गुरुमंत्राला पुष्कळ महत्त्व असूनही तो सनातन संस्थेमध्ये दिला न जाताही सहस्रो साधकांची प्रगती होत असण्यामागील शास्त्र

परात्पर गुरु डॉ. आठवले

गुरुमंत्राला पुष्कळ महत्त्व असूनही तो सनातन संस्थेमध्ये दिला जात नाही, तरी सहस्रो साधकांची प्रगती होत आहे आणि वर्ष २०१७ पर्यंत ७० हून अधिक साधक संत झाले आहेत. याचे कारण काय ? तन-मन-धन यांचा त्याग करणार्‍यांना गुरुमंत्राची आवश्यकता नसते का ? सनातनमध्ये समष्टीसाठी काळानुरूप साधना सांगितली जाते. त्यामुळे गुरुमंत्राची आवश्यकता नसते का ? या प्रश्‍नाचे उत्तर आहे, हो. सनातनमध्ये व्यष्टीसह समष्टी साधना करणे शिकवले जाते. यामुळे गुरुमंत्र दिला जात नसतांनाही साधकांची प्रगती होत आहे. सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

१. (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अ. मी गुरु नाही. माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज हे सर्वांचे गुरु असल्याचा माझा भाव असल्याने कोणाला गुरुमंत्र देण्याचा विचार माझ्या मनात कधीही आला नाही.

आ. सनातनच्या साधकांसाठी गुरुमंत्र अनावश्यक असल्यामुळे मी गुरुमंत्र दिला आहे, असा अहंभाव माझ्यात निर्माण होऊ शकला नाही. हा मला मोठा लाभ झाला आहे.

 

२. श्री. राम होनप

२ अ. सनातन संस्थेमध्ये सहस्रो साधकांची आध्यत्मिक प्रगती होण्यामागील कारणे आणि त्यांचे प्रमाण

२ आ. गुरुमंत्र आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य

श्री. राम होनप

२ आ १. गुरुमंत्र

गुरु विशिष्ट मंत्रात शक्ती देऊन शिष्याला गुरुमंत्र देतात. या मंत्रामुळे शिष्याची आध्यात्मिक प्रगती होत असते. गुरूंचा हा संकल्प त्या त्या शिष्यापुरता मर्यादित असतो. अन्य शिष्यांना आध्यात्मिक प्रगती करावयाची असते, तेव्हा त्यांना गुरुमंत्राची आवश्यकता भासते. गुरूंचा हा संकल्प व्यक्त स्वरूपाचा असतो.

२ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य

परात्पर गुरु डॉक्टरांचे कार्य अस्तित्वाने आहे. या अस्तित्वामुळे विश्‍वभरातील साधकांना साधनेसाठी गुरुमंत्राइतकी शक्ती प्राप्त होते आणि त्यांची वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अस्तित्वाच्या कार्यात विश्‍वातील सर्व साधकांची प्रगती होण्यासंबंधीचा अव्यक्त संकल्प आहे. हा संकल्प अत्यंत सूक्ष्म रूपात कार्य करतो आणि त्याचा लाभ साधकांना होतो. हे सामर्थ्य केवळ अवतारातच असते.

२ आ २ अ. गुरुकृपायोग या साधनामार्गात साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा अव्यक्त संकल्प असणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या गुरुकृपायोग या साधनामार्गात साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा अव्यक्त संकल्प आहे. त्यामुळे जो साधक या मार्गाने साधनेची वाटचाल करील, त्याला या अव्यक्त संकल्पातील शक्ती प्राप्त होते आणि ईश्‍वर अशा साधकाला साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्यात घेऊन जातो.

२ आ ३. सनातन संस्थेतील साधकांची आध्यात्मिक प्रगती वेगाने होण्यासंबंधीची अन्य कारणे

२ आ ३ अ. अध्यात्मात कृतीला महत्त्व देणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना साधनेसाठी आवश्यक तेवढे ज्ञान दिले आणि अधिक प्रमाणात प्रत्यक्ष कृतीला, म्हणजे अध्यात्म जगण्यास उद्युक्त केले. त्याप्रमाणे साधकांनी तन-मन-धनाचा त्याग केला. या त्यागामुळे साधकांच्या प्रारब्धासंबंधीच्या गणितात मोठा पालट झाला, म्हणजे साधनेने प्रारब्ध न्यून झाले. त्यामुळे साधकांची आध्यात्मिक प्रगती वेगाने झाली.

२ आ ३ आ. गुरुकृपायोग या साधनामार्गानुसार साधक साधनेत स्वयंपूर्ण होणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना अष्टांग साधनेची गुरुदीक्षा, म्हणजे ज्ञान दिले. त्यामुळे साधकांना साधनेत येणारे अडथळे, म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे वेळोवेळी स्वतःला ज्ञान होते. हे अडथळे कळण्यासाठी साधकांना स्थूल देहातील गुरूंची आवश्यकता भासत नाही. साधकाचे एकेक पाऊल ईश्‍वराच्या दिशेने पडत जाते.

२ आ ३ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ईश्‍वरी ज्ञानाद्वारे केलेल्या अचूक मार्गदर्शनामुळे साधकांच्या साधनेचा काळ न्यून होणे

राष्ट्र, धर्म अथवा साधना यांविषयीचे मार्गदर्शन परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना अतिशय सूक्ष्म आणि अचूक अशा ईश्‍वरी ज्ञानाद्वारे केले आहे. त्यामुळे साधकांना साधनेत योग्य दिशा मिळत गेली. परिणामी साधकांना पुढील काही जन्मांत साध्य होणारे ध्येय याच जन्मात प्राप्त होत असल्याने साधकांची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी लागणारा काळ न्यून झाला.

२ आ ३ ई. आसुरी शक्तींविषयी जागरूकता निर्माण होणे

कलियुगात, विशेषतः आताच्या काळात साधना करतांना सर्वांत मोठी सूक्ष्मातील समस्या म्हणजे वाईट शक्तींचा प्रकोप. परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्म जगताविषयी अतिशय सूक्ष्म अभ्यास करून साधकांना आध्यात्मिक त्रासाविषयी मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे साधकांत वाईट शक्तींविषयी जागरूकता निर्माण झाल्याने या अडथळ्यांवर मात करून त्यांना साधना करता येते.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

३. कु. मधुरा भोसले

३ अ. गुरुमंत्राचे महत्त्व

आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी स्वत:च्या मनाने साधना न करता गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करणे श्रेयस्कर असते. गुरुमंत्राचा जप करणे, म्हणजे स्वत:च्या मनाने जप न करता गुरूंनी सांगितलेल्या मंत्राचा जप करणे होय. गुरूंनी दिलेल्या मंत्रजपामागे त्यांचा संकल्प कार्यरत असल्यामुळे गुरुमंत्राचा जप करणार्‍या शिष्याची आध्यात्मिक उन्नती शीघ्रतेने होते.

३ अ १. गुरुसेवा आणि गुरुमंत्र यांमुळे शिष्याला होणारे लाभ

कु. मधुरा भोसले

अ. शिष्याच्या मनात देहधारी गुरूंविषयी व्यक्त भाव निर्माण होतो.

आ. शिष्याला विविध प्रकारच्या अनुभूती येतात अन् त्याची देहधारी गुरूंवरील श्रद्धा दृढ होते.

इ. शिष्य गुरूंच्या अखंड अनुसंधानात रहातो अन् त्याच्या मनातील मायेतील विचार अल्प होतात.

ई. शिष्याकडून शिष्यधर्माचे पालन होते.

उ. शिष्य ईश्‍वराच्या सगुण रूपाची सेवा किंवा गुरुमंत्ररूपी स्मरण करत असल्याने गुरुतत्त्वाकडून प्रक्षेपित होणारी दैवी शक्ती त्याच्याकडून ग्रहण होऊ लागते आणि सगुण चैतन्य आकृष्ट होऊ लागते.

ऊ. शिष्याने या जन्मी किंवा मागील जन्मी केलेल्या समस्त पापांचे क्षालन होते.

ए. शिष्याच्या सूक्ष्म देहांची शुद्धी होऊन त्याच्या चित्तावरील जन्मोजन्मीचे अनेक संस्कार पुसले जाऊ लागतात. अशाप्रकारे गुरुमंत्रामुळे शिष्याची चित्तशुद्धी होऊन तो सलोक, समीप, सरूप आणि सायुज्य, या चार मुक्ती टप्प्याटप्प्याने प्राप्त करण्यासाठी पात्र होतो.

३ अ २. सगुणातील गुरुसेवा आणि गुरुमंत्र यांच्या मर्यादा

३ अ २ अ. केवळ व्यष्टी साधनेद्वारे मुक्ती प्राप्त करण्याची इच्छा जोपासणार्‍या जिवांसाठी सगुणातील गुरुसेवा आणि गुरुमंत्र उपयुक्त असणे

केवळ व्यष्टी साधना करणार्‍या साधकांना देहधारी गुरूंचाच आधार वाटत असतो. त्यांच्यासाठी देहधारी गुरूंचे सगुण रूपच सर्वस्व असते. केवळ व्यष्टी साधना करून मुक्ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या जिवांच्या दृष्टीने सगुणातून, म्हणजे स्थुलातून देहधारी गुरूंची सेवा करणे, सगुण सेवेने गुरूंचे मन जिंकणे, गुरूंकडून दिक्षा घेणे किंवा गुरुमंत्र प्राप्त करणे, हे पुष्कळ महत्त्व असते.

३ अ २ आ. गुरूंच्या सगुण रूपात अडकण्याचा धोका असणे

गुरुमंत्राचा अखंड जप केल्याने शिष्याच्या मनात गुरूंच्या निर्गुण रूपापेक्षा त्यांच्या सगुण रूपाचे आकर्षण निर्माण होते. त्यामुळे शिष्य गुरूंच्या सगुण रूपात अडकण्याचा धोका संभवतो.

३ अ २ इ. ईश्‍वराच्या निर्गुण रूपाशी एकरूप न झाल्याने मोक्ष न मिळता मुक्ती मिळणे

आयुष्यभर गुरुमंत्राचा जप करून गुरूंच्या सगुण रूपात अडकलेल्या शिष्यांमध्ये ईश्‍वराचे केवळ सगुण तत्त्व कार्यरत होते. गुरुसेवा आणि गुरुमंत्राचा जप करून शिष्य गुरूंच्या सगुण रूपाशी एकरूप होऊ शकतो; परंतु त्याची वाटचाल निर्गुणाकडे न झाल्यामुळे तो गुरुतत्त्वाशी, म्हणजे ईश्‍वराच्या निर्गुण रूपाशी एकरूप होऊ शकत नाही. त्यामुळे आयुष्यभर गुरुसेवा करून आणि गुरुमंत्राचा जप करूनही शिष्याला मोक्ष न मिळता केवळ मुक्ती मिळते.

३ अ ३. गुरुसेवा आणि गुरुमंत्राचा जप केल्याने मोक्षप्राप्ती करणार्‍या शिष्यांचे प्रमाण अल्प असणे

मोक्षप्राप्ती करण्यासाठी शिष्यामध्ये अव्यक्त भाव, निर्गुण तत्त्व आणि निर्गुण चैतन्य यांची वृद्धी होणे आवश्यक असते. उत्तम शिष्य गुरुसेवा आणि गुरुमंत्राचा जप करूनही गुरूंच्या सगुण देहात न अडकता गुरुतत्त्वाकडे, म्हणजे निर्गुणाकडे वाटचाल करतो. अशा शिष्यांना मोक्षाची प्राप्ती होते, उदा. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत कबीर, संत मीरा, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, परात्पर गुरु डॉ. आठवले इत्यादी. सगुणातील गुरुसेवा आणि गुरुमंत्राचा जप करून मोक्षप्राप्ती करणार्‍या शिष्यांचे प्रमाण अल्प असते. बहुतांश शिष्य गुरूंच्या सगुण रूपात अडकतात. त्यामुळे त्यांची वाटचाल केवळ मुक्तीच्या टप्प्यापर्यंत होते.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना गुरुमंत्र न देण्याची आध्यात्मिक कारणे

३ आ १. गुरुमंत्राच्या मर्यादा लक्षात घेऊन कुणालाही गुरुमंत्रात अडकू न देणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुमंत्राच्या मर्यादा ओळखल्या आहेत. साधक आणि शिष्य गुरूंच्या सगुण देहात अडकू नयेत आणि त्यांची वाटचाल मोक्षाच्या दिशेने सुरळीतपणे व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कुणालाच गुरुमंत्र दिलेला नाही.

३ आ २. साधकाने गुरुमंत्राचा जप न करता गुरूंनी अध्यात्मशास्त्रानुसार सांगितलेल्या देवतांचा नामजप केल्यामुळे साधकाची श्रद्धा स्थुलातील देहधारी गुरूंपेक्षा सूक्ष्मातून कार्यरत असणार्‍या देवतांवर दृढ होऊ लागणे अन् त्याची वाटचाल स्थुलातून सूक्ष्माकडे चालू होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्राथमिक अवस्थेतील साधकाला त्याच्या साधनेचा आरंभ करतांना आध्यात्मिक उन्नतीसाठी कुलदेव किंवा कुलदेवी यांचा जप आणि अतृप्त पूर्वजांचा त्रास न्यून करण्यासाठी दत्ताचा जप करण्यास सांगितले आहे. त्यामुळे गुरुकृपायोगानुसार साधनेला आरंभ केल्यानंतर गुरूंचा किंवा संतांचा जप करण्यापेक्षा देवतांच्या नामाचा जप करण्याचा संस्कार साधकाच्या चित्तावर होऊ लागतो. देवता  निर्गुणस्वरूप आहेत आणि त्या क्वचित प्रसंगी सगुणातून प्रगट होऊन भक्तांना दर्शन देतात. त्यामुळे साधकांनी देवतांचा नामजप केल्यामुळे त्यांची श्रद्धा स्थुलातील देहधारी गुरूंपेक्षा सूक्ष्मातून कार्यरत असणार्‍या देवतांवर दृढ होऊ लागते. अशाप्रकारे स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ, हे अध्यात्मातील तत्त्व त्यांच्या मनावर बिंबू लागते.

३ आ ३. साधकांच्या मनावर गुरुमंत्राचा संस्कार झालेला नसल्यामुळे साधकांना काळानुसार सांगितलेला आणि आध्यात्मिक उपायांसाठी आवश्यक असलेला कोणत्याही देवतेचा नामजप करणे सहज शक्य होणे

गुरुमंत्र दिल्यामुळे साधकाच्या मनावर केवळ एकाच संतांनी सांगितलेला देवतेचा जप करण्याचा संस्कार होतो. अनेकातून एकात येणे, या तत्त्वानुसार हे योग्य आहे; परंतु ते केवळ व्यष्टी साधना करण्यासाठी उपयुक्त आहे. समष्टी स्तरावर साधना करणार्‍या जिवाला काळानुसार विविध देवतांचा नामजप करणे आवश्यक असते. ज्याप्रमाणे शत्रूशी युद्ध करतांना शत्रूने विविध शस्त्रांचा प्रयोग केल्यावर आपल्यालाही विविध शस्त्रांचा वापर करून त्याचा प्रतिकार करावा लागतो, त्याप्रमाणे समष्टी साधना करून सूक्ष्मातील आसुरी शक्तींशी युद्ध करतांना साधकांना विविध देवतांचा नामजप करावा लागतो. याला काळानुसार उपयुक्त साधना करणे असे म्हणतात. गुरुकृपायोगानुसार समष्टी साधना करणार्‍या साधकांच्या मनावर गुरुमंत्राचा संस्कार झालेला नसल्यामुळे साधकांना काळानुसार सांगितलेला आणि आध्यात्मिक उपायांसाठी आवश्यक असलेला कोणत्याही देवतेचा किंवा तत्त्वाचा नामजप करणे सहज शक्य होते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधना परिणामकारक होते.

३ आ ४. गुरुकृपायोगानुसार साधना करणारा साधक त्याच्या साधनेसाठी उपयुक्त असणारा नामजप करण्यासाठी देहधारी गुरूंवर अवलंबून न रहाता ग्रंथांच्या आधारे स्वत:साठी उपयुक्त असणारा नामजप शोधू शकणे अन् स्वावलंबी बनणे

गुरुमंत्राची प्राप्ती केवळ गुरूंकडून होऊ शकते आणि प्रत्येकाला दिलेला गुरुमंत्रही भिन्न असू शकतो. त्यामुळे गुरूंच्या अनुपस्थितीत गुरुमंत्र प्राप्त करणे अशक्य असते. याउलट गुरुकृपायोगानुसार साधना करत असतांना गुरूंनी अध्यात्मशास्त्रानुसार कुलदेवतेची उपासना आणि दत्ताचा नामजप अन् काळानुसार करायचा जप सांगितला जातो. साधकाला ग्रंथातून अध्यात्मातील तत्त्व किंवा शास्त्र शिकवल्यामुळे तो स्थुलातून गुरूंवर किंवा मार्गदर्शकांवर अवलंबून न रहाता त्याच्यासाठी आवश्यक असणारा योग्य नामजप स्वत: शोधून करू शकतो. अशाप्रकारे गुरुकृपायोगानुसार साधना करणारा साधक नामजपाच्या संदर्भात स्वावलंबी बनतो.

३ आ ५. गुरूंचा स्थूलदेह महत्त्वाचा नसून त्यांची शिकवण आणि त्यांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन अधिक महत्त्वाचे आहे, हा संस्कार साधकाच्या चित्तावर होणे अन् त्याची वाटचाल गुरूंच्या सगुण रूपाकडून त्यांच्या निर्गुण रूपाकडे, म्हणजे गुरुतत्त्वाकडे चालू होणे

सनातन संस्थेत गुरूंच्या सगुण रूपाची, म्हणजे देहाची सेवा करण्यापेक्षा त्यांच्या सूक्ष्म रूपाची, म्हणेज धर्म आणि अध्यात्म यांच्या प्रसाराची सेवा करण्यावर अधिक भर दिलेला आहे. त्यामुळे गुरु असेपर्यंत त्यांच्या संपर्कात येणार्‍या किंवा न येणार्‍या, तसेच गुरूंनी देहत्याग केल्यावर साधकाच्या साधनेवर गुरूंच्या अस्तित्वाचा कोणताच परिणाम होत नाही. साधकांची साधना गुरूंच्या अस्तित्वावर अवलंबून न रहाता स्वत:च्या प्रयत्नांवर अवलंबून असते. याचा अर्थ गुरूंचा स्थूलदेह महत्त्वाचा नसून त्यांची शिकवण आणि त्यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन अधिक महत्त्वाचे आहे, हा संस्कार गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या प्रत्येक साधकाच्या चित्तावर आरंभापासूनच दृढ होतो. त्यामुळे साधकाची वाटचाल गुरूंच्या सगुण रूपाकडून त्यांच्या निर्गुण रूपाकडे, म्हणजे गुरुतत्त्वाकडे चालू होते.

३ आ ६. केवळ जपच नव्हे, तर साधनेतील सर्व अंगे गुरूंच्या इच्छेनुसार केल्यामुळे साधकाचे मन, बुद्धी आणि अहं यांचा लय होऊन, त्याचा १०० टक्के त्याग होऊन त्याची वाटचाल निर्गुणाकडे चालू होणे

गुरुमंत्राचा जप केल्यामुळे जप केवळ गुरूंच्या इच्छेने केला जातो. त्यामुळे केवळ मनाचा त्याग थोड्याफार प्रमाणात होतो. गुरूंच्या सगुण रूपाची सेवा केल्यामुळे शरीर आणि मन यांचा काही प्रमाणात त्याग होतो. केवळ जपच नव्हे, तर साधनेतील सेवा, त्याग इत्यादी सर्व अंगे शिष्याने स्वेच्छेने न करता गुरूंनी सांगितल्याप्रमाणे केली, तर शिष्याचा १०० टक्के त्याग होऊन त्याची साधना परिपूर्ण होते. गुरुकृपायोगानुसार सांगितलेल्या साधनेमुळे साधकाच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांची शुद्धी होण्यासह टप्प्याटप्प्याने त्याचे मन, बुद्धी आणि अहं यांचा लय होऊन त्याच्याकडून १०० टक्के त्याग होऊ लागतो. त्यामुळे त्याची वाटचाल आपोआप निर्गुणाकडे होऊ लागते.

३ आ ७. गुरुकृपायोगानुसार साधना ही आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण साधना असल्याने गुरुमंत्राची आवश्यकता न भासणे

गुरुकृपायोगानुसार सांगितलेल्या साधनेअंतर्गत अष्टांग साधनेमुळे साधकाची व्यष्टी आणि समष्टी अशी दोन्ही स्तरांवरील साधना पूर्ण झाल्याने त्याची साधना परिपूर्ण होते. त्यामुळे साधकाकडे ईश्‍वराची सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही तत्त्वे आकृष्ट होऊन त्याला पूर्णत्व प्राप्त होऊ लागते. अशाप्रकारे गुरुकृपायोगानुसार साधना करणे, ही आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण साधना असल्याने आणि जलद आध्यात्मिक उन्नती करून देणारा राजमार्ग असल्याने ही साधना करणार्‍या जिवाला गुरुमंत्राची काहीच आवश्यकता भासत नाही.

३ आ ८. गुरुमंत्र न घेताही गुरुकृपायोगानुसार परिपूर्ण साधना झाल्याने जिवाची वाटचाल दु:खी, जिज्ञासू, मुमुक्षु, साधक, शिष्य, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु या पदांपर्यंत होणे

अन्य संप्रदायांमध्ये साधकाची शिष्यपदापर्यंत उन्नती झाल्यावरच त्याला गुरुदिक्षा देऊन गुरुमंत्र मिळतो. गुरुकृपायोगानुसार साधना करणारा जीव आरंभापासूनच गुरूंनी सांगितलेला केवळ नामजपच नव्हे, तर साधनेचे आठही अंगे आचरणात आणण्याचा, म्हणजे परिपूर्ण साधना करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्याच्या साधनेचा आरंभ अगदी दु:खी अवस्थेपासून जरी झाला, तरी तो करत असलेल्या गुरुकृपायोगानुसार साधनेमुळे त्याची वाटचाल कालांतराने जिज्ञासू, मुमुक्षु, साधक, शिष्य, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु येथपर्यंत होते.

३ आ ९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मोक्षप्राप्तीसाठी गुरुकृपायोग सांगितलेला असल्यामुळे त्यांनी कुणालाही गुरुमंत्र दिलेला नसणे

साधकांना गुरूंच्या सगुण देहात अडकू न देता त्यांची वाटचाल निर्गुणाकडे होण्यासाठी आणि त्यांना मुक्तीच्याही पुढे असणार्‍या मोक्षाची प्राप्ती करून देण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कुणालाही गुरुमंत्र न देता गुरुकृपायोगानुसार साधना करण्यास शिकवले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे समष्टी आणि मोक्ष गुरु असल्यामुळे त्यांनी कुणालाही गुरुमंत्र दिलेला नाही, तर संपूर्ण समष्टीच्या उद्धारासाठी उपयुक्त असणारा ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग, ध्यानयोग आणि नामसंकीर्तनयोग यांचा सुरेख मिलाप असलेला गुरुकृपायोग दिलेला आहे. हा सर्वोत्तम योगमार्ग असून तो मोक्षप्राप्तीचा राजमार्ग आहे. मोक्षासाठी तळमळणार्‍या जिवांसाठी गुरुकृपायोग ही तर संजीवनीच आहे.

३ आ १०. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकाची अल्पावधीत शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन तो मोक्षाचा मानकरी होणे

गुरुमंत्र न घेता गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकाची अल्पावधीत शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन त्याची वाटचाल स्थुलातून सूक्ष्माकडे आणि सगुणातून निर्गुणाकडे होऊन तो मोक्षाचा मानकरी होतो. त्यामुळे सनातनच्या सहस्रो साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत आणि ७०हून अधिक साधकांनी संतपद प्राप्त केले आहेत.

– कु. मधुरा भोसले , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

४. श्री. निषाद देशमुख

४ अ. जिवाच्या साधनाप्रवासाचे प्रकार

श्री. निषाद देशमुख

४ अ १. सर्वसाधारणत: सर्व योगमार्गांत व्यष्टीनंतर समष्टी साधना असणे

ईश्‍वराशी एकरूप व्हायला जिवाला व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही प्रकारांची साधना करावी लागते. सर्वसाधारणत: साधक प्रथम व्यष्टी साधनेचा टप्पा पूर्ण करतो आणि त्यानंतर समष्टी साधनेकडे वळतो. काही अपवादात्मक प्रसंगांत जीव समष्टी साधना प्रथम करतो आणि मग व्यष्टी साधना पूर्ण करतो. व्यष्टी साधनेमुळे जिवाचे स्वभावदोष आणि अहं न्यून झालेले असल्यामुळे जिवाची समष्टी साधना परिपूर्ण होते. यामुळे सर्वसाधारणत: सर्व योगमार्गांची रचना पहिले व्यष्टी आणि मग समष्टी साधना अशी असते.

४ अ १ अ. योगामार्गांतर्गत व्यष्टी साधना केल्याने जिवाची योगमार्गांतर्गत उत्तरोत्तर समष्टी साधना होणे

व्यष्टी साधना करतांना जीव त्याच्या प्रकृतीनुसार ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, ध्यानयोग आणि हठयोग अशा विविध योगमार्गांतून साधना करतो. व्यष्टी साधना करत करत जिवाची आध्यात्मिक पातळी ७० टक्के झाल्यावर, म्हणजे तो संत झाल्यावर त्यापुढे त्याची ज्ञान, कर्म आणि भक्ती यांनी परिपूर्ण अशी उत्तरोत्तर साधना आरंभ होते. व्यष्टी-समष्टी (प्रथम व्यष्टी, मग समष्टी) साधनाप्रवासातून साधना करणारा साधक त्याच्या योगमार्गानुसार उत्तरोत्तर समष्टी साधना करतो.

४ अ २. व्यष्टीनंतर समष्टी साधनाप्रवास आणि व्यष्टीसह समष्टी साधनाप्रवास यांतील भेद

टीप १ – गुरुमंत्र

१. गुरूंनी आतून मार्गदर्शन करणे, हा खरा गुरुमंत्र असणे

२. गुरुरूपी सगुणात न अडकता गुरुतत्त्वाला समजणे महत्त्वपूर्ण असणे

टीप २ निर्गुण सगुणाला पूर्ण व्यापून घेते. यामुळे उच्च पातळी असतांनाही जीव ईश्‍वरेच्छेने समष्टी साधना करत रहातो.

टीप ३ – व्यष्टीनंतर समष्टी साधनेत दीर्घकाळ, तर व्यष्टीसह समष्टी साधनेत अल्पकाळ लागण्यामागील कारण

व्यष्टीनंतर समष्टी मार्गातून साधनाप्रवास करणारे जीव एकेकाळी केवळ व्यष्टी साधना करतात (किंवा केवळ समष्टी साधना करतात). यामुळे त्यांच्या साधनाप्रवासात अखंडता न राहिल्यामुळे त्यांना प्रगती करण्यास दीर्घकाळ लागतो. अनेक वेळा जीव व्यष्टी साधना सोडून समष्टी साधना करण्यात अडकल्यामुळे त्यांची व्यष्टी साधना नष्ट होते. यामुळे त्यांना परत व्यष्टी साधनेच्या पहिल्या टप्प्यापासून आरंभ करावा लागतो, उदा. एक राष्ट्रीय नेते समष्टी स्तरावर कार्य करत होते; पण त्यांची व्यष्टी साधना न्यून पडत होती. यामुळे त्यांना कारागृह शिक्षा भोगावी लागली. त्यांना व्यष्टी साधना ज्ञात असल्यामुळे ते कारागृहात साधना करू शकले.

टीप ४ – गुरुकृपायोगात अडकण्याची शक्यता न्यून असण्याचे कारण

कर्मात अडकल्यावर भक्ती सोडवते, उदा. स्वामी विवेकानंद (कर्मयोगी) निरीश्‍वर कर्मयोगात अडकल्यावर भक्तीयोगी स्वामी परमहंस यांनी त्यांना त्यातून मुक्त केले. भक्तीत अडकल्यावर ज्ञान मुक्ती देते, उदा. भक्तीयोगी गोपींना श्रीकृष्णाच्या देहत्यागाचे दु:ख झाल्यावर ज्ञानयोगी उद्धवाने त्यांना समजवले. ज्ञानात अडकल्यावर कर्म मुक्ती देते, उदा. ज्ञानयोगी उद्धव ज्ञानात अडकल्यावर भगवान श्रीकृष्ण त्याला कर्मयोगी विदुराकडे घेऊन गेले. गुरुकृपायोगात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा सामावेश आहे. यामुळे विविध योगमार्गांनी साधना करणारे जीव कोणत्याही स्तरावर अडकल्यावर जिवाला पुढच्या टप्प्याचे मार्गदर्शन मिळून त्याची शीघ्र प्रगती होते.

– श्री. निषाद देशमुख (स्वप्नात मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.७.२०१७, रात्री १२.०५)

टीप ५ – व्यष्टीनंतर समष्टी साधना करणार्‍या जिवांसाठी ईश्‍वरी कार्यरतता त्यांच्यापुरती मर्यादित असते. यामुळे समष्टीला त्याचा पुष्कळ लाभ होत नाही, उदा. देवाने एकनाथ महाराजांची श्रीखंड्या म्हणून सेवा करणे, संत तुकाराम महाराज यांच्यासाठी विमान पाठवणे इत्यादी. याउलट व्यष्टीसह समष्टी साधना करणार्‍या जिवांसाठी ईश्‍वरी शक्ती कार्यरत झाल्यावर त्याचा समष्टीला लाभ होतो, उदा. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आणि वस्तू यांमध्ये झालेल्या दैवी पालटांमुळे साधकांवर आध्यात्मिक उपाय होणे. पालट मर्यादित स्तरावर न रहाता सर्वत्र प्रकटणे, उदा. दैवी कण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हातावर येणे आणि मग विश्‍वभरातील साधकांच्या अंगावर आणि वस्तूंवर येणे.

टीप ६ – एकाच योगमार्गाचे ज्ञान असल्यामुळे उत्तरोत्तर, म्हणजे समष्टी साधना सांगणे कठीण होणे

सर्वसाधारण मार्गाने जाणार्‍या जिवाला स्वत:च्या योगमार्गांतर्गत साधना ज्ञात असल्यामुळे त्याला उत्तरोतर साधना करणे कठीण होते. यामुळे अधिकांश जीव व्यष्टी साधनेत अडकतात आणि अनेक जन्मांनंतर त्यांना ईश्‍वरप्राप्ती होते. जिवाची ईश्‍वराशी एकरूप व्हायची तळमळ असल्यावर त्याला स्वत:च्या योगमार्गांतर्गत उत्तरोत्तर साधना करता येते, उदा. कर्मयोगांतर्गत कर्ममय भक्ती किंवा कर्ममय ज्ञान इत्यादी.

४ अ २ अ. जिवाची वृत्ती आणि क्षमता यांनुसार त्याची साधना अन् प्रगती होणे

सर्व जिवांची क्षमता वेगवेगळी असते. ईश्‍वराला जिवाच्या क्षमतेनुसार त्याच्याकडून साधना अपेक्षित असते. जिवात साधनेची तळमळ असल्यास ईश्‍वर जिवाच्या क्षमतेत वाढ करून त्याला शीघ्र ईश्‍वरप्राप्ती करण्यात साहाय्य करत असतो.

४ अ २ आ. व्यष्टी-समष्टी (प्रथम व्यष्टी, मग समष्टी) साधनामार्गातून जाणारे अत्यल्प जीव समष्टी साधनेकडे वळण्यामागील कारण

४ अ २ आ १. व्यष्टी-समष्टी (प्रथम व्यष्टी, मग समष्टी) मार्गियांना व्यापक समष्टी साधना ज्ञात नसणे

व्यष्टी-समष्टी (प्रथम व्यष्टी, मग समष्टी) मार्गाचे अनुकरण केलेले अधिकांश जीव प्रथम व्यष्टी साधना करत असतात. त्यांनी केलेल्या व्यष्टी साधनेतून त्यांना अनुभूतीही येत असल्यामुळे त्यांच्यासाठी साधनेची संकल्पना म्हणजे फक्त व्यष्टी साधना करणे, अशी असते. जिवाला केवळ व्यष्टी साधनेची तळमळ असल्यामुळे ईश्‍वर त्यांना व्यापक समष्टी साधनेचे ज्ञान देत नाही.

४ अ २ आ २. व्यष्टी-समष्टी (प्रथम व्यष्टी, मग समष्टी) मार्गाने साधना करणार्‍या जिवांची वृत्ती समष्टीच्या संदर्भात संकुचित असणे

व्यष्टी-समष्टी (प्रथम व्यष्टी, मग समष्टी) मार्गातून साधना करणार्‍या जिवांची समष्टीच्या संदर्भात तळमळ न्यून असते, तसेच व्यष्टी साधनेमुळे त्यांची वृत्ती संकुचित झालेली असते. यामुळे अधिकांश जीव त्यांना ज्ञात साधनेतून इतरांना व्यष्टी साधनेचे मार्गदर्शन करणे, यातूनच समष्टी साधना करत असतात, उदा. व्यष्टी साधना सांगणारे अनेक संत. अल्प जीव राष्ट्रीय स्तरावर पालट घडवणारी समष्टी साधना करतात, उदा. पू. गोळवलकर गुरुजी. अत्यल्प जीव वैश्‍विक स्तरावर पालट घडवणारी समष्टी साधना करतात, उदा. महर्षि अरविंद. महर्षि अरविंद यांनी सूक्ष्मातून वातावरणातील अनिष्ट शक्तींशी युद्ध केल्यामुळे वैश्‍विक स्तरावरील युद्ध टाळले गेले.

४ अ ३. जिवावर व्यष्टी साधनेचा संस्कार असल्यामुळे इतरांना व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन करण्याच्या माध्यमातून ईश्‍वराने आवश्यक अशी थोडीफार समष्टी साधना करवणे

४ अ ३ अ. इतरांना व्यष्टी साधना शिकवण्याच्या माध्यमातून ईश्‍वराने व्यष्टी-समष्टी (प्रथम व्यष्टी, मग समष्टी) साधनामार्गियांची समष्टी साधना करवणे

व्यष्टी साधनेला संपूर्ण साधना समजणार्‍या जिवांना व्यापक समष्टी साधनेत, म्हणजेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षात रस नसतो. असे काही जीव कीर्तन, प्रवचन आदींच्या माध्यमातून समाजात व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन करतात, उदा. संत नामदेव महाराज यांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर अगदी पंजाबपर्यंत नामसाधनेचा प्रसार केला होता. या माध्यमातून ईश्‍वर अशांची समष्टी साधना आपोआप करवून घेतो.

४ अ ३ आ. व्यष्टी-समष्टी (प्रथम व्यष्टी, मग समष्टी) साधनामार्गाने जाणार्‍या जिवांना समष्टी साधनेचे होणारे लाभ

१. शिष्य होण्याची पात्रता नसलेल्या जिवालाही नामजप, दीक्षा किंवा मंत्र दिल्यामुळे त्याची काही प्रमाणात नामजप, सेवा इत्यादी व्यष्टी साधना आरंभ होते.

२. संतांनी सकाम उद्देशाने किंवा त्रास दूर करण्यासाठी दिलेला संकल्पयुक्त नामजप किंवा मंत्रजप यांमुळे समष्टीकडून ईश्‍वराची साधना झाल्यामुळे समाजाच्या सात्त्विकतेत काही प्रमाणात वाढ होते.

३. अशा जिवांनी स्वत: योगमार्गांतर्गत व्यष्टी साधना केलेली असल्यामुळे त्या योगमार्गांतर्गत साधना करण्याची तळमळ असलेल्या जिवांना व्यष्टी साधनेविषयी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांची शीघ्र प्रगती होते.

भोंदू साधू

या सूत्रात खरा साधक किंवा संत यांच्या समष्टी साधनेचे लाभ सांगितले आहेत. समाजात ९८ टक्के भोंदू संत याप्रकारे कृती करून जिवाची आध्यात्मिक फसवणूक करतात. यामुळे त्यांना त्याचे महापाप लागते.

४ अ ३ इ. व्यापक समष्टी साधना

अन्य जिवांना व्यष्टी साधना शिकवणे किंवा साधनेविषयी ग्रंथ, भजन, कीर्तन इत्यादींतून मार्गदर्शन करणे, हा समष्टी साधनेचा एक भाग असतो; पण ती व्यापक समष्टी साधना नसते. जिवाच्या वैयक्तिक जीवनासमवेत सामाजिक, राष्ट्रीय, वैश्‍विक आणि आध्यात्मिक विश्‍व यांत परिवर्तन घडवून प्रभाव निर्माण करणे, याला व्यापक समष्टी साधना, असे म्हटले जाते.

४ अ ३ इ १. व्यापक समष्टी साधनेतून शीघ्र ईश्‍वरप्राप्ती होते, तर व्यष्टीशिवाय समष्टी साधनेमुळे तुलनेत न्यून प्रमाणात प्रगती होते.

४ अ ३ ई. साधनेची तीव्र तळमळ असलेल्या जिवांनी नवीन जन्म घेऊन प्राधान्याने समष्टी साधना करणे

व्यष्टी-समष्टी (प्रथम व्यष्टी, मग समष्टी) मार्गातून जाणारे अधिकांश जीव मनावर झालेल्या व्यष्टी साधनेच्या संस्कारांमुळे त्याच जन्मात समष्टी साधनेकडे वळत नाहीत. अशा जिवांचा मृत्यू झाल्यावर त्यांना जीवस्वरूपाचे भान आणि साधनेतील चूक लक्षात येते. समष्टी साधना करून ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी तीव्र तळमळ असलेले जीव पुढील जन्म घेतात आणि प्राधान्याने समष्टी साधना करतात, उदा. आद्य शंकराचार्य इत्यादी.

४ अ ३ ई १. मायेमध्ये अडकण्याचा संभव असल्यामुळे अधिकांश जिवांनी समष्टी साधनेसाठी जन्म न घेणे आणि दैवी बालकांनी जन्म घेणे

वरील सूत्रात दिलेल्या पद्धतीनुसार अत्यल्प जीव जन्म घेऊन समष्टी साधना करतात; कारण काळ साधनेसाठी अनुकूल नसल्यास समष्टी साधनेचे अपेक्षित फळ मिळत नाही. यामुळे समष्टी साधनेचा भाग पूर्ण करण्यासाठी त्यांना परत-परत जन्म घ्यावे लागतात. परत-परत जन्म घेण्याच्या प्रक्रियेत मायेमध्ये अडकून आध्यात्मिक स्तर न्यून होण्याची शक्यता असते. यामुळे एकदा जन्म घेऊन समष्टी साधना पूर्ण करण्यासाठी तीव्र प्रतिकूल काळात आपली समष्टी साधना पूर्ण करण्यासाठी अधिकांश जीव जन्म घेतात, उदा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी जन्मलेले काही मावळे आणि सध्याच्या काळात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ५१ टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या दैवी बालकांचा जन्म.

४ अ ३ ई २. हिंदु राष्ट्र आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय चालवणे इत्यादी सेवांचे महत्त्व (अधिकाधिक दैवी बालकांनी आता जन्म घेण्याचे कारण)

हिंदु राष्ट्र आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय चालवणे, ग्रंथनिर्मिती, चित्रीकरणाचे संकलन, संशोधन आदी विविध सेवा पुढच्या १०० – २०० वर्ष चालू रहाणार आहेत. या सेवांमुळे कलियुगाच्या शेवटपर्यंत जिवांना लाभ होणार असल्यामुळे या सेवांच्या कालावधीत जन्म घेतल्यावर व्यापक समष्टी साधनेत सहभागी होण्याची संधी आहेे. यामुळे आपली अपूर्ण साधना पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक दैवी बालके जन्म घेत आहेत.

४ अ ३ उ. काही जिवांनी शीघ्र ईश्‍वरप्राप्तीसाठी सूक्ष्मातून समष्टी साधना करणे

व्यष्टी-समष्टी (प्रथम व्यष्टी, मग समष्टी) साधनामार्गांतून जाणार्‍या चांगली पातळी असलेल्या काही जिवांना मृत्यूनंतर आपल्या जीव-स्वरूपाचा बोध होऊन उच्च पातळीमुळे मोक्षप्राप्तीचे वेध लागतात. पुन्हा जन्म घेऊन मायेत अडकण्याची शक्यता आहे, असे त्यांना लक्षात येत असल्याने आपल्या व्यष्टी साधनेच्या पातळीमुळे ते जन्म न घेता सूक्ष्मातून समष्टी साधना करतात. आध्यात्मिक पातळी असलेले जीव सूक्ष्मातून करत असलेले समष्टी साधनेचे स्वरूप पुढील प्रमाणे असते.

१. स्वत: गुरु म्हणून साधना सांगितलेल्या जिवांना पुढच्या टप्प्याचे मार्गदर्शन करणारे देहधारी गुरु किंवा मार्गदर्शक यांच्याकडे नेणे आणि तशी अनुभूती देणे. यामुळे अनेक जिवांना योग्य साधनामार्ग किंवा गुरु भेटल्यावर त्यांचे इष्टदेवता, श्रद्धास्थान (साईबाबा, गजानन महाराज इत्यादी) किंवा गुरु यांच्याकडून स्वप्नदृष्टांत होतात किंवा अनुभूती येते. (सनातनकडे अशा अनेक अनुभूतींचा संग्रह आहे.)

२. विविध जिवांना त्यांच्या योगमार्गानुसार सात्त्विक विचार, धार्मिक कृती किंवा साधनेविषयी सूक्ष्मातून ज्ञान देणे.

३. साधना करणार्‍या जिवांचे रक्षण करणे.

४. समष्टी स्तरावरील कार्यक्रमांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण करणे.

४ अ ३ ऊ. निष्कर्ष

१. व्यष्टी-समष्टी (प्रथम व्यष्टी, मग समष्टी) मार्गातून साधना करणारे अनेक जीव इतरांना व्यष्टी साधना करणे शिकवून आपली समष्टी साधना पूर्ण करत असतात.

२. अनेक जीव व्यष्टी साधनेच्या संस्कारांमुळे त्याच जन्मात समष्टी साधना न करता पुढचा जन्म घेऊन प्राधान्याने समष्टी साधना करतात.

३. अनेक जीव सूक्ष्म स्तरावर समष्टी साधना करतात किंवा प्रतिकूल काळात जन्म घेऊन अल्प काळात समष्टी साधना पूर्ण होण्याच्या संधीची वाट पहात असतात.

४. व्यष्टी-समष्टी (प्रथम व्यष्टी, मग समष्टी) मार्गातून जाणारे जीव वरील सर्व प्रकारांतून (वरील अधोरेखित सूत्र अ ते इ) आपली समष्टी साधना पूर्ण करतात. यामुळे स्थूल स्तरावर बघतांना अत्यल्प जीव त्याच जन्मात व्यष्टी करून व्यापक समष्टी साधनेकडे वळतात, असे लक्षात येते.

४ अ ४. विविध योगमार्ग, उत्तरोत्तर साधना, कृतीचे उदाहरण आणि इतिहासातील उदाहरण

४ अ ५. व्यष्टीसह समष्टी साधनाप्रवास

ईश्‍वराशी एकरूप होण्यासाठी जिवाने व्यष्टी साधनेसह समष्टी साधना करणे याला व्यष्टीसह समष्टी साधनाप्रवास, असे म्हटले जाते. या साधनाप्रवासात जीव हा केवळ व्यष्टी किंवा समष्टी साधना करत नसून काळानुसार आवश्यक त्या प्रमाणात व्यष्टीसह समष्टी साधना करून मोक्षप्राप्ती करत असतो. जीव व्यष्टीसह समष्टी साधना करत असल्यामुळे त्याची व्यष्टीनंतर समष्टी साधनामार्गाच्या तुलनेत अनेक पटींनी शीघ्र प्रगती होते.

४ अ ५ अ. व्यष्टीसह समष्टी साधनेत कर्म, भक्ती आणि ज्ञान यांच्या समतोलत्वाने जिवाची साधना होणे

व्यष्टीसह समष्टी साधनेत जीव एकाच वेळी व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही साधना करत असल्यामुळे त्याची साधना कर्म, भक्ती अन् ज्ञान यांच्या समतोलत्वाने होते. यामुळे जीव योगमार्गात न अडकता अन्य योगमार्गांच्या तुलनेत अल्प कालावधीत ईश्‍वरप्राप्ती साध्य करतो, उदा. गुरुकृपायोगानुसार साधना. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्या एकत्रीकरणाने गुरुकृपायोगात सांगितलेला अष्टांग योग पूर्ण होतो.

४ अ ५ अ १. गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अष्टांगयोगात सामावलेले कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग

– श्री. निषाद देशमुख (स्वप्नात प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०१७, रात्री ३.२५)

४ अ ५ अ २. व्यष्टीसह समष्टी साधना करणार्‍या जिवांची साधना आध्यात्मिक विश्‍वात पालट करणारी असणे

याउलट व्यष्टीसह समष्टी साधना करणारे जीव आध्यात्मिक विश्‍वात परिवर्तन करत असतात. यामुळे वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि वैश्‍विक अशा सर्व स्तरांवर ईश्‍वरी शक्तीचा परिणाम होतो, उदा. सनातन संस्थेचे संत करत असलेल्या जपामुळे विश्‍वाची सात्त्विकता वाढणे आणि वाईट शक्तीचा त्रास न्यून होणे. या दोन्ही क्रियांमुळे वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय अन् वैश्‍विक जीवन आनंदी होते.

४ आ. खरा गुरुमंत्र

४ आ १. गुरूंनी आतून मार्गदर्शन करणे, हा खरा गुरुमंत्र असणे

आपल्यावर गुरूंची कृपा असून ते आपला उद्धार करणारे आहेत, असा भाव ठेवून तळमळीने आणि अविरत साधनेचे प्रयत्न करणार्‍या जिवाला गुरु आतून मार्गदर्शन करतात. यामुळे काही कालावधीने अशा जिवांचा गुरुमंत्र नसला, तरी (म्हणजे जप पश्यंती वाणीत गेला असल्यामुळे) त्यांची प्रगती होते.

४ आ २. गुरुरूपी सगुणात न अडकता गुरुतत्त्वाला समजणे महत्त्वपूर्ण असणे

गुरूंचे रूप सगुण असते. जिवाची आवश्यक प्रमाणात सगुणाची उपासना झाल्यावर त्याला गुरूंच्या देहापासून म्हणजे सगुणापासून निर्गुणाकडे जायचे असते. गुरुमंत्र हाही सगुणातील एक प्रकार आहे. त्याच्याही पुढे गुरुरूपी ईश्‍वराला अपेक्षित समष्टी साधना आणि काळानुसार साधना करणे आवश्यक असते.

४ इ. साधनाप्रवासानुसार गुरुमंत्राची आवश्यकता आणि निरर्थकता

४ इ १. गुरुमंत्राचे महत्त्व आणि कार्य

४ इ १ अ. कुंडलिनीयोगानुसार

गुरुमंत्रामुळे आज्ञाचक्राची जागृती होण्यास साहाय्य होते. आज्ञाचक्राची जागृती झाल्यामुळे आज्ञाचक्राच्या खाली असलेली चक्रे (विशुद्ध, अनाहत, मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार) यांचीही जागृती होते.

४ इ १ आ. साधनाप्रवासानुसार

सर्वसाधारण जिवाचा साधनाप्रवास स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्‍वरेच्छा याप्रकारे होत असतो. गुरुमंत्र म्हणजे आपल्या मनाने साधना न ठरवता गुरूंच्या इच्छेनुसार साधना करणे. यामुळे जिवाला काही प्रमाणात साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाता येते.

४ इ १ इ. प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्ग यांनुसार

गुरुमंत्रामुळे मायेतील संस्कार न्यून होतात, तसेच मायेतून सुटून ईश्‍वराकडे जाण्यास साहाय्य होते.

४ इ २. व्यष्टीनंतर समष्टी साधना करणार्‍या जिवांच्या साधनेसाठी गुरुमंत्र आवश्यक असणे

व्यष्टीनंतर समष्टी साधनाप्रवासाने जाणार्‍या जिवांसाठी गुरुमंत्र आवश्यक असतो; कारण त्यांचा साधनाप्रवास व्यष्टीचे चरण पूर्ण करून मग समष्टीकडे जायचा असतो. गुरुमंत्रामुळे जीव अनेकातून एकात आणि स्थुलातून सूक्ष्माकडे जातो. यामुळे जीव सूक्ष्म-सूक्ष्मतर-सूक्ष्मतम होत जातो आणि पुढे समष्टी साधना करतांना व्यापक ईश्‍वरी तत्त्वाशी सहजतेने एकरूप होतो. फक्त व्यष्टी साधना करण्यात जिवांचा जन्म फुकट न जाता त्यांची शीघ्र प्रगती होऊन पुढच्या-पुढच्या जन्मांचा वेळ वाचवण्यासाठी त्यांना गुरुमंत्र आवश्यक असतो.

४ इ ३. तन-मन-धन यांचा त्याग केलेल्या जिवांसाठी गुरुमंत्र आवश्यक

तन-मन-धन यांचा त्याग केलेल्या जिवांनाही त्यांनी निवडलेल्या साधनाप्रवासानुसार गुरुमंत्र आवश्यक असणे किंवा नसणे, हे ठरते. अनेक जीव तन-मन-धन यांचा त्याग करतात; पण त्यांना शीघ्र ईश्‍वरप्राप्तीची तळमळ नसते. अंतर्मनावर असलेल्या त्यागाच्या संस्कारामुळे किंवा भावनांमुळे त्यांच्याकडून त्याग करण्यात आलेला असतो, उदा. साधु, संन्यासी इत्यादी. तळमळ नसल्यामुळे अशा जिवांचा साधनाप्रवास अनेक जन्मांनंतर पूर्ण होण्याची शक्यता असते. यामुळे तन-मन-धनाचा त्याग केलेल्या; पण तळमळ न्यून असलेल्या जिवांसाठी गुरुमंत्र आवश्यक असतो. याउलट ‘ईश्‍वरप्राप्ती व्हावी’, या तळमळीने तन-मन-धनाचा त्याग केलेल्या जिवांची भरभरून प्रगती होते. अशा जिवांना गुरुमंत्र नाही मिळाला, तरी त्यांची प्रगती होण्यात अडचण येत नाही.

४ इ ४. व्यष्टीसह समष्टी साधना करणार्‍या जिवांना गुरुमंत्र आवश्यक नसणे

व्यष्टीसह समष्टी साधना करणार्‍या जिवांच्या संदर्भात गुरुमंत्र आवश्यक नसतो; कारण ते गुरूंच्या मार्गदर्शनानुसार करत असलेल्या काळानुसार नामजपातून त्यांची व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही प्रकारची प्रगती होत असते.

४ इ ५. काळानुसार नामजप आणि गुरुमंत्र यांतून मोक्ष मिळण्याची प्रक्रिया

ईश्‍वरामध्ये विविध तत्त्वे समाविष्ट असतात. जिवाला ईश्‍वरात विलीन होण्यासाठी ही सर्व तत्त्वे स्वत:मध्ये आणण्याची आवश्यकता असते. तसेच जिवामध्ये एखादे तत्त्व न्यून असल्यामुळे वातावरणातील वाईट शक्तीचा त्याला त्रास होतो. हे न्यून असलेले तत्त्व वाढवण्यासाठी गुरु त्याला संबंधित देवतेचा गुरुमंत्र देतात किंवा त्याला काळानुसार नामजप सांगितला जातो. नामजपातून जिवामध्ये संबंधित तत्त्वांची वाढ झाल्यामुळे मोक्षप्राप्ती किंवा वाईट शक्तीचा त्रास न्यून होतो.

४ इ ५ अ. गुरुमंत्रात एकाच देवतेचे तत्त्व असल्यामुळे प्रत्येक जन्मात जिवाला नवीन गुरुमंत्र मिळणे

गुरुमंत्रातून प्रत्यक्षात केवळ एकाच देवतेचे तत्त्व मिळत असते. यामुळे जिवाने जन्मभर केवळ गुरुमंत्राचा जप केला, तरी त्याला मोक्ष न मिळता परत जन्म घ्यावा लागतो. नवीन जन्मात मागील जन्माच्या साधनेनुसार जिवामध्ये संवर्धित झालेले तत्त्व आणि अन्य तत्त्वे यांच्या आवश्यकतेनुसार गुरुतत्त्व देहधारी गुरूंच्या माध्यमातून जिवाला नवीन गुरुमंत्र देते. यामुळे व्यष्टीनंतर समष्टी साधनाप्रवासात जीव अनेक देवतांचे जप करून मोक्ष प्राप्त करत असतो.

४ इ ५ आ. पूर्वजन्माची साधना नसतांनाही एका जन्मात गुरुमंत्र मिळून जिवाला मोक्ष मिळण्याची प्रक्रिया

अनेक जिवांची पूर्वजन्माची साधना नसतांनाही केवळ गुरुमंत्र मिळाल्यामुळे अनेक जिवांना मोक्ष मिळवता येतो. याचे कारण म्हणजे जिवाची गुरुमंत्रावर असलेली श्रद्धा आणि भाव होय. जिवाच्या भावामुळे त्याचा नामजप उच्च वाणीत होऊ लागतो. ही अवस्था आल्यावर जीव ‘नाम हाच गुरु’, याची अनुभूती घेत असतो. यामुळे गुरुमंत्र किंवा नामजप यांची रचना सगुण तत्त्वाशी निगडित असली, तरी जिवाची नामजप करण्याची स्थिती निर्गुण झालेली असल्यामुळे जिवाला त्या नामातून आवश्यक सर्व तत्त्वे मिळत असतात. या अवस्थेत जिवासाठी ‘नाम हाच गुरु’ झाला असल्यामुळे जीव व्यष्टी स्तरावर न अडकता व्यापक समष्टी साधना करू लागतो, उदा. प.पू. भक्तराज महाराज. अनेक जिवांची गुरुमंत्राप्रती तळमळ नसल्यामुळे त्यांना ही स्थिती साध्य करण्यात अनेक जन्म लागतात.

४ इ ६. ईश्‍वराने गुरुकृपायोग आणि सनातन संस्था यांमध्ये गुरुमंत्र देण्याची पद्धत रूढ न करण्यामागील कारण

४ इ ६ अ. गुरुमंत्रात अडकल्यामुळे जिवाचा जन्म फुकट जाणे

शिष्यावस्थेत असतांना अनेक जिवांना गुरूंच्या सगुण रूपाप्रती आकर्षण असते. यामुळे गुरूंनी सगुणातून दिलेल्या गुरुमंत्राप्रती त्यांच्या मनात भावनिक आस्था असते. साधनेत जिवाची प्रगती झाल्यावर आवश्यकतेनुसार गुरु आतून गुरुमंत्र किंवा वेगळा जपही आरंभ करवून घेतात (सनातनच्या अनेक साधकांना याची अनुभूती आली आहे.); पण जिवाला गुरुमंत्राप्रती असलेल्या भावनिक ओढीमुळे त्याला दुसरा मंत्रजप स्वीकारता येत नाही. या मानसिक स्तरावरील अडचणीमुळे जीव जन्मभर एकाच टप्प्यावर अडकून रहातो. यामुळे त्याचा पूर्ण जन्म फुकट जातो आणि पुढच्या टप्प्याच्या साधनेसाठी त्याला परत-परत जन्म घ्यावे लागतात.

४ इ ६ आ. गुरुकृपायोगानुसार साधनेत ‘प्रगतीसाठी आवश्यक नामजप’ आणि ‘स्तरानुसार जिवाची स्थिती’ यांचा सुवर्णमध्य साधला जाणे

गुुरुकृपायोगाची निर्मिती आणि सनातन संस्थेची स्थापना करण्याचा ईश्‍वराचा उद्देश हा ‘जिवाला शीघ्र मोक्षप्राप्ती करून देणे’, हा आहे. यामुळे जीव अडकू शकणार्‍या गुरुमंत्र पद्धतीचा समावेश न करता गुरुकृपायोगातील अष्टांगयोगात काळानुसार नामजपाच्या पद्धतीचा समावेश करून ‘प्रगतीसाठी आवश्यक नामजप’ आणि ‘स्तरानुसार जिवाची स्थिती’, यांचा सुवर्णमध्य साध्य करण्यात आला आहे.

४ इ ६ इ. गुरुकृपायोगात सांगण्यात येणार्‍या काळानुसार नामजपाचे लाभ

जिवांची पातळी नसतांनाही त्यांनी काळानुसार विविध नामजप केल्यामुळे त्यांना प्रगतीसाठी आवश्यक देवतेचे तत्त्व मिळत असल्यामुळे वाईट शक्तींच्या त्रासापासून रक्षण आणि प्रगती होते. तसेच नामजपात सतत होत असलेल्या पालटामुळे जिवांनी नामजपात अडकण्याची शक्यता नसते.

स्तरानुसार उच्च वाणीत जप करण्याची स्थिती गाठलेल्या जिवांनी काळानुसार नामजप केल्यावर त्यांच्या नामजपाचा समष्टीलाही लाभ होतो आणि उच्च वाणीतील नामजप निर्गुण असल्यामुळे त्यांना प्रगतीसाठी आवश्यक तत्त्वे मिळून त्यांची आध्यात्मिक उन्नती होते.

४ इ ६ ई. काळानुसार नामजप केल्यामुळे अनेक जन्मांतील गुरुमंत्राचा लाभ मिळणे

गुरुकृपायोगामध्ये जिवाला त्याची प्रकृती आणि काळ यांनुसार विविध नामजप भावपूर्ण अन् गुणवत्तापूर्ण करण्यास शिकवले जाते. यामुळे उच्च वाणीत जप करणे जिवाला सहजतेने साध्य होत असते. प्रत्येक काळाच्या टप्प्याला नवीन जप स्वीकारल्यामुळे जिवाच्या आज्ञाचक्राचे भेदन होते, तसेच नामजपाची साधना स्वेच्छेने न होता गुरूंच्या इच्छेने होत असते. यामुळे अनेक जन्म गुरुमंत्राचा जप करण्याचा लाभ जिवाला एका जन्मातच साध्य करता येतो.

४ इ ७. गुरूंनी जिवाला गुरुमंत्र देणे आणि गुरूंनी काळानुसार विविध नामजप सांगणे, यांतील भेद

जिवाला अनेक रोग असल्यावर काही वैद्य एक-एक रोग न्यून होण्यासाठी औषध देतात, तर काही वैद्य सर्व रोगांसाठी अनेक औषधे सांगतात. त्याच प्रकारे जिवाला ईश्‍वरप्राप्ती होण्यासाठी प्रत्येक जन्मात गुरुमंत्र म्हणजे एक-एक औषध आहे, तर काळानुसार विविध नामजप म्हणजे सर्व रोगांसाठी विविध औषधे आहेत. पूर्वकाळात वाईट शक्तींचा त्रास न्यून प्रमाणात असल्यामुळे केवळ गुरुमंत्रातून ईश्‍वरप्राप्ती सहज व्हायची. कलियुगातील वर्तमानकाळात वाईट शक्तींचा त्रास वाढल्यामुळे अनेकदा गुरुमंत्राची शक्ती केवळ त्रास न्यून करण्यात व्यय होत असल्यामुळे जिवाची शीघ्र आध्यात्मिक प्रगती होत नाही. याउलट काळानुसार विविध नामजपांमुळे त्रास न्यून होणे आणि आध्यात्मिक प्रगती होणे, ही दोन्ही ध्येये साध्य होतात.

४ इ ७ अ. विविध गुरूंनी गुरुमंत्र देण्यामागील कारण

विविध जिवांनी व्यष्टी साधना करून गुरुपद प्राप्त केलेले असते. यामुळे त्यांना स्वत:चा योगमार्ग आणि उत्तरोत्तर योगमार्ग एवढेच ज्ञान असते. तसेच अन्य योगमार्गांचा अभ्यास करण्याची त्यांची तळमळ नसते. त्यामुळे ईश्‍वरही त्यांना अन्य योगमार्गांचे ज्ञान न देता संबंधित योगमार्गातून साधना करणे आवश्यक असलेल्या जिवाला त्यांच्याकडे पाठवतो. अल्प ज्ञान असलेले वैद्य केवळ काही रोगांचे उपचार करू शकतो. त्याच प्रकारे समाजातील विविध गुरु कनिष्ठ वाईट शक्ती, पूर्वजांचे त्रास दूर करणे किंवा केवळ व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन करणे, या स्तरापर्यंतच कार्य करण्यास सक्षम असतात.

४ ई. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या सनातनच्या साधकांची शीघ्र प्रगती होण्यामागील कारणे

१. गुरुकृपायोगानुसार साधनेचे अष्टांगयोग हे ज्ञान, भक्ती आणि कर्म यांनी परिपूर्ण आहे. यामुळे जिवाची शीघ्र प्रगती होते.

(संदर्भ : या लेखातील सूत्र ४ अ ५ अ १)

२. गुरुकृपायोगात सांगितलेल्या अष्टांग साधनेत नामजपाला व्यष्टीच्या दृष्टीने १० टक्के, तर समष्टीच्या दृष्टीने ५ टक्के (टीप) महत्त्व असतांनाही त्याचे फळ अनेक जन्म गुरुमंत्राचे जप करण्याइतके आहे.

३. साधक नामजपासह गुरुकृपायोगातील आठही अंगांचे आचरण करून व्यष्टीसह समष्टी साधना करत असल्यामुळे गुरुमंत्र नसतांनाही सहस्रो साधकांची प्रगती होत असून ७० हून अधिक साधकांनी संतपद प्राप्त केले आहे.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१०.२०१७, रात्री १०.३० आणि १५.१०.२०१७, दुपारी १.३२)

टीप : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या ‘गुरुकृपायोगात सांगितलेल्या अष्टांग साधनेतील घटकांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेत महत्त्व !’ यात दिलेल्या सारणीतील टक्केवारी अनुसार येथे टक्केवारी घेतली आहे. हा लेख सनातनच्या संकेतस्थळावर पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहे. – www.Sanatan.org/mr/a/9184.html

 

ज्ञानाची प्रक्रिया

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विचारलेले प्रश्‍नातील काही सूत्रे पूर्वीच स्वप्नाच्या माध्यमातून मिळणे

‘१३.१०.२०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुमंत्राला खूप महत्त्व असूनही…’ या प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्यासाठी दिले होते. या प्रश्‍नाचे उत्तर मिळवतांना त्यातील काही सूत्रे पूर्वीच स्वप्नातून मिळालेली असल्याचे लक्षात आले. यात वैशिष्ट्यपूर्ण असे की, परत ज्ञान मिळतांना पूर्ण मजकूर किंवा सारणी न मिळता केवळ ज्ञानाचे स्मरण (मथळे आठवणे) झाले. यातून ईश्‍वराचा काटकसरीपणा हा गुण अनुभवायला मिळाला.’ (सदर लेखात ज्या ज्या ठिकाणी स्वप्नातील ज्ञानाचा अंतर्भाव आहे, त्या त्या ठिकाणी ‘स्वप्नातून प्राप्त झालेले ज्ञान’, असा उल्लेख करण्यात आला आहे.)

– श्री. निषाद देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१०.२०१७, सायं ४.४८)

 

दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे फॉर्म्युले सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या फॉर्म्युल्याशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना दैवी कण असे संबोधतात.

 

धर्माच्या अभ्यासकांना विनंती !

सनातन प्रभातमध्ये प्रकाशित होणारे साधकांना मिळणारे नाविन्यपूर्ण ज्ञान योग्य कि अयोग्य, तसेच साधकांना येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती, यांचा अभ्यास करण्याच्या संदर्भात साहाय्य करा !

आतापर्यंतच्या युगायुगांतील धर्मग्रंथांत उपलब्ध नसलेले नाविन्यपूर्ण ज्ञान ईश्‍वराच्या कृपेने सनातनच्या काही साधकांना मिळत आहे. ते ज्ञान नवीन असल्यामुळे जुन्या ग्रंथांचा संदर्भ घेऊन त्या ज्ञानाला योग्य कि अयोग्य ?, असे म्हणता येत नाही. ते ज्ञान योग्य कि अयोग्य ?, यासंदर्भात, तसेच साधकांना येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूतींच्या संदर्भात (उदा. उच्च लोक, पंचमहाभूते यांच्याविषयीच्या अनुभूतींच्या संदर्भात) धर्माच्या अभ्यासकांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास मानवजातीला नवीन योग्य ज्ञानाचा लाभ होईल. एवढेच नव्हे, तर अयोग्य काय ?, हेही कळेल. यासाठी आम्ही धर्माच्या अभ्यासकांना यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.

– संपादक, सनातन प्रभात