भारतात अशिक्षित आणि गुन्हेगार लोक कायदे बनवतात, यामध्ये परिवर्तन आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना (१) श्री. चेतन राजहंस आणि (२) पू. नीलेश सिंगबाळ

पटना (बिहार) – भारतीय लोकशाहीत अनेक त्रुटी आहेत. अशी त्रुटीपूर्ण व्यवस्था ही समाजव्यवस्था उत्तम ठेऊ शकत नाही, किंबहुना ती नागरिकांना आनंदी जीवन जगण्यास बाधा ठरत आहे. भारतात अशिक्षित आणि गुन्हेगार लोक कायदे बनवतात, यामध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. खरे तर कायदे बनवणे, हे विद्वानांचे काम असते; पण संसदेतील बहुतांश लोक विद्वान नाहीत, तर तेथे धनबली आणि बाहुबली पोहोचतात. यासाठी समग्र व्यवस्था परिवर्तन आवश्यक आहे. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र-स्थापनेनेच हे कार्य शक्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते देवभूमी जनकल्याण ट्रस्टद्वारे आयोजित हिंदूसंघटन बैठकीत बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारत समन्वयक पू. नीलेश सिंगबाळ उपस्थित होते.

या प्रसंगी पू. सिंगबाळ म्हणाले, ‘‘ज्या देशाची राज्यघटना लिखित नाही, त्या इंग्लंडने भारताला लिखित राज्यघटना करून देश चालवण्यास सांगितले होते. वस्तूतः विद्यमान राज्यघटनेप्रमाणे देश चालत नाही, तर राजकारणी मनमानीपणे देश चालवतात. ते संविधानातील तत्त्वांचा अंगिकार करत नाहीत. त्यामुळे राज्यघटनेच्या अपयशासाठी आतापर्यंतचे शासनकर्ते आणि व्यवस्थेतील घटकांना दोष द्यायला हवा.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात