उद्योजकांनो, वैश्य वर्णाच्या माध्यमातून साधना करत अध्यात्मप्रसार करा ! – प्रदीप खेमका, सनातनचे बंगाल आणि झारखंड राज्य धर्मप्रसारक तथा उद्योगपती

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात
भावपूर्ण वातावरणात पार पडलेले उद्योगपती साधना शिबीर

रामनाथी (गोवा) – माझ्या कार्यालयातील कामगारांना साधना सांगितल्याने प्रतिवर्षी ते गुरुपौर्णिमेसाठी अर्पण गोळा करतात. त्यांची श्रीगुरूंवर श्रद्धा आहे. यामुळे ते कामासह साधनेलाही महत्त्व देतात. कार्यालयातील ध्यानमंदिरात प्रतिदिन आरती केली जाते. त्यातूनही त्यांना आनंद मिळतो. स्वतः साधना केल्याने आणि सहकार्‍यांकडून करवून घेतल्याने आस्थापनातील सहकारी अन् कामगार यांच्यात विश्‍वासार्हता निर्माण झाली आहे. व्यवसायात साहाय्य करणारे सर्व सहकारी साधक बनले, तर व्यवसायातील कार्यही सहजतेने होते, हे मी अनुभवले आहे. त्यामुळे वैश्य वर्णाच्या माध्यमातून साधना करत कार्यालयात साधनेचा प्रसार करा, असे आवाहन सनातनचे ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे बंगाल आणि झारखंड राज्य धर्मप्रसारक तथा उद्योगपती श्री. प्रदीप खेमका यांनी उद्योगपती साधना शिबिराचा समारोपीय सत्रात केले.

श्री. प्रदीप खेमका

२५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत सनातन आश्रम, रामनाथी येथे उद्योगपती साधना शिबीर पार पडले. शिबिरात कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, उत्तरप्रदेश, झारखंड, तसेच देहली येथील उद्योगपती सहभागी झाले होते.

श्री. खेमका पुढे म्हणाले, साधना करू लागल्यावर संतांनी सांगितल्यानुसार राम करे काम, हम करे आराम। हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. साधनेसाठी वा धर्मकार्यासाठी वेळ देत असतांना श्रीगुरुच माझा व्यवसाय सांभाळतात. मी जेव्हा जेव्हा या कार्यासाठी वेळ देतो, त्या काळात माझा व्यवसाय दुप्पट होतो, असे मला अनुभवास येते. या सत्रात अन्य सहभागी उद्योजकांनी साधनेला आरंभ केल्याने झालेले लाभ, साधना म्हणून व्यवसाय करतांना आलेल्या प्रचीती यांविषयीचे अनुभव कथन केले.

या तीन दिवसीय उद्योगपती साधना शिबिरात व्यापारी क्षेत्रांत काम करतांना आपल्यातील षड्रिपूंमुळे येणारा ताण आणि अपयश यांवर मात करून आनंदी कसे रहावे आणि गुरुकृपायोगानुसार साधना कशी करावी ? या विषयी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उद्योजकांना साधनेत येणार्‍या विविध अडचणी, साधनेमुळे येणार्‍या अनुभूतींचे आध्यात्मिक स्तरावरील विश्‍लेषण यांविषयी मार्गदर्शन, तसेच शंकानिरसन केले. तणावमुक्तीसाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया या विषयावर ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. स्वाती गायकवाड आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केले.

हिंदु राष्ट्र का हवे ? या विषयावर मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे म्हणाले, व्यापारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने त्याविरोधात प्रामाणिक व्यापार्‍यांनी उभे राहिले पाहिजे, तरच हिंदु राष्ट्र येऊ शकते. सामाजिक क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी उद्योजकांनी संघटित होणे आवश्यक आहे.

उद्योजकांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संशोधन कार्य, तसेच धर्मप्रसार करणारी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची संकेतस्थळे यांविषयी माहिती देण्यात आली. समारोप प्रसंगी सनातन संस्थेचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधक उद्योजकांचे संघटन या विषयावर मार्गदर्शन केले, तर हिंदु जनजागृती समितीचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे यांनी आभारप्रदर्शन केले.

 

उद्योगपतींनी व्यक्त केलेले मनोगत

१. व्यवसायासह ईश्‍वराचाही प्रसार करा ! – संजीव कुमार, देहली

संजीव कुमार

साधनेत आल्यापासून व्यवसायाची चिंता दूर झाली. साधनेमुळे केवळ व्यवसाय सुधारत नाही, तर तुमचे व्यक्तीमत्त्व सुधारते, हे अनुभवले. एकदा अयोध्या येथे जात असतांना दूरभाषवरून एका संतांना मी साधनेविषयी करावयाच्या प्रयत्नांविषयी विचारल्यावर त्यांनी जे करताय तसेच करत रहा. व्यवसायाच्या माध्यमातून ईश्‍वराचे मार्केटिंग म्हणजे साधनेचा प्रसार करणे, हेच उद्योगपतींचे कर्तव्य असते, असे सांगितले.

२. शिबिरातून साधनेसाठी नवऊर्जा मिळाली ! – प्रशांत मोरे, पुणे

प्रशांत मोरे

वर्ष २००७ ते २०१० या काळात मी साधना करत होतो. एकदा सेवेवरून परततांना माझ्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला. गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला होता. त्या वेळी गाडीतील व्यक्ती जिवंत असेल कि नाही ?, असे लोकांना वाटत होते; पण मला अपघातात साधे खरचटलेही नव्हते. साक्षात श्रीगुरूंनीच त्या वेळी माझे रक्षण केले. अडचणींमुळे काही काळ मी साधनेपासून दूर गेलो होतो; मात्र या शिबिराच्या माध्यमातून साधना पुन्हा चालू करण्याची नवऊर्जा मिळाली.

३. सनातनमुळे सत्याची बाजू कधीही सोडायची नाही, हा आत्मविश्‍वास निर्माण झाला ! – उमेश पै, कर्नाटक

उमेश पै

५४ वर्षांपासून आमचा नारळाचे आणि तिळाचे तेल बनवण्याचा पिढीजात व्यवसाय आहे. वर्ष २००० मध्ये मी सनातन संस्थेशी जोडलो गेलो. बाजारात भेसळयुक्त तेल अल्पदरात मिळत असल्याने वितरक आमच्याकडेही तशा तेलाची मागणी करायचे. सनातनमुळे सत्याची बाजू कधीही सोडायची नाही, हा आत्मविश्‍वास निर्माण झाला. भेसळयुक्त तेलाला मागणी असूनही आम्ही कधीही भेसळयुक्त तेल विकले नाही. सध्या दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये आमच्या आस्थापनाने बनवलेल्या तेलाची विक्री सर्वाधिक होते, तसेच बाजारपेठेत आमचे नावही झाले आणि व्यापारही वाढला. रामनाथी आश्रमाची आठवण काढल्यावर मनातील विचार थांबून नामजप चालू होतो. हा आश्रमातील वातावरणाचा परिणाम आहे, हे लक्षात आले.

४. गुरुदेवांचे स्वप्न साकार करणे, हीच माझी साधना आहे ! – अनंत कामत, कर्नाटक

अनंत कामत

पूर्वी माझ्यात राग येणे हा मोठा दोष होता. कर्मचार्‍यांवर तो अनेकदा व्यक्त केला जात असे. सनातन संस्थेने नामजप आणि राग दूर करण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकवल्याने आता त्यात पालट झाला आहे. जगात लाखो गुरु आहेत; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे कोणी नाही. रामनाथी आश्रमात येतांना वैकुंठात आल्याचा आनंद होतो. रामनाथी आश्रमाचे नाव घेतल्यावर नामजप चालू होऊन मन एकाग्र होते. घरात संस्थेचा एखादा कार्यक्रम झाल्यावर अनेकांना घरी आल्यावर मंदिरात आल्याची अनुभूती येते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एखादे स्वप्न साकार करायचे आहे, यातच माझी साधना आहे.

५. संतांनी आम्हाला केवळ आज्ञा द्यावी ! – रामकृष्ण पालेकर, कर्नाटक

आम्हाला काहीही करता येत नाही. संत आशीर्वाद देऊन कार्य करवून घेतात. आता संतांनी आम्हाला केवळ आज्ञा द्यावी.

 

क्षणचित्रे

१. श्री. प्रदीप खेमका यांनी म्हटलेले भावगीत आणि त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आधारित कृतज्ञतागीत यांमुळे उपस्थित सर्वांची भावजागृती झाली.

२. समारोप सत्राच्या वेळी मनोगत व्यक्त करणार्‍या उद्योजकांमध्ये देव आपल्यासाठी किती करत आहे, हा भाव असल्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात