परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील वायुतत्त्वामध्ये वाढ झाल्याने त्यांच्या खोलीतील स्नानगृहातील दगड वायुतत्त्वरूपी चैतन्याच्या स्पर्शामुळे गुळगुळीत होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील स्नानगृहाचे दार वार्‍याने भिंतीवर आपटू नये यासाठी भिंतीलगत मातकट रंगाचा एक आयताकृती दगड ठेवला होता. हा दगड वर्ष २०१५ पासून तेथे होता. डिसेंबर २०१७ मध्ये तो दगड गुळगुळीत झाल्याचे लक्षात आले. दगडातील हा चांगला पालट असल्याचे त्याच्या सूक्ष्मातील स्पंदनांवरून लक्षात आले. हा पालट वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २१.१२.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील स्नानगृहातील गुळगुळीत झालेल्या दगडाच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. तुलनेसाठी म्हणून साधारण तसाच दिसणारा सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील एक दगड आणि आश्रमच्या परिसरापासून दूर अंतरावरील एक सर्वसाधारण दगड यांच्या केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. केलेल्या या सर्व मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq3ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील वायुतत्त्वरूपी चैतन्याच्या स्पर्शामुळे गुळगुळीत झालेला हाच तो स्नानगृहातील दगड !

२ अ १. सर्वसाधारण दगडामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळणे; पण सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील दगड आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्नानगृहातील गुळगुळीत झालेला दगड यांमध्ये नकारात्मक ऊर्जा न आढळणे 

सर्वसाधारण दगडामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती, हे त्या दगडासंदर्भात ‘यू.टी.एस्.’ स्कॅनरच्या भुजा पूर्णपणे उघडून त्यांनी केलेल्या १८० अंशाच्या कोनावरून लक्षात आले. त्यामुळे त्या दगडातील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली. ती ०.५८ मीटर होती. सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील दगड आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्नानगृहातील गुळगुळीत झालेला दगड यांमध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.

चाचणीतील तिन्ही दगडांमध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ आ १. सर्वसाधारण दगडामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे, सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील दगड आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्नानगृहातील गुळगुळीत झालेला दगड यांमध्ये ती असून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्नानगृहातील गुळगुळीत झालेल्या दगडात ती सर्वाधिक असणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. सर्वसाधारण दगडामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील दगड आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्नानगृहातील गुळगुळीत झालेला दगड यांमध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती, हे त्या दगडांसाठी ‘यू.टी.एस्.’ स्कॅनरच्या भुजा पूर्णपणे उघडून त्याने केलेल्या १८० अंशाच्या कोनावरून लक्षात आले. त्या दगडांतील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळी अनुक्रमे ०.७८ मीटर आणि १.८ मीटर होत्या.

२ इ. दगडांच्या प्रभावळींच्या संदर्भातील केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ इ १. सर्वसाधारण दगड आणि सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील दगड यांच्या प्रभावळींच्या तुलनेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्नानगृहातील गुळगुळीत झालेल्या दगडाची प्रभावळ अधिक असणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. सर्वसाधारण दगडाची प्रभावळ ०.६० मीटर होती. सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील दगडाची प्रभावळ ०.९५ मीटर होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्नानगृहातील गुळगुळीत झालेल्या दगडाची प्रभावळ १.७९ मीटर होती. याचा अर्थ सर्वसाधारण दगड आणि सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील दगड यांच्या तुलनेत परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्नानगृहातील गुळगुळीत झालेल्या दगडाची प्रभावळ अधिक होती.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.

३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. सनातनच्या आश्रमात पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आश्रमाचा परिसर आणि त्यातील वस्तू यांवर होणे

सनातनच्या आश्रमात संत आणि साधक यांचे असणारे वास्तव्य, त्यांची दैनंदिन साधना अन् अविरतपणे चालणारे राष्ट्र-धर्माशी संबंधित अतुलनीय कार्य यांमुळे सनातनचा आश्रम आणि आश्रम परिसर यांमध्ये पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता आहे. या सात्त्विकतेचा सकारात्मक परिणाम तेथील व्यक्ती, वनस्पती, वस्तू आदींवर होतो. त्यामुळे सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील दगडांमध्येही सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत वायुतत्त्वरूपी चैतन्याचा प्रभाव अधिक प्रमाणात असल्याने त्यांच्या खोलीतील वस्तू त्या चैतन्याच्या स्पर्शाने गुळगुळीत होणे

१. ‘जेथे वायुतत्त्वरूपी चैतन्याचा कार्यकारी प्रभाव अधिक प्रमाणात असतो, त्या वायूमंडलातील वस्तू चैतन्याच्या स्पर्शाने गुळगुळीत होतात.’ – एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ यांसारख्या टोपण नावाने लिहितात.) (८.३.२००८, दुपारी २.४२)

२. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचतत्त्वे आहेत आणि ती अनुक्रमे गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द (नाद) यांद्वारे प्रकट होतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील वायुतत्त्वाचे प्रमाण वाढले आहे. या वायुतत्त्वरूपी चैतन्याच्या स्पर्शामुळे त्यांच्या खोलीतील लाद्या, स्नानगृहातील लाद्या आदी घटक गुळगुळीत झाले आहेत. त्याप्रमाणेच त्यांच्या स्नानगृहात ठेवलेला दगडही गुळगुळीत झाला आहे.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उच्च आध्यात्मिक पातळीमुळे त्यांच्याकडून सतत चैतन्य प्रक्षेपित होत असते. त्या चैतन्याचा परिणाम त्यांच्या खोलीतील वस्तूंवर झाल्याने त्या वस्तूंमध्येही चैतन्य (सकारात्मक ऊर्जा) निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या स्नानगृहातील दगडासारख्या निर्जीव वस्तूमध्येही चैतन्य निर्माण झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेल्या २ वर्षांमध्ये वाढलेले वायुतत्त्व आणि तेजतत्त्व यांमुळे तेथील गुळगुळीत झालेल्या दगडाला चमकही येणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील स्नानगृहातील गुळगुळीत झालेल्या दगडाच्या पृष्ठभागावर प्रकाश पाडल्यावर तो पृष्ठभाग चमकतो, असे लक्षात आले. याचा अर्थ त्या दगडाला गुळगुळीतपणाबरोबर चमकही आली आहे. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेल्या २ वर्षांमध्ये वाढलेले वायुतत्त्व आणि तेजतत्त्व यांमुळे खोलीमधील या दगडात पालट झाला’, असे जाणवले.’

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२३.३.२०१८)

या चाचणीवरून लक्षात येते की, उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांच्या केवळ अस्तित्वाने निर्जीव वस्तूंमध्येही आपोआप वैशिष्ट्यपूर्ण पालट होतात. संतांमुळे निर्जीव वस्तूंमध्ये पालट होत असतील, तर संतांच्या सान्निध्यामुळे मनुष्यामध्ये पालट का नाही होणार ! हेच संतांचे महत्त्व आहे. भारतभूमीमध्ये संतांचे वास्तव्य असल्यानेच तेथे जगातील अन्य देशांपेक्षा पुष्कळ अधिक प्रमाणात सात्त्विकता आहे, हे भारतियांनी लक्षात घ्यावे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१७.३.२०१८)

ई-मेल : mavresearch२०१४@gmail.com