सनातनचा आश्रम अद्भुत आहे ! – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

प्रखर धर्मनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण स्वागत !

डावीकडून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, सनातनच्या सदगुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, मंत्रपठण करतांना साधक-पुरोहित आणि औक्षण करतांना सौ. आरती पुराणिक

रामनाथी (गोवा) – सनातनचा आश्रम अद्भूत आहे !, असे उत्स्फूर्त उद्गार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर मुक्त झालेल्या प्रखर धर्मनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी येथील सनातन आश्रमाविषयी काढले. ५ एप्रिलला रात्री येथील सनातनच्या आश्रमात साध्वीजींचे शुभागमन झाल्यावर त्यांचे साधकांनी भावपूर्ण स्वागत केले. सौ. आरती पुराणिक यांनी त्यांचे पाद्यपूजन आणि औक्षण केले, तसेच त्यांना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी मंत्रपठण केले. त्यानंतर आश्रमात प्रवेश करत असतांना सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी संवाद साधतांना साध्वीजींनी आश्रमाविषयी वरील कौतुकोद्गार काढले.

साध्वी प्रज्ञासिंह यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना श्री. चेतन राजहंस, सोबत साध्वीजींचे अनुयायी श्री. भगवान झा (डावीकडे)

दुसर्‍या दिवशी म्हणजे ६ एप्रिलला सायंकाळी साध्वीजींना ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी सनातनच्या आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. या वेळी साध्वीजींसमवेत आलेले त्यांचे अनुयायीही उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. साध्वीजींच्या स्वागतासाठी आश्रमाच्या प्रवेशद्वारापासून आश्रमातील साधक पारंपरिक वेशात आणि भगवे ध्वज घेऊन उभे होते, तसेच आश्रमामध्ये पणत्याही लावण्यात आल्या होत्या.

२. साध्वीजींचे आश्रमाच्या आवारात आगमन होताच उपस्थित साधकांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, असा जयघोष केला.

३. स्वागताच्या वेळी आश्रमातील सुवासिनींनी साध्वीजींच्या चरणांवर पुष्पे वाहिली.

४. याप्रसंगी सनातनचे संत पू. सदानंद (बाबा) नाईक, पू. (सौ.) सूरजकांता मेनराय, पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले थोरले बंधू श्री. अनंत बाळाजी आठवले आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे उपस्थित होते.

५ एप्रिल या दिवशीची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या स्वागतासाठी साधकांनी सिद्ध केलेला स्वागतपर काव्यफलक साध्वीजींनी वाचला. त्यानंतर आश्रमाच्या वास्तूत प्रवेश केल्यावर मार्गिकेमध्ये उपस्थित असलेल्या साधकांकडे पाहून साध्वीजींनी उत्स्फूर्तपणे ‘जय हिंदु राष्ट्र’, असा जयघोष केला.

२. ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे हे साध्वीजींना विमानतळावरून आश्रमात आणत असतांना त्यांनी सांगितले की, साध्वीजी आपण आश्रमात येत असल्याने साधकांना खूप आनंद वाटत आहे. दिवाळी सण असल्याप्रमाणे संपूर्ण आश्रमात वातावरण आहे. त्यावर साध्वीजींनी ‘होकार’ दर्शवला. आश्रमाच्या प्रवेशदारातून गाडी आत येताच साध्वीजींनी आश्रमातील साधक पारंपरिक वेशात आणि भगवे ध्वज घेऊन उभे असलेले पाहिले. हे भावपूर्ण वातावरण पाहून साध्वीजी म्हणाल्या, ‘‘मी येथूनच (प्रवेशदारापासून) वरपर्यंत चालत जाते.’’ या वेळी श्री. गाडे यांनी त्यांना रस्त्यात बराच चढ असल्याने वाहनातूनच वर जाण्याविषयी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली.

संदर्भ:- सनातन प्रभात