(म्हणे) ‘मला राज्यात सनातन संस्थेचे राज्य आल्याचा भास होत आहे !’ – छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे घोटाळेबहाद्दर नेते छगन भुजबळ यांची मुक्ताफळे !

  • महाराष्ट्रात इसिसचे एकामागोमाग एक आतंकवादी पकडले गेल्यानंतर कधी छगन भुजबळ किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत आवाज उठवला आहे का ? 
  • छगन भुजबळ यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती, मनी लाँड्रिंग आणि महाराष्ट्र सदन घोटाळा यांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत; मात्र त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. अशा घोटाळेबहाद्दरांची सनातन संस्थेवर आरोप करण्याची पात्रता तरी आहे का ?

मुंबई – जनतेमध्ये पोलिसांचा दरारा राहिलेला नाही. सत्तेतील लोक अग्रलेख लिहीत आहेत. शिवाय पोलीस मार खात आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ‘सामना’च्या अग्रलेखातून एकमेकांची उणीधुणी काढली जात आहेत. त्यामुळे मला सनातन संस्थेचे राज्य आले असल्याचा भास होत आहे. साधकांच्या घरात स्फोटके सापडत आहेत. सरकारचे ‘मेक इन इंडिया’ बॉम्ब बनवण्यासाठी आहे का ? सरकारने राज्य दिवाळखोरीकडे ढकलले जात असतांना दिवसाढवळ्या गोळ्या झाडणारे सनातनी लोक घरात बॉम्ब बनवत आहेत. त्यामुळे राज्यात सनातनचे राज्य आहे का ?, असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ३० नोव्हेंबरला विधानसभेत उपस्थित केला. विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेच्या वेळी ते बोलत होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावरही टीका !

या वेळी भुजबळ यांनी राज्यात ‘माझ्या शेतातील आंबे खा, तुम्हाला मूल होईल’, अशी अंधश्रद्धा बोलून दाखवली जात आहे. त्यांना मोकाट सोडले जात आहे. हे लोक अंधश्रद्धा पसरवत आहेत’, अशी टीका पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे नाव न घेता केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात