ईश्‍वरी अधिष्ठान असल्यामुळे हिंदु राष्ट्र येणारच ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

धुळे येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित
दोन दिवसीय ‘प्रांतीय हिंदू अधिवेशना’ची सांगता

‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची दिशा मिळण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

धुळे, १२ मार्च (वार्ता.) – प्रसारमाध्यमे आयुष्यभर हिंदु धर्मासाठी त्याग करणार्‍या शंकराचार्यांच्या देहत्यागाच्या बातमीला महत्त्व न देता अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूच्या बातमीला अधिक महत्त्व देतात, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे आवश्यक आहे. समाजाला दिशा देण्याचे कार्य हिंदु धर्मातील संतांनी अन् धर्मगुरु यांनी केले आहे. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या समाधीचा अंतिम विधी १८ घंटे ३० मिनिटे चालला; परंतु कोणत्याही प्रसारमाध्यमांनी त्यास प्रसिद्धी दिली नाही. याउलट आयुष्यभर संपत्तीच्या मागे धावणार्‍या चित्रपट अभिनेत्रीचा अंतिम विधी मात्र तासन्तास प्रसारीत करण्यात आला, असे प्रतिपादन ह.भ.प. संकेत दीक्षितगुरुजी यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० आणि ११ मार्च असे २ दिवस धुळे येथील अग्रवाल भवन सभागृहात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील ७ जिल्ह्यांचे प्रांतीय हिंदु अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

अधिवेशनाच्या प्रारंभी श्री. शिवाजी उगले यांनी शंखनाद केला. त्यानंतर सनातनचे सदगुरु नंदकुमार जाधव, ह.भ.प. संकेत दीक्षितगुरुजी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले. या अधिवेशनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. उदय बडगुजर आणि श्री. विजय पाटील यांनी केले. विविध २० संघटनांचे १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ या अधिवेशनात सहभागी झाले होते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे लढा देऊ, असा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला. अधिवेशाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आली.

ईश्‍वरी अधिष्ठान असल्यामुळे हिंदु राष्ट्र येणारच ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

सद्गुरु नंदकुमार जाधव

प्रत्येक हिंदूने काळाला अनुसरून ‘गुरुकृपायोगानुसार’ साधना करणे आवश्यक आहे. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे. सनातनच्या रामनाथी आश्रमाचे कार्य पाहिल्यानंतर लक्षात येत आहे की हिंदु राष्ट्र संपूर्ण जगभर येणार. तेथे जगाच्या अनेक देशांतील लोक येऊन साधना करायला लागले आहेत. या सर्वांमागे ‘ईश्‍वरी अधिष्ठान’ आहे. अनेक संतांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे निश्‍चितच ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण होणारच. भगवान श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे गोवर्धन पर्वत उचलला मात्र गोपगोपींनी आपापल्या काठ्या लावल्या, त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्‍वर करणारच आहे; पण आपल्याला त्यानिमित्त सेवेची मिळालेली संधी आहे. अनेक अडचणी येत आहेत. कार्य अखंडपणे चालू आहे. जे या कार्यात सहभागी होत आहेत, त्यांच रक्षण भगवंत करत आहे. कौरव-पांडवांच्या युद्धात पांडवांकडे पुरेसे मनुष्यबळ नसतांनाही पांडवांचाच विजय झाला. छत्रपती शिवाजी महाराज ५ पातशह्यांशी लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले, कारण त्यांना ईश्‍वरी अधिष्ठान होते.

देशाला पाकिस्तानपेक्षा पुरोगामी संघटनांकडूनच धोका अधिक आहे. – पू. सुनील चिंचोलकर

पू. सुनील चिंचोलकर

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि गुढीपाडव्याचा काहीही संबंध नाही. ब्राह्मण संभाजी महाराजांच्या हत्येमुळे आनंद साजरा करण्यासाठी ‘गुढीपाडवा’ साजरा केला जात होता, असा अपप्रचार काही पुरोगामी संघटना करत आहेत.

बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्राच्या आतापर्यंत २० लाख प्रती प्रकाशित झाल्या आहेत. ते केवळ ‘ब्राह्मण’ असल्याने विद्रोही वैचारिक आतंकवाद निर्माण करत आहेत. अनेक विचारवंतांनी शिव-समर्थ भेट मान्य केलेली आहे. महात्मा गांधींच्या आश्रमात, विनोबांच्या आश्रमात, रामकृष्ण मठात किती मुसलमान आहेत ? एकही नाही, तर मग ‘सर्वधर्मसमभाव’ कशाला म्हणायचे ? मुसलमान ख्रिस्ती झाला असे एकतरी उदाहरण आहे का ?

पुरोगामी संघटनांंच्या विरोधाला न जुमानता धर्मशास्त्रानुसार गुढी उभारा ! – ह.भ.प. आर्वीकर महाराज

सध्या पुरोगामी संघटनांनी ‘गुढीपाडवा’ या सणाचा फेसबूक आणि व्हाट्सअ‍ॅप या सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे अपप्रचार करायला प्रारंभ केला आहे. तरी यास न जुमानता गावागावात जाऊन हिंदूंचे प्रबोधन करून धर्मशास्त्रानुसार गुढी उभारायला हवी.

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणजे हिंदु धर्माचा अवमानच होय ! –
सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून ‘प्रांतीय अधिवेशना’निमित्त आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे २०२३ ला ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणारच आहे. इतर धर्मियांच्या सभांची पूर्व अनुमती नसतांनाही त्यांना पोलिसांकडून वेळेवर अनुमती दिली जाते; मात्र हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या ‘हिंदु धर्मजागृती सभे’च्या अनुमतीसाठी नाहक त्रास दिला जातो. यावर उपाय म्हणून हिंदूंनी संघटित शक्ती वाढवणे आवश्यक आहे. सिद्धिविनायक मंदिर, मुबंई येथे गणपतीच्या दुसर्‍या मजल्यावर साहाय्यता निधी मिळावा म्हणून धर्मांधांची रिघ लागलेली दिसते. ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द वापरणे म्हणजे हिंदु धर्माचा अवमानच होय.

महाराष्ट्रातील नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये अनेक हिंदू मुसलमानांच्या दर्ग्यांवर चादरी चढवतांना आणि ऊरुस साजरा करतांना दिसतात. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे गरजेचे आहे. हिंदूंनी संघटित होऊन हिंदूंचा एक दबावगट निर्माण करायला हवा.

पुरोगाम्यांनी हिंदूंच्या प्रत्येक सणाचा अपप्रचार करण्याची जणू काही मोहीम हाती घेतली आहे. ‘गुढीपाडवा’ या सणाचा अपप्रचार सध्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक या सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे केला जात आहे. तरीही हिंदूंनी मोठ्या संख्येने संघटित होऊन, गावागावातील हिंदूंचे प्रबोधन करून गुढीपाडवा साजरा करायला हवा.

आर्थिक हानी सोसून ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हे एकमेव ध्येय ठेवून चालवण्यात येत असलेले दैनिक सनातन प्रभात प्रत्येकाने वाचण्याचे आवाहन श्री. घनवट यांनी या वेळी केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या मते ‘अजान धार्मिक
स्वातंत्र्याचा अधिकार नाही’ – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, पंढरपूर

 

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्ष २०१७ च्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘सुराज्य अभियान’ राबवण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. यात आतापर्यंत अनेक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला जात आहे.

१.  शासनाच्या वतीने सर्वसामान्यांसाठी धर्मदाय रुग्णालये राज्यभर चालू करण्यात आली. यात २० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ही योजना रुग्णालयाबाहेर सर्वांना दिसेल अशा स्वरूपात प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र कुठेही योजनेची प्रसिद्धी सर्वसामान्यांच्या दृष्टीस पडेल, अशी केलेली नाही. धर्मदाय आयुक्त कार्यालयांत अशा रुग्णालयांची नोंद आहे; पण ते प्रत्यक्षात अस्तित्वात नाही.

२. प्रत्येक पेट्रोलपंपावर सर्वसामान्य व्यक्तीला ११ प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. येथील पेट्रोलची शुद्धता तपासणे, प्रमाण मोजणी करणे यांसारखे अधिकार आहेत. ही पेट्रोलपंप मोहीम भारतात ८ राज्यांत ३५ जिल्ह्यांत ४८४ पेट्रोलपंपांवर प्रातिनिधिक स्वरूपात राबवण्यात आली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

३. राज्यातील जी काही ट्रस्टची रुग्णालये आहेत, त्यांची पाहणी करण्याकरता ‘डॉ. तात्याराव लहाने समिती’ची स्थापना करण्यात आली. त्यानुसार प्रती ३ मासांनी अशा रुग्णालयांची तपासणी करून मिळणार्‍या सुविधांविषयी धर्मादाय आयुक्तांकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश होते; पण प्रत्यक्षात कुठलेही कार्य झाले नाही. याउलट यात भ्रष्टाचार झाला आहे.

दंगलीच्या काळात हिंदूंनी अधिवक्त्यांचे साहाय्य घेणे आवश्यक – अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

धुळे येथे झालेल्या दंगलीच्या वेळी मी स्वत: ‘सत्यशोधन समिती’मध्ये होतो. तेव्हा हिंदु आणि मुसलमान अशा दोन्ही भागांत जाऊन आम्ही दंगलीच्या हानीची पाहणी केली. तेव्हा असे लक्षात आले की, शासनाने हिंदूंची पुष्कळ मोठ्या प्रमाणात हानी झालेली असतांना त्यांना अल्प मोबदला दिला आणि मुसलमानांची अल्प हानी होऊनही त्यांना भरघोस आर्थिक साहाय्य करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील
अनधिकृत भोंगे बंद करायला हवे ! – अधिवक्ता सुनील जैन

अधिवक्ता सुनील जैन

लव्ह जिहादच्या विळख्यातून हिंदु युवतींची मुक्तता करणे आवश्यक – अधिवक्ता देवेंद्र मराठे

अधिवक्ता देवेंद्र मराठे

आज देशात लव्ह जिहादच्या अनेक घटना समोर येत आहेत. हिंदु युवतींचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण चालू आहे. यातून वेळीच सावध होऊन आपण हिंदु युवतींची लव्ह जिहादच्या विळख्यातून मुक्तता करायला हवी.

हिंदुत्वनिष्ठांनी कथन केले हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे फलित !

श्री. भूषण महाजन, भुसावळ

हिंदु जनजागृती समिती सह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटितपणाचा परिपाक म्हणजे ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलन’ ! या आंदोलनात पद, पक्ष, सांप्रदाय, जात, संघटना  विसरून सर्वजण केवळ ‘हिंदु’ म्हणून सहभागी होते. अनेक हिंदुत्वनिष्ठ वक्ते यातून निर्माण झाले आहेत. प्रत्येक आंदोलन हे सनदशीर मार्गाने होत असल्याने पोलिसांचेही सहकार्य चांगले लाभते.

 

श्री. मुकूंद महाजन, शिवपूर, (तालुका भुसावळ)

शिवपूर या गावात हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु धर्मजागृती सभा’ झाल्यामुळे अनेक हिंदूंपर्यंत राष्ट्र अन् धर्म यांचेे विचार पोहोचले. या सभेचा प्रसार गावातल्या हिंदुत्वनिष्ठ युवकांनी घरोघरी जाऊन केला. या सभेला ६५० हून अधिक हिंदू उपस्थित होते. गावात चालू असलेल्या धर्मशिक्षणवर्गाची उपस्थिती वाढली.

श्री. चेतन चौधरी, सोनगीर, धुळे

या गावात हिंदु धर्मजागृती सभा होण्यापूर्वी दोन गटांत नेहमी वाद होत असत. येथे डिसेंबर महिन्यापर्यंत ३००/३०० युवकांचे दोन गट होते. त्यातील ५०-५० मुले नेहमी समोरासमोर येऊन भांडायची, हाणामारी करायची. त्यांनी २५ डिसेंबर या दिवशी धुळे यथे झालेली ‘हिंदु धर्मजागृती सभा’ ऐकली. तेव्हापासून गट-तट सोडून संघटितपणे रहायचे, असे ठरवले. सोनगीर येथेही ७ फेब्रुवारी या दिवशी सभा पार पडली. या सभेनिमित्त गावातील प्रसार, बैठकांची पूर्वसिद्धता, भगवे झेंडे, कापडी फलक लावणे यांसारख्या सेवा मन लावून केल्या. गावात झालेल्या सभेमुळे आज सर्व एकत्रित रहात आहेत. याचा परिणाम गावासह आजू-बाजूच्या गावांतही दिसून आला.

श्री. पियुष खंडेलवाल, धुळे

धुळे शहरात सभेनंतर चालू झालेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षण वर्ग यांमुळेे माझ्यात आत्मविश्‍वास वाढला. यापुढे मला कृतीशील होऊन धर्मकार्य करायचे आहे. मनाची एकाग्रता वाढून मन स्थिर झाल्याचे जाणवते. येणार्‍या काळात प्रत्येक हिंदूने स्वसरंक्षण प्रशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आवश्यक आहे.

अधिवक्ता श्री. नीरंजन चौधरी, जळगाव

हिंदुत्वाचे कार्य करतांना पोलिसांचा छळ अनेकांना सहन करावा लागतो. या त्रासापासून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने कायद्याचा अभ्यास समजून घेऊन कार्य करायला हवे. कायद्याचा अभ्यास केल्याने धर्मकार्य अधिक प्रभावीपणे करता येते.

डॉ. योगेश पाटील, गोरक्षक, धुळे

गोहत्येच्या संदर्भात आपण सनदशीर मार्गाने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करू शकतो. स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करून न घेतल्यास आपण त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार प्रविष्ट करू शकतो. गोरक्षणाचे कार्य करत असतांना कुलदेवतेचा नामजप करून भगवंताचे अधिष्ठान निर्माण करायला हवे.

अधिवेशनस्थळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथकक्ष उभारण्यात आला होता. त्यास चांगला प्रतिसाद लाभला. या अधिवेशनाच्या वेळी पहिल्या दिवशी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सांगताप्रसंगी जळगाव येथील श्री. विजय पाटील, शिरपूर येथील श्री. तुषार बारी, धुळे येथील श्री. नीलेश मराठे, श्री. राजेंद्र खैरनार आणि श्री. राजू भावसार यांनी मनोगत व्यक्त केले.

दोन दिवसीय अधिवेशनातून सर्व जिल्ह्यांनी कृतीच्या स्तरावर ८ राष्ट्रीय हिंदू आंदोलने, ७ निवेदने देणे, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण ५९ धर्मसभा, ३८ धर्मशिक्षणवर्ग, २२ प्रदर्शने, तर ८ ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.

क्षणचित्रे

१. मोहाडी (धुळे) येथील धर्माभिमानी धुळे येथे २५ डिसेंबर या दिवशी झालेल्या सभेनंतर हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्यात सहभागी झाले. दोन महिन्यातच येथील धर्माभिमानी श्री. तुषार बारी यांनी पूर्णवेळ धर्मकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.

२. ‘जयतु जयतु हिन्दु राष्ट्रम्’, ‘लाना है, लाना है, हिंदु राष्ट्र लाना है’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी दोन दिवस सभागृहात वीरश्री निर्माण झाली.

३. नांदेड जिल्ह्यातून श्री. जगदीश हाके, श्री. रणजित नायर, श्री. सुनील देबगुंडे हे ३ अधिवक्ते २ दिवस उपस्थित राहिलेे.

सहभागी संघटना

आध्यात्मिक संघटना : योगवेदांत सेवा समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वारकरी संप्रदाय, जय श्रीराम मित्र मंडळ, श्री संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जय मातादी ग्रूप

हिंदुत्वनिष्ठ संघटना : स्वदेशी जागरण मंच, हिंदु एकता आंदोलन पक्ष, बजरंग दल

अन्य संघटना : बार असोसिएशन नंदुरबार, बार असोसिएशन धुळे, हिंदु विधीज्ञ परिषद, श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ, जय शिवराय ग्रूप, आदर्श गणेश मंडळ, पवन नगर शैक्षणिक अन् सांस्कृतिक मंडळ, नवनाथ मंडळ, सुवर्ण मित्र मंडळ,

पक्ष : भाजप, शिवसेना

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात