परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात करण्यात आलेले विविध यज्ञ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ४ मे ते ८ मे २०१८ या कालावधीत रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात विविध यज्ञ करण्यात आले. त्या यज्ञांचे महत्त्व आणि त्यांचे वैशिष्ट्य येथे देत आहोत.

 

४ मे २०१८ – परिशिष्टोक्त ग्रहयज्ञ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ४ मे या दिवशी ‘परिशिष्टोक्त ग्रहयज्ञ’ करण्यात आला. ‘सनातनच्या साधकांना होत असलेली ग्रहपीडा नष्ट व्हावी’, या उद्देशाने हा यज्ञ करण्यात आला. या आणि अन्य यज्ञांसाठी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः संकल्प केला. या संकल्पाच्या वेळी आणि यज्ञाच्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या उपस्थित राहिल्या अन् त्यांनी यज्ञात आहुतीही दिली. महर्षींनी याविषयी सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेला संकल्प आणि सद्गुरुद्वयींची उपस्थिती यांमुळे साधकांची ग्रहपीडा नष्ट होण्यासाठी आणि नवग्रह साधनेला फलदायी ठरण्यासाठी हा यज्ञ पूरक झाला.’’

५ मे २०१८ – उग्रप्रत्यंगिरा यज्ञ

प्रत्यंगिरादेवी हे दुर्गादेवीचे रूप आहे. श्रीविष्णूच्या नृसिंह अवताराच्या वेळी प्रत्यंगिरादेवी नृसिंहाच्या नखांमध्ये अवतरली. उग्रनृसिंह असे त्याचे रूप असल्याने तिलाही ‘उग्रप्रत्यंगिरा’ असे म्हटले आहे. नृसिंहाने नखांच्या साहाय्याने हिरण्यकश्यपूचा वध केला. यामुळेच तिला ‘नारसिंही’ म्हटले आहे. कलियुगात साधकांच्या समष्टी साधनेतील आणि हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी हा यज्ञ ५ मे या दिवशी करण्यात आला.

 

६ मे २०१८ – अघोरास्त्र होम आणि संधीशांती यज्ञ

‘घोर म्हणजे भय’ आणि ‘अघोर म्हणजे जो भय दूर करतो, तो म्हणजे शिव.’ ‘अघोरास्त्र’ म्हणजे शिवाचे अस्त्र (त्रिशूळ) ! हा यज्ञ ब्राह्ममुहूर्तावर केला जातो. जन्मोत्सवानिमित्त यज्ञ साधकांना होणारे समष्टी साधनेतील आणि हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी करण्यात आला. हा यज्ञ ६ मेच्या पहाटे ४.३० ते सकाळी ६.३० या वेळेत करण्यात आला. याच दिवशी ‘संधीशांती यज्ञ’ हा ‘साधकांच्या समष्टी साधनेतील अडथळे दूर व्हावेत’, असा करण्यात आला.

 

६ मे २०१८ – साम्राज्यलक्ष्मी याग

‘सत्ययुगाच्या आरंभी वैकुंठलोकात महाविष्णु आणि महालक्ष्मी यांनी महर्षींच्या उपस्थितीत हा याग केला. त्यानंतर महाविष्णु पृथ्वीचे स्वामी झाले. तेव्हापासून पृथ्वीवर साम्राज्य करणार्‍या राजालाही विष्णुस्वरूप मानले जाते. श्री महालक्ष्मीची आठ रूपे आहेत. ती म्हणजे आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी. त्यांतील आदिलक्ष्मीला ‘महालक्ष्मी’ किंवा ‘साम्राज्यलक्ष्मी’, असेही म्हटले आहे.’ ‘साम्राज्यलक्ष्मी याग’ हा ६ मे या दिवशी ‘संपूर्ण पृथ्वीवर रामराज्याची स्थापना व्हावी’, या उद्देशाने करण्यात आला.

 

८ मे २०१८ – राजमातंगी यज्ञ

श्री राजमातंगीदेवी दशमहाविद्यांपैकी एक आहे. ती वैखरी वाणीची देवी आहे. तिच्या दोन्ही हातात पोपट असतात. पोपट हे वैखरी वाणीचे प्रतीक आहे; म्हणून राजमातंगी देवीचा वर्ण पोपटी आहे. त्यामुळे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या दोघींनी पोपटी रंगाची वस्त्रे परिधान केली होती. यज्ञस्थळी दोन पोपटही होते.

राजमातंगीदेवी विशुद्धचक्राचीही अधिदेवता आहे. विशुद्धचक्र हे वाणीशी संबंधित आहे. विष्णूच्या आकर्षणशक्तीला ‘राजमातंगी’ म्हटले आहे. मुंडकमाला या पौराणिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आढळतो की, जसे महाविष्णूचे १० अवतार आहेत, तसेच दुर्गादेवीची ‘दशमहाविद्या’ अशी १० रूपे आहेत. विष्णूच्या प्रत्येक अवताराच्या वेळी दशमहाविद्यांपैकी एक देवी अवतारकार्यात साहाय्य करते. असुरांचे वशीकरण करून त्यांचे निर्दालन करणे, हे राजमातंगीदेवीचे कार्यच आहे. याच उद्देशाने हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर करण्याकरता हा यज्ञ ८ मे या दिवशी करण्यात आला.

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.