निवडणुकीत विद्वान आणि मूर्ख यांच्या मतांचे मूल्य एकच असणे, हेच लोकशाहीच्या पतनाचे कारण ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

होलीमिलन कार्यक्रमात उपस्थित धर्माभिमानी हिंदू

एकडोंगी (कुशीनगर) येथे हिंदु युवा वाहिनीच्या ‘होलीमिलन’ कार्यक्रमात मार्गदर्शन

एकडोंगी, कुशीनगर (उत्तरप्रदेश) – सण आनंदाने साजरे करायचे असतात; पण आज सर्वत्र अन्याय-अत्याचार-शोषण करणार्‍या लोकशाहीच्या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड रोष असल्याने सण आनंदाने साजरे होत नाहीत. वर्ष १९५२ पासून आजपर्यंत प्रत्येक निवडणूक विकास आणि दारिद्य्र-निर्मूलन या सूत्रांवर लढवली गेली; पण या ७ दशकांत रस्ते, वीज, पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधाही लोकांना मिळाल्या नाहीत; कारण लोकशाहीत विद्वान किंवा लोककल्याणाची तळमळ असणारे नव्हे, तर धनबल, बाहुबल, जातीय गणित आदी असणारे निवडणूक जिंकतात. त्यामुळे निवडणुकीत विद्वान आणि मूर्ख यांच्या मतांचे मूल्य एकच असणे, हेच लोकशाहीच्या पतनाचे कारण आहे. यास्तव आपण या वर्षी होलिकादेवीला साक्षी मानून हिंदु राष्ट्र स्थापण्याची प्रतिज्ञा करूया, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी होलीमिलन कार्यक्रमात केले.

हिंदु युवा वाहिनीचे जिल्हा संयोजक श्री. अजय गोपालराव शिशुजी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला १२५ हून अधिक जण उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश-बिहार समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी उपस्थितांना होळी धर्मशास्त्रानुसार साजरी करण्याचे महत्त्व सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात