हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत असल्यामुळे सनातनला लक्ष्य करण्यात येत आहे ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

नेरूळ (नवी मुंबई) येथे हिंदु धर्मजागृती सभा

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून सौ. नयना भगत, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, श्री. प्रसाद वडके

देशावर भगवा ध्वज फडकवण्यासाठी या सरकारला निवडून दिले ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

नवी मुंबई – सध्याच्या सरकारला आम्ही गहू, तांदूळ यांच्या किमती न्यून-अधिक करण्यासाठी निवडून दिलेले नाही. धर्मांधांना धडा शिकवून हिंदुस्थानात भगवा ध्वज फडकवण्यासाठी निवडून दिले आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले. २६ नोव्हेंबर या दिवशी नेरूळ येथील गावदेवी मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन होऊन या सभेला प्रारंभ झाला. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत उपस्थित होत्या. सनातन संस्थेचे संस्थापक ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या हिंदी ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. या सभेला १५० धर्मप्रेमी उपस्थित होते.

या वेळी श्री. प्रसाद वडके म्हणाले की, आता ‘सबका साथ सबका विकास’, या ऐवजी ‘धर्म का साथ और राष्ट्रप्रेमीयोंकाही विकास’ हे आम्हाला ऐकायचे आहे. हिंदू जागृत झाला असून तुमची दुटप्पी भूमिका हिंदूंच्या लक्षात येत आहे. स्वातंत्र्यानंतर मुसलमानांनी धर्माच्या आधारावर इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती केली. त्याच वेळी हिंदुस्थानात राहिलेल्या ८० टक्के हिंदूंचे हिंदु राष्ट्र व्हायला हवे होते. हिंदूंचे संत आणि हिंदुत्वाचे कार्य करणारे यांच्यावर अन्याय होत आहे. तो थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. मंदिरे हिंदूंची ऊर्जास्थाने आहेत; मात्र शासन मंदिरे कह्यात घेत आहे. मंदिरांत भ्रष्टाचार होत आहे. मंदिरांच्या भूमी लाटल्या गेल्या आहेत. या विरोधात हिंदू विधीज्ञ परिषद लढा देत आहे. चित्रपट क्षेत्रातही हिंदुविरोधी शक्ती कार्यरत आहेत. देशातील ५ राज्यांत ‘पद्मावती’ चित्रपटाच्या  प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे; मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप या चित्रपटावर बंदी घातलेली नाही, ही खेदाची गोष्ट आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत असल्यामुळे सनातनला लक्ष्य करण्यात येत आहे ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

सध्याचा काळ हिंदूंनी संघटित होण्याचा आहे. हिंदु संस्कृतीचा जागर करण्याचे कार्य सनातन संस्था करत आली आहे. समाजात हिंदु राष्ट्र समर्थक, तर दुसर्‍या बाजूला हिंदु राष्ट्र विरोधी विचारांचे लोक आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर एक असा समाज होता की, जो हा देश पुन्हा हिंदु राष्ट्र व्हावा, अशी अपेक्षा ठेवून होता; मात्र हिंदुविरोधी लोक हिंदू समाज, हिंदु धर्म आणि राष्ट्र यांना मिटवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. हिंदुत्व आणि हिंदूसंघटक हिंदु राष्ट्रासाठी समाजात जनजागृती करत आहेत. त्यांच्या विरोधात तथाकथित पुरोगामी समाजात भ्रम निर्माण करत आहेत. सनातन संस्था धर्मप्रसाराचे कार्य करत असतांना धर्मविरोधी लोक संस्थेची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत असल्यामुळे सनातनला लक्ष्य करण्यात येत आहे.

या सभेसाठी धर्माभिमानी श्री. तुषार मुखर्जी यांनी प्रोजेक्टर विनामूल्य उपलब्ध करून दिला आणि तो हाताळण्यासाठीही वेळ देऊन सेवेत सहभाग घेतला.

सभेला उपस्थित मान्यवर

नेरूळ ग्रामदेवता ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दामोदर म्हात्रे, माजी अध्यक्ष श्री. नारायण पाटील, शिवसेनेचे नगरसेवक श्री. ज्ञानेश्‍वर सुतार, शाखाप्रमुख श्री. श्रीकांत भोईर, सारसोळे गणेश मंदिर ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. कैलास पाटील, भाजपचे श्री. रमेश नरवडे, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्री. नीलेश घाग, करावेगाव येथील श्री गणेश मंदिराचे विश्‍वस्त श्री. साईनाथ तांडेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात