नितेश गमरे यांना नोकरीतून काढून टाका अन्यथा आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाही ! – पेढे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी संस्थाचालकांना ठणकावले

  • पेढे (ता. चिपळूण) येथील नितेश गमरे या शिक्षकांनी फेसबूकवर हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरल्याचे प्रकरण
  • समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संस्था आणि गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर
संस्थेचे अध्यक्ष श्री सहस्त्रबुद्धे यांना समस्त हिंदुत्व निष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीचे सुरेश शिंदे. संतोष घोरपडे, सनातन संस्थेचे ज्ञानदेव पाटील अणि समस्त धर्मप्रेमी
संस्थेचे अध्यक्ष श्री अभय सहस्त्रबुद्धे यांना निवेदन देताना पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ

चिपळूण – तालुक्यातील पेढे-परशुराम येथील आर्.सी. काळे विद्यालयातील संस्कृत विषयाचे शिक्षक नितेश गमरे यांनी ‘फेसबूक’वर हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह लिखाण टाकल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या आहेत. या घटनेमुळे पेढे-परशुराम पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकवटून २५ एप्रिल या दिवशी ‘भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ पेढे परशुराम’, या संस्थेचे अध्यक्ष श्री. अभय सहस्रबुद्धे यांना एक निवेदन देण्यात आले. या वेळी संस्थेचे प्राथमिक विभाग चेअरमन श्री. विलास भोसले, उपाध्यक्ष श्री. विष्णु कोकीरकर, संस्थेचे पदाधिकारी श्री. मधुकर वारे उपस्थित होते. या निवेदनाच्या माध्यमातून संबंधित शिक्षकांना नोकरीवरून काढून टाका; अन्यथा मुलांना शाळेत पाठवणार नाही, असे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी संस्था चालकांना ठणकावून सांगितले. त्याच वेळी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीनेही संस्थेला निवेदन देण्यात आले. त्या वेळी पेढे पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे प्रतिनिधी, धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे निवेदन देते वेळी पेढे गावचे माजी सरपंच श्री. जनार्दन मालवणकर, शिवसेना शाखाप्रमुख श्री. सुनील नरळकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप काणेकर, राम पडवेकर, धर्मप्रेमी संदेश सुर्वे, सुरेश माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष घोरपडे, सनातन संस्थेचे श्री. ज्ञानदेव पाटील, श्री. केशव अष्टेकर, श्री. महेंद्र चाळके, योध्दा प्रतिष्ठानचे श्री. महेंद्र साळुंके यांच्यासहीत अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रकरणी पेढे येथील धर्मप्रेमी श्री. सुरेश माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नितेश गमरे या शिक्षकावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून त्यांना १५ एप्रिल या दिवशी अटकही झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.

हे निवेदन देतांना पेढे गावचे सरपंच श्री. प्रविण पाकळे यांनी सांगितले की, सदर शिक्षकांना नोकरीतून कमी करून ग्रामस्थांना न्याय देण्याची मागणी संस्थाचालकांकडे केली.

या वेळी पेढे गावचे सरपंच श्री. मंगेश कोकीरकर म्हणाले, ‘‘या घटनेच्या अगोदरही संबंधित शिक्षकाकडून मुलांचा टिळा पुसणे, हातातील दोरे कापणे अशा धार्मिक भावना दुखावणार्‍या घटना घडल्या आहेत. आम्ही मुलांना संस्कार होण्यासाठी शाळेत पाठवत असतो, शिक्षकाकडूनच असे प्रकार घडत असतील, तर आमच्या मुलांना शाळेत कसे पाठवणार ?

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे म्हणाले, ‘‘या घटनेने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतप्त भावना आहेत. हिंदू सहनशिल असल्याने अशा वारंवार घडणार्‍या घटनांकडे दुर्लक्ष करतात. फेसबूकवरील लिखाणाने हिंदु देवतांविषयी अश्‍लाघ्य लिखाणामुळे हिंदूंच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे शिक्षकाला तातडीने कामावरून काढून टाका, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना करत आहेत.’’

याविषयी झालेल्या चर्चेनंतर पेढे गावचे सरपंच श्री. प्रवीण पाकळे म्हणाले, ‘‘या घटनेने तमाम हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत; म्हणून ही हिंदुत्वनिष्ठ मंडळी येथे आली आहेत. येथे आलेले हिंदुत्वनिष्ठ जी सूत्रे मांडत आहेत, त्या सर्वांच्या भावनांचा विचार करून पंचक्रोशीला अपेक्षित असा निर्णय संस्थेने घ्यायला हवा.

या चर्चेत सहभाग घेतांना हिंदु जनजागृती समितीचे दत्ताराम घाग म्हणाले, ‘‘अन्य धर्मिय अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर करून हिंदु समाजास वेठीस धरतात आणि एवढी मोठी घटना घडूनही आपण सर्वजण मवाळ का ? हिंदूंच्या भावनांविषयी सरकारही लक्ष देत नाही. हिंदूंना न्याय मिळणार आहे कि नाही ?

सनातनचे श्री. विष्णु साळुंके म्हणाले की, पंचक्रोशीबाहेरचीही मुले या शाळेत येत असतात. पंचक्रोशी बाहेरचे पालकही स्वत:च्या मुलांविषयी निर्णय घेऊ शकतात.

पेढे येथील धर्मप्रेमी श्री. दीपक वारे संस्थेचे अध्यक्ष श्री. सहस्रबुद्धे यांना म्हणाले, ‘‘जनमताचा विचार करणे अपेक्षित आहे. तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात, तर तुम्ही आम्हाला अपेक्षित असा निर्णय घेणे अपेक्षित आहे.’’

परशुरामचे सरपंच श्री. गजानन कदम म्हणाले, ‘‘पंचक्रोशीला अपेक्षित असा निर्णय घ्या, नाहीतर मुलांना शाळेत पाठवायचे कि नाही, याचा निर्णय आम्ही घेऊ.’’

कोणालाही पाठीशी न घालता योग्य तो निर्णय घेणार ! – संस्थेचे अध्यक्ष श्री. अभय सहस्रबुद्धे

संस्थेचे अध्यक्ष श्री. अभय सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘ही पंचक्रोशीतील सर्वांची संस्था आहे. घडलेला प्रकार निंदनीय आहे. त्यासंदर्भात कारवाई निश्‍चितपणे करणार आहोत. प्रक्रिया चालू आहे. कायदेशीर सल्ला घेऊन योग्य रितीने निर्णय घेणार आहोत. कोणालाही पाठीशी न घालता योग्य तो निर्णय घेणार जनमताचा आदर करून कायदेशीर गोष्टी तपासून पुढील कारवाई करणार. आम्ही हा निर्णय पंचक्रोशीतील ग्रामस्थांना एकत्र बसवून घेऊ.

यानंतर पेढे ग्रामपंचायत सदस्य धर्मप्रेमी श्री. विनायक भोसले म्हणाले, ‘‘हा विषय हिंदूंचा आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदू येथे बोलू शकतो. हिंदुत्वनिष्ठ मंडळी बाहेरची नसून हा विषय हिंदूंच्या धार्मिक भावनेचा असल्याने त्यांचे मतही विचारात घेणे आवश्यक आहे. हिंदूंच्या देवतांचे अपमान करणारे शिक्षक विद्यालयात नको, ही आमची ठाम मागणी आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात