हिंदु धर्मजागृती सभेची सेवा ही श्रीकृष्णाची कृपा संपादन करण्याची संधी ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

नंदुरबार येथील २१ जानेवारी या दिवशीच्या हिंदु
धर्मजागृती सभेचा व्यापक प्रचार करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

डावीकडून डॉ. नरेंद्र पाटील, सद्गुरु नंदकुमार जाधव आणि श्री. प्रशांत जुवेकर

नंदुरबार – हिंदु धर्मजागृती सभा ही कोणा एका संघटनेची सभा नसून सर्व हिंदूंची सभा आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठीची सभा आहे. या सभेत सेवा करून आपल्या प्रत्येकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा संपादन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तरी तन, मन, धन यांपैकी कुठलाही त्याग करून धर्मप्रेमी हिंदू ही ईश्‍वरी सेवा करू शकतात. ही सेवा करणार्‍यावर ईश्‍वराची कृपा होणार आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्राचे सनातन संस्थेचे प्रसारसेवक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते नंदुरबार येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारासाठी आयोजित हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीत बोलत होते. ही बैठक नंदुरबार येथील मंगल भुवन, जैन मंदिराच्या मागे ३१ डिसेंबर या दिवशी झाली.

या वेळी राष्ट्रीय राजपूत करणी सेना, श्री क्षत्रिय राणा राजपूत समाजसेवा समिती, जय हनुमान व्यायाम शाळा, श्री मोठा मारुति मंदिर समिती, श्री संप्रदाय, अखिल भारतीय राजपूत युवा मंच, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री योग वेदांत सेवा समिती, सोनार समाज, जैन संघटना, गोरक्षक समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे प्रतिनिधी, तसेच धर्मप्रेमी उपस्थित होते.

या वेळी उपस्थित विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांनी एकत्र येऊन २१ जानेवारी २०१८ या दिवशी जुने पोलीस ग्राऊंड, नंदुरबार येथे होणार्‍या सभेचा प्रसार व्यापक स्तरावर करण्याचा निर्धार केला. यात महत्त्वाच्या ठिकाणी फ्लेक्स फलक लावणे, हस्तपत्रकांचे वितरण करणे, सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमांतून प्रचार करणे, हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकांचे आयोजन करणे, आदी विविध सेवांचे दायित्व हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी स्वतः घेतले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे नंदुरबार येथील समन्वयक डॉ. नरेंद्र पाटील यांनी प्रस्तावना मांडतांना सांगितले की, हिंदू संघटित झाल्यामुळेच नंदुरबारमधील अनधिकृत पशूवधगृहे बंद झाली आहेत. अशीच अनेक धर्मकार्ये या सभेच्या माध्यमातून आपल्याला करायची आहेत, तर समितीचे जळगाव येथील समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी हिंदु धर्मजागृती सभेचा प्रचार कसा करावा, या विषयी उपस्थितांना पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून माहिती सांगितली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात