धर्मग्लानी रोखण्यासाठी संतांना वैधानिक मान्यता देणारे हिंदु राष्ट्र हवे ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

खड्डा (कुशीनगर) येथे संतबैठक, संत बैठकीत चर्चा करतांना (उजवीकडून तिसरे) श्री. चेतन राजहंस

खड्डा, कुशीनगर (उत्तरप्रदेश) – प्राचीन काळी भारतात राजगुरु आणि विद्वानसभेच्या माध्यमातून राजाला राजनीतीविषयी मार्गदर्शन मिळत होते. समाजव्यवस्थेत सदाचार आणि नीतीची शिकवण संतपरंपरेतून दिली जात होती. या परंपरेला धर्मनिष्ठ विद्वतसभेद्वारे मान्यता होती. आज लोकशाहीत संतांना कोणताही वैधानिक अधिकार नाही. त्यामुळे धर्म न शिकलेला प्रशासनातील सामान्य अधिकारी शंकराचार्यांना हात लावण्याचे धाडस करतो. धर्म न शिकलेले प्रशासकीय अधिकारी देशाच्या सदाचार आणि नीती व्यवस्थेची ऐशीतैशी करत आहेत. परिणामी भ्रष्टाचार, बलात्कार, अनैतिकता आणि स्वार्थपरायणता वाढली आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी धर्मशास्त्र शिकलेल्या आणि आध्यात्मिक अधिकार असलेल्या संतांना वैधानिक मान्यता देणारे हिंदु राष्ट्र स्थापन करायला हवे. धर्मग्लानी रोखण्याचा हाच एकमात्र उपाय आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी येथे आयोजित संतबैठकीत केले.

महंत रामनयनदासजी महाराज यांच्या नेतृत्वाखालील ‘भक्ती आंदोलन मंच’ या संत-महंतांच्या संघटनेने ही बैठक आयोजित केली होती. बैठकीत सर्व संतांनी हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कार्य करण्याचा संकल्प केला. भागवतकथा, रामायणकथा आदी ठिकाणी, तसेच विविध संतबैठकांमध्ये हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयी जागृती करण्यासाठी आम्ही सर्वत्र ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांना बोलवू, असे वचन या वेळी उपस्थित संतांनी दिले.