संस्कृत मंत्रांच्या उच्चारणामुळे स्मरणशक्ती वाढते !

अमेरिकेचे न्युरो संशोधक डॉ. जेम्स हार्टजेल यांचा दावा

  • पाश्‍चात्त्य संस्कृतीचा उदोउदो करणारे आधुनिकतावादी हिंदु संस्कृतीची ही महानता लक्षात घेतील का ?
  • जगभरात महान हिंदु संस्कृतीवर संशोधन होत असतांना भारतात मात्र या संस्कृतीवर अज्ञानी पुरो(अधो)गामी टीका करतात, यासारखे दुर्दैव ते कोणते ? भारतियांना या हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात येण्यासाठी त्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

अमेरिका – वैदिक संस्कृत मंत्रांचे उच्चारण केल्याने स्मरणशक्तीमध्ये वाढ होते, असा दावा अमेरिकेतील एका वृत्तपत्राने केला आहे. या वृत्तानुसार डॉ. जेम्स हार्टजेल या न्युरो संशोधकाने त्यांचे हे संशोधन अमेरिकेच्या एका मासिकात प्रसिद्ध केले आहे.

१. डॉ. जेम्स हार्टजेल यांनी संशोधनानंतर ‘द संस्कृत इफेक्ट’ नावाची संज्ञा सिद्ध केली आहे. ‘वैदिक मंत्राचे सतत उच्चारण केल्याने खरेच स्मरणशक्ती वाढते का ? याविषयीचा शोध घेण्यासाठी डॉ. जेम्स आणि इटलीच्या ट्रेन्टो विद्यापिठातील त्यांचा सहकारी या दोघांनी भारतातील ‘नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर’च्या डॉ. तन्मय नाथ आणि डॉ. नंदिनी चटर्जी यांच्या समवेत एक गट स्थापन केला.

२. तज्ञांच्या या गटाने ४२ स्वयंसेवकांची निवड केली. यात देहलीच्या एका वैदिक विद्यालयातील २१ प्रशिक्षित वैदिक ब्राह्मण आणि एका महाविद्यालयातील २१ विद्यार्थी यांना संस्कृत उच्चारण करण्यासाठी निवडण्यात आले. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्व ४२ स्वयंसेवकांच्या मेंदूंची ‘ब्रेन मॅपिंग’ करण्यात आले.

३. या गटाने जेव्हा २१ ब्राह्मण आणि अन्य २१ विद्यार्थ्यांची ब्रेन मॅपिंग चाचणी केली, तेव्हा त्यांना दोहोंमध्ये बरेच अंतर आढळून आले. जे विद्यार्थी संस्कृत उच्चारण करण्यात पारंगत होते, त्यांची स्मरणशक्ती, भावना आणि निर्णय घेण्याची क्षमता नियंत्रित करणार्‍या मेंदूचा भाग अधिक मजबूत दिसून आला. विशेष म्हणजे त्यांच्या मेंदूच्या संरचनेत झालेले पालट तात्कालिक नव्हते. संशोधकांच्या मते, जे विद्यार्थी वैदिक मंत्रांमध्ये पारंगत होते, त्यांच्यातील पालट दीर्घकाळ रहाणारे होते. याचा अर्थ संस्कृतमध्ये पारंगत विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता, आकलन क्षमता दीर्घकाळपर्यंत टिकून रहाणारी होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात