गुरुकृपायोगाची वैशिष्ट्ये आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून गुरुकृपायोगाची निर्मिती होण्याचे कारण अन् त्याची प्रक्रिया !

परात्पर गुरु डॉ. आठवले‘आतापर्यंत अध्यात्मात ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, ध्यानयोग, हठयोग, नामसंकीर्तनयोग, कुंडलिनीयोग, शक्तीपातयोग इत्यादी अनेक योगमार्ग प्रचलित आहेत. सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू भक्तराज महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉक्टर आठवले यांनी १९९४ या वर्षी गुरुकृपायोगाची निर्मिती केली आहे. या विषयाचे श्री. राम होनप यांना मिळालेले ज्ञान येथे दिले आहे. श्री. निषाद देशमुख आणि कु. मधुरा भोसले यांना मिळालेले ज्ञान पहाणार आहोत.

 

१. ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची अन्य योगमार्गांच्या तुलनेत आध्यात्मिक वैशिष्ट्ये

१ अ. अन्य योगमार्ग आणि गुरुकृपायोग

‘ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग हे ईश्‍वराकडे जाण्याचे मार्ग आहेत. गुरुकृपायोगातही या मार्गांचा समावेश आहे; परंतु त्यांचे स्वरूप भिन्न आहे. त्यामधील तुलनात्मक अभ्यास पुढे दिला आहे.

१ अ १. कर्मयोग

या साधनामार्गात कर्माला पूर्णतः महत्त्व आहे. कर्म अचूक आणि परिपूर्ण असेल, तरच त्याचे फळ मिळते. कर्मात चूक झाली, तर साधनेचा व्यय होतो.

१ अ १ अ. गुरुकृपायोगातील कर्मयोग

कर्म करतांना अचूक करण्यासमवेत ते भावपूर्ण करण्याला महत्त्व आहे. त्यामुळे कर्म करतांना मनुष्याकडून काही कळत अथवा नकळत चूक झाल्यास देव अशा चुकीला क्षमा करतो. तसेच साधक कर्म करतांना कृतज्ञता व्यक्त करतो. त्यामुळे अशा कर्मात अहं अल्प असल्याने साधकाला कर्मदोष लागण्याचे प्रमाणही अल्प रहाते.

कर्मयोगात केवळ उत्तम कर्माला महत्त्व आहे. गुरुकृपायोगातील कर्मयोगात कर्म करतांना मनात येणार्‍या विचारांचा अभ्यास करण्यास शिकवले जाते. त्यामुळे ते कर्म स्थूल आणि सूक्ष्मदृष्ट्या शुद्ध बनते. परिणामी साधकाला कर्माचे फळ साधनेच्या दृष्टीने अधिक मिळते.

१ अ २. भक्तीयोग

भक्तीयोगात देवाची मूर्ती, रूप, गुण, स्मरण आणि भगवंताविषयीचे प्रेम या सूत्रांना अधिक महत्त्व आहे. ही सूत्रे देव आणि भक्त यांच्याशी संबंधित आहेत.

१ अ २ अ. गुरुकृपायोगातील भक्तीयोग

या योगात ‘जीवनातील प्रत्येक प्रसंगात, सजीव आणि निर्जीव घटकांत देव कसा पहायचा ? त्याची भक्ती कशी करायची ?’, हे सातत्याने शिकवले जाते. त्यामुळे भक्तीयोगाप्रमाणे ‘मी आणि देव’, असा संकुचित विचार न रहाता गुरुकृपायोगानुसार साधना करतांना साधकात चराचरात भगवंत असल्याची जाणीव वाढू लागते. त्यामुळे साधकातील अहंचे प्रमाण लवकर न्यून होते आणि त्याची आध्यात्मिक प्रगतीही जलद होते.

१ अ ३. ध्यानयोग

ध्यानयोगाने साधना करतांना साधकाचे मन स्थिर असणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात रज-तमाचे प्रमाण अधिक असल्याने ध्यानयोगाद्वारे साधना करणे कठीण आहे, तसेच अनेक घंटे बसून ध्यान करण्यासाठी शरिराच्या मर्यादाही अधिक येतात.

१ अ ३ अ. गुरुकृपायोगातील ध्यानयोग

साधकाचा सातत्याने नामजप करण्यावर भर असतो. त्यामुळे त्याचे मन लवकर एकाग्र होते. साधक नामजपासहित अचूक आणि भावपूर्ण सेवेत रममाण होतो. सेवेचे कर्म करतांना ‘ही अचूक व्हावी’, असा त्याचा ध्यास असतो. हा साधकाचा सेवा करतांनाचा अव्यक्त भाव आहे. साधकाचे मन, ‘सेवेत पूर्ण एकाग्र होणे’, हे सहज ध्यानाचे लक्षण आहे.

साधक सेवेशी एकरूप होऊ लागल्यावर हळूहळू सहज ध्यानाकडे मार्गक्रमण करीत असतो. सहज ध्यान हा ध्यानयोगातील अंतीम टप्पा आहे. ध्यानात मन एकाग्र करणे कठीण आहे. त्या तुलनेत सेवेत मन लवकर एकाग्र होते. त्यामुळे सेवेतून ध्यानाची अवस्था साधकाला लवकर प्राप्त होते.

१ अ ४. ज्ञानयोग

ज्ञानयोगाने साधना करण्यासाठी उच्च आध्यात्मिक पातळीची आवश्यकता असते. कलियुगातील जिवांची साधना अल्प असल्याने अशांना ज्ञानयोग पेलवत नाही. परिणामी साधकाची साधनेत प्रगती होण्यास दीर्घकाळ लागतो.

१ अ ४ अ. गुरुकृपायोगातील ज्ञानयोग

ज्ञान अनंत असून ते कितीही जाणून घेतले, तरी अल्पच आहे. मानवी आयुष्याला मर्यादा आहे. त्यामुळे गुरुकृपायोगात साधकाला ईश्‍वरप्राप्तीसाठी जेवढे ज्ञान असणे आवश्यक आहे, तेवढे ज्ञान साधकाला सत्संग अथवा ग्रंथ यांद्वारे दिले जाते.

साधनेच्या दृष्टीने उपयोगी नसलेले ज्ञान जाणून घेण्यात साधकाचा वेळ वाया न जाता तो वेळ प्रत्यक्ष साधना करून ईश्‍वरप्राप्ती करण्याला महत्त्व दिले जाते. त्यामुळे साधकाने ग्रहण केलेल्या ज्ञानानुसार अध्यात्म प्रत्यक्ष जगल्याने त्याची साधनेत प्रगती वेगाने होते.

१ आ. गुरुकृपायोग साधनामार्गाची अन्य तुलनात्मक वैशिष्ट्ये

१ आ १. गुरुकृपायोगात चारही योगमार्गांना महत्त्व असणे

ज्ञानयोगात ज्ञानाला, ध्यानयोगात ध्यानाला, भक्तीयोगात भक्तीला आणि कर्मयोगात कर्माला महत्त्व आहे, तर गुरुकृपायोगात या चारही योगमार्गांना महत्त्व दिले आहे.

१ आ २. समष्टी साधना केल्याने समाजऋण फेडणे लवकर साध्य होणे

मोक्षप्राप्तीसाठी मातृ-पितृ ऋण, देवऋण, ऋषिऋण आणि समाजऋण फिटणे आवश्यक असते. अन्य योगमार्गांत व्यष्टी साधना करून पहिले तीन ऋण फिटते; पण समाजऋण फिटत नाही; कारण ते फिटण्यासाठी समष्टी, म्हणजे अध्यात्मप्रसार करण्याची आवश्यकता असते. गुरुकृपायोगात समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे. त्यामुळे साधक चारही ऋणांतून लवकर मुक्त होतो.

१ आ ३. साधनेतील अडथळे दूर करण्यासंबंधीचे प्रायोगिक मार्गदर्शन असणे

अन्य योगमार्गांनी ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवला आहे; परंतु या मार्गाने आध्यात्मिक वाटचाल करतांना येणारे स्वभावदोष आणि अहं यांसंबंधीचे अडथळे दूर करण्याचा मार्ग गुरुकृपायोग या साधनामार्गाने दाखवला आहे.

१ आ ४. तारक आणि मारक उपासनेवर भर असणे

अन्य योगमार्गांनी भगवंताच्या तारक उपासनेवर भर दिला आहे. गुरुकृपायोगात तारक आणि मारक या दोन्ही उपासना करण्यावर भर दिला आहे. ही दोन्ही रूपे भगवंताची असल्याने आणि त्याद्वारे उपासना केल्याने साधकाला त्याच्यापर्यंत लवकर पोहोचता येते.

१ आ ५. साधक अष्टांग साधनेने गुरुतत्त्वाशी जोडला गेल्याने त्याला स्थूल गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता न उरणे

अन्य योगमार्गांनी साधना करतांना साधकाला प्रत्येक टप्प्याला स्थूल देह असलेल्या गुरूंची आवश्यकता असते. गुरुकृपायोगात अष्टांग साधना सांगितलेली आहे. त्यानुसार साधकाने प्रामाणिकपणे साधना केल्यास तो थेट गुरुतत्त्वाशी जोडला जातो. त्यानंतर गुरुतत्त्व सूक्ष्मातून अथवा स्थुलातील अन्य माध्यमाद्वारे साधकाला टप्प्याटप्प्याने मार्ग दाखवत मोक्षापर्यंत घेऊन जाते. या प्रक्रियेलाच ‘गुरुकृपायोग’, असे म्हणतात.

१ आ ६. भगवंताचे ‘प्रीती’ आणि ‘व्यापकत्व’ हे गुण साधकात वृद्धींगत होणे

अन्य योगमार्गांत समष्टी साधना नाही. गुरुकृपायोगात समष्टी साधनेला अधिक महत्त्व आहे. समाजाला साधनेला उद्युक्त केल्याने, म्हणजे सतत इतरांचा विचार केल्याने साधकात भगवंताचे ‘प्रीती’ आणि ‘व्यापकत्व’, हे गुण वृद्धींगत होण्यास साहाय्य होते. त्यामुळे साधकाची जलद आध्यात्मिक प्रगती होते.

१ आ ७. योगमार्गानुसार साधना करण्यासाठी आवश्यक आध्यात्मिक पातळी

कलियुगातील सर्वसामान्य व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के इतकी असते. त्यामुळे त्याला अन्य योगमार्गांच्या तुलनेत गुरुकृपायोग या साधनामार्गानुसार साधना करणे सुलभ आहे, हे वरील सारणी वरून लक्षात येते. तसेच कनिष्ठ, मध्यम किंवा उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवांनीही गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास त्यांची पुढील आध्यात्मिक प्रगती लवकर होते.

१ आ ८. अन्य योगमार्गांच्या तुलनेत गुरुकृपायोगात ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गातील पायर्‍या बारकाईने समजावून सांगितलेल्या असणे

अन्य योगमार्गांत, ‘साधना करतांना कशा पद्धतीने मार्गक्रमण करायचे ? त्यातील टप्पे कोणते ? त्यात येणारे अडथळे दूर कसे करायचे ?’, यांविषयीचे ज्ञान मर्यादित आहे. गुरुकृपायोगात या सर्व सूत्रांचे बारकाईने मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे साधकाला मोक्षप्राप्तीची वाटचाल करणे सुलभ होते.

१ इ. विविध देह आणि अहं यांना कार्य करण्यास आवश्यक असे प्राणशक्तीचे प्रमाण

वरील सारणीनुसार चित्त, म्हणजे त्यातील विविध स्वभावदोष आणि अहं यांमुळे प्राणशक्तीचा होणारा व्यय ६५ टक्के इतका होतो. गुरुकृपायोग या साधनामार्गात स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी ६० टक्के इतके महत्त्व दिले आहे.

ही प्रक्रिया राबवल्याने साधकातील प्राणशक्तीचा मोठा प्रमाणात होणारा व्यय वाचतो आणि त्या ईश्‍वरी शक्तीचा लाभ आध्यात्मिक प्रगती साध्य करण्यासाठी होतो.

१ ई. मोक्षप्राप्तीत चित्तशुद्धीला सर्वाधिक महत्त्व असणे

कुठल्याही योगमार्गाने साधना केली, तरी जोपर्यंत चित्तशुद्धी, म्हणजे स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन होत नाही, तोपर्यंत ईश्‍वरप्राप्ती होत नाही. अन्य योगमार्गांत या सूत्राला फारसे प्रायोगिक महत्त्व दिले न गेल्याने चित्तशुद्धी होण्यासाठी साधकाच्या साधनेचा मोठ्या प्रमाणात व्यय होतो आणि मोक्षप्राप्तीसाठी साधकाला अनेक जन्म घ्यावे लागतात.

त्या तुलनेत गुरुकृपायोग या साधनामार्गात चित्तशुद्धीला अधिक महत्त्व दिले असल्याने आणि त्याप्रमाणे कृती करवून घेतल्याने साधकाला आध्यात्मिक प्रगतीचा मोठा टप्पा चालू जन्मातच साध्य होतो.

१ उ. काळानुरूप गुरुकृपायोग या साधनामार्गाचे महत्त्व !

कलियुगातील रज-तमाचे वातावरण, मनुष्याची साधना करण्याची क्षमता आणि वयोमर्यादा, हे लक्षात घेऊन अन्य योगमार्गांच्या तुलनेत गुरुकृपायोग साधनामार्ग साधनेचे फळ लवकर प्राप्त करून देणारा आहे; कारण गुरुकृपायोग आताच्या काळाला अनुसरून भगवंताने मनुष्यासाठी निर्माण केला आहे.

१ ऊ. गुरुकृपायोग या साधनामार्गातील काठीण्य आणि होणारा लाभ !

अन्य योगमार्गांच्या तुलनेत गुरुकृपायोग हा सर्वांत कठीण साधनामार्ग आहे; कारण अन्य योगमार्गात साधना करतांना साधकाचा अन्य साधक अथवा समाजाशी संबंध येत नाही; परंतु गुरुकृपायोगात समष्टी साधनेला अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे साधकाचा साधना करतांना नेहमी अन्य साधक अथवा समाज यांच्याशी संपर्क असतो.

अशा वेळी भिन्न प्रकृतींशी जुळवून साधना करणे साधकाला कठीण जाते. त्यात प्रारंभी साधकाच्या मनाचा बराच संघर्ष होतो. साधनेत वाढ होते, तसा साधकाच्या मनाचा संघर्ष न्यून होतो. त्यानंतर या संघर्षाच्या फलस्वरूप साधकाचा मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो.’

१ ए. गुरुकृपायोग या साधनामार्गाची पार्श्‍वभूमी
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पूर्वजन्मांत सिद्ध झालेली असणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी मागील जन्मांत ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांद्वारे साधना केली होती. त्या विषयांचा त्यांचा मागील जन्मांत अनुभवजन्य अभ्यास झालेला होता. त्यामुळे चालू जन्मात परात्पर गुरु डॉक्टरांना चार योगमार्गांचा समन्वय साधणारा ‘गुरुकृपायोग’, या साधनामार्गाची निर्मिती करता आली.

१ ऐ. परात्पर गुरु डॉक्टरांना ‘गुरुकृपायोग’, हा साधनामार्ग निर्माण करता येण्यामागील कारणे आणि त्यांचे प्रमाण

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०१७)

सूक्ष्म : प्रत्यक्ष दिसणारी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. ‘सूक्ष्म’ ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

 

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गुरुकृपायोग सुचण्यामागील प्रक्रिया

२ अ. संत

२ अ १. गुरुतत्त्वाने विविध संतांच्या माध्यमातून ज्ञान, भक्ती आणि कर्म यांची शिकवण देणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील तळमळीमुळे गुरुतत्त्वाने विविध संतांच्या माध्यमातून त्यांना ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग आणि अध्यात्मातील अन्य प्रायोगिक भाग यांचे ज्ञान दिले.

२ अ २. विविध संतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शिकवलेले योगमार्ग आणि विषय

२ अ ३. संतांची शिकवण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्रीय भाषेत मांडणे 

संतांकडून मिळालेल्या शब्दजन्य ज्ञानाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित करून अध्यात्मशास्त्रीय भाषेत मांडले. वर्ष १९८७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘अध्यात्मशास्त्र’ या नावाने प्रथम चक्रमुद्रांकित ग्रंथ प्रकाशित केला होता. यातून त्यांचे समष्टी ज्ञानयोगाकडे मार्गक्रमण चालू झाले.

२ आ. डॉ. आठवले यांचे गुरु संत भक्तराज महाराज

२ आ १. संत भक्तराज महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचे समतोलत्व असलेली साधना करवून घेतल्याने ते केवळ दीड वर्षात संत बनणे

अन्य संतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधनेची शब्दजन्य माहिती दिली, तर संत भक्तराज महाराज यांनी परात्पर गुरु डॉक्टरांकडून ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचे समतोलत्व निर्माण करणारी साधना करवून घेतली. या साधनेमुळे परात्पर गुरु डॉक्टरांना शब्दातीत ज्ञान मिळाले. साधना करतांना ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचे समतोलत्व साध्य केल्याने परात्पर गुरु डॉक्टरांना अल्प कालावधीत, म्हणजे केवळ दीड वर्षात शिष्य पातळीतून संत पातळी गाठता आली.

२ आ २. संत भक्तराज महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांचे अधिकारी बनवणे

सर्वसाधारण गुरु शिष्याला एकाच योगमार्गाचा अधिकार देतात. त्या अधिकारामुळे शिष्य समष्टीला संबंधित योगमार्गाचे मार्गदर्शन करून आपली समष्टी साधना पूर्ण करतो. वर्ष १९९३ मध्ये संत भक्तराज महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांच्या प्राप्तीचा आशीर्वाद दिला. या माध्यमातून त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांंना ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांचे अधिकारत्व प्रदान केले. यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये सर्व योगमार्गियांना मार्गदर्शन करण्याची क्षमता निर्माण झाली.

२ आ ३. संत भक्तराज महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जगभर प्रसार करण्यास सांगणे

संत भक्तराज महाराज यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना जगभर प्रसार करण्याची आज्ञा केली. गुरूंनी दिलेल्या आज्ञेचे पालन करून भारत आणि विदेश येथे प्रसार केल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर ‘जगद्गुरु’ या पदाला पात्र झाले. ही प्रक्रिया सूक्ष्मातून घडली. त्यामुळे याची प्रचिती स्थुलातून न येता पूर्वसूचना आणि अनुभूती या माध्यमांतून दिली गेली.

२ आ ३ अ. ‘जगद्गुरु’ पदाची पूर्वसूचना

वर्ष १९८७-८८ मध्ये एक अघोरी पंथातील तांत्रिक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दररोज अध्यात्मशास्त्र शिकवायचे. एकदा त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ध्यान लावून ‘काय दिसते ?’, असे विचारले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘ॐ’ लिहिलेले सिंहासन दिसत असल्याचे सांगितले. यावर ते म्हणाले ‘‘त्या सिंहासनावर पुढे तुला बसायचे आहे.’’

२ आ ३ आ. अनुभूती 

संत (गुरु) भक्तराज महाराज यांची एक स्त्री भक्त त्रासात असतांना त्यांना प्रार्थना करत झोपली. रात्री संत भक्तराज महाराज यांनी तिला स्वप्नात सांगितले ‘‘आता मला नाही. माझा शिष्य (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना कर.’’

(पूर्वसूचना आणि अनुभूती यांचा संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’ प्रथम आवृत्ती.)

२ आ ४. ज्ञानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘विश्‍वगुरु’ असे करण्यामागील कारण

२ आ ४ अ. अनंत सृष्टीयुक्त विश्‍वावर परिणाम करणारे कार्य करणारे गुरु म्हणजे ‘विश्‍वगुरु’

‘ईश्‍वराने विश्‍वाची निर्मिती केली. या विश्‍वात अनंत सृष्टी आहेत. त्या अनंत सृष्टींपैकी एक आपली सृष्टी पृथ्वी आहे. एकाच वेळी सर्व सृष्टींवर वेगवेगळ्या काळगती गतीमान असतात. काही सृष्टींची निर्मिती होत असते, तर काही सृष्टींचा लय होत असतो. सर्व सृष्टीसाठी पूरक असे कार्य करणार्‍या गुरूंना ‘विश्‍वगुरु’ किंवा ‘जगद्गुरु’, असे म्हटले जाते.

२ आ ४ आ. अन्य देहधारी गुरुंचे कार्य सगुण स्तरावरील असल्याने मर्यादित असणे

देहधारी गुरु गुरुतत्त्वाच्या मार्गदर्शनानुसार कार्य करतात. त्यामुळे त्यांचे कार्य सगुण स्तराचे असून एका सृष्टीचा वर्तमानकाळ आणि त्याच्याशी निगडित स्थूल अन् सूक्ष्म जगत यांच्यापर्यंत मर्यादित असते. त्यांच्या कार्याने ‘विश्‍व’ या अनंत संज्ञेच्या अस्तित्वावर परिणाम होत नाही. त्यामुळे काही सहस्त्र वर्षांनी ते आपल्या भक्तांना मार्गदर्शन करू शकत नाहीत, तसेच त्यांनी सांगितलेले ज्ञानही वर्तमानकाळ आणि संबंधित भक्त यांच्याशी निगडित असल्याने भविष्यातील जिवांना आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शक नसते.

२ आ ४ इ. ‘विश्‍वगुरु’ किंवा ‘जगद्गुरु’ यांच्या कार्याची वैशिष्ट्ये

विश्‍वगुरु किंवा जगद्गुरु यांच्या कार्याला स्थळाचे बंधन नसते. त्यामुळे त्यांच्या कार्यामुळे निर्गुणातून प्रकट झालेले ज्ञान विश्‍वसंज्ञेवर परिणाम करणारे असते. विश्‍वगुरूंमुळे समष्टीला पूरक ज्ञान निर्गुणातून सगुणात अवतरित होते. त्यामुळे वर्तमानसृष्टीत जन्म घेतलेल्या जिवांचा काळानुसार अन्य सृष्टीत जन्म झाल्यावर ते इतर जिवांना समष्टी ज्ञान शिकवतात. ‘विश्‍वगुरु’ किंवा ‘जगद्गुरु’ यांनी केलेले मार्गदर्शन विश्‍वातील, म्हणजे अनंत सृष्टीतील जिवांसाठी मार्गदर्शक असते, उदा. जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेद्वारे केलेले मार्गदर्शन.

२ आ ४ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य संपूर्ण विश्‍वावर प्रभाव निर्माण करणारे असणे

‘गुरुकृपायोग’ या योगमार्गाच्या स्वरूपात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विश्‍वाला ‘समष्टी साधना’, ‘प्रकृतीनुसार साधना’ आणि ‘प्रकृतीत पालट करणे’ यासंदर्भात समष्टी शिकवण देण्याचे कार्य केले आहे. विश्‍वाच्या इतिहासात निर्गुणातून सगुण रूपात हे ज्ञान कुणी आणलेले नव्हते. त्यांचे हे कार्य पूर्ण विश्‍वावर प्रभाव निर्माण करणारे होते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्या काळातील उल्लेख ‘विश्‍वगुरु’, असे ज्ञानात करण्यात आले आहेत.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०१७, दुपारी १.१०)

२ आ ४ उ. विश्‍वगुरु आणि परात्पर गुरु यांतील भेद

पूर्ण विश्‍वाला मार्गदर्शन करतात, ते विश्‍वगुरु. विश्‍वगुरूंचे कार्य ठराविक कालावधीसाठी असते. याउलट ‘स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे जाऊन समष्टीला दीर्घकाळ लाभ होईल किंवा जिवाच्या पुढच्या जन्माच्या साधनेला साहाय्य होईल’, असे कार्य आणि मार्गदर्शन करणारे गुरु म्हणजे परात्पर गुरु.

२ आ ४ ऊ. विश्‍वगुरुपद आणि ज्ञान, भक्ती अन् कर्म यांतील अधिकारत्व यांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून ईश्‍वराने गुरुकृपायोगाची निर्मिती करणे

ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांचे अधिकारत्व अन् विश्‍वगुरुपद असल्यामुळे ईश्‍वराने परात्पर गुरु डॉक्टरांना गुरुकृपायोगाच्या निर्मितीचे माध्यम बनवले. त्यामुळे ईश्‍वरेच्छेने त्यांच्या मनात गुरुकृपायोगाच्या संदर्भात विचार आले. योगमार्गांचा प्रायोगिक भाग आणि त्यांच्या मर्यादेचे ज्ञान असल्याने ज्ञान, भक्ती अन् कर्म यांच्या समतोलत्वाने आध्यात्मिक उन्नतीचे मार्गदर्शन करणार्‍या गुरुकृपायोगाची निर्मिती परात्पर गुरु डॉक्टरांकडून झाली.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गुरुकृपायोग सुचण्यामागील प्रक्रियेतील टप्पे

२ इ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मन आणि बुद्धी यांची निर्विचार अवस्था निर्माण होणे

समष्टी साधनेमुळे परात्पर गुरु डॉक्टर सहजावस्थेत असतांनाही त्यांचे मन आणि बुद्धी हे विश्‍वमन अन् विश्‍वबुद्धी यांच्याशी एकरूप व्हायचे. या कालावधीत त्यांचे मन आणि बुद्धी यांची निर्विचार अवस्था असायची. या अवस्थेत त्यांना शब्दातीत माध्यमातून गुरुकृपायोगाच्या संदर्भात ज्ञान मिळायचे.

२ इ २. अनेक जिवांच्या स्थितीचे परीक्षण होऊन अंतर्मनात असलेल्या ज्ञानाचे मन आणि बुद्धी यांना विचार-स्वरूपात आकलन होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून समाजात साधनेचा प्रसार करतांना बिंब-प्रतिबिंब न्यायानुसार साधनेत अडकलेल्या जिवाच्या साधनेच्या स्थितीचे कारण त्यांच्या लक्षात यायचे. साधकाच्या साधनेच्या संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना अंतर्मनातील सूक्ष्म ज्ञानातून मन आणि बुद्धी यांना विचार स्वरूपात आकलन व्हायचे. हे विचार म्हणजे गुरुकृपायोगानुसार साधनेतील सिद्धांत, तत्त्व आणि टाळायच्या चुका.

२ इ ३. गुरुकृपायोगातील सिद्धांत, तत्त्व आणि टाळायच्या चुका यांनुसार जिवाला मार्गदर्शन केल्यावर त्याला त्याची साक्ष मिळणे

गुरुकृपायोगातील सिद्धांत, तत्त्व आणि टाळायच्या चुका, यांनुसार जिवाला साधना सांगितल्यावर अल्प कालावधीत जिवात पालट दिसून यायचे. यातून गुरुकृपायोगाचे सिद्धांत, टाळायच्या चुका आणि तत्त्व यांचे प्रायोगिक महत्त्व सिद्ध झाल्यामुळे एकेका भागाची निर्मिती होत गेली.

२ इ ४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैज्ञानिक प्रकृती असल्यामुळे वैज्ञानिक पद्धतीने गुरुकृपायोगाची निर्मिती झाल्याने कलियुगाच्या शेवटपर्यंत कोट्यवधी जिवांना त्याचा लाभ होणार असणे

ईश्‍वरनिर्मित प्रत्येक आचरण, कृती, सिद्धांत आणि तत्त्व शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असते. काळमाहात्म्यानुसार जिवाची क्षमता न्यून झाल्यामुळे आचारातील परिपूर्णता न्यून होत जाते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रकृतीचा गुणधर्म वैज्ञानिक, म्हणजे ‘प्रायोगिक तपास करून मग निष्कर्षापर्यंत पोहोचणे’, असा आहे. यामुळे गुरुकृपायोगातील सिद्धांत, तत्त्व आणि चुका यांच्याही त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने चाचणी केल्या आहेत. त्यामुळे ते शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या सर्व दृष्टींनी अधिकाधिक परिपूर्ण झाले आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून गुरुकृपायोगाची वैज्ञानिक पद्धतीने निर्मिती झाल्यामुळे कलियुगाच्या शेवटपर्यंत कोट्यवधी जिवांना त्याचा लाभ होणार आहे.’

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गुरुकृपायोग सुचण्यामागील कारणे आणि त्यांचे प्रमाण

टीप १ – संदर्भ सूत्र ‘२ इ.’

 

४. ईश्‍वराने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना
माध्यम बनवण्यामागील त्यांची वैयक्तिक गुणविशेषता

 

५. इतर योगांच्या तुलनेत गुरुकृपायोगाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये

५ अ. सर्वसमावेशक

‘साधनेकडे आकृष्ट होणार्‍या अधिकांश जिवांच्या मनावर कोणत्या न कोणत्या योगमार्गातून साधना करण्याचा सूक्ष्म संस्कार असतो. अन्य योगमार्गांत साधनेच्या एकांग मार्गाचे विवरण असते. त्यामुळे ठराविक जीवच त्या योगमार्गाकडे आकृष्ट होतात. याउलट गुरुकृपायोगात सर्व योगमार्गांचा समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही योगमार्गातून साधना करणार्‍या जिवाला गुरुकृपायोगातील सिद्धांत, तत्त्व आणि अंग सहजतेने स्वीकारता येऊन साधना करता येते.

५ आ. प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा समतोल

अन्य योगमार्ग प्रवृत्ती प्रधान किंवा निवृत्ती प्रधान असतात. त्यामुळे जिवाला प्रारब्ध भोगण्यासाठी भोगयोनीत जन्म घ्यावा लागतो किंवा देवाण-घेवाण हिशोबामुळे तो जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकण्याची शक्यता असते. याउलट गुरुकृपायोगात प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचे समतोलत्व आहे. त्यामुळे जीव निवृत्तीमार्गी असूनही आपले कर्तव्यकर्म पूर्ण करत असल्यामुळे त्याचे प्रारब्ध संचित किंवा समष्टी प्रारब्ध यात रूपांतरित होत नाही, तसेच जीव प्रवृत्तीमार्ग अवलंबत असतांनाही मनातून निवृत्तीमार्गी रहातो. त्यामुळे मायेतील कर्मही साधना म्हणून घडत असल्याने त्याचे नवीन देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाहीत.

५ इ. व्यष्टीसह समष्टी साधनेची शिकवण

अन्य योगमार्गांत प्रथम व्यष्टी साधना पूर्ण करण्यास शिकवले जाते आणि मग जिवाची समष्टी साधना आरंभ होते. या प्रक्रियेत जिवाला अनेक जन्म घ्यावे लागतात. याउलट गुरुकृपायोगात व्यष्टीसह समष्टी साधना शिकवली जाते. त्यामुळे जिवाचा साधनेतील अमूल्य वेळ वाचून त्याची शीघ्र प्रगती होते.

५ ई. साधनेतील प्रायोगिक भाग शिकवणे

अन्य योगमार्गांत तात्त्विक माहिती अधिक प्रमाणात असते. तात्त्विक माहिती ज्ञानशक्तीशी निगडित असते. त्यामुळे सात्त्विकतेचे प्रमाण अल्प असलेल्या जिवांना योगमार्गातील तत्त्व कळत नाही. जिवांनी श्रद्धा ठेवून दीर्घकाळ साधना केल्यावर त्यांच्या सात्त्विकतेत वाढ होते आणि त्यांना योगमार्गातील तात्त्विक माहितीचे आकलन होऊन त्यानुसार आचरण करणे शक्य होते. याउलट गुरुकृपायोगात प्रायोगिक कृती अधिक प्रमाणात सांगितली आहे. प्रायोगिक कृती इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांच्याशी निगडित असते. त्यामुळे सात्त्विकतेचे प्रमाण न्यून असलेल्या जिवांनाही प्रायोगिक कृती समजून साधना आरंभ करणे सोपे होते.

५ उ. साधनेचे संस्कार जिवाच्या अंतर्मनावर करणे

अन्य योगमार्गांची रचना प्रकृतीपूरक (प्रकृतीला पूरक) नसते. त्यामुळे अन्य योगमार्गांतून साधना करतांना जिवाला आपल्या प्रकृतीमध्ये पालट करावे लागतात. या प्रक्रियेत जिवाचा अधिक संघर्ष होत असल्यामुळे त्याच्या अंतर्मनात साधनेचे संस्कार योग्य प्रकारे होत नाहीत. याउलट गुरुकृपायोगात प्रकृतीपूरक साधना असल्यामुळे जिवाच्या अंतर्मनावर साधनेचा प्रबळ संस्कार निर्माण होतो. अंतर्मनावरील साधनेच्या संस्कारामुळे जिवाची मृत्यूत्तरही उच्च लोकात साधना चालू रहाते.

५ ऊ. प्रारब्धभोगातूनही साधना करवून घेणे

अन्य योगमार्गांत ‘संकटकाळात साधना कशी करावी ?’, या संदर्भात मार्गदर्शन नसते. जिवाची आध्यात्मिक पातळी अधिक असल्यास त्याला साधनेतील तत्त्व आचरणात आणून प्रारब्धभोगातही साधना करता येते. याउलट गुरुकृपायोगात प्रारब्धभोगालाही साधना म्हणून भोगण्यास शिकवले जाते. त्यामुळे प्रारब्धभोगातही जिवाच्या साधनेत खंड न पडता त्याची साधना अखंड चालू रहाते.

५ ए. उत्तरोत्तर साधना शिकवणे

जिवाला मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही मार्गांतून साधना करावी लागते. अधिकांश जीव एक योगातून व्यष्टी साधना पूर्ण करून साधना पूर्ण करण्यासाठी अन्य योगमार्गांतून उत्तरोत्तर साधना करतात. एकाच योगमार्गातून साधना केल्यामुळे त्यांची उत्तरोत्तर साधनाही त्या योगमार्गातून होते, उदा. ज्ञानयोगातून व्यष्टी साधना करणार्‍या जिवाने ज्ञानोत्तर भक्ती आणि ज्ञानोत्तर कर्म करणे. याउलट गुरुकृपायोगात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचे समतोलत्व आहे. त्यामुळे गुरुकृपायोगातून साधनाप्रवास करणार्‍या जिवाला वेगळी उत्तरोत्तर साधना करावी लागत नाही. याउलट उत्तरोत्तर साधना करणे शेष असणार्‍या जिवांनी गुरुकृपायोगातून साधना केल्यास त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होते.

५ ऐ. विहंगम साधनापद्धत

अन्य योगमार्गांत जिवांच्या कुंडलिनीचक्रांतील एक-एक चक्र जागृत होते. याउलट गुरुकृपायोग हा विहंगम साधनामार्ग असल्याने त्यात मूलाधार-मणिपूर-अनाहत आणि आज्ञा या क्रमाने चक्रांची जागृती होते. यामुळे जिवाची कुंडलिनी जागृतीची यात्रा शीघ्र पूर्ण होते.

विहंगम मार्गात वायूतत्त्वधारणेचे प्राबल्य असल्याने अनाहतातून भावऊर्जेच्या साहाय्याने आज्ञाचक्राच्या भेदनाने मोठ्या प्रमाणात समष्टी स्तरावर प्रक्षेपणात्मक कार्य करता येते. ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गात समष्टीचा अवलंब असल्याने विहंगम मार्गाने प्रगती करता येते. (सनातन संस्था ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ शिकवते. – संकलक)’ [सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३.६.२००६, दुपारी १.३३] (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘साधना’)

५ ओ. जिवाला गुरुतत्त्वाशी एकरूप करणे

अन्य योगमार्गांतून साधना करतांना जीव निर्गुण ईश्‍वरी तत्त्व किंवा सगुण ईश्‍वरी तत्त्व यांच्याशी एकरूप होतो, उदा. ज्ञानयोगी शब्दातीत ईश्‍वराशी; भक्तीयोगी उपास्यदेवतेचे लोक, स्वरूप, गुण आणि सहवास यांच्याशी; कर्मयोगी निष्काम कर्माशी; नामसंकीर्तनयोगी नामाशी इत्यादी. सर्व योगमार्ग एकांगी असल्यामुळे त्या माध्यमातून जीव ईश्‍वराच्या एकाच रूपाशी एकरूप होतो. त्यामुळे त्याला पुढचे जन्म असण्याची शक्यता असते. याउलट गुरुकृपायोगानुसार साधना करतांना जीव अष्टांगयोगाने साधना करत असल्याने थेट गुरुतत्त्वाशी एकरूप होतो. गुरुतत्त्वात सर्व तत्त्वे समाविष्ट असल्याने जिवाला परिपूर्ण मोक्ष मिळतो. त्यामुळे त्याचा पुढे कोणताही जन्म होत नाही, उदा. संत भक्तराज महाराज.

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०१७)

 

६. गुरुकृपायोगाची व्याख्या

जो योगमार्ग श्रीगुरूंच्या कृपेवर आधारित आहे, जो योगमार्ग गुरूंची कृपा अल्पावधीत कशी संपादन करायची, याची शिकवण देतो आणि जो योगमार्ग गुरुकृपेच्या बळावर मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ करतो, तो मार्ग म्हणजे ‘गुरुकृपायोग’.

 

७. गुरुकृपायोगाला समानार्थी शब्द

‘सनातन संस्थेने सांगितलेली साधना’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला योगमार्ग’ हे गुरुकृपायोगाला समानार्थी शब्द असून ते बोलीभाषेत सर्रासपणे वापले जातात.

 

८. (परात्पर गुरु) डॉ. आठवले यांना गुरुकृपायोग सुचण्यामागील कारणे

८ अ. विविध युगे आणि उपयुक्त साधनामार्ग

८ आ. कलियुगातील मनुष्याच्या आयुष्याचा कालावधी मर्यादित असल्याने अल्पावधीत
परिणामकारक साधना करण्याचा महामंत्र गुरुकृपायोगानुसार साधनेद्वारे सांगितलेला असणे

कलियुगात सर्वसामान्य मनुष्याचे जीवन १०० वर्षांपेक्षा न्यून आहे. ८४ लक्ष योनींमध्ये केवळ मनुष्य जन्मातच साधना करून ईश्‍वरप्राप्ती करता येते. मनुष्य जन्माचे हे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता, मनुष्याला कलियुगात योग्य साधनामार्ग दाखवून त्याच्याकडून मोक्षप्राप्तीसाठी प्रभावी साधना होणे आवश्यक आहे. मनुष्याची ही आध्यात्मिक आवश्यकता लक्षात घेता, त्रिदेवांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेल्या प्रेरणेमुळे त्यांनी कलियुगातील मनुष्याला एकाच जन्मात मोक्षप्राप्ती करून देणारा गुरुकृपायोगाचा राजमार्ग दाखवला आहे.

८ इ. चार पुरुषार्थांपैकी ‘धर्म आणि मोक्ष’ या पुरुषार्थाची
पूर्तता करण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना सांगितलेली असणे

‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’, हे धर्माचे चार पुरुषार्थ आहेत. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगात अनुक्रमे मोक्ष, धर्म अन् अर्थ, हे पुरुषार्थ प्रबळ होते. कलियुगात मायेचा प्रभाव वाढल्याने आणि सर्वत्र अज्ञानाचे साम्राज्य स्थापन झाल्यामुळे कोणत्याही मार्गाने स्वेच्छापूर्ती करण्यास मनुष्य प्राधान्य देत आहे. त्यामुळे ‘काम’ हा पुरुषार्थ बलवान झालेला आहे. मनुष्याला कामनापूर्तीच्या इच्छेतून मुक्त करून त्याला मनुष्य जन्माचे उद्दिष्ट लक्षात आणून देण्यासाठी त्याला धर्मपरायण आणि साधनारत करणे अत्यंत आवश्यक आहे. गुरुकृपायोगानुसार सांगितलेल्या साधनेमुळे मनुष्याला धर्माचरण आणि साधना करण्याचे महत्त्व कळते अन् त्याची वाटचाल काम आणि अर्थ या पुरुषार्थांकडून धर्म अन् मोक्ष या पुरुषार्थांच्या दिशेने चालू होते. त्यामुळे त्याच्या मनुष्य जन्माचे सार्थक होते. धर्मदेवतेच्या प्रेरणेने मनुष्याचा धार्मिक आणि आध्यात्मिक स्तरावर उद्धार करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगाची निर्मिती केली आहे.

८ ई. गुरु-शिष्य परंपरा चालू ठेवण्यासाठी गुरुकृपायोगाची निर्मिती केलेली असणे

गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीचे भूषण आहे. भारतात मेकॉलेप्रणालीत पाश्‍चात्त्य शिक्षणपद्धतीच्या उदात्तीकरणामुळे भारतीय गुरुकुलाची पारंपरिक शिक्षण व्यवस्था नष्ट झाली. त्याचप्रमाणे पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे भारतातील गुरुशिष्य परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. गुरु-शिष्य परंपरा चालू ठेवून शिष्याला गुरुकृपा अनुभवण्यास मिळावी आणि त्याची आध्यात्मिक क्षेत्रात शीघ्र उन्नती व्हावी, यासाठी गुरुकृपेचा पाया असणार्‍या योगमार्गाची निर्मिती करणे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत आवश्यक होते. यासाठी महर्षि व्यासांसारख्या थोर ऋषिमुनींच्या प्रेरणेने आणि दत्तगुरूंचे रूप असणार्‍या संत भक्तराज महाराज यांच्या कृपाशीर्वादाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगाची निर्मिती केली आहे.

 

९. गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने साधकांची प्रगती लवकर होण्यामागील कारणे

३०.११.२०१५ या दिवसापर्यंत सनातन संस्थेत सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने ७६ साधकांनी संतपद आणि १११३ साधकांनी ६१ टक्के पातळी गाठली आहे. इतर योगमार्ग आणि अन्य संप्रदाय यांनुसार साधना करणार्‍यांच्या तुलनेत गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने साधकांची प्रगती लवकर होण्यामागील कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

९ अ. अन्य संप्रदायांप्रमाणे सनातन संस्थेतील साधकांना गुरुमंत्र
दिला न जाणे आणि साधकांंच्या प्रकृतीनुसार त्यांना मोक्षप्राप्ती करण्यासाठी
ज्या देवतेचे तत्त्व वाढवणे आवश्यक आहे, त्याच देवतेचा नामजप करण्यास सांगितला जाणे

गुरुकृपायोगानुसार सांगितलेली साधना ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या तत्त्वावर आधारित असल्यामुळे भिन्न भिन्न प्रकृतीच्या साधकांना एकच गुरुमंत्र दिला जात नाही. त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि त्यांना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी काळानुसार वेगवेगळे नामजप दिले जातात. प्रत्येक साधकाला त्याच्या प्रकृतीनुसार मोक्षप्राप्ती करण्यासाठी त्याने ज्या देवतेचे तत्त्व वाढवणे आवश्यक आहे, त्याच देवतेचा नामजप करण्यास सांगितला जातो. त्यामुळे साधकातील आध्यात्मिक कमतरता लवकर भरून निघतात आणि त्याच्या प्रकृतीनुसार योग्य नाम मिळाल्यामुळे ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या देवतेची सूक्ष्मतम स्पंदने त्याच्या सूक्ष्म देहांशी जुळतात. त्यामुळे त्याची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होते.

९ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया प्रभावीपणे
राबवल्याने चित्तशुद्धीची प्रक्रिया अल्पावधीत पूर्ण होऊन आध्यात्मिक उन्नती जलद होणे

अन्य संप्रदायात केवळ देवाचा नामजप करण्यास, पोथी वाचण्यास आणि प्रासंगिक सेवा करण्यास सांगितले जाते. त्यामुळे साधनेची तत्त्वे चित्तापर्यंत खोलवर रुजत नाहीत. सनातन संस्थेमध्ये सांगितलेल्या साधनेअंतर्गत अष्टांग साधनेतील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यावर विशेष भर दिला जातो. पूर्णकालीन, अर्धकालीन आणि प्रासंगिक सेवा करणारे साधक स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन यांची प्रक्रिया नियमितपणे राबवतात. त्यामुळे त्यांच्या चित्तावर स्वभावदोष आणि अहं यांच्या रूपाने असणारे जन्मोजन्मीचे कित्येक संस्कार पुसले जाऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते. त्यामुळे त्यांच्या साधनेचा व्यय वाचतो आणि त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती होते.

९ इ. साधकांमध्ये जागरूकता निर्माण केल्याने त्यांच्या साधनेचा व्यय न होणे

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार, म्हणजे गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकांना त्यांची साधना कुठे व्यय होते, याविषयी त्यांच्यात जागरूकता निर्माण केली जाते. यासाठी साधकांना एकमेकांच्या चुका लक्षात आल्यावर ते लगेच एकमेकांना त्याची जाणीव करून देतात. उदा. काही जणांमध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू तीव्र असल्यास त्यांना त्यांची जाणीव करून दिली जाते अन् स्वभावदोष, तसेच अहं निर्मूलन प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यास सांगितले जाते. एखाद्याला वाईट शक्तींचा तीव्र त्रास असेल, तर त्याला आध्यात्मिक उपाय वाढवण्यास सांगितले जाते. साधकांमध्ये साधनेविषयी जागरूकता निर्माण केल्यामुळे त्यांच्या साधनेचा व्यय न होता त्यांची अध्यात्मात शीघ्र उन्नती होते.

९ ई. गुरुकृपायोगानुसार साधनेत साधकाच्या विविध देहांचा संपूर्ण
सहयोग असल्याने तन, मन, धन, बुद्धी आणि अहं यांचा १०० टक्के त्याग होणे

विविध संप्रदायांनी सांगितलेल्या साधनेमुळे व्यक्तीच्या साधनेत त्याच्या एक किंवा दोन देहांचा सहभाग केला जातो, उदा. पायी चालून वारीसारखी तीर्थयात्रा करणे, बुद्धीचा वापर करून विविध ग्रंथांचा अभ्यास करणे, हठयोगानुसार शरिराला त्रास देऊन साधना करणे इत्यादी. सनातन संस्थेमध्ये शिकवण्यात आलेल्या साधनेमुळे व्यक्तीचे सर्व देह त्यात सहभागी होतात, उदा. स्थुलातून सेवा करणे, मनाने नामजप आणि प्रार्थना करणे, बुद्धीने नियोजन आणि साधनेचे चिंतन करणे, अहंवर लक्ष ठेवून कर्तेपणा ईश्‍वरचरणी अर्पण करणे. गुरुकृपायोगानुसार केेलेल्या साधनेमुळे व्यक्तीच्या सर्व देहांचा साधनेत पूर्ण सहभाग होऊन साधकाचे तन, मन, धन, बुद्धी आणि अहं यांचा १०० टक्के त्याग होऊन साधकाची परिपूर्ण साधना होते.

९ उ. गुरुकृपायोगानुसार सांगितलेली साधना केल्याने साधकाच्या
पिंडाची शुद्धी होऊन साधकाचा ‘व्यष्टी साधनेअंतर्गत पिंडी ते ब्रह्मांडी आणि समष्टी
साधनेच्या अंतर्गत ब्रह्मांडी ते पिंडी’ हा प्रवास पूर्ण होऊन त्याची वाटचाल मोक्षाकडे शीघ्रतेने चालू होणे

गुरुकृपायोगातील ‘अनेकातून एकात, स्थुलातून सूक्ष्मात, पातळीनुसार साधना, काळानुसार साधना, वर्णानुसार साधना आणि आश्रमानुसार साधना’, ही साधनेची सहा तत्त्वे कृतीत आणल्यामुळे साधकाच्या साधनेला पूर्णत्व प्राप्त होते. अशाप्रकारे गुरुकृपायोगाद्वारे विविध तत्त्वे आणि सिद्धांत यांनुसार साधना झाल्याने साधकाच्या पिंडाची शुद्धी होऊन साधकाचा ‘व्यष्टी साधनेअंतर्गत पिंडी ते ब्रह्मांडी आणि समष्टी साधनेअंतर्गत ब्रह्मांडी ते पिंडी’ हा प्रवास पूर्ण होतो. साधकाच्या योग्य साधनेमुळे ब्रह्मांडातील उच्च लोकांमध्ये त्याची सूक्ष्मातून साधनेची स्थाने निर्माण होतात. त्यामुळे त्याची वाटचाल मोक्षप्राप्तीकडे शीघ्रतेने चालू होते.

 

१०. इतर योगांच्या तुलनेत गुरुकृपायोगाचे महत्त्व आणि गुरुकृपायोगाची वैशिष्ट्ये

१० अ. विविध योगमार्गांचा संगम असणे

गुरुकृपायोगामध्ये ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, ध्यानयोग, हठयोग, नामसंकीर्तनयोग, कुंडलिनीयोग, शक्तीपातयोग इत्यादी सर्व योगमार्गांचा सुरेख मिलाप झालेला आहे. त्यामुळे गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकाला विविध योगमार्गानुसार साधना केल्याचे लाभ होतात आणि त्याच्या साधनेला पूर्णत्व प्राप्त होते.

१० आ. विविध साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांनुसार साधनेतील कृती

१० आ १. भक्तीयोग

१० आ १ अ. कर्मकांड

१० आ १ अ १. गुरुकृपायोगानुसार साधनेतील कृती

१० आ १ अ १ अ. देवतांचे यज्ञयाग, हवन आणि पूजाअर्चा करणे

सूक्ष्मातील आसुरी शक्तींच्या आक्रमणापासून साधक आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे रक्षण होण्यासाठी अन् व्यष्टी, तसेच समष्टी साधनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर होण्यासाठी विविध संत, ज्योतिषविशारद आणि महर्षि, तसेच नाडीपट्टीवाचक यांनी वेळोवेळी सांगिल्याप्रमाणे सनातनचे पुरोहित साधक विशिष्ट देवतांचा यज्ञयाग, हवन आणि विशिष्ट पूजा-अर्चा करतात.

१० आ १ अ १ आ. जागृत देवस्थानात जाऊन देवतेचे दर्शन घेणे आणि देवतेला अभिषेक घालणे

काही वेळा साधक सनातन संस्थेच्या वतीने विशिष्ट ठिकाणी असणार्‍या देवतांच्या जागृत देवस्थानातील देवतांचे दर्शन घेतात आणि काही वेळा देवतांना अभिषेक घालून त्यांचे कृपाशीर्वाद प्राप्त करतात.

१० आ १ अ १ इ. दृष्ट काढणे आणि उतारे ठेवणे

साधकांना लागलेली दृष्ट किंवा करणीचा प्रभाव दूर करण्यासाठी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांची दृष्ट काढली जाते आणि त्यांना त्रास देणार्‍या सूक्ष्म शक्तींसाठी विशिष्ट उतारे ठेवले जातात.

१० आ १ आ. उपासनाकांड

१० आ १ आ १. गुरुकृपायोगानुसार साधनेतील कृती

१० आ १ आ १ अ. भावपूर्ण कृती करणे

नामजप, सेवा आणि व्यष्टी, तसेच समष्टी साधनेच्या अंतर्गत होणारी प्रत्येक कृती करतांना साधक ती अधिकाधिक भावपूर्ण करण्यावर भर देतात.

१० आ १ आ १ आ. भावसत्संगात सांगितल्याप्रमाणे भाववृद्धीसाठी प्रयत्न करणे

सप्ताहातून एकदा घेतल्या जाणार्‍या राष्ट्रीय भाववृद्धी सत्संगाला उपस्थित राहून साधक सत्संगात सांगितल्याप्रमाणे भावजागृतीसाठी प्रयत्न करतात.

१० आ १ आ १ इ. मानसपूजा आणि मानस नमस्कार करणे

प्रत्यक्ष पूजा करण्याऐवजी मानसपूजा करणे आणि संतांना प्रत्यक्ष नमस्कार करण्याऐवजी मानस नमस्कार करणे इत्यादी कृती करण्यास साधकांना शिकवले जाते.

१० आ १ आ १ ई. प्रेमभाव आणि प्रीती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे

हे विश्‍वची माझे घर, या टप्प्याला जाण्यासाठी साधक स्वत:मध्ये प्रेमभाव आणि निरपेक्ष प्रीती वाढवण्यासाठी प्रतिदिन प्रयत्न करतात.

१० आ २. कर्मयोग

१० आ २ अ. गुरुकृपायोगानुसार साधनेतील कृती

१० आ २ अ १. व्यष्टी साधनेअंतर्गत सत्सेवा आणि त्याग करणे

साधक व्यष्टी साधनेअंतर्गत सत्सेवा आणि त्याग करतात.

१० आ २ अ २. समष्टी साधनेअंतर्गत राष्ट्र अन् धर्म सेवा करणे

साधक समष्टी साधनेअंतर्गत आपत्कालीन सेवा, विविध उपक्रम आणि आंदोलने करून राष्ट्र अन् धर्म सेवा करतात.

१० आ ३. ज्ञानयोग

१० आ ३ अ. गुरुकृपायोगानुसार साधनेतील कृती

साधक अंतर्मुख होऊन स्वत:कडून शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि अहं या स्तरांवर होणार्‍या चुकांचा अभ्यास करून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतात, तसेच ती अधिकाधिक परिणामकारक करण्यासाठी प्रयत्न करतात.

१० आ ४. ध्यानयोग

१० आ ४ अ. गुरुकृपायोगानुसार साधनेतील कृती

१० आ ४ अ १. साधनेचे प्रयत्न एकाग्रतेने करणे

साधक नामजप, सेवा आणि साधनेची विविध अंगे एकाग्रतेने करण्यासाठी प्रयत्न करतात.

१० आ ४ अ २. संतांनी ध्यान लावणे

सनातनचे काही संत नामजप करत ध्यान लावून साधकांवर आध्यात्मिक उपाय करतात.

१० आ ५. तंत्रमार्ग

१० आ ५ अ. गुरुकृपायोगानुसार साधनेतील कृती

नामजप आणि आध्यात्मिक उपाय करतांना स्वत:भोवती विभूती किंवा विभूतीचे पाणी यांचे मंडल काढणे, देहामध्ये ज्या ठिकाणी आध्यात्मिक त्रास होत असेल, त्या ठिकाणी हातांनी मुद्रा आणि न्यास करून नामजप करणे अन् स्वत:भोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी प्रार्थना करणे, असे प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे साधक श्रीयंत्र, मृत्यूंजय यंत्र आदी संतांनी सिद्ध केलेले विविध देवतांचे यंत्र घालतात.

१० आ ६. कुंडलिनीयोग

१० आ ६ अ. गुरुकृपायोगानुसार साधनेतील कृती

साधकांची कुंडलिनीशक्ती जागृत होण्यासाठी आणि कुंडलिनीचक्रांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून संरक्षण होण्यासाठी देहातील सप्तचक्रांवर काळानुसार विविध देवतांची चित्रे किंवा नामपट्ट्या आध्यात्मिक उपायांतर्गत लावण्यास सांगितले जाते.

१० आ ७. शक्तीपातयोग

१० आ ७ अ. गुरुकृपायोगानुसार साधनेतील कृती : साधकांना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाचे निवारण करण्यासाठी काही संतांनी सनातनच्या साधकांवर नेत्रउपाय, हस्तउपाय, मुद्राउपाय इत्यादी उपाय करून त्यांच्या देहामध्ये कार्यरत झालेल्या दैवी शक्तीचा प्रवाह साधकांकडे संक्रमित केला.

१० आ ८. नामसंकीर्तनयोग

१० आ ८ अ. गुरुकृपायोगानुसार साधनेतील कृती

१० आ ८ अ १. कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करणे

प्राथमिक टप्प्यातील साधक साधनेला आरंभ केल्यावर स्वत:च्या कुलदेवीचा नामजप करतात आणि पितरांच्या त्रासानुसार प्रतिदिन ३, ६ किंवा ९ माळा दत्ताचा नामजप करतात.

१० आ ८ अ २. काळानुसार साधना करतांना विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट देवतेचा नामजप करणे

दीर्घकाल साधना करणारे साधक केवळ एका विशिष्ट देवतेचा नामजप न करता काळानुसार साधना करतांना विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट देवतेचा नामजप करतात उदा. सध्या साधक काळानुसार ॐ नमो भगवते वासुदेवाय । हा नामजप करतात.

१० आ ८ अ ३. विकारनिर्मूलन आणि प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार विविध देवता, अंक आणि तत्त्व यांचा नामजप करणे

विकारनिर्मूलन आणि प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार आध्यात्मिक उपाय करतांना साधक विविध देवता, अंक, तत्त्व इत्यादींचा नामजप करतात.

१० आ ९. मंत्रयोग

१० आ ९ अ. गुरुकृपायोगानुसार साधनेतील कृती

विकार निर्मूलन आणि आध्यात्मिक त्रासाचे निवारण करण्यासाठी संत  विविध देवतांचे मंत्र किंवा स्तोत्र म्हणतात आणि साधक ते श्रद्धेने ऐकतात.

१० आ १०. संमिश्र

१० आ १० अ. गुरुकृपायोगानुसार साधनेतील कृती

साधक स्वत:मध्ये विविध गुणांची वृद्धी करण्यासाठी गुणसंवर्धनासाठी प्रयत्न करतात.

१० इ. गुरुकृपायोगानुसार सांगितलेली साधना अन्य योगमार्गांच्या तुलनेत कळण्यास सुलभ असणे

ज्ञानमार्गानुसार विविध ग्रंथांचा अभ्यास करून त्यांचा भावार्थ समजून घेणे, ध्यानयोगानुसार जंगलात जाऊन ध्यान लावणे किंवा विशिष्ट आसनबद्ध होऊन समाधी अवस्थेत जाणे किंवा कर्मयोगानुसार निष्काम कर्म करणे, यांसारख्या साधना कलियुगातील सर्वसामान्य व्यक्तीला करणे कठीण जाते. याउलट सनातन संस्थेने गुरुकृपायोगानुसार सांगितलेली साधना कोणत्याही वयाच्या, लिंगाच्या, प्रांताच्या, भाषेच्या, जातीच्या, पंथाच्या किंवा देशाच्या जिज्ञासू आणि मुमुक्षु यांना करता येते. ही साधना व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि त्याचे शिक्षण यांवरही अवलंबून नाही. त्यामुळेे गुरुकृपायोगानुसार सांगितलेली साधना सर्वांना कळण्यास आणि कृतीत आणण्यास अत्यंत सुलभ आहे.

१० ई. सनातनची ग्रंथसंपदा, म्हणजे पाचवा वेद हा गुरुकृपायोगाचे भूषण असणे

सनातनने जून २०१९ पर्यंत ३१६ ग्रंथांच्या १७ भाषांत ७६ लाख ८६ सहस्र प्रती प्रकाशित केल्या आहेत. सनातनची ग्रंथसंपदा म्हणजे पाचवा वेद आणि कलियुगातील ज्ञानसंजीवनी आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेला गुरुकृपायोग आणि त्यांची अनमोल शिकवण ही ग्रंथरूपाने पृथ्वीवर अजरामर रहाणार आहे. सनातनची अनमोल ग्रंथसंपदा हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या गुरुकृपायोगाचे भूषण आहे. या ग्रंथांमध्ये विविध योगमार्गांनुसार साधना करणार्‍या साधकांना त्यांचा योगमार्ग गुरुकृपायोगाला जोडून शीघ्रतेने मोक्षप्राप्ती करण्याचे सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे.

१० उ. प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही मार्गातील साधकांसाठी पूरक असणे

सनातन संस्थेमध्ये सांगितलेली साधना ही प्रवृत्ती, म्हणजे मायेत राहून साधना करणार्‍या आणि निवृत्ती, म्हणजे मायेचा त्याग करून साधना करणार्‍या, अशा दोन्ही प्रकारच्या साधकांसाठी पूरक अन् पोषक आहे. त्यामुळे प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही मार्गातील साधकांना गुरुकृपायोगानुसार सांगितलेल्या साधनेचे विशेष आकर्षण वाटते.

१० ऊ. संसारात राहून साधना करण्याची शिकवण देणे

काही संप्रदाय संसाराचा, म्हणजे मायेचा पूर्ण त्याग करून, म्हणजे सर्वसंग परित्याग करून संन्यासाची दीक्षा घेऊन साधना करण्यास सांगतात. याउलट सनातन संस्थेमध्ये अशा कोणत्याही प्रकारची सक्ती न करता सहजस्थितीत साधना करण्याची शिकवण दिली जाते. गुरुकृपायोगानुसार सांगितलेल्या साधनेनुसार मनुष्य जन्माची दोन उद्दिष्ट्ये आहेत. प्रारब्धाचे भोग भोगून संपवणे आणि मोक्षप्राप्तीसाठी साधना करणे. मनुष्याचा जन्म, विवाह आणि त्याचा मृत्यू, हे त्याच्या प्रारब्धानुसारच घडतात. त्यामुळे गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकांना संसारात राहून साधना करण्याची शिकवण दिली जाते. त्यामुळे बहुतांशी साधक त्यांचा संसार सांभाळून साधना करतात, तर काही साधक त्यांच्या इच्छेने संसाराचा त्याग करून पूर्णवेळ साधना करतात.

१० ए. व्यष्टीसह समष्टी साधना करण्यावर भर दिला असणे

अन्य संप्रदायांमध्ये केवळ व्यष्टी साधना करण्यावर विशेष भर दिला जातो. त्यांना समष्टी साधनेअंतर्गत समाजात जाऊन धर्मप्रसार किंवा अध्यात्मप्रसार करणे, धर्महानी रोखण्यासाठी प्रयत्न करणे, हिंदूसंघटन करणे इत्यादी गोष्टी माहितच नसतात. मोक्षप्राप्ती करण्यासाठी केवळ व्यष्टी किंवा केवळ समष्टी साधना करून लाभ होत नसल्याने दोन्ही प्रकारची साधना करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सनातन संस्थेमध्ये गुरुकृपायोगानुसार सांगितलेल्या साधनेत व्यष्टीसह समष्टी साधना करण्यावर भर दिला जातो.

१० ऐ. कोणताही आर्थिक व्यय न करता गुरुकृपायोगानुसार विनामूल्य साधना करण्यास सांगितली जाणे

काही संस्था त्यांच्याकडे येणार्‍या जिज्ञासू आणि साधक यांच्याकडून प्रवचनासाठी, विशिष्ट प्रकारच्या साधनेसाठी किंवा त्यांच्या आश्रमात रहाण्यासाठी शुल्क आकारतात. सनातन संस्थेने आयोजित केलेले प्रवचन, उपक्रम, धर्मसभा, कार्यशाळा किंवा सत्संग यांमध्ये जिज्ञासू आणि साधक यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेशमूल्य आकारले जात नाही. राष्ट्र, धर्म आणि साधना यांसाठी कार्यरत असणार्‍या सनातन संस्थेसाठी कोणी पैसे, वस्तू किंवा जाहिरात स्वेच्छेने अर्पण म्हणून देत असल्यास सनातन संस्था ती स्वीकारते. कोणालाही अर्पण करण्यासाठी बाध्य केले जात नाही. हे सनातन संस्थेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असणार्‍या प्रामाणिक, जिज्ञासू आणि तीव्र तळमळ असणार्‍या कोणत्याही व्यक्तीला सनातन संस्थेनुसार सांगितलेली व्यष्टी आणि समष्टी स्तरावरील साधना करतांना ताण येत नाही अन् ती सहजतेने होते.

१० ओ. साधनेच्या जोडीला समाजाविषयी
संवेदना जागृत ठेवून समाजसाहाय्य करण्याची शिकवण दिली जाणे

प्रत्येक नागरिक हा समाजाचा एक घटक आहे. त्यामुळे त्याच्या मनात तो रहात असलेल्या समाजाविषयी संवेदना जागृत असायला हव्यात आणि त्याने त्याचे सामाजिक कर्तव्यही पूर्ण केले पाहिजे. याची शिकवण सनातन संस्थेत दिली जाते. त्यानुसार समाजावर विविध नैसर्गिक आणि मानवी आपत्ती कोसळल्यानंतर त्यांना प्रथमोपचार देणे अन् आपत्कालीन साहाय्य करणे, यांसाठी सनातनचे साधक, जोडलेले धर्माभिमानी अन् राष्ट्रप्रेमी नागरिक तत्पर असतात. समाजसाहाय्याच्या अंतर्गत गरजूंना कपडे, पुस्तके, फळे आणि अन्नपदार्थ यांचे वाटप करणे, मंदिरांची स्वच्छता करणे, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणे, माहितीच्या अधिकाराचा समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या कल्याणासाठी प्रभावीपणे वापर करणे इत्यादी कृती शिकवल्या जातात.

१० औ. साधनेच्या जोडीला राष्ट्रप्रेम जोपासण्याची शिकवण दिली जाणे

सनातन संस्थेमध्ये गुरुकृपायोगानुसार सांगितलेल्या साधनेअंतर्गत साधकांमध्ये समष्टीभाव निर्माण होण्यासाठी साधना शिकवली जाते. त्याप्रमाणे साधकांना समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्याची शिकवण दिली जाते. भारतभूमी पृथ्वीवरील सर्वांत पवित्र भूमी आहे. साधकांना भारतात जन्म मिळणे, हे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे. त्यामुळे साधकांनी साधना करतांना ते भारताचे उत्तरदायी नागरिक आहेत, हे सूत्र लक्षात ठेवून राष्ट्रप्रेम जोपासले पाहिजे आणि राष्ट्ररक्षणासाठी तत्पर असायला हवे, अशी शिकवण दिली जाते. त्याप्रमाणे साधक इतिहासाचे विकृतीकरण, भारताच्या नकाशाचे विकृतीकरण, भारतमातेचे विडंबन, राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा अवमान, राष्ट्रध्वजाची विटंबना, राष्ट्रगीताचा अवमान आदी गैरप्रकारांविरुद्ध सदैव जागृत राहून त्याविरोधात तत्परतेने कृती करतात.

१० अं. साधनेच्या जोडीला धर्माचरण करण्याची शिकवण दिली जाणे

सनातन संस्थेमध्ये गुरुकृपायोगानुसार सांगितलेल्या साधनेच्या अंतर्गत हिंदु धर्माचे अद्वितीय महत्त्व आणि धर्माचरणाचे महत्त्व साधकांच्या मनावर बिंबवले जाते. त्यानुसार आचारधर्माचे पालन करणे आणि हिंदु धर्मशास्त्रानुसार आचरण करणे, म्हणजे धर्माचरण करणे यावर सनातन संस्थेत विशेष भर दिला जातो. त्यामुळे सनातनचे साधक कपाळाला कुंकवाचा टिळा लावतात, स्त्रिया केस मोकळे न सोडता वेणी किंवा आंबाडा घालतात, स्त्रिया जीन्स किंवा स्कर्ट न घालता सलवार आणि कुर्ता घालतात किंवा साडी नेसतात. अनेक साधक हिंदु धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सण आणि उत्सव साजरे करतात, तसेच पूजाअर्चा, व्रतवैकल्ये अन् यज्ञयाग करतात. सनातन संस्थेत धर्माचरणाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र शिकवले जाते. त्यामुळे साधकांना धर्माचरण केल्यामुळे होणारे लाभ सहजतेने लक्षात येतात आणि त्यांच्याकडून साधनेसह धर्माचरणाच्या कृतीही उत्स्फूर्तपणे अन् श्रद्धेने केल्या जातात.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०१७)