सर्व साधकांवर निरपेक्ष प्रीती असल्याने साधकांची साधना व्हावी, यासाठी त्यांना तळमळीने सर्व स्तरांवर साहाय्य करणारे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी !

‘सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थीला वाढदिवस झाला. त्यांचे नातेवाइक आणि साधक यांनी त्यांच्याविषयी लिहिलेली गुणवैशिष्ट्ये’

पू. संदीप आळशी

१. एखाद्या साधकाचा त्रास लक्षात आल्यास इतरत्रच्या
साधकांनाही साहाय्य व्हावे; म्हणून त्यासंबंधीची चौकट बनवून ती दैनिकात देणे

सौ. नंदिनी चितळे

‘सर्व साधकांची साधना होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी पू. संदीपदादांची सतत धडपड असते. त्यामुळे ते सतत साधकांना साधनेसाठी साहाय्य करत असतात. एखाद्या साधकाच्या स्थितीवरून त्यांना त्याची अडचण किंवा त्याला होणारा त्रास लक्षात येतो आणि सर्वत्रच्या साधकांना साहाय्य व्हावे; म्हणून ते लगेच त्या विषयाची चौकट (साधकांना सूचना) बनवून ती दैनिक सनातन प्रभातमध्ये छापण्यासाठी देतात. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी एखाद्या घटनेच्या संदर्भात कसा दृष्टीकोन ठेवावा, हेही ते सांगतात. त्यांच्या या कृतींतून ‘सर्वांप्रती निरपेक्ष प्रीती कशी असावी ?’, याचे दर्शन घडते.

 

२. नातेवाईक असूनही पू. दादांकडे ‘संत’ म्हणून बघितले जाणे

पू. दादांकडे कधीही नातेवाईक म्हणून पाहिले जात नाही, तर ‘संत’ म्हणूनच बघितले जाते. पू. संदीपदादा नात्याने माझ्या मोठ्या बहिणीचे यजमान असले, तरी ‘ते संत आहेत आणि आम्ही साधक आहोत’, असेच नाते आमच्यात आहे. किंबहुना ‘हे नाते अधिक जवळचे आहे’, असे मला वाटते. मला पू. दादांच्या लाभलेल्या निरपेक्ष प्रीतीची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

२ अ. अडचणींवर योग्य उपाययोजना काढून वेळोवेळी पुढील दिशा देत असल्याने पू. दादांचा आधार वाटणे

साधनेतील किंवा वैयक्तिक स्तरावरील कुठलीही अडचण असो, पू. दादांना त्याविषयी लगेच सांगावेसे वाटते. काही कारणाने सांगण्यास उशीर झाला किंवा सांगण्याचे राहून गेले, तर पू. दादा स्वतः दूरभाष करून त्याविषयी उपाययोजना सांगतात. ती अडचण सुटेपर्यंत किंवा तसे प्रयत्न होईपर्यंत ते विचारतात. त्यांनी काहीतरी उपाययोजना सांगितली आणि नंतर पुढील दिशा दिली नाही, असे कधीही झाले नाही. मागच्या २ – ३ वर्षांत काही प्रसंगांमध्ये मी पुष्कळ खचले होते. त्या वेळी मला पू. दादांचा आधार वाटायचा. त्यांनीही त्यांचा अमूल्य वेळ देऊन मला त्या स्थितीतून बाहेर काढले. त्यांचे वेळोवेळी असे मार्गदर्शन लाभल्यामुळे मी आज साधना करू शकत आहे.

२ आ. आध्यात्मिक त्रास वाढल्याचे पू. दादांच्या लक्षात
येताच त्यांनी आवश्यक तो नामजप करायला सांगून त्याचा आढावा घेणे

कधी कधी आध्यात्मिक त्रास वाढल्याचे माझ्या लक्षात येत नाही; पण पू. दादांना स्थिती सांगितल्यावर ते आवश्यक तो नामजप करायला सांगतात. त्या नामजपाने पालट जाणवत नसेल, तर तो पालटून देणे, त्याचा कालावधी अल्प-अधिक करणे, हेही पू. दादा करतात. काही कालावधीनंतर ते आढावा द्यायला सांगतात. माझ्यातील गांभीर्याच्या अभावामुळे आढावा देणे राहून गेल्यास ते स्वतः दूरभाष करून आढावा घेतात.

२ इ. साधनेसाठी प्रोत्साहन देणे

पू. दादा साधनेसाठी मला पुष्कळ प्रोत्साहन देतात. एखादी सेवा चांगली झाली अथवा एखादा प्रयत्न जमला की, खाऊ देऊन आणखी प्रयत्न करायला प्रोत्साहन देतात.

२ ई. सेवेतील आणि दैनंदिन जीवनातील चुका सांगून सेवा परिपूर्ण होण्यासाठी साहाय्य करणे

माझ्याकडून होणार्‍या चुकांची जाणीवही ते मला वारंवार करून देतात. सेवेत होणार्‍या गंभीर चुका, तसेच दैनंदिन जीवनातील चुकाही ते मला आवर्जून सांगतात. काही वेळा मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळते. त्या सेवेतील चुकाही ते तत्परतेने सांगतात. माझी सेवा परिपूर्ण व्हावी, याची काळजी त्यांनाच अधिक असते.’

– सौ. नंदिनी चितळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३. घरातील सर्वांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेणे

श्री. नीलेश चितळे

‘पू. दादांकडे कधीही नातेवाईक म्हणून बघितले जात नाही, तर संत म्हणूनच बघितले जाते. माझा विवाह झाल्यापासून मला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होत आहे. माझे सासरेश्री. राजहंसकाका आणि सासूबाई सौ. वैशाली राजहंस रामनाथी आश्रमात आल्यावर प्रत्येक वेळी पू. दादा (संत होण्याआधीपासून) आमचा सर्वांचा व्यष्टी आढावा घेऊन आम्हाला मार्गदर्शन करतात.

४. पू. दादांकडे मोकळेपणाने अडचणी मांडता येणे

पू. संदीपदादांशी बोलतांना कधीही परकेपणा न जाणवता मोकळेपणाने सर्व अडचणी सांगून त्यांचे मार्गदर्शन घेता येते. पू. दादा वैयक्तिक, साधना, सेवा आणि आश्रम अशा सर्व स्तरांवर कुठे आणि कोणते प्रयत्न करायला हवेत, याविषयी मार्गदर्शन करतात. ते आध्यात्मिक उपाय आणि योग्य दृष्टीकोन या माध्यमांतूनही साहाय्य करतात.’

५. अनुभूती

५ अ. पू. दादांच्या बोलण्याचा तात्काळ प्रभाव पडणे

पू. संदीपदादा दूरध्वनीवर इतक्या संथ, नम्रपणे आणि हळूवार पद्धतीने बोलतात की, समोरचाही आपोआप त्याच पद्धतीने बोलायला लागतो.

५ आ. पू. दादा उपाय किंवा प्रार्थना करत असतांना त्यांच्या तोंडवळ्यावरचे स्थिर आणि शांत भाव बघून भावजागृती होते.

५ इ. पू. दादांच्या खोलीतील श्रीकृष्णाच्या चित्रात पालट होणे

पू. दादांच्या खोलीतील श्रीकृष्णाच्या चित्रात पालट झाले आहेत. श्रीकृष्णाचा वर्ण गडद झाला असून त्याचे अलंकार, वस्त्र आणि भोवतीचे सर्व प्रकाशमान झाले आहे.

५ ई. पू. दादांच्या खोलीत गोड चवीचा सुगंध येणे आणि खोलीत गेल्यावर मन शांत होणे

पू. दादांच्या खोलीत गोड चवीचा एक सुगंध सतत येत असतो. त्यांच्या खोलीत गेल्यावर मन लगेच शांत होते. पू. दादा गावी गेले त्या दिवशी एका सेवेनिमित्ताने मी ५ – ६ घंट्यांनी त्यांच्या खोलीत गेले. त्या वेळीही तो सुगंध कायम होता. त्यानंतर पू. दादा येण्याच्या दिवशी साधारण १८ ते २० दिवसांनी मी पुन्हा खोलीत गेले असता मला तोच सुगंध आणि शांतता जाणवली.’

– श्री. नीलेश चितळे (सौ. नंदिनी चितळे यांचे यजमान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे संत पू. संदीप आळशी कला, ग्रंथ-निर्मिती, हिंदी आणि इंग्रजी  भाषांतर यांविषयी सेवा करणार्‍या साधकांना सेवेसंदर्भात मार्गदर्शन करतात. त्यांची प्राणशक्ती अल्प असल्याने ते ग्रंथांच्या संदर्भातील सर्व सेवा त्यांच्या खोलीत करतात. कित्येक दिवस ते आश्रमात निवासाला असणार्‍या मजल्यावरून अन्यत्र कुठे जाऊ शकत नाहीत. समष्टी सेवेशी थेट संपर्क नसतांनाही गुरुकार्यातील एकरूपता आणि साधकांच्या प्रगतीची तळमळ यांमुळे ते सातत्याने समष्टीच्या संदर्भातील सूत्रे सुचवून साधकांना दिशा देतात, तसेच साधकांना परिपूर्ण सेवा करायला शिकवतात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

६. साधकांना साधनेत साहाय्य करणे

कु. अंजली क्षीरसागर

६ अ. साधकांच्या प्रगतीतील अडचण अचूक हेरून त्यांना साहाय्य करणे

पू. दादांचा सेवेनिमित्त ज्या ज्या साधकांशी संपर्क येतो, ‘त्यांची प्रगती नेमकी कोणत्या स्वभावदोषांमुळे होत नाही ? साधनेतील कोणते प्रयत्न न्यून होतात ?’, हे पू. दादा अचूकपणे हेरतात आणि साधकाला ‘त्या स्वभावदोषांवर मात कशी करायची ?’, हे शिकवतात. याविषयी ते संबंधित साधकांनाही सांगून त्या साधकाकडे लक्ष देण्यास सांगतात.

६ आ. साधकांना पू. संदीपदादांचा आधार वाटणे

साधकांचा तोंडवळा बघून ते त्या साधकाची स्थिती ओळखतात. आश्रमातील कोणत्याही साधकाला काही त्रास होत असल्याचे, कुणी आजारी असल्याचे अथवा साधकांच्या घरच्यांना काही अडचण आल्याचे पू. दादा कळल्यास ते लगेच त्या साधकाला उपाययोजना काढण्याच्या दृष्टीने साहाय्य करतात. इतरांना त्याला साधनेत साहाय्य करायला सांगतात. त्यामुळे सर्व साधकांना पू. दादांचा पुष्कळ आधार वाटतो.

 

७. साधकांना घडवणे

७ अ. साधकांमधे समष्टीचा विचार करण्याची क्षमता निर्माण करणे

एका सेवेसंदर्भात एखादी अडचण लक्षात आली, तेथे एखादी चूक झाली अथवा चांगली उपाययोजना सुचली, तर ते संबंधित साधकाला त्याविषयी अन्य साधकांनाही कळवायला सांगतात. यामुळे साधकांमधे समष्टीचा विचार करण्याची वृत्ती वाढत असल्याचे जाणवते. ते साधकांना स्वावलंबी होण्यास शिकवतात. ‘आम्ही हा विचार केला होता का ?’, याविषयी विचारून ‘समष्टी साधनेसाठी याची आवश्यकता कशी आहे’, हे समजावून सांगतात.

७ आ. चुकांवर चिंतन करायला लावून योग्य मार्गदर्शन करणे, त्यामुळे चुकांचा वा स्वभावदोषांचा ताण न येणेे

पू. दादा कुणालाही मानसिक स्तरावर हाताळत नाहीत. साधकांच्या चुका ते प्रेमाने; पण तेवढ्याच तत्त्वनिष्ठतेने सांगतात. साधकांना घडवतांना ते टप्प्याटप्प्याने साधकांच्या चुका सांगून त्यावरील उपाययोजनाही सांगतात. साधकांत पालट होत नसल्यास काही वेळेला कठोरपणेही चुका सांगतात. असे करत असतांना त्या साधकाकडून एखादा प्रयत्न झाला, तरी ते प्रोत्साहनही देतात. तो साधक निराशेत जाऊ नये, याकरता ‘त्याने कोणत्या उपाययोजना काढल्या ? मनाच्या स्तरावर कशी विचारप्रकिया घडली ? पुढील प्रयत्नांची दिशा कशी ठरवली ?’ आदी गोष्टी जाणून घेऊन योग्य मार्गदर्शन करतात. त्यामुळे चुकांचा वा स्वभावदोषांचा ताण न येता ‘आपण प्रयत्न करू शकतो’, असा आत्मविश्‍वास साधकांमध्ये निर्माण होतो.

७ इ. साधक अपेक्षित गतीने सेवा शिकत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या अडचणी आणि
परिस्थिती समजून घेणे आणि त्यावर परिपूर्ण उपाययोजना काढून दिल्याने साधकाची सेवेची गती वाढणे

एक साधक अपेक्षित गतीने सेवा शिकत नव्हता. पू. दादांना ही अडचण कळल्यावर त्यांनी त्यामागील सर्व कारणे शोधून काढली. त्याला मन स्थिर होण्यासाठी उपाय आणि स्वयंसूचना सत्रे करायला सांगितले. त्याच्या वैयक्तिक अडचणींसाठी मानसोपचारासह, स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे प्रयत्न करण्यास सांगितले, तसेच सेवेसाठी आवश्यक गोष्टींचा सराव त्याने आठवडाभर कशा पद्धतीने करायचा, हेही आखून दिले. ‘अन्य सेवेतील साधक त्या साधकाला शिकवण्यात कुठे उणे पडतात’, हे शोधून पू. दादांनी संबंधित साधकांना त्याची जाणीव करून दिली. काही दिवस त्यांनी या सगळ्याचा पाठपुरावा घेतला. तेव्हा पू. दादांनी दृष्टीकोन दिला, ‘आपण साधकांंना सेवांमध्ये सहभागी करून घ्यायला हवे. त्यांच्यात शिकण्याची ऊर्जा आणि गोडी निर्माण व्हायला हवी, म्हणजे साधक लवकर शिकतील !’ पू. दादांनी केलेल्या या सर्व प्रयत्नांमुळे तो साधक ६ मास सेवा करून जे शिकला नव्हता, ते केवळ १ ते दीड मासातच शिकला.

७ ई. साधकांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना योग्य प्रकारे हाताळण्यास शिकवणे

एका साधिकेला हाताळतांना मला अडचण येत असे. पू. संदीपदादांना ही अडचण सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘काही वेळेला साधकांना त्यांच्या सेवेतील सुधारणा स्वीकारणे कठीण जाते. ‘उत्तरदायी साधक ती सेवा प्रत्यक्ष करत नसल्याने ते वस्तूस्थितीला धरून सांगत नाहीत किंवा त्यांना प्रत्यक्षात येणार्‍या अडचणी कळत नाहीत’, असेही साधकांना काही वेळा वाटते. अशा वेळी त्यांच्यासारखी प्रकृती असलेल्या साधकाने तोच दृष्टीकोन दिल्यास तो अधिक स्वीकारार्ह असतो किंवा त्या साधकाने सुधारणा सांगितल्यास त्या सहजतेने स्वीकारल्या जातात.’’ पू. संदीपदादांनी सांगितल्याप्रमाणे कृती केल्यावर माझी ही अडचण दूर झाली.

७ उ. एक साधिका एका प्रसंगामुळे निराश झाली असता पू. दादांनी
‘साधिकेला निराश न होता ‘स्वतःची साधना झाली का ?’, हे पहाण्यास शिकवणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी पूर्वी एका साधिकेने केलेले एक चित्र ‘पुष्कळ चांगले झाले’, असे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी ‘ते चित्र वास्तववादी वाटत नाही’, असे सर्व साधक सांगू लागले. त्यामुळे त्या साधिकेला निराशा येऊन ‘आपली साधना होत नाही’, असे विचार तिच्या मनात येऊ लागले. त्या वेळी पू. दादांनी सांगितले, ‘‘साधनेच्या दृष्टीने ‘काही साध्य झाले नाही’, असा विचार करायला नको. त्यापेक्षा ‘प्रत्येक क्षणी आपली साधना झाली कि नाही ? आपल्याकडून आज्ञापालन होत होते का ?’, हे पहावे. तसे झाले असेल, तर त्यातून स्वतःची साधना झालेली असते. आता देवाने निर्माण केलेली परिस्थिती आनंदाने स्वीकारणे, हीसुद्धा साधना आहे.’’

७ ऊ. योग्य कलाकृती करायला लावून सेवेत बुद्धीचा योग्य वापर करण्यास शिकवणे

माझ्याकडे ‘सनातन भेट संचा’ची कलाकृती करण्याची सेवा होती. ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर आधारित कलाकृती करायची असल्याने मी ‘भारतात हिंदु राष्ट्र आले आहे’, असे दाखवले होते. त्या वेळी पू. संदीपदादांनी मला अन्य एक चित्र घेऊन कलाकृती करून बघण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी हिंदु राष्ट्राकडे वाटचाल करणार्‍या फेरीचे चित्र घेतले. त्यामुळे ती कलाकृती अधिक चांगली वाटू लागली. त्या वेळी पू. दादांनी पुढील दृष्टीकोन सांगितला, ‘‘सेवा करतांना बुद्धीच्या कसोटीवर मोजपट्टी ठेवून पहायचे. सध्या भारतात हिंदु राष्ट्र आलेले नाही. त्यामुळे असे दाखवणे हे तितकेसे वास्तविक नाही, तसेच भेट संचाच्या माध्यमातून जागृती करायची आहे. फेरीच्या चित्राद्वारे ‘आपणही असे कृतीशील व्हायला हवे’, हे दर्शकांना लगेच कळते. सेवा करतांना बुद्धीचा अधिक नाही; परंतु योग्य वापर व्हायला हवा. केवळ मनाला चांगले वाटते; म्हणून ‘भारताचे चित्र घेतले’, असे नको.’’

७ ए. एका स्वभावदोषासाठी प्रयत्न करतांना
‘अन्य स्वभावदोष वाढत नाहीत ना ?’, याकडे लक्ष देण्यास शिकवणे

एका साधकाने ‘मला तुझा आधार वाटत नाही’, असे मला सांगितले होते. त्यामुळे त्याला साहाय्य हवे असल्यास मी लगेच ते देण्याचा प्रयत्न करत असे; पण असे करतांना ‘माझी सेवेची फलनिष्पत्ती अल्प होत नाही ना ?’, याचा विचार माझ्याकडून झाला नव्हता. हे सूत्र पू. दादांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला ‘भावनाशीलता’, ‘समष्टीची तळमळ अल्प असणे’ आणि ‘प्रतिमा जपणे’ या स्वभावदोषांची जाणीव करून दिली. ते म्हणाले, ‘‘त्या साधकाला वाटते; म्हणून कोणत्याही सेवेत त्याला साहाय्य करणे, ही भावनाशीलता झाली. साहाय्य करतांना स्वतःची फलनिष्पत्तीही न्यून व्हायला नको. त्याला अन्य साधकाचे साहाय्यही देता येईल. असे केल्यास आपली फलनिष्पत्ती न्यून होणार नाही आणि सर्वांची साधना होईल.

७ ऐ. साधकांविषयी विकल्प आल्यावर स्वतःच्या साधनेसाठी दृष्टीकोन
देऊन ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रमाणे आपली आदर्श प्रीती हवी’, असे सांगणे

‘काही साधक केवळ सेवा असली, तरच माझ्याशी चांगले वागतात’, असे मला वाटत होते. त्यामुळे ‘त्यांच्याशी बोलू नये, त्यांना साहाय्य करू नये’, असे विचार माझ्या मनात यायचे. याविषयी मी पू. दादांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘या विचाराने आपली अपेक्षा वाढून प्रेमभाव न्यून व्हायला नको. प्रत्येकाची विचार करण्याची आणि साहाय्य करण्याची पद्धत वेगळी असते. ‘मी इतरांसाठी आहे’, हे लक्षात घ्यायचे. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रमाणे आपली आदर्श प्रीती हवी !’’

७ ओ. प्रत्येक गोष्टीमागील उद्देश आणि साधकांना त्यामुळे होणारा लाभ यांचा विचार करण्यास शिकवणे

पू. दादांनी रामनाथी आश्रमातील एका खोलीमध्ये मध्ये (जेथे सर्व साधक नामजपासाठी बसतात.) संत भक्तराज महाराज यांचे छायाचित्र लावण्यास मला सांगितले होते. तेथे संत भक्तराज महाराज यांनी वापरलेली गादी ठेवली आहे. हे बाहेरून येणार्‍यांना कळावे आणि तेथे नामजपाला बसणार्‍यांना लाभ व्हावा; म्हणून त्यांनी छायाचित्र लावण्यास सांगितले होते. ही सेवा माझ्याकडून प्रलंबित राहिल्यामुळे पू. दादांनी ही चूक माझ्या लक्षात आणून दिली. ते म्हणाले, ‘‘एखादी गोष्ट पुष्कळ चांगली आणि व्यवस्थितपणाने करण्यास अधिक वेळ लागणार असेल, तर ती तात्पुरत्या स्वरूपात तरी करू शकतो. येथे भक्तराज महाराज यांचे पुष्कळ चांगले छायाचित्र ठेवण्यापेक्षा छायाचित्र ठेवल्यामुळे साधकांना होणारा लाभ महत्त्वाचा होता.’

 

८. गुरुकार्याशी एकरूपता

८ अ. प्रसारासाठी नवनवीन प्रसारसाहित्य बनावे, ही तळमळ

दैनिक सनातन प्रभातमध्ये येणार्‍या बातम्या, चौकटी आदींच्या आधारे ‘प्रसारासाठी कोणते प्रसारसाहित्य सिद्ध करता येईल ? आपत्काळाच्या दृष्टीने कोणती नवीन उत्पादने काढायला हवीत ?’ इत्यादी गोष्टी ते वरचेवर दूरभाष करून सांगतात.

८ आ. पू. दादांनी बहिणीला आश्रम दाखवतांना तिच्या समवेत स्वतः
आश्रमदर्शन करून आश्रम प्रभावीपणे दाखवण्याच्या संदर्भातील सूत्रे लिहून देणे

एकदा पू. दादांची बहीण आश्रम बघायला आली होती. ती आश्रम बघत असतांना पू. दादाही तिच्या समवेत आश्रमदर्शन करत होते. त्या वेळी त्यांनी ‘आश्रमात येणार्‍या जिज्ञासूंना आणखी प्रभावीपणे आश्रम कसा दाखवता येईल ? आश्रमात कुठे कोणत्या सूचना लावायला हव्यात ? प्रत्येक ठिकाणी कोणत्या प्रसारसाहित्याचे प्रदर्शन लावायला हवे ?’, यासंबंधीच्या सर्व सूचना लिहून उत्तरदायी साधकांना दिल्या. पू. दादा केवळ सूचना लिहून थांबत नाहीत, तर ‘त्यासंदर्भात पुढे काय झाले ? त्यांनी सांगितलेले योग्य होते ना ?’ आदी भागही विचारून घेतात. आश्रमातील केवळ एका खोलीत राहूनही ते या सर्व कृती करतात.

 

९. पू. संदीपदादांनी वेळोवेळी साधनेसंदर्भात दिलेले दृष्टीकोन

अ. आपली साधना म्हणून प्रत्येक साधकाला योग्य प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे. योग्य संवादाने एकमेकांविषयी निर्माण झालेले ग्रह दूर होतात.

आ. समोरचा साधक आपली चूक सांगत असतांना ती स्वीकारायला हवी. जरी स्वतःची चूक नसली, तरी यामुळे ‘स्वीकारणे’ हा गुण तरी आपल्यात येतो.

इ. साधकांच्या अनुभवाचा आदर करायला शिकले पाहिजे.

ई. ‘सेवा प्रलंबित राहिल्या’, ही चूक नसते, तर ‘त्या प्रलंबित रहात आहेत’, हे पुढे न सांगणे, विचारून न घेणे, तसेच अडचणी न मांडणे या चुका असतात.

उ. वरचेवर होणार्‍या चुका दुरुस्त करण्यासाठी योग्य कार्यपद्धत घालून कार्यात्मक चुका दूर कराव्यात आणि स्वभावदोष लक्षात आणून देऊन व्यष्टी स्तरावर साधकाला साहाय्य करावे.’

– कु. अंजली क्षीरसागर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.११.२०१७)

 

स्वतःच्या वाढदिवसानिमित्त दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून आलेले साधक-नातेवाईक यांचे लेख आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चौकटी वाचून पू. संदीप आळशी यांची झालेली विचारप्रक्रिया

‘२२ नोव्हेंबरला सकाळी एका सेवेनिमित्त पू. संदीप आळशी यांचा दूरभाष आला. तेव्हा त्यांनी मला सेवेसंदर्भात सांगून झाल्यावर मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त नमस्कार केला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘सगळ्या साधकांनी इतके लिहून दिले आहे; पण तेवढे गुण माझ्यात नाहीत. एखाद्या प्रसंगात गुण दिसले, म्हणजे प्रत्येकच प्रसंगात तसे गुण दिसून येतील असे नाही. स्वतःचे निरीक्षण स्वतःला करता येते ना ! आपण फक्त प्रयत्न करत रहायचे !’’

पू. संदीपदादा सद्गुरुपदावर आरूढ होण्याच्या मार्गावर असतांनाही त्यांचे आत्मपरीक्षण करण्याची आणि अजूनही साधनेत न्यून पडत असल्याची विचारप्रक्रिया पाहून ‘खरे संतच असे निरहंकारी असतात’, याची जाणीव झाली.’

– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.११.२०१७)