गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी मार्गदर्शन आणि शोभायात्रा !

सांगली जिल्ह्यात ईश्‍वरपूर आणि तासगाव
तालुक्यातील सामूहिक गुढीच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद !

सांगली – सांगली जिल्ह्यात ईश्‍वरपूर येथे रेणुका मंदिर, हनुमान मंदिर (उरण), धोंडीराज महाराज मंदिर येथे सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. तासगाव तालुक्यातील कौलगे आणि वासुंबे येथेही सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. वासुंबे येथे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी श्री. सचिन गुरव यांनी मंदिराच्या ध्वनीक्षेपकावरून गुढीपाडव्याचे महत्त्व सांगितले. ते गावकर्‍यांना आवडले. त्याप्रमाणे अनेकांनी त्यांच्या घरी जाऊन तसे पूजन केले.

जत – मंगळवार पेठ येथील बसवेश्‍वर मंदिर येथे सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. विनया चव्हाण यांनी धर्मप्रेमींचे प्रबोधन केले.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी मार्गदर्शन !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने जिल्ह्यात कदमवाडी (बत्तीसशिराळा), तुजारपूर (ईश्‍वरपूनजिक), ईश्‍वरपूर, तसेच सांगलीवाडी येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

कदमवाडी (बत्तीसशिराळा) येथे हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांनी मार्गदर्शन केले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. शिवराज आवटे (सनी आवटे) आणि श्री. वैभव कदम उपस्थित होते. याचा लाभ ७५ धर्मप्रेमींनी घेतला.  ईश्‍वरपूर येथे अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांनी मार्गदर्शन केले. याचसमवेत जिल्ह्यात कुंडल, तासगाव, मिरज, विश्रामबाग अशा १५ हून अधिक ठिकाणी मार्गदर्शन घेण्यात आले.

 

मिरजेतील शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग  !

मिरज – हिंदु नववर्षाच्या निमित्ताने मिरज नगरीतील विविध संघटना आणि संस्था यांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचा प्रारंभ मैदान दत्तमंदिर येथून करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांसह सामान्य हिंदूही मोठ्या उत्साहात यात सहभागी झाले होते. या यात्रेत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक सहभागी होते. त्यांनी गुढीपाडव्याचे महत्त्व सांगणारे फलक हातात धरले होते. काशी विश्‍वेश्‍वर देवालयाच्या जवळ शोभायात्रेचा समारोप झाला.

समर्थ प्रतिष्ठानचे ढोल पथक, भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा चित्ररथ, पारंपरिक वेशभूषेत फेटे धारण करून सहभागी झालेल्या महिला, ग्रंथ दिंडी यामुळे शोभायात्रा चैतन्य निर्माण करणारी ठरली. विविध प्रकारची प्रात्यक्षिके याप्रसंगी दाखवण्यात आली. या वेळी सर्वश्री राजाभाऊ शिंदे, पांडुरंग कोरे, संदीप पोरे, माधवराव गाडगीळ, राजू बेडेकर, अधिवक्ता किरण जाबशेट्टी, अधिवक्ता सौरभ वाटवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कोल्हापूरमध्ये धर्माभिमानी हिंदूंच्या उपस्थितीत गुढीपाडवा उत्साहात साजरा !

गुढीला नमस्कार करतांना हिंदु धर्माभिमानी

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहर, वडणगे, हुपरी, जत्राट, शिरोली येथे सामूहिक गुढीचे आयोजन करण्यात आले होते. याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

१. कोल्हापूर शहर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. या वेळी नगरसेवक श्री. ईश्‍वर परमार, बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. नंदकुमार घोरपडे, सर्वश्री संजय कुलकर्णी, मनोहर सोरप, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा पोवार, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. राजेंद्र सूर्यवंशी, सर्वश्री गोविंद देशपांडे, अण्णा पोतदार, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

२. हुपरी – श्री शिवतीर्थ, छत्रपती श्री शिवाजी चौक येथे जिल्हाप्रमुख श्री. मुरलीधर जाधव यांच्या हस्ते गुढीला श्रीफळ वाढवण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उपस्थितांकडून प्रतिज्ञा करवून घेतली. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. निलकंठ माने, शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. भरत मेथे, श्री. शुभम दैने यांसह २५ धर्मप्रेमी उपस्थित होते.

३. वडणगे – येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन केले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उपस्थितांकडून प्रतिज्ञा करवून घेण्यात आली.

या वेळी वडणगे येथील सरपंच श्री. सचिन चौगुले म्हणाले, ‘‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आणि गावातील धर्मप्रेमींच्या सहकार्याने हा उपक्रम झाला. त्याविषयी मी त्यांचे आभार व्यक्त करतो.’’ या वेळी पंचायत समिती सदस्य श्री. इंद्रजीत पाटील म्हणाले, ‘‘सर्व हिंदूंचे संघटन करण्यासाठी सामूहिक गुढीपूजनाचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. सर्व हिंदूंनी त्यांचे मतभेद विसरून संघटित होणे आवश्यक आहे.’’ ग्रामपंचायत सदस्य श्री. दीपक व्हरगे म्हणाले, ‘‘आज सर्व हिंदू संघटित होण्याची आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे.’’

या वेळी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमीयांसह अन्य उपस्थित होते.

४. जत्राट – येथे  ग्रामपंचायत सरपंच श्री. दशरथ महादेव जबडे यांनी ध्वजपूजन केले. या वेळी येथील माजी ग्रामपंचायत सरपंच श्री. बापूसाहेब पाटील यांसह धर्मप्रेमी उपस्थित होते.

५. शिरोली – येथे सरपंच श्री. शशिकांत खवरे यांच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले. उपसरपंच आणि श्री शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश यादव यांनी गुढीला पुष्पहार अर्पण केला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. महेश चव्हाण, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी शिवसेना ग्राहक कक्षाचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक यादव, शिवसेनेचे श्री. संदीप कांबळे, शाहू दूध संस्थेचे श्री. सुभाष चौगुले, माजी उपसरपंच श्री. नितीन चव्हाण, श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. नितीन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या सौ. उर्मिला जाधव, सौ. राजश्री उन्हाळे, सौ. अनिका कांबळे, सौ. सुरेखा चव्हाण, सौ. संध्याराणी कुरणे, सौ. पुष्पा पाटील यासंह ५० धर्मप्रेमी उपस्थित होते.

६. काळम्मावाडी – येथे रामलिंग मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी मार्गदर्शन केले. येथे ७० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती होती.

प्रबोधनानंतर परिवर्तन !

कलशाऐवजी भगवा झेंडा उभारा असे पत्रक काढणार्‍या सरपंचांचे सनातन संस्थेच्या साधकांकडून प्रबोधन !

कोल्हापूर – जिल्ह्यातील एका गावातील सरपंचांनी गुढीसाठी कलशाऐवजी भगवा झेंडा उभारा, अशा आशयाचे पत्रक काढले होते. या पत्रकाचे गावात मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले होते. या संदर्भात संबंधित गावातील सरपंच यांना सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांना घेऊन संपर्क केला. या संदर्भात सरपंचांचे प्रबोधन केल्यावर सरपंच म्हणाले, ‘‘मला हा विषय फारसा माहिती नव्हता. गावातील काही युवकांनी माझे नाव त्या पत्रकावर टाकले.’’ डॉ. मानसिंग शिंदे यांनी धर्मशिक्षणवर्गाविषयी माहिती दिल्यावर ‘‘या संदर्भात गांभीर्याने विचार करू’’ असे त्यांनी सांगितले.

 

पुण्यात हिंदु नववर्षाचे उत्साहात स्वागत !

प्रबोधन कक्ष, गुढी उभारण्याची प्रात्यक्षिके, व्याख्यान आदी माध्यमांतून प्रबोधन !

पुणे – शोभायात्रांच्या जोडीलाच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवून हिंदु नववर्षाचे स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्याची अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारे प्रबोधन कक्ष, धर्मशास्त्रानुसार गुढी कशी उभी करावी, हे सांगणारी प्रात्यक्षिके, व्याख्याने, भित्तीपत्रके, हस्तपत्रके आदी माध्यमातून हिंदुत्वाचा प्रसार करण्यात आला. त्यासह शहराच्या विविध भागांत भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

शिरवळ येथे गुढी उभारण्याचे प्रात्यक्षिक दाखवतांना सौ. छाया पवार

स्वसंरक्षण प्रात्यक्षिके

गुढीपाडवा शास्त्रीयदृष्ट्या कसा साजरा करावा, याचे प्रात्यक्षिक शिरवळ येथील फिनिक्स सोसायटी, फुलोरा सोसायटी, आनंद विद्यालय; भोर येथील आनंद विहार या ठिकाणी दाखवण्यात आले. या प्रात्यक्षिकांचा एकूण ६० जणांनी लाभ घेतला. ‘गुढीपाडवाविषयी एवढी सविस्तर माहिती प्रथमच ऐकायला मिळाली, हे सर्व शास्त्र समजल्यामुळे आनंद वाटत आहे’, असे सौ. स्वाती कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रबोधनकक्ष

कोथरूड – थोरात उद्यानाजवळ गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी प्रबोधन कक्ष उभारण्यात आला होता. त्या वेळी गुढी उभारण्याची आणि उतरवण्याची शास्त्रीय पद्धत या संदर्भातील भ्रमणसंगणकावर ध्वनीफीत दाखवण्यात येत होती. अनेक जणांनी जिज्ञासेने त्याविषयी जाणून घेतले. अनेक जण आवर्जून थांबून ध्वनीचित्रफीत पहात होते.

सिंहगड रस्ता – भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने येथे विठ्ठलवाडी ते दौलतनगर या मार्गातून गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दौलतनगर येथे हिंदु जनजागृती समितीचा प्रबोधन कक्ष लावण्यात आला होता.

शोभायात्रा

चिंचवड – समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि संस्कृतीप्रेमी संघटना यांच्या वतीने श्रीधरनगर येथील दत्त मंदिरापासून धनेश्‍वर मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सनातन संस्था, स्वामी विवेकानंद सेवा केंद्र, पतंजली योग समिती, राष्ट्र सेविका संघ, जीवनविद्या मिशन, चिन्मय मिशन, स्वाध्याय परिवार, परशुराम सेवा, ब्राह्मण सेवा संघ, समर्थ रामदास स्वामी संघ, भजनी मंडळ आणि अन्य समविचारी संघटना आणि संप्रदाय यांचे कार्यकर्ते, तसेच नगरसेवक श्री. सुरेश भोईर, सौ. अश्‍विनी चिंचवडे, श्री. मोरेश्‍वर शेडगे आदी फेरीत सहभागी झाले होते.

पिंपरी – भैरवनाथ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशातील कार्यकर्त्यांसह वारकर्‍यांचे एक पथकही फेरीत सहभागी झाले होते. पालखीमध्ये प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महिला भजनी मंडळ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे कार्यकर्ते शोभायात्रेत सहभागी होते.

कोथरूड – येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डेक्कन येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. खासदार अनिल शिरोळे, आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी शोभायात्रेत सहभागी होते. विविध चित्ररथ, लाठी-काठी चालवणार्‍या महिलांचे पथक आणि जोडीला ढोल-ताशा, नगारा वादन यांमुळे वातावरण उत्साहपूर्ण होते.

सिंहगड रस्ता – वडगाव बुद्रुक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचाही सहभाग होता.

केवड (तालुका माढा) – येथे बिरोबा वस्ती आणि अन्य  ठिकाणी सनातनच्या साधिका सौ. वैशाली लटके यांनी ‘गुढी पाडवा शास्त्रानुसार कसा साजरा करावा’ याविषयावर प्रवचन केले. याचा अनेक महिलांनी लाभ करून घेतला.

अपशिंगे (मिलिटरी) – येथील ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे सामूहिक गुढी उभारण्यात आली. सनातन संस्थेचे ६४ प्रतिशत आध्यत्मिक स्तर असलेले साधक श्री. बाळकृष्ण निकम यांच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले. या वेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

अन्य प्रतिसाद

१. भोर गावातून पुणे येथे धर्मसभेत आलेल्या धर्माभिमान्यांनी गुढीपाडव्यानिमित्त व्हॉट्सअ‍ॅप प्रणालीवर ‘हिंदूंचा नववर्षारंभदिन म्हणजे चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा’ या चित्राचा ‘डिस्प्ले पिक्चर’ सामूहिकरीत्या लावला होता.

२. भोरचे धर्मप्रेमी श्री. धीरज गुजर यांनी हिंदु जनजागृती समितीची गुढीपाडव्यानिमित्त प्रसिद्ध केलेली नववर्षारंभदिनाची १५० भेटपत्रके घेऊन राष्ट्र-धर्माच्या प्रसारार्थ समाजात दिली.

३. देगाव, माळेगाव, निगडे, पसुरे, शिंदे या गावांतील धर्मशिक्षणवर्गार्ंत येणार्‍या धर्मप्रेमींनी गुढीपाडव्याची प्रबोधनपर भित्तीपत्रके लावण्याची सेवा केली.

प्रबोधनानंतर परिवर्तन !

१. कोथरूड (पुणे) येथे प्रबोधन कक्षावर आलेल्या एका गृहस्थांचे अयोग्य माहितीमुळे गुढीपाडवा, ब्राह्मण समाज यांविषयी प्रतिकूल मत बनले होते. त्यांना शास्त्र सांगून प्रबोधन केल्यावर त्यांचे शंकानिरसन झाले.

२. प्रबोधनानंतर ग्रामस्थांनी भगव्या झेंड्याऐवजी गुढी उभारणे

काकडहिरा (जिल्हा बीड) येथे ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीऐवजी भगवे झेंडे लावण्याचे ठरवले होते. त्यानंतर बीड येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारानिमित्त समितीच्या सौ. अनिता बुणगे यांनी गुढी उभी करण्याविषयी शास्त्र सांगून प्रबोधन केले, त्यानंतर सर्वांनी झेंड्याऐवजी गुढी उभी केली.

 

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीने नववर्ष
शोभायात्रांत विविध ठिकाणी सहभाग घेऊन केला हिंदु संस्कृतीचा जागर !

रायगड –  नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोभायात्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या शोभायात्रांत समितीने सहभाग घेऊन हिंदु संस्कृतीची महानता समाजाला सांगितली.

वशेणी – या गावात नववर्ष स्वागतयात्रेत विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी सनातनचे श्री. राजेश पाटील यांनी ‘नववर्ष पाडव्याला का साजरे करायचे’ हे सांगून प्रबोधन केले. या वेळी १०० धर्मप्रेमी उपस्थित होते.

कोलाड आणि आणि पेण येथे नववर्ष स्वागतफेरीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग होता.

कामोठे – हिंदु नववर्ष स्वागत समिती कामोठे यांनी आयोजित केलेल्या फेरीत सनातनच्या बालसंस्कारवर्गातील बालसाधकांनी ‘हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करा’, या विषयावर प्रबोधन करून राष्ट्र आणि धर्म प्रेम जागृत केले. समितीच्या रणरागिणी शाखेने स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून लोकांमधील क्षात्रवृत्ती जागृत केली. समितीचा प्रथमोपचार कक्षही या फेरीत होता.

कळंबोली (नवी मुंबई) – गुढीपाडव्याच्या निमित्ताने सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेनेही या फेरीत सहभाग घेतला होता. येथे शोभायात्रेत सहभागी होऊन फलकांद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. गुढीपूजनही सनातनचे साधक दांपत्य श्री. आणि सौ. जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी सनातन संस्थेच्या बालसाधकांनी संस्कृती संवर्धनासाठी प्रयत्न व्हावेत याविषयी माहिती देणारे फलक हातात धरून प्रबोधन केले. हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या माध्यमातून स्वसंरक्षण प्रशिक्षणाची लाठीकाठी, नानचाकू चालवणे आदी प्रात्याक्षिके करून दाखवण्यात आली. या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण हे फेरीचे महत्त्वाचे आकर्षण ठरले. या फेरीत समितीचे प्रथमोपचार पथकही सहभागी झाले होते.

प्रतिसाद

१. स्वसंरक्षण प्रात्याक्षिके पाहून समाजातील २ युवकांनीही त्यात सहभाग घेतला.

२. अनेकांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे चित्रीकरण केले आणि ‘खरेच ही काळाची आवश्यकता आहे’ असे मत व्यक्त केले.

३. आयोजक म्हणाले ‘‘संस्कृती जपण्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती पुष्कळ मोलाचे योगदान देत आहे.’’

 

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या
वतीने ठिकठिकाणी सामूहिक गुढीपूजनाचे आयोजन !

ठाणे येथे निघालेल्या भव्य शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले साधक
ठाणे येथे स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करताना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

 

ठाणे – शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेत सहभागी होऊन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या साधकांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर केली. वर्तकनगर येथेही समितीच्या वतीने सामूहिक गुढी उभारण्यात आली. या वेळी सौ. केशर गिरकर आणि सौ. सकपाळ यांनी गुढी उभारण्याचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक दाखवले.

आजच्या शुभदिनी आपण महापुरुषांच्या पराक्रमाचे स्मरण
करून आपले शौर्य जागृत करूया ! – महेश मुळीक, हिंदु जनजागृती समिती

डोंबिवली – आजवर हिंदूंचा जाज्ज्वल्य इतिहास जाणीवपूर्वक लपवला गेला, कारण खरा इतिहास लक्षात आल्यास हिंदू जागृत होतात. मग हिंदूंना जातीपातीत विभागून त्यांच्यात फूट पाडणे शक्य होत नाही. याचसाठी गुढीपाडवा हे हिंदूंचे नववर्ष नसून फक्त मराठी सण आहे; असा खोटा प्रचार केला जातो; परंतु आपल्या देशात दसरा, दिवाळी, नवरात्र हे सगळे सण जर आपण एकाच दिवशी एकाच तिथीला साजरे करतो, ते भाषेनुसार, राज्यानुसार पालटत नाहीत मग नवीन वर्षाचा दिवस, ती तिथी वेगळी कशी असेल ? आजच्या शुभदिनी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण करून आपल्यातले शौर्य जागृत करूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश मुळीक यांनी केले. उत्तरशिव गाव येथील हनुमान मंदिरासमोरील मैदानात येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘एक गाव एक गुढी’ उपक्रमाच्या अंतर्गत सामूहिक गुढीपूजन करण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा लाभ ६० धर्माभिमान्यांनी घेतला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालनही उपस्थित होत्या.

स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गातील मुलांंनी या कार्यक्रमाची सिद्धता केली. श्री. विनोद पाटील आणि सौ. नीता पाटील यांनी गुढीचे पूजन केले. गावातील प्रशिक्षणवर्गातील कु. दीक्षिता पाटील आणि कु. ऋतुजा पाटील यांनी ‘स्वसंरक्षणाची आवश्यकता’ हा विषय मांडला. उत्तरशिव ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

क्षणचित्रे

१. जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. रमेश पाटील यांनी सांगितले, ‘‘संघटन निर्माण करण्यासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणाचे तुमचे कार्य फारच छान आहे.’’

२. उत्तरशिव येथे चालू असलेल्या प्रशिक्षणवर्गातील मुलांनी आदल्या दिवशी मंदिर आणि मंदिर परिसर यांची स्वच्छता केली, तसेच कार्यक्रमाचा प्रसारही केला.

३. धर्मप्रेमी मुलांनी आणि मुलींनी कराटे आणि लाठीकाठी यांची प्रात्यक्षिके करून दाखवली.

४. कु. ऋतुजा पाटील यांनी सांगितले, ‘‘आतापर्यंत मी कधीच लोकांसमोर बोलले नाही. स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून मला आत्मविश्‍वास येऊन मी बोलू शकले.’’

५. कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

६. गुढीपूजन झाल्यावर सर्वांनी सामूहिक आरती केली आणि हनुमानाला कार्यक्रमाचा उद्देश सफल होण्यासाठी प्रार्थना केली.

अंबरनाथ – पूर्व भागातील गावदेवी मंदिर, कानसई येथे सामूहिक गुढीचे आयोजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वैशाली देसाई यांनी गुढी उभारण्याचे शास्त्र सांगून त्याप्रमाणे गुढी उभारली. नववर्ष स्वागतयात्रा फेरीत सहभागी झाल्याविषयी हिंदु जनजागृती समितीला सन्मानचिन्ह देण्यात आले.

क्षणचित्रे

१. गुढीच्या पूजनाची संपूर्ण सिद्धता श्री. आणि सौ. भोईर यांनी केली. ‘पहिल्यांदा गुढी उभारण्याचा आनंद घेतला आला’, असे मत श्री. भोईर यांनी या वेळी व्यक्त केले.

२. गुढीच्या पूजनानंतर सगळ्यांनी सामूहिकरित्या ५ मिनिटे ‘श्रीराम जयराम जय जय राम’चा जप केला.

भिवंडी येथील (डावीकडे) साईनाथ पवार यांना शुभेच्छा पत्र देतांना समितीचे श्री. प्रशांत सुर्वे

 

भिवंडी – जांगिड लेक, मानसरोवर, भिवंडी येथे सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले. श्री. श्रीनिवास कोंगारी यांच्या पुढाकारने ही गुढी उभारण्यात आली. शिवसेनेचे श्री. साईनाथ पवार, भाजपचे नगरसेवसक आणि गटनेता श्री. नीलेश चौधरी, भाजप शहर प्रमुख श्री. संतोष शेट्टी इत्यादी मान्यवरांना हिंदु जनजागती समितीच्या वतीने नववर्षानिमित्त शुभेच्छा पत्रक देण्यात आले.

कल्याण येथे हिंदु धार्मिक सणांचा संदेश देणारी ‘हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा’ !

कल्याण – येथील मुरबाड रोड येथून प्रारंभ झालेल्या नववर्ष शोभायात्रेत सहस्रो हिंदू पारंपरिक वेषात ढोलताशांच्या गजरात सहभागी झाले होते. गुढीपाडव्यानिमित्ताने कल्याण सांस्कृतिक मंच आयोजित नववर्ष शोभायात्रेचे हे १९ वे वर्ष होते. हिंदूंचे धार्मिक सण आणि त्यांचे महत्त्व सांगणारे चित्ररथ, देखावे हे या स्वागत यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. कल्याणचे महापौर श्री. राजेंद्र देवळेकर यांनी सपत्निक विधिवत पूजा करून या यात्रेचा आरंभ झाला. कल्याणचे आमदार श्री. नरेंद्र पवार, खासदार श्री. कपिल पाटील यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती नववर्ष स्वागत शोभायात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. नमस्कार मंडळ येथे शोभायात्रेची सांगता झाली.

५० हून अधिक सामाजिक संस्था सहभागी झालेल्या या शोभायात्रेत १० सहस्रांहून अधिक हिंदू सहभागी झाल्याचे नववर्ष स्वागत यात्राचे यंदाचे अध्यक्ष श्री. गौतम दिवाडकर यांनी सांगितले. जागोजागी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. संस्कारभारतीच्या रांगोळ्यांनी शहर सुशोभित करण्यात आले होते. शहरातील भगवा तलाव परिसरातील दिव्यांची रोषणाई आणि आवाजविरहित फटाक्यांची आतिषबाजी हे या स्वागतयात्राचे मुख्य आकर्षण ठरले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात