हिंदु धर्मावरील आक्रमण निपटण्यासाठी संघटित व्हा ! – कु. भव्या गौडा, सनातन संस्था

हिंदु धर्म ही एक आदर्श जीवनपद्धती आहे ! – टी.एन्. कुमारस्वामी

मरसुरू (बेंगळुरू) येथे हिंदु धर्मजागृती सभा

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून कु. भव्या गौडा, टी.एन्. कुमारस्वामी आणि श्री. मोहन गौडा

मरसुरू (बेंगळुरू) – हिंदु धर्म ही एक आदर्श जीवनपद्धती आहे. हिंदु धर्म हा संपूर्ण मानवजातीसाठी असून तो आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक आहे. धर्माचरण केल्याने गोहत्या आणि स्वभाषा यांचा अवमान यांसारख्या समस्या सुटू शकतात, असे उद्गार ज्येष्ठ लेखक श्री. टी.एन्. कुमारस्वामी यांनी येथे केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेंगळुरू जिल्ह्यातील मरसुरू या गावात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा आणि सनातन संस्थेच्या कु. भव्या गौडा उपस्थित होत्या.

हिंदु धर्मावरील आक्रमण निपटण्यासाठी संघटित व्हा ! – कु. भव्या गौडा, सनातन संस्था

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी सनातन संस्थेवर खोटे आरोप करून संस्थेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चालू आहे. हिंदु धर्मावरील अशा आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे.

भारत हिंदु राष्ट्र घोषित करा ! – मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

हिंदुबहुल भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली हिंदूंवरच अन्याय केला जात आहे. एकीकडे सरकारकडून हज यात्रेसाठी अनुदान दिले जाते; मात्र हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी रेल्वे तिकिटाची दरवाढ केली जाते. हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण केले जात असून मंदिरांचा कोट्यवधी रुपयांचा निधी लुटला जात आहे. आतंकवाद्यांचा भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचा डाव आहे. या पार्श्‍वभूमीवर भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे.

या धर्मसभेला २३० धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. सभेनंतरच्या संवाद कार्यक्रमात ३६ धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला. या वेळी त्यांनी आणखी विविध ठिकाणी ३ धर्मजागृती सभा आयोजित करण्याची, तसेच धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात