हिंदु राष्ट्र येणार, ही काळ्या दगडावरची रेघ ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड आणि
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचे निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करू ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

वडणगे (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु धर्मजागृती सभा

अधिवक्ता समीर पटवर्धन

वडणगे (कोल्हापूर) – सध्या हिंदु धर्मावर आघात होत आहेत. हिंदु धर्मात फूट पाडण्याची प्रथाच निर्माण झाली आहे. सनातनच्या निरपराध साधकांना अडकवून सडवण्याचा प्रयत्न पूर्वीपासूनच चालू आहे. श्री. समीर गायकवाड याला एकही अधिवक्ता न मिळण्यासाठी पुरोगाम्यांनी प्रयत्न केले; मात्र ३१ हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची फौज समीरच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर दबाव निर्माण झाला. डॉ. तावडे यांचेही निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करण्यात येईल, असे परखड मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी ४ डिसेंबरला येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत व्यक्त केले. या वेळी व्यासपिठावर सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाचे समन्वयक श्री. किरण दुसे उपस्थित होते. सभेला ७०० जिज्ञासूंची उपस्थिती होती.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत ! – किरण दुसे

हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत; कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि प्रभु श्रीरामाची वानरसेना आहोत. पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत येथे मुसलमानांची संख्या झपाट्याने वाढून हिंदूंची संख्या घटत आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही.

हिंदु राष्ट्र येणार, ही काळ्या दगडावरची रेघ ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

साधकांचा छळ करून सनातनला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही कायद्याच्या बाजूने राहून कॉम्रेड पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यानेच श्री. समीर गायकवाड यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसतांना त्यांना त्रास दिला गेला. खोटे साक्षीदार उभे करून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली गेली. हिंदु राष्ट्र येणारच, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

सभा यशस्वी न होण्यासाठी करणीचा उतारा, तर साधकांना सभेच्या ठिकाणी गरूडदर्शन !

सभा पार पाडू नये, यासाठी सभास्थळी अज्ञातांनी करणीचा उतारा टाकला होता. तरीही सेवा करणार्‍या साधकांना गरूडदर्शन झाले. ईश्‍वर पाठीशी असल्यामुळे सभेत कोणतेही विघ्न न येता सभा यशस्वीपणे पार पडली !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी काही साधकांना सुगंध आला. सद्गुरु ताईंनीही सूक्ष्मातून पुष्पवृष्टी झाल्याचे सांगितले.

क्षणचित्रे

१. सभेला भाजप आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

२. वडणगे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत मैदान आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली.

३. वडणगे येथे प्रथमच मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात