३१ डिसेंबरला पाश्‍चात्त्य नववर्षोत्सवाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांच्या वतीने ठिकठिकाणी प्रबोधन !

३१ डिसेंबरच्या कालावधीत होणारे अपप्रकार रोखणे आणि समाजाचे प्रबोधन करणे यासाठी संघटित होऊन कृती करणारे राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांचे अभिनंदन ! सर्वांनीच अशा प्रकारे एकत्रित येऊन धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी प्रयत्न करावेत !

३१ डिसेंबरला पाश्‍चात्त्य नववर्षोत्सवाच्या नावाखाली प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवावेत, अशा ठिकाणी मेजव्याना, मद्यपान करण्यास प्रतिबंध करावा, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाने नियोजन करावे आणि सर्वांनीच नववर्ष १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करण्याचा निश्‍चय करावा, या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने महाराष्ट्रभरातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना दिले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये जाऊन प्रबोधन करण्यात आले.

समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला. या मोहिमेमुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनाही धर्मरक्षणासाठी कृतीशील झाल्या. समाजात जागृती आणि प्रबोधनही होऊ लागले. ३१ डिसेंबरला होणारे युवा पिढीचे नैतिक अधःपतन रोखण्यासाठी आणि अपप्रकार होऊन कुठे गालबोट लागू नये, यासाठीही हिंदुत्वनिष्ठ सरसावले. निवेदन वाचून काही प्रशासकीय अधिकार्‍यांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासनही दिले.

समितीच्या या मोहिमेचा राज्यभरातील सारांश स्वरूपातील वृत्तांत आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

 

मुंबई

मुलुंड येथील तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार (महसूल) कार्यकारी दंडाधिकारी एस्.आर्. बाचकर, परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह,  मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे, भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे, कांंजूरमार्ग पोलीस ठाणे येथे निवेदने देण्यात आली.

निवेदन देतांना बजरंग दलचे श्री. विनोद जैन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन घाग आणि श्री. उमेश रसाळ, शिवसैनिक श्री. गणेश पाटील, सनातन प्रभातचे वाचक श्री. हरिदास जाधव, धर्मप्रेमी श्री. विनायक साळुंखे उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य स्तुत्य असल्याचे या वेळी सांगितले. ‘छायाचित्र काढण्यासाठी तुम्ही माझी अनुमती मागितली, यातूनच तुमचे गुण माझ्या लक्षात आले. ३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आम्ही नक्कीच कायदेशीर प्रयत्न करू’, असेही ते म्हणाले.

२. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे हे सुट्टी असूनही कामावर आले होते. काम संपवून घरी जात असतांना धर्मप्रेमींना पाहून ते थांबले. निवेदन पूर्ण वाचल्यावर त्यांनी कक्षात जाऊन छायाचित्र काढले. ‘समितीचे कार्य पुष्कळ प्रभावी आहे’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

नालासोपारा (पश्‍चिम) पोलीस ठाणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. धर्मप्रेमी श्री. प्रतिक सांगले आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद काळे अन् अन्य कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

 

नाशिक

निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आणि पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना निवेदन दिले. खेडकर यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला आदेश देणार असल्याचे सांगितले. या वेळी अखिल भारतीय वैष्णव बैरागी समाजाचे राष्ट्रीय सचिव श्री. दीपक बैरागी, श्रीराम पर्णकुटीचे महंत बैजनातरामदयाल गुरुनृत्य गोपालदास महाराज उपस्थित होते.

 

मिरज

फटाक्यांवर ३१ डिसेंबर आणि पुढे वर्षभर बंदी घालण्याची निवेदनाद्वारे मागणी

भारताची अनेक मोठी शहरे अतीप्रदूषित म्हणून गणली जात असतांना ३१ डिसेंबर या दिवशी नववर्षारंभाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येतात. त्यामुळे २५ डिसेंबर ते १ जानेवारी आणि पुढे वर्षभर फटाक्यांवर बंदी घातल्याने पर्यावरणाचा र्‍हास आणि अन्य दुष्परिणामांना आळा बसेल. सर्वोच्च न्यायालयानेही नुकतीच देहली परिसरात अशा प्रकारची बंदी १ नोव्हेंबरपर्यंत घातली होती. केवळ हिंदू सणांच्या वेळी अशी बंदी न घालता ३१ डिसेंबर आणि पुढे वर्षभर बंदी घालावी, अशी मागणी येथे प्रांताधिकारी कार्यालयात हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी शिवसेना व्यापारी सेनेचे तात्या कराडे, शिवसेनेचे सागर दरबारे, धर्माभिमानी विठ्ठल मुघळखोड, गुरुदत्त जोशी उपस्थित होते.

 

संभाजीनगर

येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

 

धाराशिव

निवेदनाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व अधिकार्‍यांना कार्यवाही
करण्यास सांगू ! – जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचे आश्‍वासन

जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिल्यावर त्यांनी ‘निवेदनातील मागणीप्रमाणे जिल्ह्यातील सर्व अधिकार्‍यांना कार्यवाही करण्यास सांगू’, असे आश्‍वासन दिले. श्री. प्रकाश काजळेकर, गौतम सुतार, बाळासाहेब श्रीनामे, महारूद्र बोंबाळे, शुभम पाटील, लक्ष्मण काकडे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अधिवक्ता विक्रम साळुंखे, धर्माभिमानी पंकज दहिहंडे, श्याम कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

 

तुळजापूर

येथील तहसीलदार दिनेश झांपले आणि पोलीस निरीक्षक बाबर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने, जिजामाता प्रतिष्ठान सचिव महेश चोपदार, पतंजली योग समितीचे प्रा. हेमंत वडणे, प्रमोद गायकवाड उपस्थित होते.

 

पंढरपूर

येथील उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार अविनाश पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री मोहन लोखंडे, राजेंद्र माळी, श्‍लोक पाटील, सिद्धीविनायक खरात, हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण डिंगरे, वीर बाजीप्रभू प्रतिष्ठानचे ओकार कुलकर्णी उपस्थित होते.

 

यवतमाळ

येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अमरसिंह जाधव यांना निवेदन दिल्यावर ते म्हणाले,  ‘‘३१ डिसेंबरच्या संदर्भात नियोजन बैठक झाली असून गैरप्रकार होणार्‍या संभाव्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे.’’ निवेदन देतांना बजरंग दलाचे श्री. योगिन तिवारी उपस्थित होते.

 

वडूज (जिल्हा सातारा)

३१ डिसेंबरला ऐतिहासिक स्थळांवर अपप्रकार न घडण्यासाठी उपाययोजना काढाव्यात, अशा मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक श्री. यशवंत शिर्के यांना देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री अलोकराव महाजन, शुभम ठिगळे, संकेत गोडसे, प्रतीक गोडसे उपस्थित होते.

 

फलटण (जिल्हा सातारा)

येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार श्री. अंकुश येवले आणि पोलीस निरीक्षक श्री. संदीप शिंगटे यांना निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदारांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

पोलीस निरीक्षक शिंगटे यांनी सांगितले की, सरकारनेच रात्री हॉटेल आणि बार चालू ठेवण्यास अनुमती दिली आहे; मात्र आमच्याकडे पोलीससंख्या अल्प असल्याने ताण येत आहे. रात्री आमचा पहारा चालूच असतो. तुम्हीच याविषयी शासनाला पत्र लिहा. (पाश्‍चात्त्य देशांप्रमाणे रात्री हॉटेल आणि बार चालू ठेवल्यामुळेच अपप्रकारांमध्ये वाढच झाली आहे. पोलिसांवरही अनावश्यक ताण येत आहे ! हा ताण दूर करण्यासाठी त्वरित प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक)

 

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली)

९८ विद्यार्थ्यांचा गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करण्याचा निर्णय !

समितीचे श्री. भरत जैन यांनी सेमी इंग्रजी क्लासेस आणि नवनाथ गणित क्लासेस या शिकवणीवर्गांत ९८ विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. विद्यार्थ्यांनी नवीन वर्ष ३१ डिसेंबरला नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करणार असल्याचे सांगितले. मार्गदर्शनाचे आयोजन करण्यासाठी श्री. विक्रम शेळके आणि श्री. मारुति पवार यांनी सहकार्य केले.

 

बेळगाव

पोलिसांकडून धर्मप्रेमींकडून केल्या जाणार्‍या प्रबोधनाचे कौतुक !

येथील निवासी जिल्हाधिकारी श्री. सुरेश इंटनाळ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अभिनव हिंदुराष्ट्र संघटनेचे श्री. व्यंकटेश शिंदे, अधिवक्ता श्रीराम घोरपडे, धर्मप्रेमी अमित पैलवांनाचे, सुनील पाटील, विक्रम लाड, विजय भोसले आदी उपस्थित होते. जिल्हा पोलीस आयुक्त अमरनाथ रेड्डी आणि पोलीस अधीक्षक रविकांत गौडा यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी गौडा म्हणाले, ‘‘अशा पद्धतीने समाजामध्ये जागृती झाली, तर आमचे काम निश्‍चितपणे न्यून होईल, तसेच प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करू.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात