हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समस्त हिंदूंनी सहभागी व्हावे ! – श्रीधर पै, विश्वस्त, श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थान, मुनियाल

मुनियाल (उडुपी) येथील हिंदु धर्मजागृती सभा

व्यासपिठावर डावीकडून सौ. लक्ष्मी पै, डॉ. (सौ.) श्रीकला जोशी, श्री. श्रीधर पै (दीपप्रज्वलन करतांना) आणि श्री. विजय कुमार

मुनियाल (उडुपी) – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समस्त हिंदूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानाचे विश्‍वस्त श्री. यं. श्रीधर पै यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानातील श्री पद्मावत कला मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.

या वेळी श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानाचे विश्‍वस्त श्री. श्रीधर पै, रणरागिणी शाखेच्या सौ. लक्ष्मी पै, सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) श्रीकला जोशी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय कुमार उपस्थित होते. सभेचा आरंभ शंखनाद आणि वेदमंत्रपठण यांनी झाला. त्यानंतर श्री. पै यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री विवेक पै यांनी सूत्रसंचालन केले.

सौ. लक्ष्मी पै म्हणाल्या, आपली संस्कृती मातृशक्तीचा आदर करणारी आहे. तथापि पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आज समाज दिशाहीन झाला आहे. समाजात वाढत चाललेली अश्‍लीलता, लव्ह जिहाद आदींच्या विरोधात महिलांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. यासाठी महिलांनी धर्मशिक्षण घेऊन स्वत:मध्ये ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज निर्माण करण्याचीही आवश्यकता आहे.

पोलिसांनी हिंदुत्वाचे काम केले, असे एकतरी उदाहरण आहे का ?

मी पोलीस असलो, तरी हिंदुत्वाचे काम करू शकत नाही का ? – सभास्थळी प्रवेश करू पहाणार्‍या पोलिसाचा प्रश्‍न

सभा चालू असतांना पोलीस तेथे आले. त्यांच्याकडे विचारणा केल्यावर त्याने मी पोलीस असलो, तरी हिंदुत्वाचे काम करू शकत नाही का ?, असा प्रश्‍न विचारला. यानंतर त्यांनी सभास्थळी प्रवेश केला, तसेच सभास्थळी लावण्यात आलेले प्रदर्शन पाहून त्यातील काही वस्तूही घेतल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात