अकोला येथे आयोजित विदर्भस्तरीय अधिवक्ता अधिवेशनात सनातन संस्थेचा सहभाग

अकोला येथे आयोजित विदर्भस्तरीय अधिवक्ता अधिवेशन

बसलेले डावीकडून १. अधिवक्ता काकाणी, २. अधिवक्ता मुकुंद जालनेकर, ३. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, ४. पू. अशोक पात्रीकर, ५. श्री. श्रीकांत पिसोळकर आणि उभे असलेले ६. अधिवक्ता संजीव पुनाळेकर.

अकोला – हिंदु राष्ट्र या संकल्पनेमध्ये जास्तीतजास्त अधिवक्ते जोडून घ्यायला पाहिजे. अधिवक्ताच सर्व बाजूंनी विचार मांडून समाजाची नाळ ओळखू शकतो. हिंदु राष्ट्र आणि हिंदू यांच्यासाठी लढा या संकल्पनेत अधिवक्ता महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. त्यामुळे यात जास्तीतजास्त अधिवक्त्यांना जोडून घ्यायला पाहिजे, असे प्रतिपादन अधिवक्ता मुकुंद जालनेकर यांनी केले. येथे अधिवक्त्यांंच्या विदर्भस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. अधिवेशनाला २९ मार्च या दिवशी प्रारंभ होऊन ३० मार्चला सांगता झाली.

अधिवेशनात सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी विविध विषयांवर उपस्थित अधिवक्त्यांना मार्गदर्शन केले. अधिवेशनात गटचर्चेचेही आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख श्री. धीरज राऊत यांनी करून दिली. तसेच सूत्रसंचालन कु. माधवी चोरे यांनी केले.

गटचर्चेत अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी हिंदु जनजागृती समिती अंतर्गत होणारे उपक्रम, धर्मशिक्षणवर्ग, बालसंस्कारवर्ग, प्रशिक्षणवर्ग यासंदर्भात माहिती दिली. तसेच आलेल्या अधिवक्त्यांना संघटित होऊन  काय करू शकतो, याविषयीही सांगितले. अधिवेशनामध्ये अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या परिचयाची ध्वनीचित्रफित दाखवण्यात आली.

अधिवेशनामध्ये झालेल्या गटचर्चेत सहभागी असलेले अधिवक्ते

 

अधिवक्त्यांचे ओजस्वी वाणीतील मार्गदर्शन

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अधिवक्त्यांचे योगदान आवश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर सतत आघात होत आहेत. त्यात असंख्य हिंदू भरडले जात आहेत. त्यांच्या पाठीशी समस्त हिंदूंना उभे रहावे लागणार आहे. तेव्हा न्यायालयीन प्रक्रियेसाठी अधिवक्ते लागतील. थोडक्यात राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अधिवक्त्यांचे योगदान आवश्यक आहे.

दुर्जनांची अभद्र युती अधिवक्त्यांना मुळासकट तोडायची आहे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

आज प्रत्येक क्षेत्रात दुर्जनांची अभद्र युती झाली आहे. प्रत्येक क्षेत्र भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. ती युती अधिवक्त्यांना मुळासकट तोडायची आहे. अधिवक्ते हे योद्धे आहेत. संपूर्ण शक्तीनिशी आपापल्या सर्व दुष्प्रतींच्या विरोधात लढायचे आहे. यामध्ये शिवरायांच्या गमिनी काव्याचा उपयोगही करावा लागणार आहे.

हिंदुत्वरक्षणासाठी संघटन ही काळाची आवश्यकता ! – अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

गोरक्षकांना किंवा लव्ह जिहादमधे सापडलेल्या महिलांना आज अधिवक्त्यांची आवश्यकता आहे; म्हणून अधिवक्त्यांचे संघटन हवे. समाजकंटकाकडून हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध अधिवक्त्यांकडून कायदेशीर साहाय्य मिळाल्यास हिंदूंना दिलासा मिळेल. हिंदुत्वरक्षणासाठी संघटन ही काळाची आवश्यकता आहे.

प्रत्येक कृतीला साधनेची जोड द्या ! – पू. अशोक पात्रीकर

आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुकृपायोगानुसार नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती अशा टप्प्यांनुसार साधना करावी. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी साधना करायला पाहिजे. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियाही कृतीत आणायला हवी. प्रत्येक कृतीला साधनेची जोड देणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी लढा देणे अनिवार्य !
– श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

आज देशाच्या दु:स्थितीला आतंकवाद, नक्षलवाद, धर्मांतर, गोहत्या, भ्रष्टाचार असे अनेक घटक कारणीभूत आहेत. या प्रत्येक घटकाचा बीमोड हिंदूंना करावा लागणार आहे. तसे केल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूंना मोठा लढा देणे अनिवार्य आहे.

हिंदु धर्मावर होणारे आघात आणि देवतांवरील विडंबन थांबवणे यांसाठी नि:शुल्क सेवा देणार. आज हिंदु एकतेची नितांत आवश्यकता आहे.- अधिवक्ता जगदीश हाके, नांदेड

अधिवेशनात वेगळीच स्फूर्ती अनुभवली ! – अधिवक्ता सत्यनारायण जोशी, अकोला

लव्ह जिहादमध्ये हिंदु मुलींना जादूटोणा करून त्यांना संमोहित केले जाते. हे मी एका प्रकरणात अनुभवले आहे. मुलीच्या कमरेला काळा दोरा बांधला होता. तो काढल्यावर ती शांत झाली. अधिवेशनात वेगळीच स्फूर्ती अनुभवायला मिळाली, ती आजपर्यंत मी कोणत्याच कार्यक्रमात अनुभवली नव्हती.

अधिवक्त्यांचे संघटन टिकवण्याचा प्रयत्न करू ! – अधिवक्ता प्रतिक पाटील, अमरावती

एका लव्ह जिहादच्या प्रकरणात एका मुलीला तिची बहीण आणि नातेवाईक यांच्या साहाय्याने सोडवायचा प्रयत्न केला; पण आम्ही मुलीला रोखू शकलो नाही; पण तिच्या बहिणीला वाचवू शकलो. अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विचार करणारे अधिवक्ते संघटित झाले आहेत. हे संघटन आपण असेच टिकवण्याचा प्रयत्न करू. पुढील अधिवेशन अमरावती येथे घेण्यात यावे.

माहिती अधिकार कायद्याचा उपयोग हिंदुत्वासाठी करीन ! – अधिवक्ता राजाराम उमाळे, अकोला

अधिवेशनात माहितीचा अधिकार कायदा याविषयीही समजले. त्याचा उपयोग मी आता हिंदुत्वासाठी करीन. भ्रष्टाचार आणि अन्यायविरोधी प्रकरणात मी सहकार्य करेल. पू. पात्रीकरकाकांनी सांगितलेली आनंदी जीवनासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया सर्व अधिवक्त्यांनी कृतीत आणावी.

 

अनुभवकथन

आपण एक पाऊल टाकल्यावर ईश्‍वर साहाय्य करत असल्याची प्रचीती आली ! – अधिवक्ता श्रुती भट, अकोला

मलकापूर दंगलीच्या प्रकरणात मला सतत नागपूरला उन्हात जावे लागत होते. तेव्हा मला उन्हाची जाणीव होत नव्हती. तिथे गेल्यावर सर्व कामे नियोजनाप्रमाणे झाली. आपण एक पाऊल टाकल्यावर ईश्‍वर कसा साहाय्य करतो, ते अनुभवता आले. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी, तसेच राष्ट्र आणि धर्म या ध्येयाने एकत्र आल्यास ईश्‍वर साहाय्य करणारच आहे.

अधिवेशन म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा प्रारंभ ! – अधिवक्ता प्रशांत गोरे, अकोला

अधिवेशनाच्या संदर्भातील सर्व सिद्धता, अधिवक्त्यांच्या भेटी घेणे ही सर्व सिद्धता परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करवून घेतली. आपण एकत्र येऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढा दिल्यास ते लवकर येईल. त्यासाठी प्रत्येकाने साधनाही करावी. हे अधिवेशन म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा प्रारंभ आहे.

 

गटचर्चेतील अधिवक्त्यांचा सहभाग

१. अधिवक्ता मनीषा धूत यांनी महिला सक्षमीकरणासाठी एका संस्थेची स्थापना केली आहे. या माध्यमातून त्या महिलांच्या समस्या जाणून घेतात आणि त्यांना न्यायालयीन पद्धतीने मार्गदर्शन करतात. ‘ज्यांच्या पाठीशी ईश्‍वराचा आशीर्वाद असतो, त्याचे कोणीच काही बिघडवू शकत नाही. भगवद्गीतेचे शिक्षण आपल्या शिक्षण व्यवस्थेत समावेश असायला पाहिजे’, असे त्यांनी सांगितले.

२. अधिवक्ता श्री. देवाशिष काकड म्हणाले, ‘‘ईश्‍वराचे अधिष्ठान प्रत्येक कार्य करतांना ठेवले पाहिजे. हिंदूंचे संघटन होणे आवश्यक आहे.’’

३. अधिवक्ता श्री. प्रतिक पाटील यांनी गोमांस प्रकरणात हिंदूंना विनामूल्य सेवा दिली.

४. अधिवक्ता वैशाली गावंडे यांनी महिलांसाठी असणार्‍या कायदेविषयक तरतुदींचा लाभ महिलांना मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

५. अधिवक्ता आणि माजी न्यायाधीश नितीन अग्रवाल यांनी अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी एकत्र येऊन हिंदुसाठी काम करणे आवश्यक आहे, हे लक्षात आल्याचे सांगितले.

क्षणचित्रे

१. सूत्रसंचालनात घोषणा देतांना अधिवक्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

२. दीड मास आजारी असल्याने अधिवेशनाला येण्याची निश्‍चिती नव्हती; मात्र अधिवेशनात दोन दिवस पूर्णवेळ सहभागी होऊ शकले, असे अधिवक्ता लता देशपांडे यांनी सांगितले.

३. ‘अधिवेशनाच्या दोन्ही दिवस वेगळीच आनंदावस्था अनुभवत होते. त्यात स्वतःचा पूर्णपणे विसर पडला होता’, असे अधिवक्त्या सौ. श्रुती भट यांनी सांगितले.

४. अधिवक्त्या सौ. वैशाली गावंडे म्हणाल्या, ‘‘अधिवेशनाच्या २ दिवसांमध्ये माझ्या सासूबाईंनी कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याचे नियोजन केले होते; मात्र मला अधिवेशनाला जायचे होते. मी कुलदेवतेला प्रार्थना केली. त्यानंतर सासूबाईंनी सांगितले,‘‘तू अधिवेशनाला जा. आपण कुलदेवतेला जाण्याचे नंतर नियोजन करूया.’’

सहकार्य : खंडेलवाल भवनचे श्री. रमाकांतजी खेतान आणि विश्‍वस्त यांनी अधिवेशनाला सभागृह विनामूल्य दिले. गुजराती उपाहारगृहातून अल्पाहार, तर सिसोदिया कॅटरर्स, श्री. महावीर कॅटरर्स, श्याम दुबे कॅटरर्स यांनी भोजनाची व्यवस्था केली. श्री. सुनील शर्मा यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. आमदार गोवर्धनजी शर्मा यांनी अमूल्य सहकार्य केले.

अधिवक्त्यांच्या अधिवेशनासाठी तळमळीने प्रयत्न करणारे अधिवक्ता श्री. प्रशांत गोरे !

अधिवक्ता प्रशांत गोरे एक प्रतिथयश अधिवक्ता असून ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार मागील ७ ते ८ वर्षांपासून साधना करत आहेत. ते डिसेंबर २०१७ मध्ये गोवा येथे हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात गेले होते. त्यांनी शिबिरातील सर्व विषय ऐकले. एका संतांच्या भेटीत त्यांनी सर्व अधिवक्त्यांना सांगितले, ‘‘हिंदु विधीज्ञ परिषदेचे कार्य तुमच्या विभागात चालू करा आणि वाढवा; कारण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत त्यांचे साहाय्य आपल्याला लागणार आहे.’’ त्यानुसार अधिवक्ता गोरे यांनी जिल्हातील साधकांच्या साहाय्याने अकोला येथे अधिवक्त्यांचे अधिवेशन घेण्याचा विषय मांडला आणि स्वतः झोकून देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे त्यांनी अनेक अधिवक्त्यांना संपर्क करून अकोला येथे विदर्भस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात