कोल्हापूर येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त धर्माभिमान्यांनी वाहनफेरीतून केला हिंदु राष्ट्राचा जागर !

१. वाहनफेरी आल्यावर धर्मध्वजाचे पूजन करतांना नागरिक

कोल्हापूर येथे हिंदु धर्मजागृती सभा

स्थळ – पद्माराजे गर्ल्स हायस्कूलचे मैदान, खरी कॉर्नरजवळ, कोल्हापूर.

दिनांक – १७ डिसेंबर २०१७, रविवार

वेळ – सायंकाळी ५.३० वाजता


कोल्हापूर – ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र, हिंदु राष्ट्र’ या आणि अन्य गगन भेदून टाकणार्‍या घोषणा अन् भगव्या ध्वजांमुळे भगवी झालेली कोल्हापूरनगरी १५ डिसेंबर या दिवशी काढलेल्या वाहनफेरीने दुमदुमून गेली. या वाहनफेरीमध्ये १५० हून अधिक धर्माभिमान्यांनी सहभागी होऊन हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

२. वाहनफेरीत सहभागी हिंदुत्वनिष्ठ

हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने येथे खरी कॉर्नर येथे वाहनफेरीचा प्रारंभ सकाळी ११ वाजता शंखनादाने करण्यात आला. त्यानंतर धर्मध्वजाचे पूजन शिवसेनेचे वडणगे येथील शिवसैनिक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. आणि सौ. बाबासाहेब जवंजाळ यांच्या हस्ते, तर धर्मध्वजाला पुष्पहार संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री. किशोर घाडगे यांनी अर्पण केला. या वेळी जय शिवराय तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री. किशोर माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. पूजनाच्या वेळी आणि संपूर्ण वाहनफेरीमध्ये सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती. धर्मध्वजपूजेचे पौरोहित्य श्री. विवेक देवस्थळीगुरुजी यांनी केले. खरी कॉर्नर येथून प्रारंभ झालेली वाहनफेरी शहरातील विविध प्रमुख चौकांतून मार्गस्थ होत तिची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एका छोट्याशा सभेच्या रूपात झाली.

वाहनफेरीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाल्यावर समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर श्री. किशोर घाडगे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हासमन्वयक श्री. किरण दुसे आणि रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिभा तावरे यांनी उपस्थितांना धर्मसभेत येण्याचे आवाहन करत संबोधित केले.

 

वैशिष्ट्यपूर्ण

अ. वाहनफेरीच्या अग्रभागी बालसाधकांचा एक चमू छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी या आणि अन्य पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाला होता. बालसाधकांचा हा चमू कोल्हापूरवासियांचा आकर्षणबिंदू ठरला.

आ. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे धर्माभिमानी उर्त्स्फूतपणे युवक, युवती आणि वयस्क हे भगवे ध्वज, भगवे फेटे आणि पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते.

इ. धर्मध्वजाचे स्वागत आणि पूजन एकूण ६ विविध ठिकाणी करण्यात आले. शाहुपुरी येथील सनातन सेवाकेंद्राच्या ठिकाणी वाहनफेरी आल्यावर धर्मध्वजपूजन आणि पुष्पवृष्टी करण्यात आली.

 

हिंदुत्वनिष्ठांनी केलेले मार्गदर्शन

धर्मजागृती सभेला सर्व हिंदूंनी एकत्र येऊन देशविघातक शक्तींना हिंदूंची एकजूट दाखवूया. त्या माध्यमातून हिंदूंनी वज्रमूठ हिंदु राष्ट्राचा उद्घोष करूया.

– श्री. शरद माळी, शहराध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान.

आतापर्यंत केवळ हिंदु राष्ट्राची मागणी केली; पण येथून पुढे मागणी न करता ते खेचून आणणार आणि पुरोगाम्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. देव, देश आणि धर्म यांसाठी खर्‍या अर्थी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती प्रामाणिकपणे अन् तळमळीने कार्य करत आहे.

– श्री. संभाजी भोकरे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.

 

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेच्या जिल्हाध्यक्षा सौ. रश्मी अडसुळे, उपजिल्हाध्यक्षा सौ. सुवर्णा पवार, हिंदु महासभेचे श्री. सोरप, पुरोहित महासंघाचे अध्यक्ष श्री. निगुडकर

 

क्षणचित्रे

१. अनेक ठिकाणी नागरिक आणि महाविद्यालयीन युवक थांबून कुतूहलाने वाहनफेरी पहात होते.

२. काही ठिकाणी नागरिक आणि युवक स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये वाहनफेरीचे चित्रीकरण करत होते आणि उत्स्फूर्तपणे ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’च्या घोषणा देत होेते.

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात