शिवजयंती उत्सवात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याची अनुभूती देणार्‍या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी प्रबोधन !

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा सुवर्णसंगम असलेले आणि पाचही मोगल पातशाह्यांचा निःपात करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, हे महाराष्ट्राला एखाद्या देवतेसमान पूजनीय आहेत. त्यांच्या केवळ स्मरणानेही अन्यायाविरुद्ध लढण्याची विजिगिषु वृत्ती निर्माण होते. फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया, ४ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार ३८८वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी झाली. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीनेही राज्यभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी आयोजिलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा आदर्श ठेवत आदर्श हिंदु राष्ट्र स्थापन करण्याविषयी या वेळी जागृती करण्यात आली.

प्राण असेपर्यंत धर्मासाठी लढण्याची प्रतिज्ञा करा ! – आमदार टी. राजासिंह

पिंपरी (जिल्हा पुणे), ५ मार्च (वार्ता.) – शंभर कोटी हिंदु असूनही आज हिंदुस्थान ‘हिंदु राष्ट्र’ नाही. आज हिंदु धर्मावर एका बाजूने मिशनरी धर्मांतराचे कट रचत आहेत, तर दुसर्‍या बाजूने ‘लव्ह जिहाद’चा आघात होत आहे. बांधवांनो, धर्माचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी प्रतिदिन धर्मासाठी किमान एक घंटा देण्याचा निश्‍चय करा. आपल्या सर्वांना अखंड हिंदु राष्ट्र स्थापायचे आहे. त्यासाठी प्राण असेपर्यंत देश अन् धर्म यांसाठी लढण्याची प्रतिज्ञा करा, असे आवाहन भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. शिवजयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून शगुन चौक ते पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ मूर्तीपर्यंत ‘एक गाव एक शिवजयंती’च्या पार्श्‍वभूमीवर भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

ते पुढे म्हणाले –

१. जिजामाता ‘आपला पुत्र धर्मरक्षक व्हावा’, अशी प्रार्थना सतत करायच्या. त्यानुसारच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापण्याची प्रतिज्ञा केली. सध्याच्या काळात आई-वडील असा विचार करतांना दिसत नाहीत. त्यांना माझे आवाहन आहे की, आपल्या मुलांना देश आणि धर्म रक्षणासाठी सिद्ध करा.

२. हिंदुत्वावर घाला घालण्यासाठी हिरवे फुत्कार काढत अफझलखान महाराष्ट्रावर चालून आला. त्या वेळी त्याचा वध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र भगवामय केला. जगेन तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, धर्मासाठी प्राणार्पण करेन, तर छत्रपती संभाजी महाराजांसारखे हा विचार दृढ करा.

३. काही जण म्हणतात, हिंदु पुष्कळ शांत स्वभावाचे असतात. त्यांना मला सांगायचे आहे, हिंदु जागृत होतात तेव्हा, सर्व जग हिंदुत्वमय होऊन जाते; म्हणून हिंदु धर्मावर आघात करणे थांबवा.

क्षणचित्रे

१. चिंचवड येथील सिद्धिविनायक शाळेच्या ५० विद्यार्थ्यांनी वारकरी पथक, मर्दानी खेळ पथक आणि झाशीची राणीच्या वेशात मुली मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. घोडे, उंट यांसह नृत्य पथकांचाही यात समावेश होता.

२. असंख्य भगव्या ध्वजांमुळे सर्व प्रमुख मार्ग भगवेमय झाले होते. ध्वनीक्षेपकांवरून लावण्यात आलेल्या स्फूर्तीगीतांमुळे, तसेच जोशपूर्ण घोषणांमुळे शिवकालीन वातावरणाचा अनुभव सर्वांना येत होता.

३. मिरवणुकीच्या मार्गावरील गुरुद्वारामधून सर्वांना न्याहारी आणि पाणीवाटप करण्यात आले. त्या वेळी श्री. टी. राजसिंह यांनी गुरुगोविंद सिंह यांचे हिंदु धर्मियांना मिळालेले साहाय्य आणि त्यांची लढाऊवृत्ती याविषयी सर्वांना ध्वनीक्षेपकावरून माहिती दिली.

४. आमदार टी. राजसिंह यांनी ‘अयोध्येला राममंदिर बांधण्यासाठी कोण कोण येणार ?’, असे विचारल्यावर सर्वांनी आपल्या भ्रमणभाषमधील प्रकाश चालू करून ‘‘आम्ही सर्व येणार !’’ असे म्हणत अनुमोदन दिले.

हिंदु राष्ट्रासाठी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे बळ हवे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

डावीकडून सर्वश्री सुहास पोफळे, जगदीश वासवानी, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. सुशील पंडित (हिंदुकुलभूषण पुरस्कार स्वीकारतांना), पंडित धर्मवीर आर्य, अधिवक्ता देवीदास शिंदे

पिंपरी, ५ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांनी संत आणि गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली साधना केली. त्यांना साधनेचे बळ असल्यानेच ते यशस्वी होऊ शकले. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने क्षात्रतेजाचे पालन करावे. शस्त्रपूजा ही हिंदूंची परंपरा आहे; मात्र ही शस्त्रे कुणावर आक्रमण करण्यासाठी म्हणून नाही, तर स्वसंरक्षणासाठी वापरायची आहेत. हिंदु राष्ट्रासाठी कार्यरत असणार्‍यांनी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे बळ वाढवायला हवे. जातीपातीच्या भिंती तोडून हिंदूंनी एक व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती महोत्सव आणि हिंदु स्वाभिमान दिन यांनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पनून काश्मीर संघटनेचे श्री. सुशील पंडित यांना हिंदुकुलभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानचे सर्वश्री पंडित धर्मवीर आर्य, उत्तम दंडिमे, अधिवक्ता देवदास शिंदे, सुहास पोफळे आदी उपस्थित होते.

कराच्या पैशांतून भारत आतंकवाद पोसत आहे ! – श्री. सुशील पंडित

माहिती अधिकाराच्या अंतर्गत गृहमंत्रालयाकडून माहिती मागवण्यात आली होती की, हुर्रियत कॉन्फरन्सवर शासकीय पैसे व्यय केले जात आहेत का ? असल्यास किती ? त्यावर लिखित उत्तर मिळाले, ‘गेल्या ५ वर्षांत हुर्रियतच्या लोकांचे खाणे, पिणे, विमानप्रवास, पेट्रोल, गाडी, सुरक्षाव्यवस्था यांवर ५०० कोटींपेक्षा अधिक रुपये व्यय करण्यात आले आहेत. त्यांच्या रोगोपचारांवरचा व्यय यामध्ये अंतर्भूत नाही. जे लोक देशाचे कायदे मानत नाही, त्यांना खाऊन पिऊन तंदुरुस्त ठेवणारा भारत हा एकमेव देश आहे.’

या वेळी श्री. सुशील पंडित यांनी आतंकवादाविषयीच्या सरकारच्या बोटचेप्या आणि राष्ट्रविरोधी धोरणांवर टीका केली. ‘काश्मीर हे हिंदु संस्कृती आणि ज्ञानपरंपरा यांचे केंद्र असल्याचे सांगत देशाचा खरा शत्रू ओळखून आपल्यापुढील संकटांचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने जागृत होण्याची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.

काश्मीरमधून वर्ष १९९० मध्ये हिंदूंना निर्वासित व्हावे लागले. काश्मीरवर जे संकट कोसळले होते, त्या वेळी काश्मिरी हिंदूंना वाटत होते की, स्वतंत्र भारताचे शासनकर्ते, न्याययंत्रणा, मानवाधिकार संघटना, प्रसिद्धीमाध्यमे काश्मिरी हिंदूंच्या सोबत असतील; मात्र हा केवळ भ्रम होता, हे नंतर सिद्ध झाले, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या मनातील व्यथा व्यक्त केली.

रायगड जिल्ह्यात ७ ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून शिवजयंतीच्या कार्यक्रमांत सहभाग

१. पेण

येथे ‘शिवछावा प्रतिष्ठान’ आणि ‘ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ यांच्या संयुक्त विद्यमाने फणसडोंगरी येथे सामूहिक शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीच्या वतीने ‘हिंदूंमध्ये शौर्यजागरण आणि हिंदु राष्ट्र्राची स्थापना’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले.

२. शिरकी पेण

येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. जगन्नाथ जांभळेगुरुजी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र याविषयी प्रवचन घेतले. याचा लाभ १६० जिज्ञासूंनी घेतला.

३. उरण

आवरे येथे शिवसेना युवा शाखेच्या वतीने शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. याचा लाभ १२० जणांनी घेतला. धर्माभिमानी श्री. कौशिक ठाकूर यांनी हिंदु जनजागृती  समितीचे कार्याने प्रभावित होऊन समितीच्या कार्यकर्त्यांना व्याख्यान घेण्यासाठी निमंत्रित केले होते. या वेळी ‘श्री सिद्धिविनायक न्यासातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी त्वरित कारवाई व्हावी’, अशा आशयाच्या निवेदनावर स्वाक्षरी करण्याची मोहीम घेण्यात आली. त्यात सर्वांनी उस्फूर्तपणे सहभाग दर्शवत स्वाक्षरी केली.

वशिणी येथील शिवसेनेच्या शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात समितीचे श्री. मिलिंद पोशे यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ ४५ शिवप्रेमींनी घेतला. हे मार्गदर्शन आयोजित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमानी श्री. यशवंत ठाकूर यांनी पुढाकार घेतला. या वेळी वशिणी शिवसेना शाखाप्रमुख श्री. राकेश पाटील यांनी धर्मशक्षण वर्गाला येणार असल्याचे सांगितले.

४. पनवेल

तळोजा मजकूर येथील कार्यक्रमात समितीच्या वतीने श्री. योगेश ठाकूर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले. ५० जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला. याही ठिकाणी ‘श्री सिद्धिविनायक न्यासातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी त्वरित कारवाई व्हावी’, अशा आशयाच्या निवेदनावर स्वाक्षरी करण्याची मोहीम घेण्यात आली. त्यात सर्वांनी उस्फूर्तपणे सहभाग दर्शवत स्वाक्षरी केली.

५. नेरे, चिपले

येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अभिजित कोलकर यांनीही ‘गावात हिंदु जनजागृती समितीने प्रवचन घ्यावे’, अशी मागणी केली आहे.

६. सांगुर्ली

गावात ‘युवाराजे प्रतिष्ठान’कडून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि सःद्यस्थिती’ याविषयीचे मार्गदर्शन केले.

७. कोलाड, रोहा

येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. जांभळेगुरुजी यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ ७० जणांनी घेतला. या वेळी घोसाळा गावच्या सरपंच सौ. पोर्टे आणि व पाली पंचायत समितीच्या उपसभापती सौ. देसाई यांची उपस्थिती लाभली. या वेळी क्रांतिकारकांच्या जीवनचरित्राचे दर्शन घडवणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांच्या वितरण कक्षालाही उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला.

८. डोंबिवली

शिवसेना शाखा क्र. ७०, कोपरगाव, डोंबिवली पश्‍चिम येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. महेश मुळीक यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापना आणि काळानुसार आवश्यक असे हिंदूसंघटन यांचे महत्त्व सांगितले. ८० शिवप्रेमींनी याचा लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात