उमदी (जिल्हा सांगली) येथे ‘व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन आवश्यक’ या विषयावर मार्गदर्शन !

शाळेतील उपप्राचार्य श्री. बासरगाव सर यांनी २ मासांपूर्वी सनातनचे ग्रंथ पाहिल्यावर शाळेतील मुलांवर संस्कार व्हावेत, तसेच पुढची पिढी सुसंस्कारित होऊन समाजव्यवस्था उत्तम रहावी, यासाठी मार्गदर्शनाची इच्छा व्यक्त केली होती. शाळेचे प्राचार्य श्री. होर्तीकरसर यांना भेटल्यावर त्यांनीही मुलांना मार्गदर्शन करण्यास सांगितले. दोघांच्याही मनात सनातन संस्थेविषयी आदरही जाणवला. ‘हे केवळ सनातन संस्थेच्या ग्रंथांतील चैतन्य आणि गुरूंची कृपा यांचा परिणाम आहे’, हे जाणवले. – श्री. आप्पासाहेब सांगोलकर, पंढरपूर

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. आप्पासाहेब सांगोलकर

उमदी (जिल्हा सांगली) – व्यक्तिमत्त्व विकास, सुसंस्कार आणि आदर्श जीवन यांसाठी स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्यास आपल्यातील विकार नष्ट होऊन गुणसंवर्धन होण्यास साहाय्य होते. स्वभावदोष-निमूर्लनासाठी आवश्यकतेनुसार स्वयंसूचना घेतल्यास जीवनात आमूलाग्र पालट होतो. व्यक्तीचे स्वभावदोष हेच तिच्या जीवनातील तणावाचे प्रमुख कारण आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन आणि गुणसंवर्धन करा, असे आवाहन सनातन संस्थेचे साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांनी केले.

२५ नोव्हेंबर या दिवशी येथील एम्.व्ही हायस्कूल आणि ज्युनियर महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना ‘व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्वभावदोष-निर्मूलन आणि गुणसंवर्धन आवश्यक’ या विषयावर मार्गदर्शन केले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर प्राचार्य होर्तीकर, पर्यवेक्षक खरोशी आणि उपप्राचार्य बासरगाव उपस्थित होते. या मार्गदर्शनाचा लाभ ८ वी ते १२ वी च्या १ सहस्र ४५१ विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. घनश्याम चौघुले यांनी केले.

 

क्षणचित्रे

१. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी ‘आजचा विषय आम्हाला पुष्कळ आवडला. या विषयावर १५ दिवसांतून मार्गदर्शन ठेवल्यास आम्हाला लाभ होईल’, असे मत उपप्राचार्य श्री. बासरगाव सर यांच्याशी बोलतांना व्यक्त केले.

२. काही शिक्षकांनी मार्गदर्शनानंतर उत्स्फूर्तपणे पाऊण घंटा उभे राहून शंका विचारल्या.

३. शिक्षकांनी सनातन संस्थेच्या ग्रंथांची मागणी केली.

४. मार्गदर्शनानंतर आभारपत्रे देण्यात आली.

५. श्री. आप्पा सांगोलकर यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात