एक साधक नियमित वापरत असलेल्या उपनेत्राच्या (चष्म्याच्या) काचेवर सप्तरंगी वर्तुळे उमटणे

वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटनेमागील कारण
जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेले संशोधन

जिवाची साधना जसजशी वृद्धींगत होत जाते, तसतशी त्याच्याकडून अधिकाधिक सात्त्विकता प्रक्षेपित होऊन त्याच्या संपर्कातील वस्तू, वास्तू आणि आसपासचे वातावरण चैतन्यमय बनू लागते. मंदिरे, संतांची समाधीस्थळे आणि संत रहात असलेले आश्रम चैतन्यमय झालेले असतात अन् सर्वत्र चैतन्याचे प्रक्षेपण करत असतात. थोडक्यात साधनेमुळे व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे तिच्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण सकारात्मक पालट होत जातात आणि त्याचा सुपरिणाम सभोवतालच्या घटकांवरही होऊ लागतो. या परिणामांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी होईल, या उद्देेशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या, अन्य संतांच्या आणि काही साधकांच्या संदर्भातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा अभ्यास केला आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण घटना, वस्तू, वास्तू किंवा वातावरण यांतील असे वैशिष्ट्यपूर्ण पालट सर्वसाधारण व्यक्तीलाही समजून घेता यावेत, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन चालू आहे. गोव्यातील रामनाथी येथील सनातन आश्रमात घडलेल्या अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण घटनेचा अभ्यास करण्यात आला. तो पुढे दिला आहे.

१. वैशिष्ट्यपूर्ण घटना

उपनेत्राच्या दोन्ही काचांवर सप्तरंगी (इंद्रधनुष्यातील रंगाप्रमाणे) वर्तुळाकार आकृत्या उमटल्या आहेत. (या आकृत्या गोलात मोठ्या करून दाखवल्या आहेत.)

साधक नियमित वापरत असलेल्या उपनेत्राच्या (चष्म्याच्या) काचेवर सप्तरंगी वर्तुळ उमटूनही उपनेत्र वापरतांना नेहमीप्रमाणेच दिसणे आणि असा पालट नेत्रतज्ञांनीही प्रथमच पाहिल्याचे सांगणे

माझ्या उपनेत्राच्या दोन्ही काचांवर बुबुळांच्या समोर सप्तरंगी (इंद्रधनुष्यातील रंगाप्रमाणे) वर्तुळाकार आकृत्या उमटल्या आहेत. त्या अधिक ठळक आणि सुस्पष्ट आहेत. उपनेत्राच्या काचांमध्ये असे पालट झाले असूनही मला ते उपनेत्र घातल्यावर नेहमीप्रमाणे दिसते. केवळ उपनेत्र काढल्यावर त्याची काच पाहिली असता त्या काचेतील पालट दिसतात. उपनेत्राची काच नवीन बनवून घेतल्यापासून बराच कालावधी झाला; परंतु हे पालट गेल्या ५ मासांपासून (महिन्यांपासून) झाले आहेत. ज्या दुकानातून ते उपनेत्र विकत घेतले होते, त्यांना उपनेत्र दाखवले. तेव्हा त्या क्षेत्रातील तज्ञ म्हणाले, असे यापूर्वी कधीही झाले नव्हते.

– श्री. गुरुप्रसाद बापट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१.२०१७)

२. सप्तरंगी आकृती निर्माण होण्याच्या विज्ञानानुसार प्रक्रिया

२ अ. वायूमंडलात इंद्रधनुष्य निर्माण होण्यामागीलकारण

इंद्रधनुष्य एक वातावरणीय प्रकाशीय घटना आहे. पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर / दवबिंदूंवर प्रकाशाचे परावर्तन, अपवर्तन (Refraction) आणि फैलाव, यांमुळे प्रकाशाचा सप्तरंगी वर्णपट दिसतो.

२ आ. नेत्रांना सप्तरंग कधी दिसतात ?

हवेत पाण्याचे थेंब आणि निरीक्षकाच्या मागे सूर्यप्रकाश असल्यास अल्प उंचीच्या कोनातून बघितल्यावर इंद्रधनुष्याचे निरीक्षण केले जाऊ शकते. बघणार्‍या जिवाच्या पाठीमागे प्रकाश असल्यामुळे सर्वसाधारणतः सकाळच्या वेळेत पश्‍चिम दिशेला, तर संध्याकाळी पूर्व दिशेला इंद्रधनुष्य दिसते.

२ इ. अन्य रंग आणि इंद्रधनुष्यातील रंग यांतील भेद

अन्य रंग प्रकाशाच्या परावर्तनामुळे निर्माण झालेले असतात, तर इंद्रधनुष्यातील रंग प्रकाशाच्या पाण्यातून झालेल्या परावर्तनामुळे निर्माण झालेले असतात.

(सूत्र १ संदर्भ : संकेतस्थळ)

३. सप्तरंगी आकृती निर्माण होण्यासंदर्भात साधकाला मिळालेले वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान

३ अ. सप्तरंगी आकृती निर्माण होण्याच्या आध्यात्मिक स्तरावरील प्रकिया आणि त्याची कारणमीमांसा

३ अ १. बुब्बुळांच्या ठिकाणी सप्तरंग निर्माण होण्यामागील कारण

बुब्बुळे स्थूल प्रकाश ग्रहण करण्याचे माध्यम असतात. नेत्रांतून प्रकट होणारी आपतत्त्वात्मक काळी शक्ती नष्ट करण्यासाठी कार्यरत निर्गुण प्रकाश आणि बुब्बुळांना ग्रहण होणारा सगुण प्रकाश यांचे मीलन होऊन घनीकरण झाल्यामुळे बुब्बुळांच्या ठिकाणी सप्तरंग निर्माण झाले.

३ अ २. उपनेत्र लावल्यावर आणि न लावता सप्तरंगांत दिसणार्‍या फरकामागील शास्त्र

उपनेत्र लावल्यावर प्रकाश बघणार्‍याच्या समोरच्या बाजूला कार्यरत असतो. त्यामुळे आप-प्रकाश मीलनामुळे निर्माण झालेल्या रंगाचा परिणाम न होता तो स्पष्ट दिसतोे. याउलट ज्या वेळी उपनेत्र न लावता समोर ठेवून बघितले जाते, त्या वेळी पाठच्या बाजूने प्रकाश परावर्तित होतो. तेव्हा आप आणि प्रकाश यांचे मीलन बघण्यासारख्या अंतरावर असल्यामुळे उपनेत्राच्या काचेवर सप्तरंग दृश्यमान होतात.

३ आ. उपनेत्रावर निर्माण झालेले सप्तरंग समष्टीच्या रक्षणासाठी कार्यरत ईश्‍वरी शक्तीचे सगुण प्रमाण असणे

काळानुसार योग्य साधना आणि गुरुतत्त्वाची कृपा यांमुळे साधकांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहात वाईट शक्तींनी साठवलेली काळी शक्ती नष्ट होण्याची प्रक्रिया घडत आहे. या प्रक्रियेतही काळ्या शक्तीचे प्रकटीकरण करून साधकांना त्रास देण्याची युद्धनीती वाईट शक्ती कार्यरत करत असल्याने त्यांना नष्ट करून साधकांचे रक्षण करण्यासाठी ईश्‍वरी तत्त्वही कार्यरत झाले आहे. त्रास असलेल्या साधकाच्या उपनेत्रावर निर्माण झालेले सप्तरंग साधकाच्या रक्षणासाठी कार्यरत झालेल्या ईश्‍वरी शक्तीचे सगुण प्रमाण असून ते साधकाच्या सूक्ष्म देहात असलेल्या काळ्या शक्तीचे तीव्रतेने होणार्‍या विघटनाची प्रक्रिया दाखवते. घनघोर संकटकाळाचा लाभ घेऊन वाईट शक्ती करत असलेल्या आक्रमणांना प्रत्युत्तर देऊन ईश्‍वर साधकांचे रक्षण करत असल्याची ही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आहे.

३ इ. उन्नत, भाव असणारे साधक आणि त्रास असणारे साधक यांच्या उपनेत्रांवर सप्तरंगी आकृत्या निर्माण न होण्यामागील कारण

३ इ १. उन्नत

समष्टी साधना करणारे संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु आदी ईश्‍वरेच्छेने वागत असतात. यामुळे त्यांच्या सूक्ष्म देहासह स्थूल देहही चैतन्याचे प्रक्षेपण करण्याचे माध्यम झालेला असतो. उन्नतांच्या डोळ्यांतून चैतन्य सूक्ष्मतम, म्हणजेच प्रकाश स्वरूपात प्रक्षेपित होत असल्यामुळे त्या चैतन्याच्या संपर्कात येणारे घटक, उदा. उपनेत्र इत्यादीवर रंग निर्माण होणे आदी स्थूल परिणाम न होता ते घटक निर्गुणात जाण्याचे लक्षण, उदा. काच पारदर्शक होणे इत्यादी होतात.

३ इ २. भाव असणारे साधक

साधकाच्या भावाच्या प्रकटीकरणानुसार घटकावर आपतत्त्वाचे आवरण निर्माण होते. सर्वसाधारणतः साधकांचा अल्प कालावधीसाठी प्रकट भाव जागृत होतो. यामुळे सात्त्विक घटक, उदा. छायाचित्र इत्यादींवर आपतत्त्वाचे आवरण निर्माण होऊन त्याच्या रंगात परिवर्तन होते. साधकांची प्रकट भावावस्था दीर्घकाळ जागृत असल्याने ते प्रतिदिन वापरत असलेल्या घटकांत दैवी पालट होतात.

३ इ ३. त्रास असणारे साधक

त्रास असणार्‍या सर्व साधकांच्या देहातून काळी शक्ती बाहेर पडण्याची आणि वाईट शक्तीकडून त्रास देण्याची प्रक्रिया अन् प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे अन्य त्रास असणार्‍या साधकांच्या उपनेत्रातही सप्तरंग निर्माण होतीलच, असे नाही. साधकाचा भाव, ईश्‍वरेच्छा आदी विविध कारणांमुळे त्याला वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येेतात.

३ ई. निष्कर्ष

साधकाच्या उपनेत्रावर निर्माण झालेल्या सप्तरंगी आकृत्या ईश्‍वरी शक्ती कार्यरत असण्याचे प्रतीक असणे.

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.९.२०१७, सकाळी १० आणि ४.९.२०१७, सायं. ५.१७)

जगामध्ये अशा काही आश्‍चर्यकारक घटना घडत असतात. काही वेळा आपल्याला त्यांमागील कारणे माहीत नसतात; परंतु प्रत्यक्षात घटना या स्थळ, काळ आणि वेळ यांच्याशी बांधलेल्या असल्यामुळे त्यांमागे काही ना काहीतरी अध्यात्मशास्त्र असते, असे जाणवले.

– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.१.२०१८)

ई-मेल : [email protected]

तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

वस्तू आणि वास्तू यांसंदर्भातील आध्यात्मिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण घटनांविषयी अधिक संशोधन करून त्यामागचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. साधकाच्या उपनेत्राच्या (चष्म्याच्या) काचेवर सप्तरंगी वर्तुळ उमटण्यामागील वैज्ञानिक कारण काय ? अशा पालटांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ?

या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : [email protected])