कोल्हापूर येथे आयोजित हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त पत्रकार परिषदेत सनातनचा सहभाग

हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यासाठी सभेला हिंदूंनी मोठ्या संख्येने
उपस्थित रहावे ! – मनोज खाडये, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून श्री. सुनील पाटील, श्री. मनोज खाडये, अधिवक्ता समीर पटवर्धन, डॉ. मानसिंग शिंदे, श्री. शरद माळी आणि श्री. किरण दुसे

कोल्हापूर   – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करणे, यांसाठी अधिकाधिक हिंदूंनी १७ डिसेंबर या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी पत्रकार परिषदेत केले. कोल्हापूर प्रेस क्लब येथे १४ डिसेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शरद माळी, पतित पावन संघटनेचे जिल्हाप्रमुख श्री. सुनील पाटील, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता समीर पटवर्धन, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे आणि समितीचे श्री. किरण दुसे आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनीही ‘धर्मसभेला हिंदूंनी बहुसंख्येने उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावण्याचे’ आवाहन केले.

श्री. खाडये पुढे म्हणाले की, सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात असून शहर आणि  ग्रामीण भागात आतापर्यंत युवक, महिला अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्या १४० हून अधिक बैठका घेण्यात आल्या आहेत. याचसमवेत हस्तपत्रके, भीत्तिपत्रके, होर्डिंग्ज आणि विविध सामाजिक माध्यमे आदींद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात येत आहे.

सभेच्या प्रसारानिमित्त आज वाहनफेरी

फेरीचा मार्ग – खरी कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक

वेळ – सकाळी १०.३० वाजता

या वाहनफेरीला समस्त हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीने केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात