सर्वांचा उत्कर्ष साधणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी कटीबद्ध व्हा ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मजागृती सभांच्या सत्राला गोवा राज्यातही प्रारंभ

नेवरा (गोवा) – भ्रष्टाचारी, निरर्थक आणि अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी हिंदूंवर अन्याय करणारी धर्मनिरपेक्ष लोकशाही पालटून सर्वांचा उत्कर्ष साधणारे कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्र्र’ स्थापन करण्यासाठी कटीबद्ध होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी येथे केले. हिंदु धर्मजागृती सभांच्या गोव्यातील नूतन सत्राला नेवरा येथे २६ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी श्री महालक्ष्मी मंदिरात झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेने प्रारंभ झाला. या सभेत प्रमुख वक्ता म्हणून श्री. चोडणकर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या कु. संगीता नाईक उपस्थित होत्या.

श्री. चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘आज २६/११ च्या काळ्याकुट्ट दिनाचे स्मरण होते. पाकिस्तानातून आलेल्या आतंकवाद्यांनी याच दिवशी आक्रमण केले. असा आतंकवाद कसा संपवायचा, याचे धडे आम्हाला छत्रपती शिवरायांनी ४०० वर्षांपूर्वीच दिले आहेत. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी आतंकवादाला संपवले. त्यांचे आपण वंशज आहोत. त्यामुळे येणार्‍या काळात आतंकवादाला घाबरण्याचे कारण नाही. केवळ आवश्यकता आहे ती आपल्यामध्ये छत्रपती शिवरायांसारखे धर्मतेज जागवण्याची ! असे धर्मतेज जागवून आपण ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी प्रयत्नरत राहूया.’’

कु. संगीता नाईक यांनी सनातन संस्थेने हिंदु राष्ट्रासाठी घेतलेला ध्यास; संस्थेचा राजकारणी, तपासयंत्रणा, पुरोगामी आणि बुद्धीवादी यांच्याकडून होत असलेला छळ यांविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘इतका विरोध होत असूनही ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी सनातन संस्था कार्यरत आहे. ईश्‍वराच्या आशीर्वादाने आणि संतांच्या संकल्पातून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणारच आहे. आपण सर्वांनी धर्माचरण करून या धर्मसंस्थापनेच्या या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात