धर्मावर श्रद्धा असलेल्या हिंदूंच्या संघटनाची आवश्यकता ! – प्रवीण नाईक, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शारीरिक बळासह
आध्यात्मिक बळाची आवश्यकता ! –  पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंची कार्यशाळा

पुणे  – प्राचीन काळापासून भारतावर जी संकटे आली त्यातून गुरु-शिष्य परंपरेने देशाला वाचवले आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरूंच्या आज्ञेनुसार हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणेच आपणही संतांच्या मार्गदर्शनानुसार कार्य केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना जलद गतीने होईल. प्रत्येक हिंदूने आपल्या धर्मग्रंथांचे अध्ययन करून हिंदु धर्मप्रसाराचे दायित्व घ्यायला हवे. हिंदु मुलांना शाळांमधून धर्मशिक्षण दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांना धर्माचे ज्ञान नाही. धर्माचरणाने हिंदु राष्ट्राला खरी दिशा मिळेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी केले. शिवाजीनगर येथे समितीच्या hindujagruti.org या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंसाठी १७ डिसेंबर या दिवशी कार्यशाळेत केले. संकेतस्थळाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्र आणि अध्यात्म यांविषयी योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी २७ जिज्ञासू उपस्थित होते.

कार्यशाळेला उपस्थित धर्मप्रेमी

धर्मावर श्रद्धा असलेल्या हिंदूंच्या संघटनाची आवश्यकता ! – प्रवीण नाईक, सनातन संस्था

आपली प्रत्येक कृती धर्माशी निगडीत आहे, त्यामुळे हिंदूंनी धर्माचरण करायला हवे. भावनेच्या आहारी न जाता धर्मावर श्रद्धा ठेवून हिंदु राष्ट्र निर्मितीचे कार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्मावर श्रद्धा असलेल्या हिंदूंचे संघटन निर्माण व्हायला हवे.

कार्यशाळेच्या वेळी डॉ. ज्योती काळे यांनी सूक्ष्मातील कळण्याची क्षमता विकसित होण्यासाठी सूक्ष्म प्रयोग घेतले, तसेच महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाविषयी माहिती दिली.

मनोगत

नासाने रामसेतूचे अस्तित्व असल्याचे सांगितल्यावर आपण त्यावर विश्‍वास ठेवतो; पण संत किंवा ऋषि-मुनी यांच्यावर विश्‍वास ठेवत नाही. ही स्थिती पालटायला हवी – श्री. ओकार ईनामदार

हिंदूंना मंदिरांमध्ये धर्मशिक्षण आणि सण-उत्सव यांची शास्त्रीय माहिती मिळायला हवी – श्री. विजय साळवे

हिंदूंनी कोणतीही संघटना, पद हे सर्व विसरून हिंदू म्हणून एकत्र यायला हवे – श्री. जयदीप पंड्या

क्षणचित्रे

१. हिंदु राष्ट्राच्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी जिज्ञासूंचा उत्स्फूर्त सहभाग होता. पुणे येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारामध्ये सर्वांनी सहभागी होणार असे सांगितले.

२. श्री. अतुल कोटकर यांनी येथील प्रदर्शन कक्षावर ठेवलेले भेटकार्ड पाहून १००० भेट कार्डची मागणी दिली.

३. या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाविषयीची ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली.

४. श्री. समर्थ फणसळकर हे कार्यशाळेसाठी कोल्हापूरवरून आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात