रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राजमातंगी यज्ञ भावपूर्ण वातावरणात संपन्न

यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी डावीकडून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, यजमान दांपत्य सौ. वैष्णवी आणि श्री. श्रेयस पिसोळकर आणि सनातनचे साधक पुरोहित
डावीकडे परात्पर गुरु डॉ. आठवले, प.पू. दास महाराज यांचा सन्मान करतांना पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) गाडगीळ, तसेच बाजूला आसनस्थ असलेल्या पू. (सौ.) माई

रामनाथी (गोवा) – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, म्हणजे ७ मे या दिवशी ७६ वा जन्मोत्सव सोहळा पार पडला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ४ मेपासून विविध यज्ञ रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडले. ८ मे या दिवशी राजमातंगी यज्ञ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या यज्ञाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची वंदनीय उपस्थिती होती. हा यज्ञ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, या उद्देशाने करण्यात आला.

या यज्ञाच्या वेळी पुरोहितांनी देवता आवाहन, देवतांचे पूजन, हवन आणि पूर्णाहुती असे विविध धार्मिक विधी केले. यज्ञातील हवन करण्याच्या विधीमध्ये सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सहभाग घेतला. यज्ञाचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठशाळेच्या पुरोहितांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांच्यासह सनातनच्या संतांची वंदनीय उपस्थिती होती.

क्षणचित्रे

१. राजमातंगी देवीला पोपटी रंग प्रिय आहे. त्यामुळे यज्ञातील हवन करण्याच्या विधीमध्ये सहभागी असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पोपटी रंगाची वस्त्रे परिधान केली होती.

२. यज्ञस्थळी पोपटाच्या रूपात असलेले शुकमुनी उपस्थित होते. यज्ञाच्या वेळी करण्यात येणार्‍या मंत्रोच्चाराला मधूनमधून ते प्रतिसाद देत होते.

३. राजमातंगी यज्ञात कमळ पुष्पांची आहुती देण्यात आली.

(वाचकांना निवेदन : यज्ञाचे सविस्तर वृत्त आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांचा यज्ञस्थळी सन्मान

या यज्ञाला उपस्थित प.पू. दास महाराज यांचा सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांनी हार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला, तर प.पू. दास महाराजांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांची सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ओटी भरली आणि सन्मान केला. याप्रसंगी प.पू. दास महाराज यांनी यज्ञाला उपस्थित असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भावपूर्ण साष्टांग नमस्कार केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात