हिंदु राष्ट्राची स्थापना श्रीकृष्णच करणार आहे, याची धर्मप्रेमींना निश्‍चिती ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सनातन संस्था

पंचम मुंबई-ठाणे-रायगड प्रांतीय हिंदु अधिवेशन २०१८

विविध २२ हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांचा अधिवेशनात सहभाग

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुणाच्या साहाय्याची वाट न पहाता हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केवळ हिंदुत्वावर होणारे आघातच नव्हे, तर देशातील भ्रष्टाचार, अनाचार यांविरोधातही आपणाला लढायचे आहे. आज काश्मीरमध्ये भारतीय सैन्यांवर दगडफेक करणार्‍यांवरील खटले मागे घेण्यात येत आहेत आणि देशद्रोह्यांना मारणार्‍या सैनिकांवर खटले घातले जात आहेत. जगात अन्य धर्मियांची राष्ट्र आहेत; मात्र उद्या हिंदूंवर शरणार्थी म्हणून रहाण्याची वेळ आली, तर जगात एकही हिंदु राष्ट्र नाही. राज्यकर्ते भ्रष्ट झाले आहेत. लोकशाही अपयशी ठरली आहे. शिक्षणसम्राटांनी शिक्षणाचे बाजारीकरण केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात लूट चालू आहे. जातीपातींवरून मते मागणारे निवडून येत आहेत. महिला आणि बालक सुरक्षित नाहीत. या सर्वांवर हिंदु राष्ट्र हा एकमेव पर्याय आहे. यासाठी संघटनेच्या कार्याच्या पुढे जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एकजूट आवश्यक, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ आणि ४ फेब्रुवारी २०१८ असे २ दिवस भांडुप येथील देवम बँक्वेट सभागृहात मुंबई-ठाणे-रायगड पंचम प्रांतीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे, संघटक श्री. प्रसाद वडके उपस्थित होते. विविध २२ संघटनांचे ४४ हिंदुत्वनिष्ठ या अधिवेशनात सहभागी झाले होते. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एकत्रित लढा देऊ’, असा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला. या अनुषंगाने धर्मावरील आघाताच्या विरोधात सर्व संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन उभारण्यावर सर्वानुमते ठरवण्यात आले.

 

अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे

‘पद्मावत’ दाखवण्याला व्यक्तीस्वातंत्र्य आहे, तर मग अफझलखान
वधाचे चित्र लावायला व्यक्तीस्वातंत्र्य का नाही ? – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

१. पद्मावत चित्रपटातून खोटा इतिहास दाखवला जात आहे, तरीही न्यायालय म्हणते, ‘दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करायला हवा.’ माझा न्यायालयाला प्रश्‍न आहे, ‘पद्मावत’ दाखवण्याला व्यक्तीस्वातंत्र्य आहे, तर मग अफझलखान वधाचे चित्र लावायला व्यक्तीस्वातंत्र्य का नाही ? अफझलखानवध हा सत्य आणि प्रेरणादायी इतिहास आहे; मात्र अफझलखान वधाचे चित्र लावणार्‍यांवर खटले प्रविष्ट होतात. भन्साळी यांना व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र खरा इतिहास मांडायला हिंदूंना व्यक्तीस्वातंत्र्य नाही. काय ही संविधानाची विटंबना आहे !

२. आज भारतात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आहे. तरीही आज हिंदु राष्ट्राची आवश्यकता का ? कारण काश्मीरमध्ये भारतीय सैन्यांवर दगडफेक करणार्‍यांवरील खटले मागे घेण्यात येत आहेत आणि ज्या जवानांनी देशद्रोह्यांना मारले त्यांच्यावर खटले घातले जात आहेत. काश्मीरसाठी स्वतंत्र कायदा आहे. यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे.

३. काश्मीरची स्थापना झाली, तेव्हा पंजाबमधून स्वच्छतेच्या कामासाठी १० सहस्र दलितांना काश्मीरमध्ये आणण्यात आले. त्यांची तिसरी पिढी आता काश्मीरमध्ये आहे; मात्र ७० वर्षे झाली तरी ३७० कलमामुळे अद्यापही त्यांना काश्मीरचे नागरिकत्व मिळालेले नाही. यावर उमर खालिद बोलत नाहीत; मात्र पुणे येथे येऊन तो मनस्मृतीवर टीका करतात. हे ढोंग आहे.

४. शासनाने हजचे अनुदान बंद केले म्हणून आपण आनंद व्यक्त केला; मात्र प्रती मासाला शासन मंदिराचे ६०-७० कोटी रुपये इतके धन हडप करत आहे. हिंदूंच्या मंदिरातील अर्पण हिंदूंना मिळत नाही. यावर ना काँग्रेस बोलत आहे, ना भाजप.

५. आझाद मैदानावरील आंदोलनाच्या वेळी मुसलमानांनी महिला पोलिसांची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. त्या धर्मांधांना शिक्षा व्हावी, यासाठी सरकारला गांभीर्य नाही.

६. राज्यकर्ते भ्रष्ट झाले आहेत. लोकशाही अपयशी ठरली आहे. शिक्षणसम्राटांनी शिक्षणाचे बाजारीकरण केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात लूट चालू आहे. जातीपातींवरून मते मागणारे निवडून येत आहेत. महिला आणि बालके सुरक्षित नाहीत. या सर्व सर्वांवर हिंदु राष्ट्र हा एकमेव पर्याय आहे.

७. हिंदूंचे नेते कारागृहात जाणे, त्यांना जामीन न मिळणे, संतांना अटक होणे, मशिदींवर नियंत्रण नसणे, त्यांवरील भोंगे न उतरवणे हे असेच चालू नाही. हे एक षड्यंत्र आहे.

…तर संविधानात आणखी एक पालट करून हे हिंदु राष्ट्र व्हावे ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

जर धर्माच्या आधारावर पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळा झाला असेल, तर उरलेला भाग हिंदु राष्ट्र म्हणून का स्थापन होऊ नये ? वर्ष १९७६ मध्ये संविधानात पालट करून भारताला धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी करण्यात आले. आतापर्यंत संविधानात शंभरहून अधिक पालट करण्यात आले आहेत. जर घटनेत दुरुस्ती करून भारत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी होऊ शकतो, तर संविधानात आणखी एक पालट करून हे हिंदु राष्ट्र व्हावे. आमचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य संविधानाला धरूनच आहे. वर्ष १९९९ मध्ये भारतात आलेल्या पोप जॉन पॉल यांनी संपूर्ण भारताला ख्रिस्ती करण्याची घोषणा केली. यावर कुणाला आक्षेप नव्हता, तर मग हिंदु राष्ट्र स्थापनेच्या घोषणेमुळे कुणाच्या पोटात दुखण्याचे कारण काय ? रामायण घडण्यापूर्वी २०० वर्षे आधी वाल्मिकी ऋषींनी ‘रामराज्य येणार’, असे लिहून ठेवले होते. कंसवध करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म होणार, हे आकाशवाणीने सांगितले होते. त्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असे संतांनी सांगितले आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापना श्रीकृष्णच करणार आहे, याची धर्मप्रेमींना निश्‍चिती !

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी उपस्थितांना साधनेविषयी मार्गदर्शन केले. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना श्रीकृष्ण करणारच आहे, आपण केवळ कार्यात सहभागी व्हायचे आहे. यासाठी साधना करून धर्मकार्यासाठी भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे’, असे सद्गुरु ताईंनी सांगितले. अधिवेशनाला आलेले धर्मप्रेमी तळमळीने आणि झोकून देऊन धर्मकार्य करत आहेत. काही धर्मप्रेमी नामजप करत आहेत, तर काहींनी अधिवेशनात साधनेविषयीचे मार्गदर्शन ऐकल्यावर नामजप चालू करणार असल्याचे सांगितले. काहींनी सद्गुरु ताईंना साधनेविषयीच्या शंका विचारून घेतल्या. धर्मकार्यासाठी साधनाच आवश्यक आहे, याची निश्‍चिती या अधिवेशनातून उपस्थित धर्मप्रेमींना झाली. ही या अधिवेशनाची सर्वांत महत्त्वाची फलनिष्पत्ती ठरली.

हिंदु जनजागृती समितीच्या नावाच्या धाग्यासमवेत जोडून विशाल माळ बनू
आणि भारतमातेच्या चरणी समर्पित होऊ ! – अधिवक्ता संतोष दुबे, सहसंयोजक, विहिंप, विक्रोळी

आपणा सर्वांच्या मनात हिंदुत्वाची ज्वाळा निर्माण व्हावी, हा या संमेलनाचा मूळ उद्देश आहे. आपण सर्वजण एकेक मोती आहोत. एका मोत्यापेक्षा अनेक मोत्यांना एकत्र करून त्यांची एक माळ सिद्ध केली, तर तिचे मूल्य अमूल्य होते. आपण जे मोत्यांची माळ बनवण्याचे लक्ष्य निश्‍चित केले आहे, या धाग्याचे नाव आहे ‘हिंदु जनजागृती समिती’. आपणाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, जेव्हा आपण या धाग्यामध्ये जोडले जाऊ, तेव्हा आपल्या सर्वांचे मुख त्या माळेकडे असेल. आपण या धाग्याशी जोडले गेलो नाही, तर आपण विखुरलेल्या मोत्यांप्रमाणे होेऊ. आता अशी वेळ आली आहे की, आपण सर्व ‘हिंदु जनजागृती समिती’ नावाच्या धाग्यासमवेत जोडून मोत्यांची विशाल माळ बनू आणि भारतमातेच्या चरणावर वाहू. मला पूर्ण विश्‍वास आहे की, या माळेत मोत्यांची संख्या वाढत जाईल आणि वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !

पू. संभाजी भिडेगुरुजी यांना कोरेगाव भीमा प्रकरणात
गोवण्याचा प्रयत्न ! – बळवंतराव दळवी, मुंबई कार्यवाह, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास सांगणार्‍या महनीय व्यक्तींची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न चालू आहे. बाबासाहेब पुरंदरे यांची मानहानी करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि आता पू. संभाजी भिडेगुरुजी यांची अपकीर्ती करून त्यांना कोरेगाव भीमा प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जातीपातीचे राजकारण करून हिंदु धर्मात फूट पाडण्याचे कारस्थान चालू आहे. संतांच्या अपकीर्तीचे  षड्यंत्र चालू आहे. संतांची अपकीर्ती केली म्हणजे हिंदूंची साधना बंद होईल. सनातन संस्थेवरही अशाच प्रकारे आरोप करण्यात आले. या परिस्थितीतही सनातनचे कार्य चालू आहे. सनातनच्या साधकांकडे पाहून बरे वाटते. धर्मावर आघात करणार्‍या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना खडसवावेच लागते. हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले आहे.

अहिंसा टिकाया चिरा हिंसकाला । हरिण वाचवाया हाणा लांडग्याला ॥

सीता रक्षिण्याला वधा रावणाला । असे नित्य टिकवू अहिंसा व्रताला ॥

वीरशैव समाज हिंदु धर्माच्या रक्षणासाठी अग्रेसर राहील !
– डॉ. विजय जंगम (स्वामी), कार्याध्यक्ष, प्रवक्ता, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

वेदकाळापासून धर्मकार्यात असुरांचा विरोध होत आहे. त्या वेळी स्थूलातून असूर त्रास देत होते. आता सूक्ष्म रूपाने ते धर्मकार्याला विरोध करत आहेत. त्यासाठी हिंदूंनी साधना करणे महत्त्वाचे आहे. ही धर्म-अधर्म यांची लढाई आहे. आपणा सर्वांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान द्यायचे आहे. त्यासाठी सर्वांच्या मनामध्ये हिंदु राष्ट्राची भावना निर्माण करावयाची आहे. वीरशैव संप्रदाय हा हिंदु धर्मातील एक भाग आहे. आम्ही काल हिंदु होतो, आज हिंदु आहोत आणि पुढेही हिंदु म्हणूनच राहू. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आम्ही अग्रेसर राहू.

 

या ठिकाणी अधिवेशन होत आहे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट ! – आमदार सरदार श्री. तारासिंह

हे अधिवेशन या सभागृहात होत आहे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे सांगत भाजपचे आमदार श्री. तारासिंह यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

 

धर्मकार्याला साधनेची जोड देणारे धर्मप्रेमी !

श्री. ऋषीकेश दुबे यांना नामजप केल्यानंतर आंदोलनाविषयीच्या सर्व अनुमती मिळणे

नामजपाविषयी आलेली अनुभूती सांगतांना श्री. ऋषीकेश दुबे म्हणाले, ‘कर्ता करविता भगवंत आहे. आपण केवळ निमित्तमात्र आहोत. प्रत्येकाने नामजप करणे महत्त्वाचे आहे. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मला नामजप करण्यास सांगितला होता; मात्र मी नामजप केला नाही. एका आंदोलनासाठी आम्हाला अनुमती मिळत नव्हती; त्या वेळी मी नामजप केला. त्याच दिवशी आम्हाला आंदोलनासाठी

६ पोलीस ठाण्यांची अनुमती एकाच दिवशी मिळाली. यासह अन्य आवश्यक अनुमतीही मिळाल्या. त्याच भागात एक रॅली होती. फेरीच्या ३ दिवस आधीपासून संबंधित लोक अनुमतीसाठी प्रयत्न करत होते; मात्र त्यांना अनुमती मिळाली नव्हती. नामजपामुळे आम्हाला अनुमती मिळाली, असे मी अनुभवले. आपण नामजप केला, साधना केली, तर त्याचा आपणाला परिणाम लक्षात येईल.

गोरक्षक श्री. चेतन शर्मा यांचे भीतीचे प्रमाण अचानक वाढणे
आणि नामजप चालू केल्यावर पूर्वीप्रमाणे गोरक्षणाचे कार्य करता येणे

आम्ही अनेक ठिकाणी हत्येसाठी नेण्यात येणार्‍या गायी सोडवल्या आहेत. गोरक्षणाचे कार्य करतांना कधीही भीती वाटली नाही; मात्र काही मासांपासून गोरक्षासाठी गेल्यावर मला काही सुचेनासे व्हायचे, थकवा जाणवू लागायचा, भीती वाटायला लागायची, मनात नकारात्मक विचार यायचे. असे अचानक का व्हायला लागले, हे माझ्या लक्षात येत नव्हते. त्यानंतर सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी मला दत्ताचा नामजप करायला सांगितला. नामजप चालू केल्यावर माझा हा सर्व त्रास निघून गेला आणि मला पहिल्याप्रमाणे गोरक्षणाचे कार्य करता येऊ लागले.

ठळक क्षण

  • अधिवेशनाच्या प्रारंभी धर्मप्रेमी श्री. जयप्रकाश मिश्रा यांनी शंखनाद केला.
  • त्यानंतर सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले. दीपप्रज्वलनानंतर सायन मुरलीधर मंदिर, वेद आणि संस्कृत पाठशाळेचे श्री. अंकुर देवस्थळी अन् श्री. प्रज्वल शेंबेकर यांनी वेदमंत्रपठण केले. त्यानंतर अधिवेशनाला प्रारंभ झाला.
  • या अधिवेशनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर आणि श्री. योगेश शिर्के यांनी केले.
  • अधिवेशनाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने करण्यात आली.

सहभागी संघटना

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, नवी मुंबई मंदिर समिती, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, हिंदू रक्षक सेना, बजरंग दल, युवा हित करीबी संघ, सनातन संस्था, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, युवा हितकारिणी संघ, हिंदू एकता जागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद, हिंदू राष्ट्र सेना, श्री शिव स्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान, व्रजदल, श्रीराम प्रतिष्ठान, नीळकंठ मित्र मंडळ, रणरागिणी शाखा, चिन्मय मिशन, पिपल्स फॉर अ‍ॅनिमल, सीताराम सेवा संघ

धर्मप्रेमींचे मनोगत

१. प.पू. गुरुदेव आठवले यांनी ‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे’, असे सांगितले आहे. ती निश्‍चितच होईल; मात्र त्यापूर्वी स्वत:च्या हृदयात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला हवी. तसे झाल्यासच हे हिंदु राष्ट्र होईल. एका ठिकाणी ‘बाथरूम’वरील देवतांच्या चित्राच्या ‘टाईल्स’ हिंदूंना एकत्र करून आम्ही काढल्या. अशा छोट्या-छोट्या कृतींतून धर्मरक्षणाचे कार्य करायला हवे.

– श्री. ऋषीकेश दुबे, हिंदू रक्षक सेना

२. मी २ दिवस दुकान बंद ठेवून अधिवेशनाला आलो. अधिवेशनामध्ये मला जी धर्मविषयक माहिती मिळाली, तिचा लाभ मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. अधिवेशनातून धर्म आणि नामजप यांचे महत्त्व लक्षात आले. कार्य करतांना तळमळ न्यून पडते; मात्र सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांमुळे कार्याची प्रेरणा मिळते.

– श्री. राजेश कार्येकर, धर्मप्रेमी

३.    पू. भिडेगुरुजींनी आम्हाला भगव्याचे महत्त्व लक्षात आणून दिले. श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलीदानानिमित्त आम्ही बलीदान मास साजरा करतो. समितीच्या आंदोलनांत सहभाग घेतो. धर्मावरील आघातांच्या वेळी धावून गेले पाहिजे. अडचणींवर मात करून कार्य कसे करावे, हे अधिवेशनातून कळले. समितीने आमच्याकडून सहस्रोपटींनी कार्य करून घ्यावे.

– श्री. गणेश मोदी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

४.    धर्मकार्य कसे करू शकतो, हे अधिवेशनातून शिकायला मिळाले. समितीच्या मार्गदर्शनानुसार आम्ही धर्मकार्य करू शकतो.

संतांच्या संकल्पाने हिंदु राष्ट्र स्थापन होणारच ! त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न करायला हवेत.

– श्री. अनिल जैसवाल, श्रीराम हिंदु सेना

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात