भारतात हिंदू अल्पसंख्यांक होण्याआधी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदु धर्मजागृती सभेत वक्त्यांनी धर्माभिमान्यांमध्ये जागवली हिंदुत्वाची ज्योत !

जाज्वल्यपूर्ण घोषणांनी दुमदुमला आसमंत !

डावीकडून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, अधिवक्ता समीर पटवर्धन, दीपप्रज्वलन करतांना अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. मनोज खाडये

कोल्हापूर – आई श्री महालक्ष्मीदेवीचा आशीर्वाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरमावळे वीर बाजीप्रभु देशपांडे यांचा आदर्श ठेवून शेवटच्या श्‍वासापर्यंत संघर्ष करून हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचा निर्धार कोल्हापूरच्या सहस्रावधी धर्माभिमान्यांनी येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत व्यक्त केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानामध्ये १७ डिसेंबरला आयोजित केलेल्या या सभेत धर्माभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी आदर्श हिंदु राष्ट्र स्थापण्याची शपथ घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र, हिंदु राष्ट्र आणि जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् अशा जयघोषांनी हिंदु धर्मजागृती सभेचे वातावरण जाज्वल्यपूर्ण झाले. या सभेत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, परिषदेचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता समीर पटवर्धन, सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी उपस्थितांमध्ये हिंदुत्वाची चेतना निर्माण केली.

. . . या ऐतिहासिक सभेला शंखनादाने प्रारंभ झाला.

त्यानंतर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. जय भवानी, जय शिवाजी या जयघोषात अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर वेदमूर्तींच्या चैतन्यमय वाणीत वेदमंत्रपठण झाले. त्यानंतर सहस्रो उपस्थिती लाभलेल्या हिंदु धर्मजागृती सभेमध्ये उपस्थित वक्त्यांनी त्यांच्या ओजस्वी वाणीने धर्माभिमान्यांमध्ये प्रखर हिंदुत्वाची ज्योत पेटवली.

 

कोल्हापूर येथे ५ सहस्र धर्माभिमान्यांनी केला हिंदु राष्ट्राचा हुंकार !

हिंदुत्वनिष्ठांनी वक्त्यांना तलवार भेट दिल्यानंतरचा क्षात्रतेजपूर्ण क्षण !

डावीकडून छावा मर्दानी आखाडाचे (टोप) श्री. चंद्रकांत पोर्लेकर, श्री. विशाल निकम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, अधिवक्ता समीर पटवर्धन, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. मनोज खाडये

नुकताच ज्येष्ठ पुरो(अधो)गामी डॉ. भारत पाटणकर यांनी त्यांच्या पत्नीसह श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यामध्ये प्रवेश करण्याचा ‘स्टंट’ केला. डॉ. पाटणकर यांनी त्यांच्या पत्नी कोणत्या धर्माच्या आहेत, हे उघड करावे. विवेकवाद्यांचा धर्म वेगळा असून श्री महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी हिंदु धर्माचे नियम पाळले पाहिजेत. डॉ. पाटणकर हे सनातनच्या विरोधात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ची भाषा वापरतात. त्यांनी विनासोवळे गाभार्‍यात प्रवेश करण्यासाठी कायदा मोडण्याची भाषा करू नये. डॉ. पाटणकर यांनी अशी कृत्ये करण्याआधी त्यांनी त्यांची कोत्या मनाची वृत्ती पालटावी, असे परखड प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ डिसेंबर या दिवशी येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेला ५ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंचा प्रतिसाद लाभला. हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता समीर पटवर्धन, सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी सभेत आपले जाज्वल्य विचार मांडले. या सभेला सनातनच्या पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

मंदिरात प्रवेश करण्याआधी डॉ. भारत पाटणकर यांनी कोत्या मनाची
वृत्ती पालटावी ! – ढोंगी पुरोगाम्यांचा बुरखा फाडणारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचे वाग्बाण

१. बाळगंगा प्रकल्पात पुनर्वसन समितीचे सदस्य असलेले डॉ. भारत पाटणकर यांनी मांडवली केली आहे. त्या प्रकल्पात शेकडो आदिवासींच्या जमिनी लुटल्या गेल्या आहेत. असे असतांना श्रमिकांचा कळवळा असणारे पाटणकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात एक शब्दही का बोलत नाहीत ? आयुष्यभर श्रमिकांच्या नावावर त्यांनी राजकारण केले. आदिवासींच्या बाजूने न बोलणार्‍या पाटणकर यांनी हिंदूंना धर्म शिकवू नये.

२. पुरोगामी कॉ. गोविंद पानसरे भांडवलदारांचे नेते होते. येथील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी भांडवलदारांनी लुटल्या. त्यामुळे अनेक जण रस्त्यावर आले. त्या वेळी दाभोलकर, पानसरे कुठे होते ?

३. भाजप सरकार पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसंबंधित मंदिरांसाठी एक कायदा आणू पहात आहे. त्या कायद्याद्वारे सरकार मंदिराच्या असलेल्या जमिनी तथाकथित भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव करू पहात आहे. सरकारने हिंदूंना न फसवता देवस्थान समितीशी संबंधित कायदा न करता देवस्थानची गेलेली जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न करावा.

४. सनातनचा साधक समीर गायकवाड यांना कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केल्यावर त्यांना अधिवक्ता मिळवून न देण्याचा प्रयत्न येथील सर्व अधिवक्त्यांनी केला. आझाद मैदानावर रझा अकादमीने दंगल घडवली आणि त्यांनी महिला पोलिसांवर हात टाकले. त्या वेळी अकादमीची बाजू घेणारे दोन अधिवक्ते हे कोल्हापूरमधील होते, तेव्हा येथील अधिवक्त्यांनी विरोध का केला नाही ?

५. पद्मावती चित्रपटामध्ये केलेल्या विडंबनात्मक चित्रीकरणाला व्यक्तीस्वातंत्र्य म्हटले जाते, तर अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतांनाचे फलक लावल्यास ते व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून का चालत नाही ? ते फलक लावल्याने अनेकांवर गुन्हे प्रविष्ट केले असून शासन ते मागे घेणार का ?

भारतात हिंदू अल्पसंख्यांक होण्याआधी ‘हिंदु राष्ट्राची’ स्थापना करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये २२ टक्के हिंदू होते, आता केवळ १ टक्का शेष आहेत. दुसरीकडे भारतात ९० टक्के हिंदू आणि १० टक्के मुसलमान होते, तर आता भारतात ७८ टक्के हिंदू शेष आहेत. काश्मीर, पंजाब, लक्षद्वीप, नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांत हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. असे असूनही तेथील बहुसंख्यांक असलेल्या मुसलमान किंवा ख्रिस्ती यांना अल्पसंख्यांकांचे सर्व अधिकार आणि लाभ मिळतात ! तेथील हिंदू अल्पसंख्यांकांना मात्र काहीही लाभ दिले जात नाहीत. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘हिंदूंसाठी कायदे आणि अन्य धर्मियांसाठी फायदे’, असा प्रकार चालू आहे. ‘धर्म टिकला, तर राष्ट्र टिकेल; राष्ट्र टिकले, तर समाज टिकेल आणि समाज टिकला, तर तुम्ही-आम्ही टिकू; नाहीतर धर्म पालटावा लागेल. एकूणच भारतातून हिंदू अल्पसंख्यांक झाले, तर हा देश इस्लामी देश झाल्याविना रहाणार नाही ! ही स्थिती येण्यापूर्वी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे.

हिंदु धर्म हा सत्यावर आधारित असल्याने सत्याचाच
विजय होणार ! – अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद

१. तथाकथित पुरो(अधो)गाम्यांनी हिंदु समाजाला निधर्मीवादाकडे नेण्याचे कार्य केले. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांसाठी सनातनवर नाहक टीका करून संस्थेला अपकीर्त करण्यात येत आहे. याच पुरो(अधो)गाम्यांनी हे लक्षात ठेवावे की, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती हिंदूंच्या प्रभावी संघटनाचे कार्य करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभत आहे. हिंदु धर्म हा सत्यावर आधारित असल्याने सत्याचाच विजय होणार.

२. भारताचे तुकडे करण्याची भाषा करणार्‍या देशद्रोही कन्हैय्या कुमारला गौरी लंकेश आपला मुलगा मानत होत्या.

३. सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना १८ मास कारागृहात ठेऊनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. अखेरीस न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले. ज्यांच्यावर काँग्रेसच्या गृहखात्याने नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका ठेवला, त्या डॉ. दाभोलकरांना महात्मा बनवण्याचा प्रकार सध्या चालू आहे. येत्या काही दिवसांत डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचीसुद्धा निर्दोष सुटका होईल. राष्ट्र आणि धर्मद्रोही कृती करणार्‍यांच्या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषद कायदेशीररित्या लढण्यासाठी सदैव सिद्ध आहे.

सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील ‘सुराज्य अभियाना’त
सहभागी व्हा ! – मनोज खाडये, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

देशातील भ्रष्ट आणि शोषक प्रवृत्ती वाढल्याने जनतेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी आंदोलन करावे लागते. लोकशाहीत प्रबळ झालेल्या दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ आरंभले आहे. या अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन श्री. मनोज खाडये यांनी केले. ते पुढे म्हणाले की,

१. ‘आरोपीला निर्दोष म्हणून सोडतांनाच न्यायाधिशांनी खोटे गुन्हे नोंदवणार्‍या पोलिसांकडून आणि शासकीय अधिवक्त्यांकडून हानीभरपाई वसूल करून ती ‘निर्दोष’ व्यक्तीला द्यायला हवी. अशा पोलीस अधिकार्‍यांना आणि शासकीय अधिवक्त्यांना सेवेतून कायमचे निलंबित करायला हवे; रामराज्य स्थापायचे आहे, तर आपल्याला न्याययंत्रणेतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध जागृती केलीच पाहिजे.

२. जागतिक बँकेने जगातील शिक्षणाची दयनीय स्थिती असणार्‍या १२ देशांच्या नावांची सूची प्रसिद्ध केली असून त्यात भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. देशात पाचवीतील ५० टक्के मुले दोन अंकी संख्यांची वजाबाकी किंवा बेरीज करू शकत नाहीत. ही विश्‍वगुरु भारताची दुःस्थिती आहे !

३. हल्ली बरेचसे आधुनिक वैद्य आवश्यकता नसली, तरी अनेक तपासण्या करण्यासाठी सांगतात. शस्त्रक्रियेची आवश्यकता नसतांनाही शस्त्रक्रिया करायला सांगतात. विशेषतः बाळाच्या जन्माच्या वेळी नैसर्गिक प्रसूती होणार असली, तरी शस्त्रक्रिया करायला सांगतात, तसेच एखादा रुग्ण मरण पावलेला असला, तरी ‘व्हेंटिलेटर’वर ठेवल्याचे सांगून अतीदक्षता विभागाचे भरमसाट शुल्क घेतात. अशी लुबाडणूक करणार्‍या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी समितीला साहाय्य करून हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातील सुराज्य अभियानामध्ये सहभागी होऊ शकतो.

धर्मजागृती सभेला वृत्तपत्रांतून व्यापक प्रसिद्धी देऊन धर्मकार्यात योगदान देणारी प्रसारमाध्यमे !

‘फेसबूक’वरून सभेचे थेट प्रक्षेपण

धर्मजागृती सभेचे ‘फेसबूक’वरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. ही सभा ९ सहस्र जणांनी प्रत्यक्ष अनुभवली, तर प्रक्षेपणाची लिंक ४६ सहस्र जणांपर्यंत पोहोचली. सभेची लिंक ३०० हून अधिक जणांनी अन्य जणांना ‘शेअर’ केली. याचसमवेत १ सहस्र ८५० हून अधिक जणांनी सभा पाहून विविध अभिप्राय समितीच्या पानावर व्यक्त केले, तसेच सभेची लिंक १ सहस्र २०० जणांनी ‘लाईक’ केली.

वैशिष्ट्यपूर्ण

१. १६ आणि १७ डिसेंबर या दोन्ही दिवशी मैदानाभोवती २ ते ३ गरुड पक्षी फिरतांना दिसले. जणू धर्मसभेसाठी साक्षात श्रीविष्णूने आशीर्वाद दिल्याचे अनेकांना जाणवले.

२. सर्व साधकांना अमावास्या असूनही कोणत्याही प्रकारचा त्रास न जाणवता चैतन्य जाणवले.

कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेची छायाचित्रे काढतांना
छायाचित्रकात ‘ऑर्ब्ज’ येणे, हा सभेच्या वेळी सूक्ष्मातील युद्ध चालू असल्याचा प्रत्यय !

सभास्थळी वातावरणात दिसलेले ऑर्ब्ज

‘जगात काही गोष्टी डोळ्यांनी दिसतात, तर काही दिसत नाहीत. काही गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, म्हणजे त्या अस्तित्वातच नसतात, असे नव्हे, उदा. वारा डोळ्यांना दिसत नाही, म्हणजे तो नसतो, असे नाही. डोळ्यांनी तो दिसत नसला, तरी आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवते. ‘स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. अशा सूक्ष्मातून घडणार्‍या घटनांचा व्यक्तीच्या देहावर स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही परिणाम होतो किंवा जाणवतो.

काही छायाचित्रांमध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारचे पारदर्शक गोळे दिसतात. या गोळ्यांना ‘ऑर्ब्ज’ म्हणतात. ‘ऑर्ब’ म्हणजे ऊर्जात्मक शक्ती होय. ‘ऑर्ब’ गोलाकार पारदर्शक असतात. ‘एखाद्या व्यक्तीला अनिष्ट शक्तीचा त्रास असल्यास तिच्याजवळ अथवा वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास तेथे ‘ऑर्ब्ज’ दिसतात’, हे आतापर्यंत आपल्याला ठाऊक होते. अशा त्रासदायक ‘ऑर्ब्ज’प्रमाणेच चांगले ‘ऑर्ब्ज’ही दिसतात.

हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात हिंदूसंघटन होऊन हिंदुत्वनिष्ठ कृतीशील होतात. हा हेतू साध्य होऊ नये, यासाठी वातावरणातील अनिष्ट शक्ती सभेत विघ्ने आणण्यासाठी येतात; मात्र त्या वेळी वातावरणातील चांगल्या शक्तीही सभेच्या रक्षणार्थ कार्यरत असतात. हे एक प्रकारे सूक्ष्मातील युद्धच असून छायाचित्रामध्ये पांढर्‍या आणि काळ्या गोळ्यांच्या रूपात हे ‘ऑर्ब्ज’(वातावरणातील चांगले-वाईट लिंगदेह) चित्रित होतात. कोल्हापूर येथे १७ डिसेंबरला पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या छायाचित्रात ‘ऑर्ब्ज’ दिसून आले. (‘ऑर्ब्ज’ सोबतच्या छायाचित्रात दिसत आहेत.)

तज्ञ, अभ्यासू आणि या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करण्याची विनंती !

‘काही चांगल्या वास्तूमध्ये किंवा त्रासदायक वास्तूंच्या छायाचित्रांमध्ये ‘ऑर्ब्ज’ दिसून येतात.

१. सूक्ष्म स्तरावर चांगल्या आणि त्रासदायक वास्तू यांमध्ये लिंगदेह दिसण्यामागील वैज्ञानिक कारण काय ?

२. लिंगदेहाच्या आकारामागील वैज्ञानिक स्तरावरील वैशिष्ट्ये कोणती ?

३. लिंगदेहाचा आकार सतत पालटतो कि कायमचा एकच असतो ?

४. लिंगदेहांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ?

या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : [email protected])

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात