हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे त्याग करण्याची सिद्धता आवश्यक ! – श्री. अभय वर्तक,सनातन संस्था

भामाठाण, श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे पहिली ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’ !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने उपक्रम

डावीकडून श्री. सांगळे, श्री. वर्तक, श्री. बनसोडे, कु. कोरगावकर सूत्रसंचालन करतांना सौ. वानखडे

श्रीरामपूर – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील पहिली ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’ येथून जवळच असलेल्या भामाठाण येथे पार पडली. या सभेला सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी संबोधित केले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे त्याग करण्याची सिद्धता आवश्यक ! – श्री. अभय वर्तक

हिंदूंना लालूच दाखवून होणार्‍या धर्मांतराचे षड्यंत्र नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याचे लोण अगदी भामाठाणच्या जवळ पोहोचले आहे. अशा वेळी ग्रामस्थांनी जागरूक राहून हे प्रकार थांबायला हवेत. हिंदूंनी कपाळावर टिळा लावणे आदी धर्माचरणाच्या कृती चालू केल्यास त्यांना ईश्‍वराचे आशीर्वाद लाभतील. आपल्या देशाला लाभलेल्या शौर्यपूर्ण इतिहासाचे स्मरण करून स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे त्याग करण्याची सिद्धता केल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते, असे प्रतिपादन श्री. अभय वर्तक यांनी या वेळी केले.

देशभरात मुली तसेच स्त्रिया यांवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, आज ४ वर्षांच्या बालिकेपासून ७५ वर्षाची वृद्धाही सुरक्षित नाही, अशा वेळी इतर कोणाच्या साहाय्याची वाट न पहाता स्त्रियांनी स्वत:च सक्षम होणे आवश्यक आहे, तरच स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबतील, असे विचार हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी व्यक्त केले.

या वेळी व्यासपिठावर सरपंच श्री. दिनकरराव बनसोडे, तसेच श्री. रामनाथ सांगळे उपस्थित होते. सभा यशस्वी होण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठान आणि पवनपुत्र प्रतिष्ठान या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. सभेला २०० हून अधिक राष्ट्राभिमानी उपस्थित होते.

विशेष !

हिंदु राष्ट्र जागृती सभेसाठी स्थानिक १२ युवकांनी आसपासच्या ७ गावांमध्ये प्रसारफेरी काढून धर्मप्रसार केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात