उद्योजक क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्राकडे सेवाभावातून पहाणारे अरविंद शिंदे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. अरविंद शिंदे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

कोल्हापूर – उद्योजकतेकडे साधना म्हणून पहाणारे आणि प्रत्येक गोष्ट सेवाभावातून पार पाडणारे कोल्हापूर येथील उद्योजक श्री. अरविंद शिंदे (वय ६६ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. कोल्हापूर येथील सनातन संस्थेच्या शाहुपुरी येथील सेवाकेंद्रात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी एका सत्संगात ही घोषणा केली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. मानसिंग शिंदे, डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, उद्योजक श्री. आनंद पाटील यांसह अन्य उपस्थित होते.

या वेळी श्री. अरविंद शिंदे यांची वैशिष्ट्ये सांगतांना श्री. आनंद पाटील म्हणाले, ‘‘छोट्या छोट्या गोष्टीत एखाद्या व्यक्तीला कशाप्रकारे सिद्ध करायचे, त्याचे कौशल्य कसे विकसित करायचे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. एखाद्या चारचाकी गाडीची काच पुसण्यासाठी गाडीचा वायपर कशाप्रकारे उचलावा यांसह ‘अनेक कामे गुणवत्तापूर्ण करणे’ या गोष्टीवर श्री. शिंदे यांच्या आस्थापनात भर देण्यात आला आहे आणि त्या गाष्टींचा अत्यंत खुबीने अवलंब केला आहे.’’

सत्कारानंतर मनोगत व्यक्त करतांना श्री. अरविंद शिंदे म्हणाले,

१. श्री श्री रवीशंकर यांच्या शिबिराला जायचो तेव्हा हृदयाचे ठोके मोजता आले. प्रत्यक्षात घडाळ्यावर ठोके मोजले असता ते जुळले !

२. मुसलमानांच्या इज्तेमाविषयी आज चर्चा चालू आहे. त्यासाठी केवळ संभाजीनगर नव्हे, तर अन्य ठिकाणचे मुसलमान त्यांना साहाय्य करत आहेत. त्यामुळे हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठी साहाय्य करायला हवे.

३. मलाही साधना शिकायची आहे. मी शिकल्यावर घरच्यांनाही साधना करण्यास सांगणार आहे. सध्या दैनिक सनातन प्रभातचे वाचन करत आहे. त्यातून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे.

 

यशस्वी उद्योजक असूनही साधेपणा आणि साधनेचे गांभीर्य
असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कोल्हापूर येथील श्री. अरविंद शिंदे !

उद्योजकतेकडे साधना म्हणून पहाणारे कोल्हापूर येथील उद्योजक श्री. अरविंद शिंदे (वय ६६ वर्षे) यांनी नुकतीच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. कोल्हापूर येथील सनातनच्या शाहुपुरी येथील सेवाकेंद्रात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

श्री. अरविंद शिंदे

१. साधेपणा

‘श्री. अरविंद शिंदे हे यशस्वी उद्योजक असूनही त्यांच्यात साधेपणा आहे.

 

२. उत्तम कार्यक्षमता

या वयातही त्यांची काम करण्याची क्षमता चांगली आहे.

 

३.अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

ते बाजारातील नवीन तंत्रज्ञान वापरतात; मात्र ते त्याचे बाजारीकरण करत नाहीत.

 

४. जिज्ञासू वृत्ती

‘श्री. आदित्य शास्त्री आय.टी. अभियंता असूनही ते साधनेत कसे आले ?’, हे त्यांनी जिज्ञासेने विचारले. श्री. आदित्य यांनी त्यांना एका ग्रंथाच्या संदर्भातील माहिती दिल्यावर ‘मलाही तो ग्रंथ द्या’, असे ते लगेच म्हणाले.

 

५. व्यष्टी साधना

अ. ते श्री श्री रविशंकर यांच्या संप्रदायाच्या माध्यमातून साधना करतात. ते म्हणाले, ‘‘नामजप श्‍वासाला जोडण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. मी श्री श्री रवीशंकर यांच्या शिबिराला गेलो असता माझे ध्यान लागून मला हृदयाचे ठोके मोजता आले. प्रत्यक्षात घड्याळ लावून मोजले असता ते जुळले.’’

आ. एक मासापूर्वी (महिन्यापूर्वी) मी त्यांना नामजपाचे महत्त्व सांगितले. साधक श्री. मनोज खाडये त्यांना भेटल्यावर ते म्हणाले, ‘‘माझा नामजप चालू आहे आणि मला अनुभूतीही येत आहेत.’’

 

६. समष्टी साधना

अ. ते ५ वर्षांपासून ७० ते ८० सनातन पंचांग घेतात.

आ. ते म्हणाले, ‘‘मला अध्यात्म जाणून घ्यायचे आहे. मला तुमच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे.’’

इ. ते संस्थेच्या कार्यात अर्पण देऊन सहभागी होतात.

 

७. स्वतःला पालटण्याची तळमळ

ते सांगतात, ‘‘मी बोलतांना एखादा शब्द परत परत वापरला का किंवा अनावश्यक शब्द वापरला का ?’,याकडे माझे लक्ष असते.’’

– डॉ. मानसिंग शिंदे, कोल्हापूर (फेब्रुवारी २०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात