पाश्‍चात्त्य विकृतींचे उदात्तीकरण करणार्‍या ‘गोंगाट २०१७’ कार्यक्रमास अनुमती देऊ नये ! – हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी संघटनांची मागणी

राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी

सातारा  – पाश्‍चात्त्य कुप्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे ३१ डिसेंबरला मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघात आणि महिलांवरील अत्याचारही वाढत आहेत. येथे ३१ डिसेंबरला  होणार्‍या ‘गोंगाट – गुडबाय २०१७’ या कार्यक्रमात ‘हॅलोवीन थीम’, ‘डॉल्बी डिजिटल नाईट’, ‘टॅटू पार्लर’ तसेच फटाक्यांची आतषबाजी असे अपप्रकार होणार आहेत. त्यातून होणारे प्रदूषण आणि अंगप्रदर्शन रोखणे प्रशासनासाठी आव्हान ठरणार आहे. हे सर्व युवा पिढी आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी हानीकारक ठरू शकते. छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारक यांचा वारसा असलेल्या सातारा येथे अशा संस्कृतीहीन कार्यक्रमास अनुमती देऊ नये, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. गोलबाग, राजवाडा या ठिकाणी २३ डिसेंबरला समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी संघटनांनी विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले.

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. जितेंद्र वाडेकर, बजरंग दलाचे श्री. मुकुंदराव पंडित, हिंदु महासभेचे श्री. धनराज जगताप, रजपूत समितीचे श्री. उत्तमसिंह रजपूत, शिवसेनेचे अधिवक्ता शिरीष दिवाकर, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अमोल मोरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे आणि रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. धर्मवीर युवा मंचचे श्री. प्रशांत नलावडे आणि सनातन संस्था यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.

आंदोलन करण्यात आलेल्या इतर मागण्या

१. वायूप्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर केवळ दिवाळीतच नाही, तर नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या काळातही बंदी घाला !

२. जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याचा आत्मघातकी निर्णय रहित करा !

३. वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटास अनुमती देऊ नये !

दैनिक सनातन प्रभातमधील बातमी आणि हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन यांचा परिणाम !

‘गोंगाट’ कार्यक्रमातील ‘हॅलोवीन थीम’ आणि ‘टॅटू पार्लर’ रहित करू ! – रोहित सावंत, गोंगाट कार्यक्रमाचे संयोजक

गोंगाट कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. मुंबई, पुणे अशा शहरांतून अनेकजण सहपरिवार येणार आहेत. सर्व प्रशासकीय परवाने घेऊन कार्यक्रम करण्यात येत आहे. कोणतेही अपप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल. कार्यक्रमास होणारा विरोध लक्षात घेता ‘हॅलोवीन थीम’ आणि ‘टॅटू पार्लर’ रहित करू.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात