रामनाथ (अलिबाग) येथे २२ एप्रिलला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त धर्मप्रेमींसाठी सनातनचे मार्गदर्शन

शिबिरात मार्गदर्शन करतांना सौ. लोटलीकर आणि श्री. बळवंत पाठक

रामनाथ (अलिबाग) (वार्ता.) – येथे २ एप्रिल या दिवशी रामनाथ येथील देऊळ भेरसे या गावी २२ एप्रिलला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या सिद्धतेच्या पार्श्‍वभूमीवर धर्मप्रेमींसाठी एक दिवसीय शिबीर पार पडले. हिंदु धर्मजागृती सभा प्रभावीपणे होण्यासाठी कसे नियोजन करायचे, याविषयी शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराच्या प्रारंभी सनातन संस्थेच्या सौ. विशाखा आठवले यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. ‘जीवनातील साधनेचे महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना’ याविषयी हिंदु जनजागृती समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी मार्गदर्शन केले. समितीच्या ठाणे जिल्हा समन्वयक सौ. वेदिका पालन यांनी ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन या प्रक्रियेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. रायगड येथील सौ. संगीता लोटलीकर यांनी या आपत्काळातील आध्यात्मिक उपायांचे महत्त्व उपस्थितांना विशद करून सांगितले, तसेच त्यांचे प्रात्यक्षिकही करवून घेतले. विविध मंडळांमध्ये प्रत्यक्ष संपर्क कसा करावा, तसेच मंडळातील युवकांसाठी हिंदु धर्मजागृती सभेचा विषय कसा मांडावा, याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले.

अन्य पंथियांकडून होणारा अन्याय आणि लोकशाहीची
निरर्थकता हिंदूंपर्यंत पोहोचवणे आवश्यक ! – बळवंत पाठक, हिंदु जनजागृती समिती

शिबिराच्या शेवटच्या सत्रात समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची संकल्पना गावागावात कशी रुजवायची, याचे मार्गदर्शन करतांना सांगितले, ‘‘सध्या हिंदु राष्ट्र्र या विषयांवर सर्वत्र चर्चा चालू आहे. ही संकल्पना रुजवण्यासाठी हा कालखंड पोषक आहे. तर्कशुद्ध आणि संविधानिक पद्धतीने हिंदु राष्ट्राची आवश्यकता सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाकडून अन्य पंथियांंकडून हिंदूंवर अन्याय कसा होत आहे, हे गावातील युवकांना सांगावे लागेल. निधर्मीपणा या गोंडस नावाखाली गेल्या ७० वर्षांत लोकशाहीची निरर्थकता हिंदूंपर्यंत पोहोचवावी लागेल आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श हिंदवी राज्याची स्थापना केली, त्याचप्रमाणे या सर्व समस्यांवर एकमात्र उत्तर असलेल्या हिंदु राष्ट्राची स्थापना आपल्याला करावी लागेल.’’

शिबिरांतर्गत रामनाथ येथे हिंदु धर्मजागृती सभा घेण्याचा निर्धार धर्मप्रेमींनी व्यक्त करत सभेच्या आयोजनाचे आणि प्रसार-प्रसिद्धीचे दायित्वही घेतले.

श्रीरामाप्रमाणे कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले
साधकांकडून साधना करवून घेत आहेत ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

या वेळी सनातन संस्थेच्या प्रसारसेविका सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी भ्रमणभाषद्वारे सर्वांना मार्गदर्शन केले. या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘ज्याप्रमाणे रावणाशी युद्ध करण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्रांनी वानरांकडून रामसेतू बांधून घेतला आणि त्यांची साधना करवून घेतली, त्याचप्रमाणे आजच्या कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून साधना करवून घेत आहेत. आपले भाग्य आहे की, भगवान विष्णु साक्षात या पृथ्वीलोकात अवतरले असून आपल्याला धर्मकार्याच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.’’

क्षणचित्र : संपर्काच्या प्रात्यक्षिकांच्या वेळी धर्मप्रेमींनी आत्मविश्‍वासाने विषय मांडला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात