साधना केल्यानेच परिस्थितीमध्ये परिवर्तन होणार ! – प्रदीप खेमका, सनातन संस्था

डावीकडून श्री. प्रदीप खेमका आणि श्री. चित्तरंजन सुराल

धनबाद – आदर्श राष्ट्र स्थापन करण्यासाठी आम्हा सर्वांना धर्म आणि संस्कृती यांचे पालन करावे लागेल. त्यासाठी सर्वांनी साधना केली पाहिजे. साधना केल्यानेच परिस्थितीमध्ये परिवर्तन होणार आहे, असे मार्गदर्शन ६९ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले सनातन संस्थेचे बंगाल आणि झारखंड राज्य धर्मप्रसारक श्री. प्रदीप खेमका यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने धनबादच्या कतरास बाजार येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सत्संग सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि उत्तर पूर्व भारताचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनीही मार्गदर्शन केले. स्थानिक व्यापारी श्री. श्यामसुंदर खंडेलवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सत्संग सोहळ्याला प्रारंभ झाला.

श्री. खेमका यांनी या वेळी कुलदेवता आणि दत्त यांच्या जपाचे महत्त्व सांगितले. ‘दिवसातून किमान पाच वेळा ‘हे भगवान श्रीकृष्ण, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण कर’, अशी प्रार्थना करा’, असे आवाहन श्री. खेमका यांनी उपस्थितांना केले. श्री. चित्तरंजन सुराल मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘सध्या चालू असलेले धर्मांतर, भ्रष्टाचार, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन यांविषयी कोणी भाष्य करत नाही. अयोध्येतील राममंदिर सध्या केवळ भाषण करण्याचा विषय झाला आहे. स्वार्थी राजकीय नेते राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करू शकत नाही.’’ सनातनची साधिका कु. निशाली हिने सोहळ्याचा उद्देश आणि सनातन प्रभातचे महत्त्व सांगितले, तर कु. नंदिता अग्रवाल यांनी प्रार्थनेचे महत्त्व विषद केले. सूत्रसंचालन कु. सलोनी सिंह यांनी केले. सोहळ्याला ६२ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात