व्यापक हिंदु संस्कृतीमुळे जगभरात समरस होणारा आणि सर्वत्र सन्मान होणारा हिंदु समाज !

‘हिंदू एक जीवनपद्धती आहे. संपूर्ण जगभर हिंदुस्थानी जीवनपद्धतीचे अनुकरण होत आहे. जगभरात जेथे जेथे हिंदू गेले, त्यांनी तेथे स्वभाव, कार्यक्षमता आणि निष्ठेचा प्रभाव निर्माण केला आहे. परिणामी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही त्यांच्या भाषणात ‘आगामी काळात हिंदुस्थानात जन्माला आलेली व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकते’, असे म्हणावे लागले. ही खरे तर हिंदु जीवनपद्धतीचीच देणगी आहे. केवळ अमेरिकाच नव्हे; तर संपूर्ण विश्‍व भारतियांना मानते. स्वभावानुसार ते ज्या देशात जातात, तेथील होऊन जातात.

१. हिंदुस्थानात रहाणार्‍या सर्वांची राष्ट्रीयता हिंदूच असायला हवी !

राष्ट्रीयता आणि नागरिकता या दोन वेगळ्या गोष्टी असल्या, तरी दोन्हींचा अर्थ एकच होतो. राष्ट्रीयता ही जन्माने मिळते, तर नागरिकता एक राजकीय व्यवस्था आहे, जी काळ, वेळ आणि स्थान यांनुसार पालटते. एखाद्या व्यक्तीचे पूर्वज अनेक शतके ज्या एकाच भूप्रांतात, देशात जन्माला आले, ती त्या व्यक्तीची राष्ट्रीयता होय. एखाद्या देशात बराच काळ व्यापार-उदिम केला आणि तेथील सोयी-सवलतींचा लाभ घेतला, तर त्या देशात रहाणे ही व्यक्तीची नागरिकता असते. राष्ट्रीयता कायमस्वरूपी असते, वंशपरंपरेने चालत आलेली असते, तर नागरिकता तात्पुरती असते. राष्ट्रीयता कुणी हिसकावू शकत नाही, तिचा र्‍हासही होत नाही. या परिभाषेनुसार हिंदुस्थानात रहाणारा कोणत्याही जाती-धर्माचा का असेना, हिंदूच आहे.

२. अनेक जन्मांपासून हिंदू हीच ओळख असतांना ती आताच का लपवावी ?

हिंदूंशिवाय इतर धर्माचे लोक स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायला सिद्ध नसतात. वास्तवात ‘हिंदू’ या शब्दाचा उपयोग नागरिकता किंवा राष्ट्रीयता स्पष्ट करण्यासाठी होत असेल, तर त्यांनी आक्षेप घेण्याचे कारण काय ? जन्मजन्मांतरापासून त्यांची मूळ ओळख हिंदू अशीच होती, तर आता ‘हिंदू’ हा शब्द त्यांनी झटकून का टाकावा ? असे दिसून येते की, स्वतःला हिंदू म्हणवून घेतल्याने त्यांची इस्लाम, ख्रिस्ती, यहुदी इत्यादी म्हणून जी एक ओळख आहे, ती संकटात पडेल. त्यामुळे ते स्वतःला हिंदी किंवा हिंदुस्थानी तर म्हणवून घेतात; परंतु हिंदू मात्र नाही. आपली घृणा लपवण्यासाठी ते स्वतःला हिंदुस्थानी, हिंदी किंवा हिंदुस्थानीय असल्याचे सांगतात. ज्या हिंदु संस्काराचा लाभ हवा, त्याचा वापर करायची वेळ आली की, सहस्रो कारणे सांगितली जातात. ही मानसिकता अभ्यासाचा विषय आहे. सर्वच असे करतात, असेही नाही. जगभर असे असंख्य लोक आहेत, जे स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास लाज बाळगत नाहीत. इस्रायल याचे उत्तम आणि जिवंत उदाहरण आहे. तेथे शेकडो वर्षांपासून रहात असलेले लोक आजही ‘आम्ही हिंदू यहुदी आहोत’, असे सांगतात.

३. हिंदूंच्या व्यापकतेमुळे इस्रायली नागरिकांनी हिंदु दांपत्याविषयी व्यक्त केलेले प्रेम

इस्रायलनिवासी डॉ. यशवंत पाठक यांनी यासंदर्भातील आपला एक गमतीदार अनुभव नुकताच पत्रकारांपुढे मांडला आहे. ते लिहितात, ‘‘काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या स्वातंत्र्यदिन समारंभात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. तेथे मी सांगितले की, मी हिंदू आहे आणि हिंदुस्थानातून आलो आहे. तेव्हा तेथील रहिवाशांनी मी आणि माझ्या पत्नीशी अतिशय जिव्हाळ्याने अन् आपुलकीने भावविभोर होत संवाद साधला. आम्ही त्यांच्यात आहोत, याचा त्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी आम्हाला मिठाई दिली आणि मुलांसाठी खेळणीही दिली. आमच्यासह त्यांनी छायाचित्रेही काढली. एवढेच नव्हे, तर ते म्हणाले की, ‘‘आम्ही हिंदुस्थान, हिंदू आणि हिंदु दर्शन यांचा फार सन्मान करतो. जगात तुमचा एक हिंदुस्थान असा देश आहे, जेथे आम्हाला कधीही त्रास झालेला नाही. वेळ आल्यास आम्हाला या देशाने मनापासून आश्रयही दिला. त्यामुळे आमच्या मनात हिंदुस्थानविषयी मोठा सन्मान आहे.’’

४. हिंदुस्थानी संगीतातील सामर्थ्याची अमेरिकी व्यक्तीला आलेली प्रचीती

पाठक म्हणतात, याच काळात माझा एका अमेरिकन व्यक्तीशी परिचय झाला. त्यांचे नाव मार्क स्क्वायर. त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्हाला हिंदुस्थानी संगीत आवडते का ?’’ मी म्हणालो, ‘‘हिंदुस्थानी संगीतावर तर मी माझा जीव ओवाळून टाकतो.’’ त्यांनी मला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. मी तेथे गेलो. मार्क यांच्या घरी हिंदुस्थानी संगीताचे फार मोठे भांडारच आढळून आले. आसावरी, दरबारी, कानडा आदी रागांवर आधारित हिंदुस्थानी संगीताच्या शेकडो ध्वनीचित्रचकत्या (ऑडिओ सीडीज्) तेथे होत्या. एवढा मोठा संग्रह असेल, अशी मी कल्पनाच केली नव्हती. आमची हतप्रभ अवस्था पाहून त्यांना हसू आले.

मार्क म्हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वी जेव्हा मी खूप निराश झालो. आत्महत्येसाठी घराबाहेर पडलो. चालत असतांना माझ्या कानांना सतारीची धून ऐकू आली. तिने मला मोहून घेतले. जशी जशी सतारीची धून ऐकू येऊ लागली, तसे मी खिळून गेलो. त्या स्वरांनी जणू काही माझा ताबाच घेतला. मनातून आत्महत्येचा विचार केव्हाच निघून गेला. माझ्यात जगण्याचे साहस आले, मी दृढ निश्‍चय केला की, मला आता जगायचे आहे. परिस्थितीशी सामना करायचा आहे. तेव्हापासून मी केवळ हिंदुस्थानी संगीताचा भक्त आहे. मला हिंदुस्थानी संगीत कळते, याचा मोठा अभिमान आहे. ज्याला हिंदुस्थानी संगीत कळत नाही, त्याने जगच काय पाहिले ? मी तर हिंदुस्थानी संगीतासाठी पूर्ण समर्पितच झालेलो आहे.’’

५. हिंदुस्थानींची कार्यक्षमता, सेवाभाव, स्वभाव यांमुळेच अन्य राष्ट्रे प्रभावित !

अमेरिकेतील हिंदुस्थानींनी बुद्धीच्या जोरावर महाशक्तीचे मन जिंकले आहे. अमेरिकेत संपूर्ण जगभरातून लोक आलेले आहेत. मानसिक बळाच्या जोरावर अमेरिकेसारख्या महाशक्तीला आपल्या मुठीत घेतले, ते केवळ हिंदुस्थानींनीच ! त्यामुळेच कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेत महत्त्व आहे, ते हिंदुस्थानींचेच ! हिंदुस्थानींची कार्यक्षमता, सेवाभाव, स्वभाव यांमुळे हे शक्य झाले आहे. अमेरिकेप्रती असलेल्या हिंदुस्थानींच्या राष्ट्रभावनेमुळे तेथील जनता प्रभावित असते. केवळ अमेरिकाच नव्हे, तर संपूर्ण विश्‍व हिंदुस्थानींना मानते. स्वभावानुसार ते ज्या देशात जातात, तेथील होऊन जातात. गेल्या पाचशे वर्षांत अमेरिकेत अशी एकही घटना घडलेली नाही, ज्यामुळे तेथील जनता किंवा सरकार यांना काही त्रास झाला असेल. त्यामुळेच त्यांना आज ना उद्या पुरस्कार मिळाल्याशिवाय रहाणार नाही, ज्याचा उल्लेख ओबामा यांनी केला आहे.’

– मुझफ्फर हुसेन (दैनिक सामना, ३१ जानेवारी २०१७)