सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर समाजकंटकांकडून जीवघेणे आक्रमण

तक्रार प्रविष्ट होऊन १५ दिवसांनंतरही पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक नाही !

रामनाथी – येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर समाजकंटकांनी कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांंद्वारे जीवघेणे आक्रमण केले. या वेळी जमावाने त्यांच्याकडील भ्रमणभाषसंच हिसकावून घेतले, तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड केली. याविषयी श्रीमती पै यांनी शिवराम बांदोडकर, शानू गावडे, रोहिदास गावडे, सरिता गावडे आणि रेखा गावडे (सर्व रहाणार बोकडबाग, बांदोडा, फोंडा, गोवा.) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार श्रीमती पै यांनी गावात एके ठिकाणी भूमी विकत घेतली आहे. त्या भूमीचे सर्वेक्षण होत असल्याचे सरिता नामक एका महिलेने श्रीमती पै यांना ३० मे या दिवशी कळवले. श्रीमती पै सकाळी ११.३० वाजता घटनास्थळी पोहोचल्या. श्रीमती सरिता यांच्याशी चर्चा करण्यासाठी श्रीमती पै त्यांच्या चारचाकी गाडीतून बाहेर आल्या. थोड्याच वेळात शिवराम बांदोडकर, शानू गावडे, रोहिदास गावडे, सरिता गावडे आणि रेखा गावडे, तसेच त्यांच्यासोबत आणलेले ५० समाजकंटक यांनी श्रीमती पै यांच्या चारचाकी गाडीच्या चाकांची हवा काढली. हे पाहून श्रीमती पै गाडीत जाऊन बसल्या. तेव्हा जमावाने कोयते, कुर्‍हाडी आणि लाठी घेऊन त्यांच्यावर आक्रमण करत त्यांना गाडीच्या बाहेर खेचले. या जमावातील काही महिलांनी त्यांना रस्त्याच्या बाजूला नेऊन मारहाण केली, तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्याचा प्रयत्न केला. जमावाने त्यांना जबर मारहाण करत त्यांचे दोन्ही भ्रमणभाष संच हिसकावून घेतले. ‘ही भूमी तुला खरेदी करू देणार नाही. परत या भूमीवर पाय ठेवल्यास तुझी हत्या करू’, अशी धमकी दिली. श्रीमती पै यांनी कशीबशी स्वतःची सुटका करून पोलीस ठाणे गाठले आणि तेथे तक्रार नोंदवली.

यासंदर्भात पोलिसांनी १ जून या दिवशी प्रथमदर्शी अहवाल नोंदवला असूनही अद्यापपर्यंत (१३ जूनपर्यंत) कोणालाही अटक केलेली नाही.

या प्रकरणी खालील सूत्रांविषयी पोलिसांकडून
तपासामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात दिसून आलेली अक्षम्य दिरंगाई !

१. श्रीमती पै यांच्यावर कोयते, कुर्‍हाडी आणि लाठी घेऊन प्राणघातक आक्रमण करणार्‍या व्यक्तींची संपूर्ण नावे आणि पत्ता देऊनही पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही, तसेच ‘हत्या करण्याचा प्रयत्न’ म्हणूनही त्या व्यक्तींच्या विरोधात भारतीय दंड विधानाचे कलम ३०७ अंतर्गत गुन्हा नोंदवलेला नाही.

२. आक्रमण करणार्‍याव्यतिरिक्त ३ जणांनी गावात अफवा पसरवून कोयते, लाठ्या-काठ्या घेऊन जमाव आणला आणि कोणी टायर फोडायचे, कोणी दोन्ही भ्रमणभाष संच हिसकावून घ्यायचे, गाडीच्या काचा कोणी फोडायच्या, श्रीमती पै यांना बाहेर खेचून सामूहिक मारहाण कोणी आणि कशी करायची, हे ठरवले होते, तसेच गळ्यातील सोन्याची चेन आणि बांगड्या चोरण्याचा प्रयत्न करणे, अंगावरील कपडे फाडणे आदी सर्व गोष्टी पूर्वनियोजित होत्या. या प्रकरणी संबंधितांचे नाव-पत्ता देऊनही पोलिसांनी त्या व्यक्तींना अटक केलेली नाही, तसेच प्रथमदर्शी अहवालात दंड विधानाचे कलम ३४ आणि १२० ब यांचा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला नाही.

३. मारहाण करण्यासाठी आलेल्यांपैकी १०-१२ महिला होत्या. त्यातील २ महिलांची नावे फिर्यादीने लेखी तक्रारीत दिली असतांनाही त्यांच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच आरोपींनी मारहाण करतांना फिर्यादीच्या अंगावरील फाटलेले कपडे आणि त्यांचा फोडलेला चष्मा पोलिसांना फिर्याद प्रविष्ट करतांना दाखवूनही त्यांनी आजपर्यंत पंचनामा करून या गोष्टी कह्यात घेतलेल्या नाहीत, तसेच पोलिसांनी आरोपींची ओळख परेडही घेतलेली नाही. या आरोपींकडून इतरांची नावेही शोधून काढण्यात आलेली नाहीत. पोलिसांनी एकूणच या गंभीर प्रकरणातील आरोपींना कायद्याप्रमाणे शिक्षा होण्यासाठी आवश्यक तसा विनाविलंब तपास न करता त्यातील काही जणांना केवळ एकदाच पोलीस ठाण्यात बोलावून सोडून दिले.

४. या प्रकरणातील विलंबामुळे फिर्यादीने एकदाच पाहिलेल्या आरोपींचा त्याला विसर पडू शकतो आणि त्यामुळे केस कमकुवत होऊ शकते. यामागे पोलिसांचा ‘तक्रारदाराचे खच्चीकरण करणे, अन्य आरोपींची नावे शोधून न काढणे’, हा उद्देश दिसून येतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात