सातारा नगरपालिकेने ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कार’ रहित करावा ! – राहुल कोल्हापुरे

श्री. राहुल कोल्हापुरे

 

सातारा, ४ मार्च (वार्ता.) – ज्याप्रमाणे महाराष्ट्र विधीमंडळाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमुळे सहानुभूमी म्हणून १४ वर्षे रखडलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अवघ्या ८ दिवसात संमत केला, त्याप्रमाणेच सातारा नगरपालिकेनेही डॉ. दाभोलकर यांच्या नावे सामाजिक स्मृती पुरस्कार सहानुभूमी म्हणूनच चालू केला आहे. या पुरस्काराला समस्त सातारावासियांचा प्रखर विरोध आहे. त्यामुळे नगरपालिकेने हा पुरस्कार रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कोल्हापुरे यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये केली.

हिंदू धर्माला नावे ठेवणार्‍यांच्या नावाने दिला जाणारा सामाजिक स्मृती पुरस्कार हा समस्त हिंदूंचा पर्यायाने हिंदु धर्माचा अवमान आहे. या पुरस्कारासाठी डॉ. दाभोलकर यांच्यापेक्षाही श्रेष्ठ सातारावासियांची नावे डोळ्यांपुढे असतांना घोटाळेबाज धर्मद्रोही डॉ. दाभोलकर यांच्या नावे पुरस्कार देणे म्हणजे तो पुरस्काराचाही अवमानच होय. अशा स्मृती पुरस्काराला विरोध करून तो रहित करण्याची मागणी करणे हे प्रत्येक सातारावासीयांचे आद्यकर्तव्य आहे, असे विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, असे म्हणाले.

जिल्हा धर्माचार्यप्रमुख पू. शहाजीबुवा रामदासी म्हणाले की, हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन नेहमीच परिणामकारक असते. दाभोलकरांच्या न्यासाविषयी सातारा धर्मादाय आयुक्तांनी गंभीर ताशेरे ओढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर डॉ. दाभोलकर स्मृतीपुरस्कार रहित करावा या समस्त सातारावासियांच्या मागणीला आमचा ठाम पाठिंबा आहे.

२८ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत गोलबाग परिसरात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात ते बोलत होते. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, जिल्हा धर्माचार्यप्रमुख पू. शहाजीबुवा रामदासी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम, श्री. हेमंत सोनवणे, सौ. रूपा महाडिक, सनातन संस्थेच्या सौ. विद्या कदम, सौ. माधुरी दीक्षित आदी मान्यवरांसह ३५ हून अधिक धर्माभिमानी हिंदु उपस्थित होते.

आंदोलनामध्ये या वेळी विविध मान्यवरांचे मार्गदर्शनही झाले. ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर सामजिक स्मृती पुरस्कार’ रहित करण्यासमवेत धर्मादाय रुग्णालयातील भ्रष्टाचार चौकशीविषयी नेमण्यात आलेल्या डॉ. तात्याराव लहाने समितीच्या निष्क्रीयतेचा निषेध करत ती बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली, तसेच मध्यप्रदेशातील कासगंज येथील तिरंगा यात्रेवर दगडफेक करून चंदन गुप्ता या हिंदुत्वनिष्ठाची हत्या करण्यात आली होती. या हत्येसाठी आणि दंगलीसाठी उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई करावी, ही मागणीदेखील करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात