हिंदूंच्या हत्या करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकलून द्या ! – धनराज जगताप, जिल्हा उपाध्यक्ष, हिंदूमहासभा

गोलबाग, राजवाडायेथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी झालेले धर्माभिमानी हिंदू

सातारा, १२ मार्च (वार्ता.) – बालापूर, हैद्राबाद येथे अवैधपणे रहात असलेल्या रोहिंग्या मुसलमानांसाठी १०८ घरांचा प्रकल्प बांधण्यात आला. त्याचे उद्घाटन तेलंगणाचे उपमुख्यमंत्री महमूद अली यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी जम्मू-काश्मीर, बंगाल आणि अन्य राज्ये येथेही रोहिंग्या मुसलमानांना वसवले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम असल्याने त्या राज्याबाहेरील अन्य कोणीही नागरिक तेथे घर बांधू शकत नाही. असे असतांना रोहिंग्यांना तेथे घरे कशी दिली जातात ? काही ठिकाणी याच रोहिंग्यांनी हिंदु महिलांवर अत्याचार केले, त्यांच्या हत्या केल्या, हिंदूंवर धर्मांतरासाठी दबाव आणला, नमाजासाठी दबाव आणला आदी घटना घडल्या आहेत. अशा उपद्रवी रोहिंग्यांनी उद्या जर आतंकवादी कारवाया केल्या, तर त्याला कोण उत्तरदायी असेल ? त्यामुळे हैद्राबादसह देशभरातील रोहिंग्या मुसलमानांच्या वसाहतींची अनुमती रहित करा आणि हिंदु महिलांवर अत्याचार करून हत्या करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढा, अशी मागणी हिंदू महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष  श्री. धनराज जगताप यांनी केली.

राजवाडा येथील गोलबाग परिसर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त ते बोलत होते. या वेळी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी, विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, योगवेदांत सेवा समितीचे श्री. दीपक पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक आदी ३० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.

हज यात्रेसाठी हवाई प्रवासभाड्यामध्ये केलेली भरघोस कपात त्वरित मागे घ्या ! – जितेंद्र वाडेकर

केंद्र सरकारनेे १६ जानेवारीला हज यात्रेवरील अनुदान बंद केले, असे जाहीर केल्यानंतर जेमतेम दीड महिन्याच्या आतच २७ फेब्रुवारीला हज यात्रेकरूंसाठीच्या विमानप्रवासात १५ ते ४५ टक्क्यांपर्यंत भाडेकपात घोषित करून मुसलमानांना खुश केले. एकीकडे ‘एअर इंडिया’ ही शासकीय विमान कंपनी तोट्यात असल्याने तिचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात असतांना, दुसरीकडे हज यात्रेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सवलत देऊन या आस्थापनाचे उत्पन्न बुडवले जात आहे. ही कोणती व्यवहार्यता आहे ? तसेच हज अनुदान बंद केल्याचे दाखवून तेवढीच रक्कम विमानप्रवासात सवलत म्हणून देणे, हा हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचाच प्रकार आहे. शासन एकीकडे अमरनाथ यात्रेकरूंची संख्या नियंत्रित करते आणि हज यात्रेकरूंची संख्या १,७५,०२५ करून गेल्या ७० वर्षांतील उच्चांक गाठते, हाही एक विरोधाभासच आहे. असे म्हणत केंद्र सरकारनेे हज यात्रेसाठी हवाई प्रवासभाड्यामध्ये केलेली भरघोस कपात त्वरित रहित करावी, अशी मागणी विश्‍व हिंदू परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर यांनी केली.

सिद्धीविनायक मंदिराच्या अर्पणनिधीमध्ये भ्रष्टाचार
करणार्‍या माजी विश्‍वस्तांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करा ! – हेमंत सोनवणे

वर्ष २०१६ मध्ये मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या केलेल्या तपासणीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. १.१.२०१५ ते ३१.८.२०१६ या काळात तत्कालीन विश्‍वस्तांनी जलयुक्त शिवार आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या देणग्यांच्या ंसंदर्भातील अभ्यास दौर्‍याच्या नावाखाली १२ लाख ९१ सहस्र २९१ रुपये खर्च केला. श्री सिद्धीविनायक मंदिर कायदा विश्‍वस्तांना अशा प्रवासखर्चाची अनुमतीच देत नाही. यासाठी शासनाची अनुमती घ्यावी लागते. त्यामुळे विनाअनुमती अभ्यास दौर्‍यांवर मंदिर विश्‍वस्तांनी केलेला खर्च नियमबाह्य ठरतो. तसेच जलयुक्त शिवाराचे पैसे शासनालाच दिले आहेत, तर दौरा करायची आवश्यकता काय होती ? यांसारखी अनेक सूत्रे या तपासणीत आढळली असून ती अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणी देवनिधीवर डल्ला मारणार्‍या संबंधित विश्‍वस्तांवर फसवणुकीचे आणि अफरातफरीचे गुन्हे प्रविष्ट करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी केली.

संभाजीनगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला डांबर फासण्यात आले. या घटनेचा समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच संबंधितांना तात्काळ अटक करण्याची मागणी या वेळी हिंदूमहासभेच्या वतीने करण्यात आली. आंदोलन संपल्यानंतर मोती चौक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर असणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर नामफलकाला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात