सर्व जाती संपवून केवळ हिंदु ही एकच जात शिल्लक रहावी !

नुकतेच घडलेल्या कोरेगाव भीमा प्रकरणात जाती-जातींमध्ये किंबहुना हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे हीन राजकारण करण्यात आले. पुरोगामी नि निधर्मी म्हणवणार्‍यांकडूनच जातीयवाद पसरवण्याचा गलिच्छ प्रकार केवळ महाराष्ट्रानेच नव्हे, तर संपूर्ण भारताने उघड्या डोळ्यांनी पाहिला. अर्थात् यांची पुरोगामित्वाची व्याख्या काय आहे, हे वेगळे सांगायला नको; परंतु या सर्व Anti-Hindu Narrative मुळे (हिंदुविरोधी कटकारस्थानामुळे) निधर्मीवाद्यांचा ब्राह्मणद्वेष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे यांनी लिहिलेला मार्मिक लेख प्रसिद्ध करत आहोत.

गेल्या ५८ वर्षांत (महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून) जात या शब्दाने भारतात विशेष करून महाराष्ट्रात उच्छाद मांडला आहे. जरा कुठे काही झाले की, जात आडवी येते. परवा कुठेतरी एका साहेबांनी कारण नसतांना जातमध्ये आणली आणि तरीही ते पुरोगामी आणि निधर्मीवादी (सेक्युलर) कसे, हे आश्‍चर्य नाही का ? एक ब्राह्मण मुख्यमंत्री काय दिला की, भाजप-सेना जातीयवादी झाले !

१. शिवछत्रपती,शंभूराजे,संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आणि समर्थ रामदासस्वामी यांचा हा महाराष्ट्र नाही का ?

वर्ष १९९४ ला युती सरकारमध्ये श्री. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून तुमची (पुरोगामी आणि निधर्मीवादी यांची) ही ओरड आहे. आता तर फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. ठीक आहे, एक प्रश्‍न विचारतो, मुख्यमंत्रीपद काय फक्त मराठा समाजाची जहागीर आहे का ? फक्त तथाकथित बहुजन समाजाची जहागीर आहे का ? स्वामित्व हक्क (कॉपीराईट) आहे का ? किती जातीयवाद आहे ? अशानेच राज्य आणि देश यांचे वाटोळे केले. शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहेच आणि आम्ही हे अमान्य करतच नाही; पण मग स्वातंत्र्यवीर सावरकर अन् टिळक यांचा नाही का ? हातातून रक्त पडत असतांनाही सावरकर अंदमानात कोलू फिरवत होते, हातातून रक्त येत होते, तरी सावरकर काथ्या कुटत होते. तेथे ते १० सहस्र ओळींचे काव्य रचत होते. लोकमान्य टिळक यांना मधुमेह होता, तरी त्यांनी ६ वर्षे मंडाले कारागृहात सश्रम कारावासाची शिक्षा भोगली. फडके यांना एडनच्या कारागृहात छळ करून का मारले ? एकाच घरातील ३ सख्खे भाऊ चापेकर बंधू फासावर गेले. तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे हे स्वातंत्र्यसमरात गेले. शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे ना, त्यांच्याविषयी नितांत आदर आहेच; पण मग शिवछत्रपती, शंभूराजे, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आणि समर्थ रामदासस्वामी यांचे काय ? त्यांचा महाराष्ट्र नाही का ?

२. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक ब्राह्मण असतांना तो इतिहास दाखवण्यास विरोध

मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील मालिकेच्या दूरचित्रवाहिनीवरील ध्वनीचित्रीकरणाला कोणत्या तरी संघटनेचे लोक येऊन बसायचे आणि दिग्दर्शकाला दम द्यायचे की, महाराजांच्या दरबारात एकही पगडी आणि समर्थ रामदासस्वामी दिसता कामा नये. महाराजांच्या अष्टप्रधान मंत्र्यांमध्ये कितीतरी ब्राह्मण होते, तो इतिहास का दाखवायचा नाही ? एक ब्राह्मणच राज्याभिषेकाचे मंत्र म्हणायला आला ना ?

३. समाजसुधारक आणि क्रांतीकारक यांच्यामध्ये ब्राह्मणांची नावे
अग्रणी असणे आणि संभाजी ब्रिगेडने निर्ब्राह्मण समाज करणार असल्याचे सांगणे !

रत्नागिरीत सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी पतित पावन मंदिर उभे करणारे सावरकर हेच होते ना ? कुटुंब नियोजनासाठी कर्वे हेच पुढे आले ना ? दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हालवला, काय झाले ? इतिहास वाचा एकदा ! समाजसुधारक आणि क्रांतीकारक यांची नावे बघितल्यास सावरकर आणि त्यांचे बंधू, लोकमान्य टिळक, फडके, चापेकर बंधू, कान्हेरे, मंगल पांडे, हुतात्मा राजगुरु, आगरकर, गोखले, रानडे, सेनापती बापट, कर्वे, जोशी, केळकर, बाजीराव, नानासाहेब, माधवराव ही नावे येतातच. संभाजी ब्रिगेडवाल्यांनी मागे एक विधान केले की, निर्ब्राह्मण समाज सिद्ध करायचा आहे, कसा करणार ?

४. ज्या समाजाच्या हातात सत्ता असते, ते दुसर्‍या ज्ञातीवर अन्याय करतातच !

ज्या समाजाच्या हातात सत्ता असते, ते दुसर्‍या ज्ञातीवर अन्याय करतातच. मराठ्यांनी दलितांवर अन्याय केला नाही का ? केला की, अहो, अन्य मागासवर्गीय (अदर बॅकवर्ड) हे मागासवर्गीयांसमवेत (बॅकवर्डसमवेत) खालच्या जातीचे म्हणून लग्न करायचे नाहीत.

५. पेशव्यांनी ४१ वर्षांत ४२ लढाया जिंकल्या, ते महत्त्वाचे नाही का ?

पेशव्यांना तर तुम्ही फक्त ब्राह्मण म्हणून शिव्या घालता. त्यांचा पराक्रम तुम्हाला दिसत नाही का ? त्यांनी स्वतःला छत्रपती म्हणवून घेतले नाही, तर छत्रपतींच्या गादीचे सेवक म्हणून राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्धे काम पूर्ण केले. त्यांनी ४१ वर्षांत ४२ लढाया जिंकल्या आणि एकही लढाई हरले नाहीत. हे महत्त्वाचे नाही ? कारण शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा महाराष्ट्र ना फक्त ! बाकीच्यांचे काही योगदानच नाही !

६. ब्राह्मण समाजाला संपवायची भाषा करणारे
ब्रिगेडी नि तथाकथित पुरोगामी कुणाच्या आश्रयाने सर्व करतात ?

भाजप-सेना जातीयवादी म्हणे ! मग ब्रिगेडचे जन्मदाते कोण ? सगळ्या जगाला माहिती आहे. ब्राह्मणांचा द्वेष करणार्‍या अनेक नेत्यांना त्यांचे खासगी व्यवहार सांभाळायला ब्राह्मण स्वीय सचिवच हवे असतात. का ? कारण ही जात प्रामाणिक आहे. त्या नेत्यांना माहिती आहे की, हे नेत्यांचा भ्रष्टाचार लपवतील; पण स्वतः एक पैसा खाणार नाहीत. तरीही ऊठसूठ ब्राह्मण समाजाला संपवायची भाषा करणारे ब्रिगेडी नि तथाकथित पुरोगामी कुणाच्या आश्रयाने हे सर्व करतात, हेही जगाला माहिती आहे.

७. …आताच्या ब्राह्मणांवर कितीही अन्याय करा, ते शांतच !

मला एक प्रश्‍न नेहमी मनात येतो की, एवढे ब्राह्मण क्रूर होते, असे असेल, तर त्यांचा काही अंशी गुण पुढच्या पिढ्यांमध्ये उतरायला हवा होता. पूर्वज क्रूर, छळणारे आणि पिळवणूक करणारे होते, तर आताचे ब्राह्मण पाहून अजिबातच विश्‍वास बसत नाही की, ह्यांच्या ५ पिढ्या आधी हे एवढे क्रूर होते ! आताचे तर सगळे (काही अपवाद सोडून) पचपचीत आहेत. चीड येणे, विद्रोह करणे, क्रांती घडवणे, प्रवाहाविरुद्ध वहाण्याची धाडस दाखवणे, हे गुणच दिसत नाहीत. सगळे इतके सहन करतात की, कधी कधी चीड येते. कितीही शासकीय अन्याय करा, हे मात्र शांतच !

८. बाकीच्या जातींविषयी एक शब्द जरी आला,
तरी रान पेटवतात ! मग ब्राह्मणांमध्ये एवढा अमूलाग्र पालट कसा ?

जरा बाकीच्या जातींविषयी एक शब्द जरी आला, तरी रान पेटवतात की नाही ते ! एका प्रसिद्ध मालिकेत खलनायकाचे आडनाव जातीवाचक होते, तर ते बंद करायला लावले. ब्राह्मणेतर जातीवाचक वाक्प्रचार उच्चारायचे नाहीत अन्यथा लगेच राडा आणि मोर्चा निघतो; पण भागवत किंवा गोखले हे कोणत्या मालिकेत भ्रष्ट दाखवले किंवा भटाला दिली ओसरी, असे म्हटले, तर एकाही ब्राह्मणाचा मोर्चा किंवा निषेध कधी ऐकिवात नाही ! माझ्या मनात प्रश्‍नच येतो की, इतिहास पाहिला तर मुसलमान क्रूर होते. त्यांनी बलात्कार, मंदिरे उद्ध्वस्त केली, तर त्यांचे काही अंशी गुण (जे काही अंशही भारी पडतात) ते दिसतात ना ! डॉ. झाकीर नाईक किंवा ओवैसी बंधू किंवा संभाजी ब्रिगेड यांच्याकडे पाहिले की, त्यांच्यात पूर्वजांचे काही अंश आले आहेत ना ! मग तसे ब्राह्मणांमधे यायला हवे होते ना ? मग एवढा आमूलाग्र पालट कसा ? बरं खरंच झाला असेल, तरी ब्राह्मणांना मानायला हवे. कारण हाही एक आदर्शच आहे की, वाईट गोष्टींना त्यांनी संपूर्ण तिलांजली दिली !

९. गेली २०० वर्षे ब्राह्मणांनाच शिव्या घालूनही ते पुरून उरणे !

आज ब्राह्मण किती राहिले, तर केवळ ५ टक्के ! तरी त्यांची एवढी धास्ती का घेता ? कधी आरक्षण नाही कि राजकीय पाठबळ नाही ! तरीही ब्राह्मणांनाच शिव्या घालणार. शाहू, फुले आणि आंबेडकर यांचाच महाराष्ट्र ना ? आहेच त्यांचा; पण केवळ त्यांचाच नाहीये ! मग स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे नाव घ्यायला नको का वाटते ? पुरोगामी नेते नेहमी जातीपातीचे राजकारण करतात, हे सगळ्या जगाला माहिती आहे, तरीही नेहमी शिवसेना आणि भाजप यांनाच जातीयवादी म्हणणार ? वाह रे वाह, हा उलटा न्याय आहे. पेशव्यांना सतत शिव्या, तेही फक्त ब्राह्मण म्हणून ! काहीही पुरावे नसतांना त्यांच्यावर घाणेरडे आरोप; पण अन्य जातींविषयी काही बोलले की, भावना दुखावणार. यावरूनच खरे जातीयवादी कोण आहेत, हे कळते. तरीदेखील तुम्ही ब्राह्मणांनाच शिव्या घालणार. गेली २०० वर्षे तेच चालू असूनही ते या सर्वांना पुरून उरले आहेत.

१०. केवळ हिंदू ही एकच जात शिल्लक रहावी !

मी जात कधीच मानली नाही आणि मानत नाही. कारण मी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या खर्‍या अर्थाने निधर्मी (सेक्युलर) विचारांचा आहे. बाकी सर्व जाती संपवून केवळ हिंदू ही एकच जात शिल्लक रहावी, या मताचा मी आहे. कारण तसे संस्कार आमच्यावर तात्याराव सावरकर आणि बाळासाहेब यांनी केले आहेत; पण त्यांनाही धर्मांध ठरवण्यात आले. त्यांनाही कायम टीकेला तोंड द्यावे लागले.

भारत माता की जय !

– ज्येष्ठ अभिनेता आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे

(श्री. पोंक्षे यांच्या फेसबूक पेजवरून साभार)