सनातनशी एकरूप झालेले संत : परात्पर गुरु पांडे महाराज !

प्रीतीचे मूर्तीमंत रूप असलेली, साधकांचे त्रास दूर होण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणारी, साधी; परंतु ज्ञानब्रह्माने परिपूर्ण असलेली विभूती, म्हणजे परात्पर गुरु पांडे महाराज !

प.पू. पांडे महाराज

‘माघ शुक्ल पक्ष दशमी (१८.२.२००५) या दिवशी प.पू. पांडे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम भेट झाली. प.पू. पांडे महाराज ‘हा दिवस वाढदिवस आहे’, असे समजतात. एखादी विभूती वयाच्या ९० व्या वर्षी उच्च आध्यात्मिक पातळी गाठून मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतांना ‘याची देही याची डोळा’ पहाण्याचे भाग्य देवद आश्रमातील साधकांना मिळाले आहे, ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच ! त्यासाठी प्रथम त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !!

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी साधकांसाठी जे काही केले आहे, त्याचे उतराई होण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे. खरेतर ‘गुरूंची महती त्यांच्या शिष्याने वर्णावी’, हे आजपर्यंत पहात आलेल्या गुरु-शिष्य परंपरेत आपण वाचले आहे, पाहिले आहे; पण कितीही पराकाष्ठेचे प्रयत्न केले, तरी त्यांचे गुणगान, त्यांची महती वर्णन करण्यास शब्दमाध्यम अपूर्णच ठरते, हे अनुभवले आहे.

परात्पर गुरु पांडे महाराज (उजवीकडे) यांच्यासमवेत परात्पर गुरु डॉ. आठवले (वर्ष २००५)

१. साधकांच्या त्रासावर नामजपादी उपाय सांगून त्यांच्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

परात्पर गुरु पांडे महाराज यांना मी गेल्या ४ वर्षांपासून जवळून अनुभवत आहे. त्यांनी आम्हा त्रास असलेल्या साधकांसाठी जे काही केले आहे, त्यासाठी आम्ही साधकांनी अनेक जन्म चामड्याचे जोडे करून त्यांची सेवा केली, तरीही आम्ही त्यांचे उतराई होऊ शकत नाही. ‘त्यांचे साधे, सहज; परंतु ज्ञानब्रह्माने परिपूर्ण व्यक्तीमत्त्व साधकांवरच नाही, तर मोठ्या वाईट शक्तींवरही प्रभाव पाडून जाते’, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे.

२. रुग्ण-साधकांना मंत्रोपाय देऊन बरे करण्याची तीव्र तळमळ

एखाद्या रुग्ण-साधकाला मंत्रोपाय सांगण्याचा निरोप मिळताच परात्पर गुरु पांडे महाराज यांचे मन, बुद्धी आणि सर्वकाही त्या रुग्णाशी एकरूप झालेले असते. तो रुग्ण-साधक स्वतः जेवढे प्रयत्न करणार नाही, त्यापेक्षा अधिक प्रयत्न परात्पर गुरु महाराज त्या साधकाला बरे करण्यासाठी करतात. ‘महाराज त्या साधकाला पूर्ण बरे वाटेपर्यंत शांत झोप घेत नाहीत’, हे आम्ही सर्व साधक अनुभवत आहोत.

३. ग्रंथांची अक्षरे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या सेवेसाठी त्यांच्या दृष्टीसमोर येऊन उभी रहात असल्याची अनुभूती येणे

‘ग्रंथांची अक्षरे त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या दृष्टीसमोर येऊन उभी रहातात. ग्रंथांची पाने आपोआप पलटून त्यांना पाहिजे असलेले लिखाण त्यांच्यासमोर येऊन उभे रहाते’, हे मी प्रतिदिन पहात आले आहे.

४. प्रत्येक कृती परिपूर्ण आणि भावपूर्ण करायला शिकवणे

‘कोणतीही कृती परिपूर्ण आणि भावपूर्ण कशी करायची असते ?’, याचे शिक्षण परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडूनच मला मिळत आहे. त्यांच्याकडे कुठल्याही विषयाची सेवा नेली, तरी त्या सेवेतील उणिवा त्याच क्षणी त्यांच्या लक्षात येतात. ‘त्या सेवेत देवाला काय अपेक्षित आहे ?’, हे त्यांच्यातील देवत्व त्वरित सांगून जाते. हे शब्दांत सांगणे तसे अतिशय खालच्या स्तरावरील असेल; कारण ज्यांनी हे अनुभवले आहे, त्यांनी त्या त्या स्तरावर जाऊन त्याविषयीच्या अलोट आनंदाची अनुभूती घेतली आहे.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी सेवा करण्याची तळमळ

एखाद्या धारिकेत त्यांना ज्ञानाविषयीचा प्रश्‍न विचारला असल्यास त्या प्रश्‍नाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असे उत्तर आपल्याकडून जाण्यासाठी महाराज सर्व प्रकारे प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांच्याकडील ज्ञानभांडाराचे ते मंथन करतात.

६. ‘मनुष्यजन्माला येऊन ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय गाठायचे असल्यास स्वतःचे दायित्व स्वतःच घेऊन कठोर प्रयत्न करायचे असतात’, स्वतःच्या आचरणातून साधकांना शिकवणे

‘एखाद्या शिस्तबद्ध आणि आदर्श व्यक्तीचे दैनंदिन जीवन कसे असते ?’, हे परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या दिनचर्येेतून शिकायला मिळते. त्यांचा दिवस पहाटे ४ वाजता चालू होतो आणि रात्री १० वाजता संपतो. ते म्हणतात, ‘‘मलासुद्धा उशिरा उठता येते. मला कोण विचारणार आहे ? पण मी स्वतःला बांधील आहे. हे सर्व मला माझ्यासाठी करायचे आहे.’’ त्यांच्या या बोलण्यातून ‘त्यांनी आजपर्यंतच्या जीवनात जो पल्ला गाठला आहे, याचे हे मर्म आहे’, असे मला वाटते. ‘मनुष्यजन्माला येऊन ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय गाठायचे असल्यास स्वतःच स्वतःचे दायित्व घेऊन कठोर प्रयत्न करायचे असतात’, हे ते स्वतःच्या आचरणातून दाखवून देत आहेत. ‘त्यांच्या काटेकोर धर्माचरणामुळे धर्मच त्यांचे रक्षण करत आहे’, याची अनुभूती येते.

७. स्वतः उच्च कोटीचे संत असूनही सामान्य साधकाप्रमाणे आचरण असणे

अनेक मंत्रोपाय देऊनही एका रुग्णाकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ‘आपण कुठे उणे पडलो ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांना कळवले. तेव्हा मी त्यांच्यातील साधकत्वाला जवळून अनुभवले. स्वतः उच्च कोटीचे संत असूनही परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरु राजेंद्रदादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) आणि पू. (सौ.) अश्‍विनीताई यांना स्वतःच्या सेवेविषयी अन् आश्रमातील काही सूत्रांविषयी एका सामान्य साधकाप्रमाणे ते सांगतात.

८. नवीन पिढीला ज्ञान देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे

आजच्या रज-तमात्मक वातावरणाविषयी ते पोटतिडकीने सांगतात. ते म्हणतात, ‘‘हे सर्व अधर्माचरणामुळे होत आहे. यासाठी बालवयापासून सर्वांना साधना सांगितली पाहिजे. भगवंताने आपल्याला केवढे दिले आहे ! भगवंताची दृष्टी या नवीन पिढीला दिली पाहिजे.’’ नवीन पिढीला ज्ञान देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात.

९. ‘जीवनातील कठीण प्रसंगांत भगवंतच साहाय्यार्थ कसा
धावून येतो ?’, हे शिकवणारे परात्पर गुरु पांडे महाराज यांचे जीवनचरित्र !

अलीकडेच परात्पर गुरु पांडे महाराज यांचे जीवनचरित्र माझ्या वाचनात आले. ते वाचतांना ‘जया अंगी मोठेपण, त्यासी यातना कठीण ।’, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ।’, ‘भाव तिथे देव’, ‘विद्या विनयेन शोभते ।’, यांसारख्या अनेक उक्ती त्यांच्या जीवनातील प्रसंगांत उतरल्या आहेत’, हे माझ्या लक्षात आले. परात्पर गुरु पांडे महाराज पुष्कळ कठीण परिस्थितीतून गेलेले आहेत. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांत ‘भगवंतच त्यांच्या साहाय्यार्थ कसा धावून आला ?’, हे मला त्यांच्या चरित्रात वाचायला मिळाले.

१०. ‘गणेश अध्यात्मदर्शन’ या ग्रंथांचे लिखाण करतांना त्यांनी व्यासमुनींप्रमाणे प्रत्यक्ष भगवंताला अनुभवले आहे’, असे मला जाणवते.

११. ‘माझ्या जीवनातील प्रत्येक प्रसंग ही एक अनुभूतीच आहे’, असे ते नेहमी सांगतात.

१२. ‘प्रीती म्हणजे काय असते ?’, असे कुणी विचारले, तर त्याच क्षणी मुखी एकच नाव येईल, ते म्हणजे आमचे परात्पर गुरु पांडे महाराज !

१३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव

अ. परात्पर गुरु पांडे महाराज यांचा प्रत्येक श्‍वास परात्पर गुरु डॉक्टरांचा अभ्यास करण्यात जातो. ते म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांना ओळखणे, हीच माझी साधना आहे. ‘माझ्यासारख्या वृद्धाला त्यांनी येथे आश्रमात आणून ठेवले आहे’, हे माझे अहोभाग्य आहे.’’

आ. त्यांच्या बोलण्यातील कोणत्याही विषयाचा आरंभ ‘चैतन्य’ या शब्दापासून होतो आणि शेवट ‘परात्पर गुुरु डॉ. आठवले’ या शब्दाने होतो.

या थोर देवत्वाविषयी अजून काय सांगावे ? जे काही शब्द या जिवाकडून लिहिले गेले, त्याचे सर्व श्रेय परात्पर गुरु पांडे महाराज यांनाच आहे. लहान तोंडी मोठा घास घेऊन अंतरीचे विचार कृतज्ञता म्हणून त्यांनीच माझ्याकडून मांडून घेतले.

‘परात्पर गुरु बाबा (परात्पर गुरु पांडे महाराज), आपणच आम्हा सर्व साधकांना भगवंताकडे घेऊन जाणार आहात. आम्हा देवद आश्रमातील साधकांसाठी आपणच परात्पर गुरु डॉक्टर आहात. आपल्या चरणी कोटी कोटी नमन !’

– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.११.२०१७)