अधिवक्त्यांनी संविधानातील त्रुटींविषयी प्रबोधन करावे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

मार्गदर्शन करतांना १. श्री. चेतन राजहंस आणि त्यांच्या बाजूला पू. नीलेश सिंगबाळ

मुझफ्फरपूर (बिहार) – आजही भारतात ‘इंडियन पीनल कोड १८६०’ हा कायदा चालू आहे. हा कायदा मुळातच इंग्रजांनी भारतात पुन्हा वर्ष १८५७ सारखा उठाव होऊ नये; म्हणून क्रांतीकारकांवर अंकुश ठेवण्यासाठी बनवला होता. या कायद्याने गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी सर्वांना अपराधी ठरवले होते. हाच कायदा आजही चालू रहाणे आश्‍चर्यकारक आहे. भारतात कायदे करणार्‍या संसदेत अनेक अशिक्षित लोक निवडले जात असल्याने भारतातील नवे कायदेही सदोष असण्याची शक्यता नाकारणे चुकीचे होईल. याविषयी कायदा आणि संविधान यांचे जाणकार असलेल्या अधिवक्त्यांनी प्रबोधन केले पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मुझफ्फरपूर बार असोसिएशनमध्ये आयोजित कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला ३१ अधिवक्ते उपस्थित होते. या वेळी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर अधिवक्त्यांसाठी ‘बार असोसिएशन’मध्ये प्रतिमास धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्‍चित झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात