असा झाला जन्मोत्सव सोहळा !

‘याची देही याची डोळा’ अनुभवावा । अपार कृतज्ञतेने मनमंदिरात साठवावा ।

श्रीगुरूंचा ७६ वा जन्मोत्सव सोहळा । साष्टांग नमन विष्णुस्वरूप गुरुमाऊलीला ॥

वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी ! हिंदु राष्ट्राचे उद्गाते आणि सनातनच्या साधकांची गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मतिथी ! गतवर्षीच्या अमृत महोत्सवाच्या स्मृती अजूनही मनःपटलावर जपणार्‍या साधकांना यंदाच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुरुमाऊलीचे डोळे भरून दर्शन घेण्याची उत्कंठा लागली होती. साधकांना आनंदप्राप्ती होण्यासाठी झटणार्‍या गुरुमाऊलीला आनंद देण्यासाठी साधक निरनिराळ्या प्रकारे भावजागृतीचे प्रयत्न करत होते ! ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी अनुभूती देणारा तो दिन कधी एकदा उजाडतो’, याची सर्व साधक आतुरतेने वाट पहात होते. अन् तो दिन आला ! ७ मे २०१८ ! निसर्गदेवानेही नेहमीचा वैशाखवणवा त्यागून आल्हाददायी वातावरण निर्माण केले होते. न जाणो का; पण सकाळपासूनच साधकांना वैकुंठलोकाचे स्मरणही होत होते ! कुणाला श्रीगुरूंचे श्रीकृष्णरूप स्मरत होते, तर कुणाला श्रीरामरूप ! भूलोकीचा वैकुंठ असलेला सनातनचा रामनाथी आश्रम त्या दिवशी अंगाखांद्यावर अनेक आभूषणे लेऊन पुलकित झाला होता ! आश्रमात निनादणारे सामवेदाचे स्वर, साधकांची लगबग, सारे वातावरण असे की, जणू विष्णुलोक भूवरी आला !

श्रीगुरूंचा जन्मोत्सव अशाच अत्यंत भावभक्तीमय वातावरणात साजरा झाला ! तो अलौकिक दर्शनसोहळा व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरेच आहेत; मात्र आमच्या अल्प बुद्धीला श्रीगुरूंची जी महती वर्णन करता आली, ती येथे कृतज्ञताभावाने अर्पण करत आहोत !!

असा झाला जन्मोत्सव सोहळा !

  • महर्षींच्या सांगण्यानुसार श्रीविष्णूच्या रूपात अवतरलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आगमनासाठी दुतर्फा उभे राहिलेले साधक डोळ्यांत प्राण आणून श्रीगुरूंची प्रतीक्षा करत होते ! परात्पर गुरूंनी ज्या वाहनातून पूर्वी सर्वत्र धर्मप्रसारार्थ भ्रमण केले, त्याच पिवळ्या सुशोभित वाहनातून त्यांचे कार्यस्थळी आगमन झाले. साधकांचे हात नकळत जुळले ! साधकांना पाहून परात्पर गुरूंनीही हात जोडले ! श्रीगुरूंचे मनोहारी रूप सर्वांनी डोळ्यांत साठवले !
  • मार्गात हाती आरतीचे तबक घेऊन उभ्या असलेल्या सुवासिनींवरही कृपावत्सल दृष्टीने आनंदवर्षाव करत श्रीगुरु सभागृहाकडे मार्गस्थ झाले !
  • कार्यस्थळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ हाती कलश घेऊन, तर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आरतीचे तबक घेऊन त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या.
  • ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग हे महर्षी मयन यांनी सांगितलेले श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरूंचे महत्त्व विशद करत असतांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे श्रीविष्णुरूपात कार्यक्रमस्थळी आगमन झाले ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनंतशयन श्रीविष्णुरूपात साधकांना दर्शन दिले अन् सहस्रो साधकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले ! ज्या विष्णुतत्त्वाची साधक प्रत्यक्ष अनुभूती घेतात, ते साक्षात् समोर अवतरलेले पाहून साधकांच्या भावाश्रूंचा बांध फुटला !
  • सनातन पुरोहित पाठशाळेच्या पुरोहितांनी ‘श्रीसूक्ता’चे पठण केले.
  • पुरोहितांकडून विष्णुसहस्रनामाचे उच्चारण होत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी सनातनच्या सर्व साधकांच्या वतीने ५ साधकांनी शरणागत भावाने नमस्कार केला.
  • त्यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अनंतशयन विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हृदयकमलावर पुष्पार्चन केले.
  • गुरुमाऊली शेषासनावर आरूढ झाल्यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांचे औक्षण केले.

 

जन्मोत्सवाला लाभला वरुणाशीर्वाद !

७ मे या दिवशी जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजिलेले यज्ञ आणि प्रत्यक्ष सोहळा संपन्न झाला. ‘आतापर्यंत सनातनने महर्षींच्या मार्गदर्शनाखाली जेवढे सोहळे, यज्ञ-याग केले, त्या प्रत्येक प्रसंगी वरुणाशीर्वाद मिळून कार्य देवाच्या चरणी रुजू झाल्याची साक्ष (प्रचीती) मिळाली आहे. ‘आज अजून कसा पाऊस आला नाही ?’, असा विचार रात्री सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी समवेत असलेल्या साधिकेकडे बोलून दाखवला. त्यानंतर अर्ध्या घंट्यातच म्हणजे रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी आश्रमाच्या परिसरात पाऊस पडला अन् विधी परिपूर्ण झाल्याची वरुणाशीर्वादरूपी साक्ष मिळाली ! एरव्ही येणारा पाऊस सर्वत्र पडतो; मात्र आशीर्वादाचा पाऊस केवळ विधी झालेल्या भागाच्या ठिकाणीच पडतो, हा सामान्य पाऊस आणि वरुणाशीर्वाद यांतील भेद आहे.

 

उपस्थित संत आणि साधक

प.पू. दास महाराज, त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, पू. पृथ्वीराज हजारे, पू. सदानंद (बाबा) नाईक, पू. (कु.) रेखा काणकोणकर, पू. (डॉ.) भगवंत मेनराय, पू. (सौ.) सूरजकांता मेनराय, पू. संदीप आळशी, पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, पू. (वैद्य) विनय भावे, पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी, पू. (श्रीमती) सुमन नाईक, एस्.एस्.आर्.एफ.च्या संत पू. (सौ.) योया वाले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे बंधू तीर्थरूप श्री. अनंत आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ. सुनीती आठवले अन् साधक.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात