पाश्‍चात्त्य अपप्रकारांचे उदात्तीकरण करणारा ‘गोंगाट २०१७’ हा कार्यक्रम रहित करण्यात यावा ! – सनातन संस्था

सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

जिल्हा पोलीस उपअधीक्षक श्री. विजय पवार यांना निवेदन देताना समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि कार्यकर्ते
उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांना निवेदन देतांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते

सातारा  – रहिमतपूर रस्त्यावरील जाधववाडी येथे ३१ डिसेंबर या दिवशी ‘गोंगाट २०१७’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे होर्डिंग शहरातील चौक आणि महाविद्यालये यांच्या बाहेर लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमात ‘हॅलोवीन थीम’, ‘डॉल्बी डिजिटल नाईट’, ‘टॅटू पार्लर’, ‘टेन्ट कॅम्पिंग’, ‘मद्यपान’, फटाक्यांची आतषबाजी या माध्यमांतून हवाप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, धांगडधिंगा, अंगप्रदर्शन होणार असे अपप्रकार होणार आहेत. या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, राजकीय पक्ष आणि शिवप्रेमी यांनी आंदोलनाद्वारे ‘गोेंगाट २०१७’ कार्यक्रमास प्रखर विरोध केला. याविरोधात उपजिल्हाधिकारी श्री. गायकवाड आणि जिल्हा पोलीस उपअधीक्षक श्री. विजय पवार यांना निवेदने देण्यात आली.

या वेळी वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु महासभा, हिंदु एकता आंदोलन, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, योग वेदांत सेवा समिती, भाजप आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय आणि राजकीय पक्षांचे १५ हून अधिक पदाधिकारी आणि कायकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की……..

१. सातार्‍यात ‘गोंगाट २०१७’ कार्यक्रमाचे आयोजन होणे, ही धोक्याची घंटा आहे. यातून आपण आपल्या भावी पिढीवर चुकीचे संस्कार करत आहोत.

२. ‘टॅटू पार्लर’सारख्या प्रकारांमुळे अंगप्रदर्शन आणि त्यायोगे येणार्‍या विकृतींना रोखणे, ३१ डिसेंबर या दिवशी प्रशासनासाठीही आव्हान ठरणार आहे. अशा कार्यक्रमांना वेळीच थांबवले नाही, तर अन्यत्रही असे कार्यक्रम राजरोसपणे होऊ लागतील.

३. कार्यक्रमस्थळी विवाहित-अविवाहित ७५ जोडपी आणि ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे संयोजकांनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले आहे.

४. कार्यक्रमात मद्यपानाचीही व्यवस्था केल्याचे समजते. विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात मद्यपानाची व्यवस्था करणे, हे चित्र विदारक आहे. अशा कार्यक्रमास अनुमती देणे म्हणजे युवा पिढीला व्यसनाधीनतेच्या गर्तेत ढकलण्यासारखे आहे.

५. ३१ डिसेंबरला ‘डीजे’चा वापर केल्यास कारवाई करण्याची चेतावणी पर्यावरणमंत्री मा. रामदास कदम यांनी २६ डिसेंबरला दिली. ‘गोंगाट २०१७’ कार्यक्रमाचे विज्ञापन करतांना ‘डॉल्बी नाईट’चा प्रचार करण्यात येत आहे. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आवाजाची महत्तम मर्यादा ओलांडली जाण्याचीच शक्यता अधिक दिसते. या ठिकाणी ‘ई.डी.एम.’ आणि ‘ईलेक्ट्रो हाऊस’ही करण्यात येणार आहे.

६. रानात होणार्‍या या कार्यक्रमामुळे जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे. शेतामध्ये फटाके फोडणे हे पशू-पक्षी, गुरे-ढोरे, तसेच शेतकरी समाज यांसाठी घातक ठरणार आहे.

७. या कार्यक्रमास विविध स्तरांवर विरोध वाढतच आहे. त्यामुळे हा विषय केवळ एका कार्यक्रमापुरता सीमित राहिला नसून भविष्यातील संभाव्य अपप्रकार आणि भारतीय संस्कृती यांच्या रक्षणाचा झाला आहे. विविध सामाजिक संघटनांनी या अपप्रकारांच्या विरोधात आवाज उठवला आहे. यातून या कार्यक्रमाविषयी समाजभावना किती गंभीर आहे, हे दिसते.

८. शाश्‍वत पर्यावरण, युवा पिढीचे निरोगी आयुष्य यांसाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ‘गोंगाट २०१७’ हा कार्यक्रम सातारा जिल्ह्यात होऊ नये.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमाचे विज्ञापन करणारे होर्डिंग मुख्य चौक आणि महाविद्यालये यांच्या बाहेर लावले आहे; मात्र मुदत संपूनही ते काढले नाही. येथे नगरपालिकेचे नियम डावलल्याचे निदर्शनास आले आहे. अनधिकृत होर्डिंगवर तत्परतेने कारवाई व्हावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

२. कार्यक्रमास स्थानिकांचा विरोध वाढू लागल्यावर त्यामाध्यमातून लोकांना रोजगार मिळणार असल्याची बतावणी करण्यात येत आहे. ‘प्रतिव्यक्ती सहस्रो रुपयांचे शुल्क भरून सातार्‍यातून या कार्यक्रमास हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही लोक सहभागी होणार नाहीत. काही जणांच्या तात्पुरत्या आर्थिक लाभासाठी शाश्‍वत पर्यावरणाचा बळी देऊन महानगरांतील पैसेवाल्या धनदांडग्यांची हौसमौस पुरवली जाणार असेल, तर त्यास भूमीपुत्रांचा विरोधच असेल’, अशी प्रतिक्रिया शिवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात