अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात वायूप्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? शासनाला हे लक्षात येत नाही का ?

अकोला – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वायूप्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर केवळ दिवाळीतच नाही, तर नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या काळातही बंदी घाला, पंढरपूर येथील झीज होणार्‍या श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपन न करता धर्मशास्त्रानुसार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी, पद्मावती चित्रपटावरही बंदी घाला, अशा मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात रणरागिणी शाखेच्या सौ. माधुरी मोरे, धर्माभिमानी श्री. संजय निमकंडे, श्री. केशव मालोकार, अधिवक्त्या श्रीमती वैशाली गावंडे, अधिवक्त्या (सौ.) श्रुती भट, श्री. श्याम सांगुनवेढे आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी घोषणा, तसेच स्वाक्षरी मोहीमही घेण्यात आली.

 

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनानंतर
३०० स्वाक्षर्‍यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यासाठी सिद्ध

आंदोलनाच्या वेळी स्वाक्षरी करतांना राष्ट्राभिमानी नागरिक

यवतमाळ – येथील दत्त चौकातही वरील मागण्यांसाठी १७ डिसेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत धरणे आंदोलन घेण्यात आले. या वेळी ‘जम्मू-काश्मीर येथील सैन्यावर दगडफेक करणार्‍यांवरील गुन्हे मागे घेऊ नयेत, अशी मागणीही करण्यात आली. या धरणे आंदोलनात वैदिक ब्राह्मण संघटना, भाजप, सनातन संस्था, रजपूत विकास संघटना यांसह हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. ३०० स्वाक्षर्‍यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यासाठी सिद्ध करण्यात आले.

इतिहासाची मोडतोड करणार्‍या संजय भन्साळी
यांचा निषेध ! – श्री. रघुवीर सिंह चव्हाण, जिल्हाप्रमुख, रजपूत विकास संघटना

महाराणी पद्मावतीचा त्याग पुष्कळ मोठा आहे. इतिहासाची मोडतोड करणार्‍या संजय भन्साळी यांचा मी निषेध करतो. हिंदु जनजागृती समिती हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करणार्‍या सर्व संघटनांना सहभागी करून घेते, त्यासाठी आम्ही आभारी आहोत.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे संस्कृती रक्षणाचे कार्य अतुलनीय आहे. – श्री. राजेंद्र डांगे, जिल्हाध्यक्ष, भाजप

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात