सनातनचे प्रसारसेवक श्री. नीलेश सिंगबाळ (वय ५१ वर्षे) सनातनच्या ७२ व्या समष्टी संतपदावर विराजमान !

सनातनच्या संतांच्या मांदियाळीत आणखी एक संतरत्न !

पू. नीलेश सिंगबाळ (उजवीकडे) यांचा पुष्पहार घालून सन्मान करताना सदगुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

मोक्षदायिनी काशीनगरीत श्रीकृष्णाने साधकांना दिलेली भावभेट !

पू. नीलेश सिंगबाळ

वाराणसी – पूर्व उत्तरप्रदेश, झारखंड, बंगाल आणि ओडिशा या राज्यांचे सनातनचे प्रसारसेवक तथा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे पती श्री. नीलेश सिंगबाळ (वय ५१ वर्षे) हे १८ डिसेंबरला सनातनच्या ७२ व्या समष्टी संतपदावर विराजमान झाले. येथील सनातनच्या सेवाकेंद्रात झालेल्या सन्मान सोहळ्यात सनातनचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ही घोषणा केली आणि पू. नीलेश सिंगबाळ यांचा पुष्पहार घालून, तसेच श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या सोहळ्याद्वारे सर्व साधकांना आनंदाची आणि संतकृपेची भावभेट दिल्यामुळे उपस्थित सर्व साधकांची भावजागृती झाली, तसेच वातावरणही आनंदमय झाले.

अशी झाली संत झाल्याची घोषणा !

या सोहळ्याच्या आरंभी, वाराणसी येथे एक दिवसापूर्वी पार पडलेल्या राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनात साधकांना आलेल्या अनुभूती कथन करण्याविषयी सांगण्यात आले. या हिंदू अधिवेशनात साधकांसह हिंदुत्वनिष्ठांनाही चैतन्याची अनुभूती आल्याचे या सोहळ्यात सांगण्यात आले. या अनुभूतींचे विश्‍लेषण करतांना सनातनचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘चैतन्याची अनुभूती येण्याचे कारण म्हणजे श्री. नीलेश सिंगबाळ हे पू. नीलेश सिंगबाळ झाले आहेत’, असे सांगून ते संत झाल्याचे गुपित उघड केले.

गृहस्थाश्रमी असूनही संन्यस्त जीवन जगणारे पू. नीलेश सिंगबाळ ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

पू. नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी गौरवोद्गार काढतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘गृहस्थाश्रमी असूनही संन्यस्त जीवन कसे जगावे’, याचा आदर्श पू. नीलेश सिंगबाळ यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. नम्रता, निरपेक्षता, विचारून करणे, सेवेचा उत्तरदायी साधकांना आढावा देणे आदी दैवी गुणांमुळे श्री. नीलेश सिंगबाळ यांनी संतपद गाठले आहे.’’

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. नीलेश सिंगबाळ यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातून संगणकीय प्रणालीद्वारे या सोहळ्याचा आनंद अनुभवला. या वेळी त्यांनी पू. नीलेश सिंगबाळ यांच्यामध्ये आज्ञापालन, निरपेक्षता, स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ, सकारात्मकता, कोणाविषयी पूर्वग्रह नसणे आदी गुणवैशिष्ट्ये असल्याचे सांगितले.

पू. नीलेश सिंगबाळ यांचे पुत्र श्री. सोहम् (वय २० वर्षे) यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

पू. नीलेश सिंगबाळ संत झाल्याची आनंदवार्ता एकून त्यांचे पुत्र श्री. सोहम् याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. श्री. सोहम् म्हणाला, ‘‘मी ५ वर्षांचा असल्यापासून माझे वडील पू. नीलेश सिंगबाळ हे अध्यात्मप्रसारासाठी वाराणसी येथे आहेत. स्थूलदेहाने ते माझ्याशी दूर असले, तरी सूक्ष्मातून ईश्‍वरी तत्त्वानेच आम्ही एकमेकांशी जोडलेले आहोत आणि त्यामुळेच मला वडिलांविषयी पुष्कळ जवळीक वाटते. आम्ही स्थूल देहाने एकमेकांशी दूर असलो, तरी मनाने एक आहोत. वडिलांकडूनच मला साधना करण्याची आणि पूर्णवेळ साधक होण्यासाठी प्रेरणा अन् प्रोत्साहन मिळाले.’’

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात लावण्यात
आलेला पू. नीलेश सिंगबाळ संत बनल्याची आनंदवार्ता देणारा फलक !