परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त संतांनी केलेला गुणगौरवपर आणि कृतज्ञतापूर्वक दिलेले भावसंदेश !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे असामान्यत्व समजून घेऊन काया, वाचा आणि मन
यांद्वारे ईश्‍वरी राज्याच्या निर्मितीच्या कार्यात सहभागी होऊया ! – परात्पर गुरु पांडे महाराज

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी वार्तालाप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जन्मोत्सवानिमित्त दिलेला आशीर्वाद ! : ‘जीवेत् शरदः शतम् ।’ म्हणजे आपल्याला ‘शरद ऋतूप्रमाणे आनंददायी शत वर्षांचे आयुष्य लाभो !’

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा या वर्षी साजरा होणारा जन्मोत्सव, म्हणजे आपत्काळाची नांदी आहे. त्या दृष्टीने साधक, वाचक, हिंतचिंतक, विज्ञापनदाते इत्यादी सर्वच जणांना एक नम्र विनंती आहे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महानता जाणून त्यांचे उतराई होण्यासाठी आपण आपापल्या क्षमतेनुसार प्रयत्नरत राहूया ! त्यांची महानता, तसेच त्यांच्या कार्याची महानता जाणून घेण्यासाठी या सृष्टीचा आणि सृष्टीचा कारभार ज्यावर अवलंबून असतो, त्या धर्माचा, तात्कालीन परिस्थितीचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. याचा अभ्यास केला, तर परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतारी पुरुष असल्याचे ध्यानी येऊन त्यांची महानता कळेल.

१. भगवंताचा सृष्टी निर्मितीमागील उद्देश जाणून घेणे, हे खरे शिक्षण !

साधकांनो, भगवंताने मानवजन्म आणि हे शरीररूपी यंत्र भगवत्प्राप्तीसाठी दिले आहे. सृष्टीची निर्मिती समष्टीसाठी साधन म्हणून, तसेच चराचरातील प्राणीमात्रांचा सृष्टीतील चैतन्याचा आस्वाद घेऊन, त्यांना आनंद मिळून त्यांचा उद्धार व्हावा, या उद्देशाने केली आहे. सृष्टी ब्रह्मचैतन्यावर सत्त्व, रज आणि तम या गुणांनी आवृत्त असल्यामुळे ती सगुण स्वरूपातून दृगोच्चर होते; म्हणूनच सृष्टीनिर्मितीचा अभ्यास करून त्याविषयी जाणून घेणे, हे खरे शिक्षण ठरते. हे शिक्षण नव्या पिढीला उत्तम माणूस अथवा समाजोपयोगी नागरिक म्हणून घडवण्याची उदात्त प्रयोगशाळा आहे.

१ अ. शिक्षणाची व्याख्या

आता ‘शिक्षण म्हणजे काय ?’, हे पाहूया ! ‘शिक्षण’ म्हणजे ‘श’ + ‘ईक्षण.’ ‘श’ म्हणजे आदि चैतन्यशक्ती, जिला ‘कृष्ण’ असेही म्हणतात. (‘कृष्ण’ म्हणजे ‘कृष्’ + ‘ण’ ! ‘कृष्’ म्हणजे आकर्षून घेणे आणि ‘ण’ म्हणजे आनंद देणे) आणि ‘ईक्षण’ म्हणजे दयार्द्र दृष्टीने पहाणे ! कृष्णाने अंशांशाद्वारे संकर्षणतत्त्वाद्वारे मायेची निर्मिती करण्यासाठी केवळ दृष्टीक्षेप केला. त्याद्वारे सृष्टी निर्माण झाली. त्याची शाश्‍वत चैतन्यशक्ती सृष्टीत अनुस्यूत, म्हणजेच ठासून भरून उरली आहे.

१ आ. अखिल ब्रह्मांडावर शासन करणारी ब्रह्मशक्ती, तिचे विश्‍वातील स्रोत आणि तेथील तिचे कार्य !

वातावरण त्रिगुणांनी भरलेले असते. काळानुसार या त्रिगुणांच्या प्रमाणात पालट होत असतो. कालमहिम्यानुसार चालू स्थितीत रज-तमाचा प्रभाव वाढण्याची अत्युच्च स्थिती येऊन ठेपली आहे. या रज-तमाचा प्रभाव न्यून करण्यासाठी ब्रह्मशक्तीच्या चैतन्यस्रोतांची वाढ व्हावी लागते. याविषयी अथर्ववेदात कांड ९, सूक्त १, श्‍लोक २२ मध्ये उल्लेख आला आहे. हा ब्रह्मशक्तीचा स्रोत म्हणजे मेधाशक्तीने (ईश्‍वराला जाणून त्याप्रमाणे कार्य करणार्‍या बुद्धीने) चैतन्ययुक्त असलेला, तसेच समत्वावर रहाणारा विद्वान पुरुष, राजा, गाय, बैल, धान्य, जव, मध (मधुर वचन, मधुर कर्मफल इत्यादी योग्य धारणा करून आचरण करणे, म्हणजेच अंतरस्थ शक्तीद्वारे ही चैतन्यशक्ती शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्याद्वारे तुम्ही कशी संकलित करता) इत्यादी आहेत.

जगावर शासन करणारी ब्रह्मशक्ती या स्रोतांद्वारे विश्‍वातील रज-तमाचा प्रभाव न्यून करू शकते. अन्यथा ही रज-तमात्मक शक्ती सर्वत्र तिचा प्रभाव निर्माण करून सर्वांना विनाशाकडे नेते.

१ इ. धर्माची व्याख्या !

‘धर्म’ या संज्ञेत दोन अक्षरे आहेत. ‘ध’ + ‘र्म’ यात ‘ध’ म्हणजे ‘चित्तात चांगल्या धारणा करणे’ आणि ‘र्म (मर्म)’ म्हणजे चैतन्यशक्तीचे गुह्य ज्ञान जाणून घेणे. चांगल्या धारणा म्हणजेच ज्याद्वारे चैतन्यशक्ती ग्रहण होईल, असे चांगले विचार करणे आणि यातील मर्म समजून घेणे म्हणजे ‘धर्म’ होय !

चांगल्या विचारांमुळे धारणेवर होणारा परिणाम ओळखून जो तसे आचरण करतो आणि ज्यामुळे मर्म कळते, तो धर्म !

‘कळे ते ना कळे । ना कळे ते कळे ।

वळे ते ना वळे । गुरुविणे ।’ – हरिपाठ

अर्थ : गुरु नसतील, तर जे कळायला हवे, ते कळत नाही. जे कळायला नको, ते कळते, तसेच जे वळायला हवे (आचरणात यायला हवे) ते वळत नाही (आचरणात येत नाही.)

१ इ १. धर्माचे मर्म जाणण्यासाठी गुरूंविना तरुणोपाय नाही !

‘यातील मर्म (गुह्य ज्ञान) जाणण्यासाठी गुरु हे चैतन्य अनुभवणारे तज्ञ असल्याने त्यांची आवश्यकता असते. गीतेत म्हटले आहे, ‘आत्म्यालाच तुमचा बंधू करा; कारण तो आनंदमय, चैतन्यमय, शाश्‍वत आहे. त्याच्याशी सख्य करा. त्याला सांगा, तो तुमची इच्छा पूर्ण करील. मनाला समर्थ करण्यासाठी मनाला निवेदन करा. ते चांगल्या गोष्टींकडे वळवा. (आत्मानुसंधान करा.) सुसंस्कृत करा.’ स्वभावदोष जाण्यासाठी गुरूंकडून योग्य दृष्टीकोन घेऊन स्वयंसूचना घ्या. त्यामुळे मनातील विकार नष्ट होतील. विकल्प येणार नाहीत. मन आत्म्याशी अनुसंधानित होईल. वाईट शक्ती मनाचा उपभोग घेणार नाहीत. कर्म ईश्‍वरेच्छेने होऊन सुयोग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यान्वित होईल. ‘योगः कर्मसु कौशलम् ।’ म्हणजे ‘प्रत्येक कर्म चांगल्या प्रकारे करणे, म्हणजे ‘योग साधणे’, असे होईल.

१ ई. राजकारण – मनुष्यप्राण्यांचे कार्य योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी राज्यकारभार राबवला जाणे आणि तो सुरळीत चालण्यासाठी सत्त्वप्रधान रजोगुण असावा लागणे

आता पुढील एका संज्ञेचा अभ्यास करूया ! या सृष्टीच्या कार्यावर भगवंताचे नियंत्रण आहे. येथील मनुष्यप्राण्यांचे कार्य योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी राज्यकारभार केला जातो. या राज्यकारभाराला ‘राजकारण’ असेही संबोधले जाते.

१ ई १. ‘राजकारण’ या संज्ञेचा अर्थ

‘राजकारण’ म्हणजे ‘राज’ + ‘कारण’ ! ‘राज’ म्हणजे ‘रजोगुण’ आणि ‘कारण’ म्हणजे ‘माया’, जी सत्त्व, रज आणि तम या गुणांनी युक्त आहे. म्हणजे सत्त्व आणि तम या गुणांद्वारे कार्य करतांना रजोगुण मध्यस्थ असतो. राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी सत्त्वप्रधान रजोगुण पाहिजे, तरच कार्य चांगले होते; कारण ‘राजा कालस्य कारणम् ।’, म्हणजे ‘राजा हाच काळाला कारण आहे’, असे म्हटले आहे.

राज्यव्यवस्था सुव्यवस्थित होण्यासाठी राजाला सत्त्वगुणाचा आधार घ्यावा लागतो. पूर्वी राजाला धर्माचरणाप्रमाणे वागून राज्यकारभार करावा लागत असे. यासाठी राजाला ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ (गो म्हणजे सत्त्वगुणी गाय ! ‘सत्त्वगुणाचे पालन’ या अर्थाने हा शब्दप्रयोग केला आहे आणि ‘ब्राह्मण’ म्हणजे साम्यावस्थेत राहून योग्य पद्धतीने न्यायदान करू शकणारा सत्त्वगुणी जीव !) अशी प्रतिज्ञा घ्यावी लागत असे. एखाद्याला ‘राजा’ म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली, तर त्या राजाने प्रत्येक जिवाचे कल्याण होऊन त्याचा उद्धार व्हावा, यासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यकारभार करणे आवश्यक आहे. या दृष्टीने त्याचे व्यवस्थापन करणे, म्हणजे राजकारण करणे, हे समजावून सांगण्याचे कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत.

२. आजची भयावह परिस्थिती

२ अ. जागतिक स्तरावर

२  अ. १ देशांतर्गत हिंदूंना आणि पर्यायाने भारताला ‘नीच’ दाखवण्याचा कुटील प्रयत्न चालू असणे

देशांतर्गत हिंदूंना, पर्यायाने भारताला ‘नीच’ ठरवण्याचा कुटील प्रयत्न चालू आहे. देशात राजकीय, सामाजिक परिस्थिती अस्थिर आणि असंतोषजनक आहे. काळाप्रमाणे युद्धनीती पालटते. ‘शत्रूशी सीमेवर दोन हात न करता त्याला अन्य मार्गांनी कसे खिळखिळे करता येईल ?’, यासाठी जगभरातील देश नियोजनबद्ध डावपेच आखत आहेत. पाकिस्तान आणि चीन या शत्रूराष्ट्रांनी भारताविरोधात ‘इलेक्ट्रॉनिक मिडिया’ (वृत्तवाहिन्या) आणि ‘सोशल मिडिया’ (सामाजिक माध्यमे) यांच्या माध्यमांतून भाडोत्री लेखक, साहित्यिक आणि पत्रकार कामाला लावले आहेत. भारतात महिला, बालके, दलित, अल्पसंख्यांक, तसेच धार्मिक स्थळे असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत, अशी स्थिती असल्याचा आभास निर्माण करून ‘भारत एक असुरक्षित आणि अस्थिर देश आहे’, अशी भारताची अपकीर्ती करणे’, हा त्यांचा उद्देश आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्या व्यतिरिक्त मध्य पूर्व आशियातील ‘वहाबी’ उग्रवादी संघटना, आयएस्आय यांच्याकडून आर्थिक साहाय्य उभे करण्यात येत आहे.

२ आ. राष्ट्रीय स्तरावर

२ आ १. संघर्ष आणि अराजकता निर्माण केली जाणे

सध्या भारतात सामान्य राजकारण चालू नाही. सत्तेसाठी राजकारण, राजकारणासाठी पक्ष, पक्षासाठी विचार, विचारांसाठी संघटना, असे आहे. या संघटनांचा ‘जगावर राज्य’ करणे’, हा हेतू आहे. लढाया आणि युद्ध करण्यामागील कारण संपत्ती, पैसा, साम्राज्यविस्तार किंवा सत्ता एवढेच नसते. बर्‍याच युद्धांमागे ही कारणे दिसतात; पण वैचारिक कारणे स्पष्ट केली जात नाहीत. ‘विषम विचारी असणे’, यातूनही शत्रुत्व, संघर्ष आणि अराजकता निर्माण होते.

२ आ २. देशद्रोही मानसिकता सिद्ध करणे

भारतात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्यावरून आक्रोश केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन करत दंगे होत आहेत आणि नक्षलवादी, तसेच आतंकवादी यांना साहाय्य केले जात आहे.

२ आ ३. असहिष्णुतेवरून हलकल्लोळ माजवणे

देशात दलित असुरक्षित असल्याचा ढोल बडवला जात असून असहिष्णुतेवरून हलकल्लोळ माजला आहे. ‘जे.एन्.यू.’नंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळला. आतंकवाद, नक्षलवाद यांना खतपाणी दिले जाते.

२ आ ४. भारतातील पत्रकार आणि लेखक यांनी भारतियांचे खच्चीकरण करणे

भारतातील पत्रकार आणि लेखक ‘चीन किती बलाढ्य, पराक्रमी अन् भारतापेक्षा शक्तीशाली आहे’, याविषयी कौतुक करून, तसेच भारतीय सैन्य आणि युद्धसामुग्री यांना कुचकामी ठरवून भारतियांचेच खच्चीकरण करण्यात दंग आहेत.

२ इ. धार्मिक स्तरावर
२ इ १. राजकारण्यांनी हिंदु धर्मियांचा स्वार्थासाठी वापर करून घेणे

राजकारणी हिंदु धर्मियांच्या धर्माविषयीच्या सज्जनतेच्या भावनांचा अपलाभ घेऊन त्यांना आश्‍वस्त करतात. आश्‍वासनांची पूर्तता न करता केवळ स्वार्थ साधतात. त्यामुळे ते स्वतःसमवेत कुटुंब, समाज, देश यांच्या नाशाला कारणीभूत होतात.

२ इ २. हिंदु धर्मियांची सद्यस्थिती

हिंदु जनता अधर्माचरणी, भौतिक सुखाच्या लालसेने आकर्षित झालेली आणि इंद्रियांद्वारे भोग भोगण्यात रमणारी अशी झाली आहे. असंघटितपणामुळे हिंदू पक्ष आणि पंथ यांत विभाजित झाले आहेत. त्यामुळे सध्याचे पुरोगामी (अधोगामी) हिंदू अहंकारयुक्त होऊन धर्माविरुद्ध प्रचार करत आहेत.

२ आ ३. अधर्माचरण वाढल्याने आणि षड्रिपूंच्या आहारी गेल्यामुळे मानव नीतीभ्रष्ट होणे

समाजातील पंथभेद, पक्षभेद, धर्मभेद यांमुळे आणि अधर्माचरणाचे प्राबल्य वाढल्यामुळे स्वभावदोष अन् अहं (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) यांचे प्रमाण वाढले आहे. अधर्माचरणामुळे मानव नीतीभ्रष्टतेने वागत आहे. त्याच्याकडून भ्रष्टाचार होत आहे. मंत्रीमंडळ ‘अधिकाधिक संपत्ती कशी वाढवू शकतो ?’, याच विचारांत आहे. शीलभ्रष्ट आणि धर्मभ्रष्ट राजकारणी पदावर राहिल्यामुळेच जनतेचे कल्याण झाले नाही.

कृतज्ञता आणि प्रार्थना

अशा अवतारी परात्पर गुरूंच्या छत्रछायेखाली आपण सर्व जण आलो आहोत. यासाठी काया, वाचा आणि मन यांद्वारे त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया अन् त्यांना अपेक्षित अशा प्रकारे ईश्‍वरी राज्याच्या निर्मितीच्या कार्यात खारीचा वाटा उचलूया ! ‘त्यांना या अवतारी कार्यासाठी दीर्घायू लाभावे’, यासाठी त्या जगत्नियंत्याला कोटी कोटी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.४.२०१८)

 

कलियुगातील भयावह परिस्थिती पालटण्याचे
अवतारी कार्य करणारे अद्वितीय प.पू. डॉ. आठवले !

१. परात्पर गुरूंच्या कार्यात ‘ईश्‍वरेच्छा’ हीच प्रधान असून त्यांनी साधकांना त्यानुसार वागण्याची शिकवण देणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून होणार्‍या कार्यात ‘ईश्‍वरेच्छा’च प्रधान आहे. त्यामुळे काळानुरूप त्यांच्याकडून घडलेल्या कार्यातील परिपूर्णता एका टप्प्यापर्यंत मर्यादित न रहाता त्यात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांद्वारे समतोलत्व आल्याने ते कार्य विविधांगांनी होते. असे कार्य केवळ अवतारी कार्याद्वारेच होऊ शकते. अनेक सूत्रांकडे ते ईश्‍वरेच्छेने बघतात आणि साधकांना समष्टी कार्यासाठी त्यानुसार वागण्याची शिकवण देतात, उदा. त्यांनी साधकांना काळानुसार क्षात्रभाव अंगी न बाणवता शरणागतभाव (अहंकारशून्यता) आणण्याची शिकवण दिली. यामुळे साधकांना कार्यासाठी अधिक ईश्‍वरी शक्ती (बळ) मिळते.

२. इतरांना स्वतःचे असामान्यत्व कळू न देणे

त्यांच्यातील सगुण वैशिष्ट्य म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्यातील समतोलत्व ! त्यामुळे सजीव मोक्षावस्थेकडे जात असतांना एकेका घटकाचा लोप झाल्यामुळे ते त्या अवस्थेशी निगडित असलेल्या विविध अनुभूती घेत आहेत. तेसुद्धा स्वतःच्या स्थितीचा प्रभाव दाखवतांना सामान्यजनांवर पुन्हा मायेचे आवरण आणून त्यांच्या मनातील स्वतःच्या स्थितीचा विसर पाडतात. अघटित, अगम्य आणि असंभव असे कार्य करूनही त्यांच्यातील असामान्यत्व ते कधीच दर्शवत नाहीत, जसे श्रीकृष्णाने त्याचे अवतारत्व कधीच दर्शवले नव्हते; मात्र त्यांचे अगम्य असे कार्य चालूच रहाते.

३. मनुष्याला ईश्‍वरप्राप्तीकडे वळवणे

३ अ. व्यक्तीचे जीवन आनंदी करणार्‍या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती करणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती केली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्याने सहस्रो व्यक्तींचे जीवन आनंदी झालेे आहे. विज्ञानयुगातील पिढीला साधनेचे महत्त्व पटण्यासाठी ते विविध विषयांवर आध्यात्मिक संशोधन करून आधुनिक यंत्राद्वारेही सिद्ध करत आहेत. वर्ष २०२३ मध्ये सत्त्वगुणाधिष्ठित, विश्‍वातील सर्वांना आनंदी करणारे आणि सर्वार्थांनी आदर्श ‘ईश्‍वरी राज्य’ (सनातन धर्मराज्य) स्थापन करण्यासाठी ते आध्यात्मिक स्तरावर अखंडपणे कार्यरत आहेत.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भौतिक सुखप्राप्तीसाठी नव्हे, तर निष्काम साधनेद्वारे आध्यात्मिक प्रगती करण्याची शिकवण देणे

‘आतापर्यंत अनेक व्यक्तींनी केवळ भौतिक सुखप्राप्ती व्हावी, त्यात येणारे अडथळे दूर व्हावेत, अशा कामनापूर्तींसाठी इतरांचे प्रबोधन केले आहे. त्यांनी दाखवलेले मार्ग हे केवळ स्वर्गापर्यंत नेणारेेच आहेत. अशा व्यक्तींनी सगुण मायेत न अडकता प्रत्येक कार्य निर्गुणाशी संबंध ठेवून (निष्कामपणे) केल्यास त्यांची मायेतील संकटे दूर होतील, त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊन या व्यक्तींना जीवनात आनंदही घेता येईल ! ‘अशा प्रकारे साधना करून आपण आपले भाग्य उजळू शकतो’, याची शिकवण परात्पर गुरु डॉ. आठवले देत आहेत.

३ इ. धर्माचरणाद्वारे प्रत्येक कृतीतील चैतन्य अनुभवायला शिकवणे

धर्माचरणाद्वारे प्रत्येक कर्म केल्यास ते चैतन्याला उजाळा देते, यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अधिक भर आहे. रांगोळी काढणे, सात्त्विक अलंकार घालणे, सात्त्विक वस्त्रे परिधान करणे, या कृतींद्वारे चैतन्याला प्रफुल्लित करायचे. प्रत्येक कर्मातून चैतन्य द्विगुणित करायचे. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे आवरण काढून सर्वांचा मिलाप करायचा ?’, याविषयी ते कृतीद्वारे दाखवून देत आहेत.

३ ई. ‘जीवप्राणीमात्रावरील मायेचे आवरण नाहीसे करून चराचरात चैतन्य प्रगट करणे’, हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचा उद्देश असणे

‘प्रत्येक जीवप्राणीमात्राला जीवनातील आनंद मिळावा, सर्व जण उल्हसित व्हावेत, हे जगत आनंदमय व्हावे, चराचरात चैतन्य प्रगट व्हावे’, हा त्यांच्या कार्याचा उद्देश आहे; म्हणून ते मायेच्या आवरणाखाली दडलेल्या चैतन्याला उघडे करत आहेत. ‘या आवरणाला नाहीसे करणे’, ही त्यांची लीला आहे. ‘आवरणाला नाहीसे करणे, म्हणजेच वस्त्रहरण करणे !’ परात्पर गुरु डॉ. आठवले करत असलेल्या अवतारी कार्यात सार्‍या जगाचे वस्त्रहरण चालू आहे. त्यासंबंधी ते साधकांकडून साधनेद्वारे ‘प्रक्रिया’ (स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन करणे) राबवत आहेत.

३ उ. व्यक्तीने कृती चैतन्यमय केल्यास वातावरणातील सात्त्विकता आणि चैतन्य यांत वाढ होणे शक्य !

‘चैतन्य कसे घ्यायचे ? आनंद कसा मिळवायचा ?’, हे कृतीद्वारे ते दाखवून देतात. याद्वारे ‘आपल्या हातून होणारी प्रत्येक कृती चैतन्यमयच कशी होईल ?’, यावर त्यांचा कटाक्ष आहे. यामुळे प्रत्येक जीव आनंदी होईल. सात्त्विकता, चैतन्य वाढीस लागेल. समाजमन सिद्ध होऊन त्याचा परिणाम जिवावर होईल आणि पिढ्यान्पिढ्या धर्माचरण चालू राहील. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर परिणाम होऊन सर्वत्र रामराज्याप्रमाणे स्थिती दिसेल.

४. समाजव्यवस्था सुधारण्यासाठी समाजमन जागृत करणे

४ अ. समाज, राष्ट्र आणि धर्म या स्तरांवर चाललेल्या अयोग्य अन् विकृत गोष्टींविषयी प्रबोधन करून हिंदूंना वास्तवाचे भान करून देणे

धर्मांधांकडून होणार्‍या ‘लव्ह जिहाद’सारख्या ‘जिहादी’ कारवायांमुळे उद्भवणार्‍या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी प्रबोधन करणे, मनोविकृतीमुळे समाजातील सर्वच स्तरांवर चाललेल्या समाजविघातक अतिरेकी कारवायांविषयी ‘सनातन प्रभात’, ‘फेसबूक’, ‘इंटरनेट’ यांसारख्या माध्यमांतून प्रबोधन करणे, काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे दर्शन घडवणार्‍या चित्रांचे प्रदर्शन भरवणे, तरुण पिढीसमोर क्रांतीकारकांचा इतिहास दृगोच्चर होण्यासाठी त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवणे, समाजकारण आणि राजकारण यांतील भ्रष्टाचार उघडकीस आणणे, देवतांची होणारी विटंबना थांबवण्यासाठी धर्मशास्त्र सांगून धर्मजागृती करणे, वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये सहभाग घेऊन जनप्रबोधन करणे, आदी अविरतपणे चाललेल्या प्रयत्नांमुळे समाजात खर्‍या परिस्थितीचे भान निर्माण होऊन हिंदू जागृत होत आहेत.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हिंदूंमधील कृतीशीलता वाढीस लागली असून ईश्‍वरी राज्याची निर्मिती होणार आहे !

सद्यस्थिती पालटण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले कार्यबद्ध आहेत. त्यांनी सांगिल्यानुसार साधक धर्माचरणाविषयी प्रबोधन करत आहेत. यामुळे समाजातील कृतीशीलता वाढीस लागली आहे. त्यामुळे ईश्‍वरी राज्याची निर्मिती होऊन रामराज्याप्रमाणे काळ येईले. हे कार्य पिढ्यान् पिढ्या सृष्टीचक्राला अनुसरून होणार आहे; कारण या ईश्‍वरी कार्याचे नियोजन त्यानुसार करण्यात आले आहे.

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त कल्याण
येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेला संदेश !

तीर्थरूप प.पू. डॉ. जयंतराव यांस,

स.न.वि.वि.

तीर्थरूप प.पू. डॉ. जयंतराव यांना ७६ व्या जन्मदिनानिमित्त अनेक अंतर्भूत शुभेच्छा ! जीवेत् शरदः शतम् । (अर्थ : तुम्हाला शंभर वर्षांचे आयुष्य लाभो !) वर्तमान स्थितीत हिंदु धर्माला आलेली ग्लानी दूर करण्याचे कार्य आपण सचोटीने तन, मन इत्यादी गोष्टी व्यय करून करत आहात, तसेच आपल्या मार्गदर्शनाखाली देश-विदेशांतील साधकवर्ग आध्यात्मिक प्रगती करून घेत आहे. हे कौतुकास्पदच आहे. वर्तमान स्थितीत हिंदु धर्माची सांप्रतची स्थिती पाहता आपण जणूकाही एक दीपस्तंभच आहात. आपण करत असलेले कार्य अत्यंत तळमळीने पुढे नेण्याचा आपला मानस असून आपल्या साधकांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन अत्यंत सकारात्मक असतो, हे विशेष ! ‘आपण ९० वर्षांचा तरी टप्पा पार करावा’, अशी आनंददायी इच्छा व्यक्त करतो. आपल्या कार्याला अनेक शुभाशीर्वाद देतो. शुभं !

– आपला हितचिंतक,

दादाजी (योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन) (३.५.२०१८)

 

साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती सतत कृतज्ञ रहावे ! – प.पू. रामभाऊस्वामी

२८.४.२०१८ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ दक्षिण तमिळनाडूच्या दौर्‍यावर असतांना त्यांनी तंजावूर येथील समर्थ संप्रदायातील थोर संत प.पू. रामभाऊस्वामी यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. वर्ष २०१६ मध्ये प.पू. रामभाऊस्वामी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत’, यासाठी ३ दिवस ‘उच्छिष्ट गणपति यज्ञ’ केला होता. तेव्हापासून प.पू. रामभाऊस्वामी प्रतिदिन परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण आणि दैनिक सनातन प्रभातचे वाचन करतात. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासह असलेले साधक यांना पाहून स्वामींना फार आनंद झाला.

१. प.पू. रामभाऊस्वामी यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव !

डावीकडून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासह अभ्यास दौर्‍यावर असलेल्या गटातील साधक श्री. दिवाकर आगावणे, श्री. सत्यकाम कणगलेकर आणि श्री. विनायक शानभाग यांना मार्गदर्शन करतांना प.पू. रामभाऊस्वामी
१ अ. प्रतिदिन परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करणे

‘मी ‘डॉ. आठवले यांना आठवले नाही’, असे एकही दिवस होत नाही. मला प्रतिदिन दैनिक सनातन प्रभात टपालाने मिळते. मी प्रतिदिन दैनिक सनातन प्रभात वाचतांना मला त्यांचे स्मरण होते. मी ‘डॉ. आठवले यांची आठवण काढतो’, हे तुम्हाला कळावे; म्हणून डॉ. आठवले यांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवले.

१ आ. ध्यान करतांना ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ समोर ठेवणे

मी ज्या ठिकाणी ध्यानाला बसतो, तेथे (आश्रमात एकीकडे एक छोटी गुहा आहे, तेथे) ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ घेऊन बसतो. ते समोर असतांना होणारा आनंद काय वर्णावा !

२. प.पू. रामभाऊस्वामी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वर्णिलेली थोरवी !

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात दासबोधात वर्णिलेली सदगुरुंची सर्व लक्षणे आहेत

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या थोर गुरूंची महती वर्णन करणे अशक्य आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात समर्थ रामदासस्वामी यांनी दासबोधात वर्णिलेली सद्गुरूंची सर्व लक्षणे आहेत.

२ आ. हिंदूंसाठी कार्यरत असलेले एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !

लोककल्याणासाठी, हिंदूंसाठी सतत कार्यरत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे सध्या अजून दुसरे कुणीही नाही.

३. प.पू. रामभाऊस्वामी यांनी सनातनच्या साधकांच्या भाग्याचे केलेले वर्णन !

३ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले जीवनात येणे’, ही साधकांची पूर्वपुण्याई !

सनातनच्या साधकांना गुरु शोधत कुठे जावे लागले नाही, तर परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः त्यांच्या जीवनात आले आहेत. हे साधकांनी मागील अनेक जन्मांत केलेल्या पुण्याचे फळ आहे.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांचे जन्मजन्मांतरीचे नातेआहे !

‘सनातनचे सर्व साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे का आले ? काही साधक त्यांच्या समवेत आश्रमात रहायला तरी का आले ? मीही त्यांच्या संपर्कात कसा आलो ?’, या सर्व प्रश्‍नांचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे जन्मजन्मांतरीचे बंधन ! सर्व साधक गेल्या अनेक जन्मांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत होते. त्यामुळे कुठेतरी पुन्हा आपल्याला संधी मिळाली आहे.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना सेवा उपलब्ध करून दिलीआहे !

साधकाला जरी ‘सेवा करूया’, असे वाटले, तरी त्याला तशी संधी लाभली पाहिजे. ‘सेवा करण्याची संधी मिळणे’, हे फार कठीण असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना सेवा करण्याची संधी आणि सौभाग्य दोन्हीही स्वतःहून उपलब्ध करून दिले आहे.

प्रभु श्रीरामचंद्राच्या काळात एकच हनुमंत होता. आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे दास्यभावाने सेवा करणारे अनेक हनुमंत आहेत. ‘जगी दास तो सर्वोत्तमाचा ।’ असे समर्थांनी म्हटले आहे. ‘सर्वोत्तम असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करण्याची संधी लाभणे’, हे सनातनच्या साधकांचे अहोभाग्य आहे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करणे

मला सनातनच्या साधकांना पाहून वाटते, ‘मी युवा असतो, तर मलाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याजवळ राहून त्यांची सेवा करायला मिळाली असती.’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महानता जाणून साधकांनी त्यांच्याप्रती सतत कृतज्ञ रहावे.’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.५.२०१८)

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त
परम श्रद्धेय प्रवर डॉ. श्री. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांचा संतसंदेश !

परम श्रद्धेय प्रवर डॉ. श्री. गुणप्रकाश चैतन्य महाराज

परात्पर ब्रह्मच गुरुतत्त्वामध्ये परावर्तीत होते. ब्रह्मातीत असलेले भविष्यातील ज्ञानाला वर्तमानकाळातसुद्धा पाहू शकतात. त्याचेच अनुकरण करणारे साधकजन साधनारत असल्याने भूत आणि भविष्य यांना वर्तमान स्थितीत पाहू शकतात. या सर्व चिदंश शक्ती आहेत. समाजामध्ये आपल्या लेखन कार्याने आश्‍चर्यचकित करणार्‍या सहस्रो ग्रंथांचे लेखन करणारे कोणत्याही ऋषि प्रवराप्रमाणेच आहेत.

धर्मसंघ परिवाराकडून प.पू. गुरुदेवांच्या ७६ व्या पावन जन्मोत्सवाच्या अनंत शुभेच्छा पाठवतांना आम्ही परमश्रेष्ठ प्रभूला आपल्याला दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना करतो. आपण अशाच प्रकारे अनादि संस्कृतीच्या संबंधी मार्गदर्शन करत रहा. ज्यामुळे निरंतर अज्ञानी लोकांच्या मनातील मलीनता दूर होऊन ते परम प्रभूच्या दिशेने प्रवृत्त होतील. आपल्याकडून होणारे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.

जन्मोत्सवाच्या अनंत शुभेच्छा प्रदान करतांना आम्ही पुनश्‍च धन्यतेचा अनुभव घेत आहोत !’

– परम श्रद्धेय प्रवर डॉ. श्री. गुणप्रकाश चैतन्य महाराज, भादरा, राजस्थान येथील ‘अखिल भारतीय धर्मसंघ’, तसेच ‘करपात्री फाउंडेशन’चे उत्तराधिकारी.