धर्मद्रोह्यांनी कितीही मुस्कटदाबी केली, तरी सनातन हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करणारच ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सभेत वक्त्यांच्या जाज्वल्य मार्गदर्शनासह उपस्थितांकडून हिंदु राष्ट्र स्थापनेची हाक !

• ‘जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आणि मरावे तर छत्रपती संभाजी महाराजांसारखे’ असेही हिंदूंना आवाहन !

• ३ सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, श्री. सुधाकर चतुर्वेदी, श्री. अभिजित देशमुख, अधिवक्ता संजीव पुनाळेकर

भोसरी (जिल्हा पुणे) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या मैदानावर हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून जामिनावर सुटलेले श्री. सुधाकर चतुर्वेदी, भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि समितीचे श्री. अभिजित देशमुख यांच्या जाज्वल्य मार्गदर्शनामुळे सभेतील वातावरण उत्साही आणि हिंदुत्वमय झाले होते.

हिंदूंचा सर्वनाश होतांना त्याकडे मूकपणे पहाणार्‍या राज्यकर्त्यांचा धिक्कार ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. सुधाकर चतुर्वेदी, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, टी. राजासिंह आणि श्री. अभिजित देशमुख

आज भारतात १०० कोटी हिंदू आहेत. तरीही हिंदूंची स्थिती दयनीय आहे. सत्तेत येण्यापूर्वी राजकीय नेत्यांकडून पुष्कळ आश्‍वासने दिली जातात; मात्र सत्ता प्राप्त झाल्यावर नेते धर्मनिरपेक्ष होतात. हिंदूंचा सर्वनाश होत असतांना त्याकडे मूकपणे पहाणार्‍यांचा धिक्कार आहे. तुम्ही धर्माचे रक्षण केले, तर तुम्ही सुरक्षित रहाल, हे नेत्यांनी लक्षात ठेवावे, असे सडेतोड प्रतिपादन भाग्यनगरचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ शाळेच्या मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. सभेला ३ सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदु राष्ट्राविषयी कार्य करण्याचा निर्धार उपस्थित हिंदूंनी केला. वक्त्यांचे जाज्वल्य मार्गदर्शन आणि उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांमुळे संपूर्ण सभा हिंदुत्वमय झाली होती. वारकरी आणि धारकरी यांचा संगमही सभेत दिसून आला.

 

मान्यवर वक्त्यांची ओजस्वीपूर्ण आणि जाज्वल्य भाषणे

टिपू सुलतानची नव्हे, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी
लढणार्‍यांची जयंती साजरी करा ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगण

१. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना धर्मकार्य करतांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी २ दिवस कारागृहात ठेवले, तरी काही जण नंतर धर्मकार्य सोडून देण्याचा विचार करतात. सुधाकर चतुर्वेदी यांनी मात्र निरपराध असतांना ९ वर्षे कारागृहात काढली आणि तेथून सुटल्यावरही हिंदु राष्ट्रासाठी समर्पित जीवन जगण्याचाच निर्धार केला, हे कौतुकास्पद आहे. त्यांना मी अभिवादन करतो.

२. १०० कोटी हिंदू असूनही भारत हिंदु राष्ट्र का नाही ? अखंड हिंदु राष्ट्राचे स्वप्न पहाणे, हा गुन्हा आहे का ? महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी असतांना शेजारील राज्यातून गोमांस आयात केले जात आहे. तुम्हाला कुठेही अशा प्रकारे अवैध पशूवधगृहे किंवा गोवंश हत्या होतांना दिसली, तर हिंदु जनजागृती समितीला त्वरित कळवा.

३. आज हिंदुस्थानात एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी, तर संपूर्ण देशात रोहिंग्या मुसलमानांचे संकट वाढत आहे. जोपर्यंत हिंदू संघटित होऊन याला उत्तर देणार नाहीत, तोपर्यंत हिंदू या देशात असुरक्षित आहेत. हिंदूंच्या मंदिरांवर कारवाई करणारे पोलीस-प्रशासन सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करत नाही. ख्रिस्ती मिशनरी विदेशी निधीच्या जोरावर लाखोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. ‘पहिले बात आणि नंतर लाथ’ या दोन्हीने उत्तर द्यावे. काश्मीरमध्ये होणार्‍या दगडफेकीचे उत्तर आता गोळीने देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक दगडाचे उत्तर गोळीने दिल्यावरच ही समस्या सुटेल.

४. आज आपल्या देशात एका अत्यंत क्रूर माणसाची म्हणजे टिपू सुलतानची जयंती साजरी होते. ज्याने लाखो हिंदूंचे तलवारीच्या बळावर धर्मांतर केले, त्याची कसली जयंती ? करायचीच असेल तर भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, अश्फाक उल्ला खान यांप्रमाणे जे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांची जयंती साजरी करा.

५. आज आपल्याला ‘फेसबूक’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’ यांच्या आहारी जायचे आहे कि शिवछत्रपतींच्या मावळ्यांसारखे धर्म, देश आणि समाज यांसाठी झटणारा मावळा व्हायचे आहे ? खाणे, पिणे आणि मौज करणे ही जीवनशैली सोडून द्या. प्रत्येकाने प्रतिदिन किमान एक घंटा हिंदु धर्मासाठी द्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी धर्मांधांवर १०० टक्के बहिष्कार घाला. त्यांच्याकडून कोणतीही वस्तू विकत घेऊ नका.

दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांना एकेक करून
कारागृहात टाकल्याविना स्वस्थ बसणार नाही ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अंनिसचे दाभोलकर, तसेच पानसरे यांनी त्यांच्या कार्यात प्रचंड भ्रष्टाचार केला. हत्या झाल्याने ते सुटले; पण ते जर जिवंत असते, तर नक्कीच कारागृहात असते. आता त्यांच्या कुटुंबियांना भ्रष्टाचारप्रकरणी आम्ही एकेक करून कारागृहात टाकल्याविना स्वस्थ बसणार नाही.

१. साध्वी प्रज्ञासिंह यांना ब्लू फिल्म दाखवणार्‍या परमवीर सिंह यांची आयुक्तपदासाठी चर्चा होणे, ही सरकारची वैचारिक दिवाळखोरीच आहे.

२. पुण्यात १ रुपया एवढ्या अल्प रकमेने सहस्रो एकर भूमी वाटल्या गेल्या. तेथे उत्पन्न वाढण्यासाठी सरकारने सनबर्नचे आयोजन करणे हास्यास्पद आहे.

३. मंदिरांच्या सरकारीकरणानंतर राजकारण्यांनी देवस्थानच्या सहस्रो एकर भूमी लाटल्या; मात्र त्याविषयी कुणीच बोलत नाही. हिंदु विधीज्ञ परिषदेने कायदेशीर लढ्याद्वारे ३५० एकर भूमी राजकारण्यांकडून परत मिळवली. येत्या काळात उर्वरित भूमी आम्ही परत मिळवू. मंदिरे ही धर्मसंस्थापनेची केंद्रे बनायला हवीत.

४. धर्मरक्षणासाठी लढणार्‍या हिंदूंना पोलिसांनी अटक केली आणि अटकेतील हिंदु निरपराध असतील, तर ते निरपराध आहेत; म्हणून आम्ही त्यांच्या बाजूने लढू आणि जर ते दोषी असतील, एक धर्मप्रेमी म्हणून त्यांच्या बाजूने लढू.

धर्मद्रोह्यांनी कितीही मुस्कटदाबी केली, तरी सनातन हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करणारच ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

 

हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या बाजूने आणि विरोधात २ गट आहेत. जे हिंदु राष्ट्र्राच्या विरोधात आहेत, ते हिंदु संघटनांच्या विरोधात विखारी प्रचार करतात. सनातन संस्थेविषयीही गरळओक केली जाते. हा मोठा षड्यंत्राचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप यांचे आम्ही वंशज आहोत. कोणीही यावे आणि आमचा धर्म बुडवावा, हे कदापि सहन केले जाणार नाही. मोगलांना ज्याप्रमाणे पाण्यात संताजी आणि धनाजी दिसत, त्याचप्रमाणे पुरोगामी, निधर्मीवाद्यांना नेहमी सनातन संस्थाच दिसते. मला धर्मद्रोही आणि राष्ट्र्रद्रोह्यांना सांगायचे आहे, की, कितीही मुस्कटदाबी केली, तरी सनातन हिंदु राष्ट्र्र स्थापनेचे कार्य करणारच !

हिंदु केवळ क्रांतीकारक होऊ शकतात, आतंकवादी नाही – सुधाकर चतुर्वेदी, हिंदुत्वनिष्ठ

आज ९ वर्षे कारावास आणि नरकयातना भोगूनही मी जिवंत आहे, ते केवळ सुदर्शनचक्रधारी भगवान श्रीकृष्णामुळे ! माझ्यावर जो काही अन्याय झाला, तो मी विसरून गेलो आहे; परंतु जो  भगव्या आतंकवादाचा खोटा प्रचार केला गेला, तो मला खोडून काढायचा आहे. ज्या दिवशी मी कारागृहाबाहेर पाऊल ठेवले, तेव्हाच ठरवले की, इथून पुढे केवळ हिंदु धर्माचे कार्य करायचे. हिंदु कधीच आतंकवादी होऊ शकत नाहीत, तर ते छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग आणि स्वामी विवेकानंद यांच्या सारखे क्रांतीकारी होऊ शकतात. आता माझ्या मनामध्ये कोणाविषयी द्वेषभावना नाही; परंतु आता आपण सर्व हिंदूंनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्र्र स्थापनेसाठी आपले बळ लावूया !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात